शांताबाई किर्लोस्कर: परिवर्तनवादी विचारांना बळ देणारी कलाप्रेमी संपादक

-डॉ . मोहना कुलकर्णी

‘किर्लोस्कर’ ‘स्त्री’ ‘मनोहर’ या मासिकांच्या माजी संपादक व ख्यातनाम उद्योगपती मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या जीवनसाथी दिवंगत शांताबाई किर्लोस्कर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने त्यांच्या कन्या डॉ. मोहना चंद्रशेखर कुळकर्णी यांनी जागवलेल्या आठवणी.

……………………………………………………………..

प्रिय आईस,

तसं पाहिलं तर जगातल्या सगळ्या आया आपल्या मुलाला प्रेम, माया, कुटुंबानुसार शिस्त-वळण लावत असतात, आणि कुवतीनुसार संस्कार करत असतात. तूही हे सर्व मला दिले आहेसच, पण त्याहूनही बरेच अधिक तू मला दिले आहेस. म्हणून त्याबद्दल आई, थैंक यू ! त्यामुळे तुझं आज या जगात नसणे , हे पचविणे जडच जातं . प्रत्येकवेळी तुझी आठवण आली की तुझ्या हजारो आठवणी मनाभोवती फेर घालतात. माणसाला भावनिक, मानसिक आधार देऊन उभी करणारी अनेक नाती असतात. त्यातील रक्ताची नाती फार मोठी भूमिका बजावतात. दुर्दैवाने तुला ह्या नात्यांचे कोणतेच पाठबळ मिळाने नाही. तुझे वडील (कै. रामचंद्र वैद्य) तू तीन महिन्यांची असतांना वारले. भावंडे नाहीतच. आई (कै. आनंदीबाई) तू कॉलेजमधील अठरा वर्षांची कोवळी मुलगी असतांना स्वर्गवासी झाली. तुझ्या आजोळच्या घराने तुला भक्कम आधार दिला. आजही त्या ‘भट’ कुटुंबियांच्या नात्याची वीण घट्ट राहिली आहे, ती तू त्यांच्याशी किर्लोस्करांची सून’ झाल्यावरही ठेवलेल्या आपुलकीच्या व जवळकीच्या प्रेमसंबंधामुळेच. सख्खी नाती नसल्यामुळे इतर नात्यांमध्ये येणारा कोरडेपणा, तुटकपणा तुझ्या वागण्यात कधीच नव्हता, तुझे दोन मानलेले भाऊ कै.रा. र.देशमुख व कविवर्य कै. वसंत बापट यांना तू न चुकता राखी बांधत होतीस, तीही घरी हातावर बनविलेली रेशमाची! निमित्त काहीही असो तू विचारपूर्वक दिलेल्या भेटवस्तू मधून त्या व्यक्तिबद्दलचा तुझ्या मनातला जिव्हाळाच व्यक्त होत असे. मग ती मालूआत्याला दिलेली भाऊबिजेची साडी असो, मंगला मराठे मानसकन्येला दिलेली घरगुती उपयोगाची वस्तू असो, विद्याताई बाळांसाठी चाफ्याची फुले असोत, कै. प्रभाकर उर्ध्वरेषेसाठी आणलेले एखादे पुस्तक असो, नाहीतर माझ्या आजीसाठी आणलेला नक्षीदार बटवा असो! माझी आजी (कै. पार्वतीबाई किर्लोस्कर ) खरं म्हणजे प्रेमळ, सुगरण पण तितकीच हट्टी आणि तापट. मात्र एखाद्या शहाण्या समजूतदार सुनेने अशा सासूशी कसे वागावे याचा वस्तुपाठच आई तू मला लहानपणी दिलास. माझे आजोबा (कै. शंकरराव) यांची तू इतकी लाडकी होतीस की कधीकधी मालूआत्या (प्रा. मालती किर्लोस्कर ) “तुम्हाला मुलीपेक्षा सुनेचे कौतुकच जास्त!” असे लटक्या रागाने त्यांना म्हणत असे.

