गजानन घोंगडेंच्या व्यंगचित्रकलेची ३१ वर्षे!

नामवंत व्यंगचित्रकार, कॅलिग्राफर, ग्राफिक डिझायनर, स्टॅन्ड अप कॉमेडीयन, लेखक  गजानन घोंगडे यांच्या व्यंगचित्रकारिता प्रवासाला आज  ३१ वर्ष झालीत . यानिमित्ताने त्यांनी कलेच्या क्षेत्रातील आपला प्रवास , प्रवासादरम्यानचे खाचखळगे, वेगवगळे चांगले-वाईट अनुभव शब्दबद्ध केले आहेत . कलेच्या क्षेत्रात धडपड करणाऱ्या नवीन कलावंतांसाठी हे अनुभव, हा प्रवास खूप काही सांगून जाणारा आहे. – संपादक 

…………………………………………….

गोष्ट असेल १९८९ ची. तेव्हा मी स्कूल ऑफ आर्ट नागपूरला शेवटच्या वर्षाला होतो. त्याच दरम्यान भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ होऊ घातली होती. ‘मिस्टर क्लीन’ अशी प्रतिमा असणाऱ्या राजीव गांधींच्या विरोधात व्ही. पी. सिंग या त्यांच्याच सरकार मधल्या अर्थमंत्र्यांनी मोठी आघाडी उघडली होती. बोफोर्स तोफेच्या व्यवहारात राजीव गांधी यांनी दलाली खाल्ल्याचा आरोप त्यांनी केला होता ( जो आज पर्यंत सिद्ध झाला नाही. ) आणि त्या जांगडबुत्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांना गोवलं होतं. या राजकीय गदारोळाकडे माझं लक्ष जायला एक दुसरी पार्श्वभूमी कारणीभूत होती ती म्हणजे वडिलांच्या वाचनाच्या सवयीची.

माझे वडील डॉक्टर जगन्नाथराव घोंगडे यांना तत्कालीन परिस्थिती वर टिप्पणी करणारे आणि त्यांची माहिती देणारे माया, इंडिया टुडे, धर्मयुग, साप्ताहिक हिंदुस्तान, साप्ताहिक दिनमान, लोकप्रभा अशी राजकीय वजा सामाजिक विषयांवर भाष्य करणारी साप्ताहिकं, मासिकं, पाक्षिकं आमच्याकडे नियमित येत असत. याव्यतिरिक्त वृत्तपत्र होतीच, रेडिओवरच्या बातम्या ही होत्या, त्या सगळ्यांची वडिलांच्या सोबतीने मला ही आवड लागली होती, मीही ते वाचू लागलो होतो. अगदी लहानपणापासूनच मला शरद पवार, हेमवतीनंदन बहुगुणा, मधु लिमये, जयप्रकाश नारायण, वसंतदादा पाटील अशी त्याकाळची राजकीय क्षेत्रातली नावे आणि त्यांची व्यक्तीमत्वे माहीत होती.

अगदी सुरुवातीच्या काळातील व्यंगचित्र

शरद पवारांनी त्यावेळी विधानभवनावर ‘शेतकरी दिंडी’ काढली होती ती वृत्तपत्रात बरीच गाजली होती. तो पूर्ण घटनाक्रम मी कागदाच्या पट्टीवर काढला आणि एका डब्यात दोन काड्या टोचून त्याला तो कागद चिटकवला, त्या डब्याचा एक भाग कापला, दोन काड्या मधली एक गाडी फिरवली की डब्या च्या कापलेल्या भागातून एकेक घटना पुढे – पुढे सरकायची. अशा प्रकारची बरीच खेळणी त्यावेळी मिळायची त्यावर नटनट्यांची, देशातल्या सुप्रसिद्ध स्थळांची चित्र राहायची ते असंच पुढे – पुढे सरकवत पाहायला लागायचं. चाळिशीत किंवा पन्नाशीत असणाऱ्या बऱ्याच मंडळींना हे माहित असेल. त्यावेळी शरद पवारांच्या पक्षाचं ‘चरखा’ हे चिन्ह होते. मी त्यांना पत्र लिहिले होते, की तुम्ही हे चिन्ह आगपेटीवर छापा म्हणजे आपोआप तुमचा प्रचार होईल.

