हे असं का होतं?

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

तुम्ही भारत देशात जन्म घेता, इकडे शिक्षण घेता, लहानाचे मोठे होता आणि अमुक काळानंतर बाहेरगावी जाता. तिकडे मग तुम्ही नव्याने त्या देशात स्ट्रगल करता, राहण्यासाठी- खाण्यासाठी, तिकडे तग धरण्यासाठी… एकीकडे आपल्या लोकांपासून लांब राहण्यामुळे येणाऱ्या एकटेपणाशी देखील तुमचा स्ट्रगल चालू असतोच.

तुम्हाला प्रत्येकवेळी तुमच्या देशाची आठवण होते. तुम्ही कधी एकदा भारतात परत जाताय, कधी सगळ्यांना भेटताय वगैरे स्वप्न रंगवत असता… तिकडून भारतात परत येण्याच्या कल्पनेएवढं दुसरं सुख कशात नसतं. “वुई आर गोइंग होम”, वगैरे म्हणत तुमच्या अव्वाच्या-सव्वा भावना उफाळून आलेल्या असतात.

तुम्ही दोन वर्षांनी येता, तुम्हाला भारतात थोडेफार प्राॅब्लेम दिसतात. तुम्ही चार वर्षाने येता, आधी दिसलेल्या प्राॅब्लेममध्ये सुधारणा तर दिसत नाहीच, पण अजून प्राॅब्लेम वाढलेले जाणवतात… जसजसं तुमच्या खेपा वाढतात, तसतसं तुम्हाला इकडे फक्त प्राॅब्लेमच प्राॅब्लेम दिसू लागतात. आणि सुधारणा नखभरही झालेली दिसत नाही.

देशप्रेमी लोकं तुम्हाला इकडच्या सुधारणा, इकडे झालेले चांगले बदल, किती पुल बांधले, किती शाळा उघडल्या… वगैरे वगैरेचे हिशोब देत असतात आणि ते सगळं तुमच्या डोक्यावरून जात असतं.

कारण,
गर्दी कमी होताना दिसत नसते,
प्रदूषणात नखभर कमतरता जाणवत नाही,
लोकांची मानसिकता कुठे बदललेली दिसत नाही…

दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होतानाच दिसत राहते.

पण हे असं तर शक्य नाही ना, की सुधारणा होत नाही ?
मग आपल्याला असं का दिसत असावं ? आपण आपल्याच होम-कंट्रीवर नकारात्मकतेने बोलून काही सुख मिळतं का ?
आपण हे जाणूनबुजून करतो का ? आपला काय फायदा असतो असं करण्यात ? असं केल्याने आपल्या नकळत आपल्याला सुख मिळत असेल का ?

एकेकाळी आपण इथेच राहायचो,
ट्रेनने प्रवास करायचो… सायकलवर इस्टहून वेस्टला जायचो….रस्त्यावर पाणी-पुरी खाताना निखळ आनंद मिळायचा, उत्सव साजरे करताना ना प्रदूषण जाणवलं, ना कोणाला होणारा त्रास….
मग आज का असं सगळं एकदम नकोसं वाटू लागलंय ?

आज बाहेरचं खाताना, काळजी का वाटते ?
बाहेर खाताना आज तेल कुठलं, हायजीन कसं, वगैरे पहिलं डोक्यात येतं. समोर लाल सिग्नल आहे हे कळूनही हाॅर्नवरच जणू उभी असलेली लोकं तिडीक आणतात,
गाडीतून जाताना काचा खाली घ्यायची भिती वाटते.
रस्त्यावर नुसतं दहा मिनिटं चाललं तरी आपण अंगावर-चेहऱ्यावर सव्वा तीन किलो प्रदूषणाचा-धुराचा थर घेतल्याचा भास होतो.
आधी रस्त्यावर विसर्जनात धिंगाना-नाचगाणी करताना मजा यायची, आता ते नुसतं बघणं देखील चीड आणतं.

एकेकाळी मुंबईत जायला भारी वाटायचं, तिथे आज मुंबई सारखं शहर कुरूप भासू लागतं. इकडचे समुद्र गटरासारखे भासू लागतात. इकडच्या बिल्डींग्स खपल्या पडलेल्या, रंग उडालेल्या, काळ्याकुट्ट-प्रदुषणाचा थर चढलेल्या दिसतात. कुठल्या तरी जुनाट शहरांत आल्यासारखं वाटतं.

हे सगळं, एकूणच येवढं विचित्र वाटतं की, आपण इकडेच राहायचो, हे सगळं करायचो… यावर विश्वास बसेनासा होतो.

पण मग येवढं सगळं असून का इकडे यावसं वाटतं ?
येवढ्याच पैशांत तिकडचीच सुंदर शहरं नाही का फिरता येणार ? प्रत्येक सुट्टी इकडे का वाया घालवायची ?
आणि मग इथे प्रॅक्टिकल-इमोशनल द्वंद्व चालतं. ज्यात इमोशन्स भाव खाऊन जातात. कितीही प्रॅक्टिकल गप्पा मारल्या, तरी काही केल्या इकडची नाळ तुटत नाही.
भले शिव्या देऊन राहायचं, पण यायचं. “तुझ्याशी पटेना-तुझ्याविना करमेना”, अशी गत होते.

विचित्र म्हणजे, काही गोष्टी बघून, ‘लोकं इथे कसं काय राहत असतील’, असंही मनात येतं.
कदाचित अज्ञानात सुख वगैरेसारखं,
‘जे आहे ते चांगलं चालू आहे….’

एक प्रकर्षाने जाणवतं की,
जसं डासांना रोजरोजच्या कछवा-छाप किंवा ऑल-आऊटचा त्रास होत नाही, ते त्याला इम्युन झालेले असतात…
तसं इकडचे लोक प्रत्येक समस्येला-वैतागाला-त्रासाला “इम्युन” झालेत.

Previous articleपहिली गं भुलाबाई देवा देवा साजे !
Next articleवेश्याव्यवसाय इतर व्यवसायांसारखाच, हे मान्य केले पाहिजे !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.