 पाठ्यपुस्तकात रंगविलेल्या ‘आई’ सारखी तुला मी स्वयंपाकघरात ओट्यापाशी उभी असलेली फार थोड्यावेळा पाहिली आहे. पण स्वयंपाक करणा-या काकूबाईंना ज्या महत्त्वाच्या व बारकाईच्या सूचना तू बाहेरुन करत असे त्याने तो पदार्थ मात्र छान झालेला मी अनेकदा चाखला आहे. घरामध्ये तुला सतत काही तरी काम करतानाच मी पाहिले आहे. रिकामी बसलेली तू मला आठवतच नाहीस. एकीकडे लेखन, वाचन, भाषण, परिसंवादाची तयारी, पाहुण्यांचे आदरातिथ्य, प्रवास, सभा, मेळाव्यांचे आयोजन, भेटायला येणारी माणसं, कुटुंबातले समारंभ, आजारपण हे सर्व चालू असतांना तू मला रांगोळी घालायला, कशिदा विणायला, मशीनवर कपडे शिवायला, संक्रांतीचा बदाम, लवंग, काजूवरचा काटेरी हलवा करून छोट्या जरीच्या पिशव्या बनवायला, पोहणे, सायकल चालवायला, रामरक्षा, भीमरुपी, गीताई आणि मनाचे श्लोक कधी आणि कसे शिकवलेस,हे आठवून अचंबा वाटतो!

घरातील नोकर वर्गाशी तुझे नाते ममत्त्व आणि दरारा असे दुहेरी होते, आणि अतिशय खुबीने त्याची सरमिसळ करुन तू त्यांना सांभाळले होतेस. वर्षानुवर्ष घरी राहणारे नोकर हे केवळ त्यांना मिळणाऱ्या आपलेपणाच्या बरोबरीच्या व सन्मान्य वागणुकीमुळेच टिकले होते. याबाबतीची तुझी एक गोष्ट मला फार विशेष वाटते, ती म्हणजे ‘गोष्ट पासष्टीची’ या तुझ्या पुस्तकात आपल्या घरी जवळ जवळ चाळीस वर्षे काम करणाऱ्या कोकणातल्या विठू (कै. विठ्ठल आग्रे) या गड्याचा उल्लेख तू माझा ‘विश्वासू साहाय्यक’ असा केला आहेस व त्याचे ऋण नोंदविले आहेस. You are great Aai!जातपात, धर्मभेद, उच्च-नीच, शिवाशिव या गोष्टी आई तू मला कधी शिकविल्या नाहीस, त्यामुळेच शाळेत सातवी-आठवीत असतांनासुद्धा मला ‘तुम्ही कोण?’ असा जातीवाचक संदर्भ असलेला प्रश्न विचारल्यावर मी भोळसटासारखे ‘आम्ही किर्लोस्कर’ असे उत्तर दिले होते! आपली जात-पोटजात कोणती ? हे खरोखरच मला माहित नव्हते आणि आजही मला ते आवश्यक वाटत नाही, इतके हे विचार तू खोलवर रुजवले आहेस.

आज माझ्यात असणारा निर्भयपणा आणि आत्मविश्वास, तू अनेक बन्यावाईट प्रसंगांना सामोरी जात असतांना तुझी जी मनोभूमिका मला जाणवत होती त्यातून आला आहे, असे मला वाटते. मी तुमची तिसरी मुलगी म्हणून मला जशी कोणतीच मुलगा न झाल्याची- अपेक्षाभंगाची वागणूक मिळाली नाही तशीच किर्लोस्करांची मुलगी म्हणून कोणतीच विशेष वेगळी सूट किंवा सवलत मला मिळाली नाही. घराबाहेर पडल्यावर सामान्य माणसारखे सायकल किंवा पी.एम.टी. बसने प्रवास करणे, स्वावलंबन व प्रसंगावधान ठेवून आपले प्रश्न आपण सोडविण्याची सवय आई तू मला लावलीस.मी मुलगी असूनही आचार विचाराचे स्वातंत्र्य तू मला नेहमीच दिलेस. मग ते एखाद्या कार्यक्रमासाठी कोणता फ्रॉक घालायचा, मॅट्रिक झाल्यानंतर होस्टेलमध्ये राहण्यासाठी पुण्याबाहेर जाण्याचा निर्णय किंवा अगदी स्वतःचा जोडीदार निवडण्याचे सुद्धा! आई, फक्त दोन गोष्टींबद्दल तू माझ्या बाबतीत आग्रहीपणा आणि ठामपणा दाखविलास. एक म्हणजे ‘गाणे शिकलेच पाहिजे’ आणि दुसरे ‘डॉक्टर झालेच पाहिजे’ आणि खरं सांगू आई या दोन्ही गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात खूप स्थैर्य, सन्मान मिळाले आणि त्यामुळे आज मी खूप आनंदात समाधानी आहे, थँक यू सो मच् आई !….

तुझे आत्मभान आणि आत्मसन्मान सजग असल्याने ‘मला काय हवे आहे’ आणि ‘त्यासाठी मी काय करणार आहे’ या विषयीच्या निश्चित विचारांचे नियोजन तुझ्याजवळ होते . त्यामुळेच वयाच्या ४५ व्या वर्षी तू वृत्तपत्रविद्या पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण केलास. एखाद्या प्रामाणिक कॉलेज विद्यार्थिनींप्रमाणे तू त्या वर्गांना नियमित हजेरी लावलीस , अभ्यास केलास आणि आक्काच्या लग्नाच्या आधी २ दिवस तू परीक्षेचे पेपर्स दिलेस. आई, तू आम्हा तिघींना घेऊन इंदौर माळवा विशेषांकासाठी प्रवास केला होतास. तेव्हा एकदा रेल्वे स्टेशनवर (बहुदा खंडवा) एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातांना तुझी शेळी, वाघ आणि गवताच्या भाल्यासारखी स्थिती झाली होती. सामान आणि तीन मुली यापैकी कोणाला कुठे ठेऊ आणि कोणाला घेऊन जाऊ असे झाले होते. आम्हीही तुझ्याच मुली असल्याने (वय वर्षे ४-९ आणि ११) प्रसंगाला योग्य रितीने तोंड दिले! तू एकटीने केलेल्या जगप्रवासाची तयारी सुद्धा मी पाहिली आहे. पूर्व आशियातून सुरु झालेला तुझा प्रवास रशियातून संपला होता.

आई, तू सुरु केलेले अनेक उपक्रम, आयोजिलेले अनेक समारंभ एका वेगळ्याच वैशिष्ट्यपूर्ण शिस्तीत पण तितकेच भावपूर्ण व सुंदर रितीने प्रत्यक्षात उतरत असे व परिणामकारक काम करत असे. याचे कारण त्याचे अति काटेकोरपणे व तपशीलात जाऊन केलेले नियोजन. कधी कधी अतिशय छोट्या, बिन महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टीचाही अंदाज करुन विचारपूर्वक पूर्वतयारी करणे यात तुमचा (आई तू आणि ती. दादा) यांचा हात कोणी धरणार नाही! आई, तू खरं म्हणजे अगदी कोकणस्थी घारी- गोरी आणि वागणे बोलणे No Nonsense या पद्धतीचे! अतिशय रॅशनल-विवेकी पण कठोर तर्कट नाही. त्यात नेहमीच एक भावनिक ओलावा व कन्सर्न जाणवत असे. छोटीशी चिठ्ठी, पोस्टकार्ड, पत्र काहीही लिहितांना रंगीत स्केचपेननी काढलेले कोपऱ्यातले लहानसे चित्र तुझ्या मनाची प्रसन्नता त्या व्यक्तीपर्यंत पोचवत असे. माझे पती डॉ. चंद्रशेखर यांच्या आईच्या अकाली निधनानंतर जेव्हा जेव्हा तू त्याला पत्र लिहिलेस तेव्हा शेवटी सही ‘मोनाई’ अशी करायचीस, आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. तरीही एक आश्वासक असा आधाराचा हात तू त्यांच्या पाठीवर नेहमी ठेवला होतास. तुझ्या मनाचा हळूवारपणा तू मला दिलेल्या पहिल्या साडीतून जाणवला, १७ सप्टेंबरला तुझ्या आईचा स्मृतिदिन आणि अशाच एका १७ सप्टेंबरला मी ‘मोठी’ झाले. त्या दिवशी कौतुकाने मला मोरपंखी रंगाची साडीची घडी मोडून नेसायला दिलीस व आजीच्या फोटो समोर उभे राहून नमस्कार करतांना खरोखरच ‘मोठी हो’ असे म्हणाली होतीस. मी तशी झाले की नाही ठाऊक नाही! आई तू डोंगराएवढे काम केले आहेस. मी तर आत्ता कुठे टेकडीचा चढ चढायला सुरुवात केली आहे. पण समोर डोंगराएवढे काम आपली वाट पहात आहे या सामाजिक बांधिलकीची जाणीव आई तू मला दिलीस त्याबद्दल मनःपूर्वक थँक्स .

आई तुझी कलासक्त नजर आणि सौंदर्यदृष्टी रोज दिवाणखान्यात तू केलेल्या पुष्परचनेतून दिसे. मला आठवते, इंडो-जॅपनिज् असोसिएशन कडून आपल्या घरी दरवर्षी कॅलेंडर येई आणि त्यात सुंदर सुंदर इकेबान पद्धतीच्या पुष्परचना असत त्यासाठी वेगवेगळ्या फुलदाण्या, काट्याचे स्टॅन्ड तू आणून ठेवले होतेस. फुलांची रचना करणारे तुझे हात कधी कधी लोकरीच्या वेगवेगळ्या वीणी घालून स्वेटर्स, टोपडी, मोजे करण्यात गुंतलेले असत. परवा तुझ्या कपाटातली जुनी पुस्तकें काढतांना सापडलेले विणकामाचे नमुने आणि पुस्तकें। त्याची साक्ष आहे.

गाणे हा तुझा विक पॉईंट होता. आज नावरुपाला आलेल्या कित्येक मोठ्या कलावंतांची पहिली बैठकआपल्या घरी झालेली आहे. गाणं शिकण्याची तुझी तीव्र इच्छा होती. तुझ्या अनेकविध कामांमधून आठवड्यातून ३-४ दिवस तू गाण्यासाठी १ तास वेळ देत होतीस. कित्येकदा बिचारे शिक्षक तुझी वाट पाहून चहा पिऊन परत जात, पण तुझी गाणं शिकण्याचे आस कमी झाली नाही. कित्येक रागांची लक्षणे गीत आणि जुन्या सुंदर चीजा तू मला इकडे अमरावतीत आलीस की लिहून देत होतीस. लहानपणी आपल्या मोटर प्रवासामध्ये माझी सिनेमाची गाणी आणि तुमची जोत्स्ना भोळेंची, गजाननराव वाटव्यांची गाणी, बालगंधर्व आणि मास्तर कृष्णांची नाट्यगीतं नाहीतर पद्माताई (गोळे) किंवा संजिवनी मावशी (मराठे) च्या कवितांचा समावेश असे.

प्रवास तर आई मी तुझ्या बरोबर खूप केला अगदी काश्मिर ते कन्याकुमारी आणि कारवार ते कलकत्ता. विशेषतः आक्का (इरावती पुसाळकर) व ताई (विद्या गोगटे) यांची एक वर्षात पाठोपाठ लग्न झाल्याने, मला एकटीला ७ वी ते ११ वी अशी ५ वर्षे माझ्या त्या संस्कारक्षम वयात तुमचा खूपच परिणामकारक सहवास मिळाला.माझी वाचनाची-पुस्तकांच्या संग्रहाची आवडही आई तू अशीच जोपासलीस. मला आठवते कारले- भाजे येथे एक लेखिका मेळवा झाला होता, त्यावेळी लहान मुलांच्या पुस्तकांची छोटी वाचक म्हणून कै. लीलाताई भागवत यांनी माझी मुलाखत घेतली होती. आज भा.रा. भागवतांचा ‘फास्टर फेणे’ जो नव्या रुपाने बाजारात आला आहे तो त्या काळातला ‘हॅरी पॉटर’ होता. आणि मी त्याची फॅन होते. खास माझ्यासाठी घरी ‘मार्मिक’चा अंक माझ्या नावे वर्गणी भरुन येत होता.

जीवनातले विविध रंग, ढंग, अंग मी अनुभवावेत म्हणून तू मला आकाशवाणीवरील ताई (सई परांजपे) आणि नाना (गोपीनाथ तळवलकर) यांचे सोबत बालोद्यानमध्ये भाग घ्यायला लावलास, नाशिकच्या ऐन दिवाळीच्या थंडीत भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाठविलेस, जिजीच्या पाककलेच्या पुस्तकाचे प्रकाशन समारंभाचे संपूर्ण नियोजन मला करायला लावलेस, रोज सकाळी दारात रांगोळी घालायचे काम माझ्याकडे दिलेस. तू माझा गृहपाठ वगैरे कधी घेतल्याचे मला आठवत नाही. फारतर जेवणाच्या टेबलावर एखाज्ञा निबंधाच्या विषयावर चर्चा नाही तर कवितेचं रसग्रहण होत असे.

तुमच्याबरोबर सवाई गंधर्वांचा महोत्सवातील अनेक बैठकींना आणि साहित्य संमेलनात मी हजेरी लावली आहे. घरी येणारे देशी, विदेशी पाहुण्यांच्या भेटी आणि ‘किर्लोस्कर’ ‘स्त्री’ ‘मनोहर’च्या या ४००/५०० व ६०० व्या अंकासाठीची लगबग मी पाहिली आहे. पानशेतचा पूर नाहीतर कोयनेचा भूकंप असो या घटनांबाबतच्या तुमच्या क्रिया-प्रतिक्रिया किंवा एखाद्या सामाजिक राजकीय घडामोडींबद्दलची तुमची व्यक्त झालेली मते या सगळ्यातून मला काही ना काही शिकायला मिळत होतं. आई तुझ्याबरोबर बँक, पोस्ट ऑफिस, सरकारी किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये हिंडण्यामुळे मला अशा कार्यालयीन कामाचे दडपण कधीच वाटले नाही. कारण तू बहुतेक ठिकाणी थेट साहेबांना जाऊन भेटत होतीस आणि पटकन काम होऊन जाई.

‘मी मुकुंदराव व शांताबाई किर्लोस्करांची मुलगी’ अशी माझी ओळख आज जेव्हा मी अभिमानाने करुन देते तेव्हा तुझ्या सुजाण पालकत्त्वाबद्दल मन कृतज्ञतेने भरुन येते. तुझ्या या पालकत्त्वाचा अनुभव माझ्या मुलीच्या (चि.डॉ.प्राजक्ताच्या) वाट्यालाही आला हे तिचे भाग्य ! मी डॉक्टर व्हावे हा जसा तुझा आग्रह होता तसेच ‘तू पुढे शीक, मी तुझे मूल सांभाळेन’ हा तुझा पाठिंबा मला फार मोलाचा होता. प्राजक्ता चार महिन्यांची असतांना पुण्यात तुझ्याजवळ सोपूवन मी निश्चित मनाने एम.डी. करु शकले. थैंक यू व्हेरी मच आई!

तुझ्या देवपूजेमागची भूमिका तर मला कितीतरी मोठी होईपर्यंत समजलीच नव्हती! खरं म्हणजे आपल्या घरात एक दहा इंच बाय दहा इंच अशा फळीवर ठेवलेला लंगडा बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा म्हणजे आपले देवघर होते. उपासतापास, व्रतवैकल्य, कर्मकांड, पूजा, अभिषेक, होमहवन, सवाष्ण, प्रसाद, कुळाचार इ. शब्द मला परीकथेतल्या अगम्य गोष्टीसारखे वाटत, पण तरीही तू मात्र सकाळी न्याहरीला टेबलावर येण्यापूर्वी स्नान करुन देवासमोर दिवा लावून फुले वाहूनच यायचीस. तुझा ‘सश्रद्धपणा’ यातून मला जाणवायचा. ती श्रद्धा होती या सृष्टीतील अगाध शक्तीवर, जी या जगामध्ये प्रत्येक माणसाला चांगलं काम करण्याची शक्ती देते. आणि म्हणूनच रुढी परंपरेनुसार तुझे ‘दिवस’ वगैरे आम्ही केले नाहीत. माझ्यापुरतं सांगायचं तर, मी तुझ्या तेरवीच्या दिवशी एका महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थिनींची विवाहपूर्व मार्गदर्शनाची कार्यशाळा घेतली. समुपदेशनाचे मी सुरु केलेले काम पहायला, समजायला आणि कौतुक करायला आई तू नाहीस, पण ते पूर्ण तयारीनिशी, मनापासून आणि सातत्याने करण्याचे बळ मात्र आई तूच देते आहेस, तुझे किती आभार मानू ?

अगदी थोडक्यात सांगायचे तर आई, तुम्ही ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ मासिकांमधून काळाच्या पुढे नेणारे परिवर्तनाचे जे विचार समाजाला दिलेत, ते मी आपल्या घरात दिवस रात्र प्रत्यक्षात जगत होते. संपूर्ण दशकभर चाललेले आंतरराष्ट्रीय स्त्री मुक्ती चळवळीचे वारे आपल्याही घरात वहात होते पण अतिरेकी स्वातंत्र्याच्या कल्पना आणि व्यक्ती स्वातंत्र्य याची सीमारेषा मला आतून उमजली. विविध कला गुणांची ओळख व त्यातून आनंद घेण्याची मनाची भावनिक गरज पूर्ण करायला तू मला उत्तेजन दिलेस. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात होत जाणारे लहान मोठे बदल आणि त्याचे होणारे बरे वाईट परिणाम यांचे स्वागत करतांना व स्वीकारतांना तारतम्य बाळगण्याचे भान आई तू मला दिलेस.

 आई तू सर्व सामान्य चार चौघींसारखी आई नक्कीच नव्हतीस मात्र तुझे वेगळेपण आत्ता शब्दात मांडतांना मीच कमी पडते आहे असे मला राहून राहून वाटते आहे, पण मी जशी आहे तशी घडवण्याबद्दल थैंक यू आई……

तुझी

मोहना

(लेखिका स्वानंद समुपदेशक केंद्र , अमरावतीच्या संस्थापक आहेत)

9823072992

.
Previous articleअर्धशतकी मोबाईल क्रांती
Next articleविदर्भ महाविद्यालय झाले १०० वर्षाचे !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.