आई -बाबा

या सर्व गोष्टींना माझे वडील प्रोत्साहन द्यायचे. त्यांच्याशी मी ह्या सर्व विषयांवर चर्चा ही करायचो. तात्पर्य काय वडिलांमुळे, वेगवेगळ्या मासिकं, साप्ताहिकं यामुळे माझी राजकीय समज हळूहळू वाढत होती. जसा – जसा मी मोठा होत गेलो तसा – तसा वडिलांशी मी तास – तासभर  या विषयांवर गप्पा मारायचो. त्या गप्पांमधून केवळ राजकीयच नव्हे तर माझ्या इतरही जाणिवा समृद्ध झाल्या. त्यामुळेच मी कधी शारीरिक व्यंगांवर, जाती-धर्मावर व्यंगचित्रे काढली नाहीत. (त्यांच्याकडून मी काय शिकलो तो एक स्वतंत्र विषय आहे. त्यावर पुन्हा कधीतरी लिहीन)

नाऊ ओव्हर टू नाईंटीनएटी नाईन…

राजीव गांधी, व्ही. पी. सिंग अँड अमिताभ बच्चन !

व्ही. पी. सिंग यांनी सगळं वातावरण ढवळायला सुरुवात केली होती. कारण नसताना त्यांनी अमिताभला गोवल्यामुळे मी त्यावर एक लेख लिहिला. ही नागपूरला असतानाची गोष्ट आणि तो पोस्टाने वडिलांना पाठवला, त्यावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. पुढे अकोल्यात आल्यावर ते मला म्हणाले, ‘तुम संपादक नही हो ! तुम्हारा हथियार कुची है, कलम नही !कु्ची का कमाल दिखाओ !’

तेव्हा मला व्यंगचित्र काढणं फारच अशक्यप्राय गोष्ट वाटायची (त्यावेळेस आमच्या कॉलेजला इरफान हुसेन नावाचा एक विद्यार्थी होता, तो मला दोन-तीन वर्ष सिनियर होता ,तो तेव्हाच सॉलिड व्यंगचित्र काढायचा. त्याचं थर्ड इयरला असताना प्रदर्शन सुद्धा भरलं होतं. मी त्याच्याशी उगाचच व्यंगचित्रांवर बोलायचो. मला त्याचं फार कौतुक वाटायचं. पुढे तो दिल्लीत एका मोठ्या वृत्तपत्रात गेला नंतर कार चोरणाऱ्या टोळीने फक्त कार साठी म्हणून त्याचा खून केला, नाहीतर आज इरफान हुसेन देशातला एक मोठा व्यंगचित्रकार असता.) नंतर मी परीक्षेत गुंतलो, त्या काळी आमच्या कॉलेजला असणाऱ्या विकृत मानसिकतेच्या प्राध्यापकांनी त्यांना नावडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नापास केलं… त्यात एक मीही होतो.

आधीचे तीन वर्ष मला नागपूर विद्यापीठ मेरिट स्कॉलरशिप देत होतं आणि चौथ्या वर्षी मी थेट नापास झालो होतो. ‘मेरे लहजे में जी हुजूर न था, वरना मेरा कोई कुसूर न था।’ असं एकूण प्रकरण होतं. आम्ही कॉलेजमध्ये त्यावरून आंदोलन वगैरे केलं. त्या प्राध्यापकांची बदली झाली, विद्यापीठाने एका बिनडोक आणि विचित्र तडजोडी मध्ये काही ग्रेस मार्क देण्याचे ठरवले. आमच्या आदरणीय प्राध्यापकांनी माझ्या वरच्या अतिव प्रेमामुळे मला दोन – तीन विषयात दहा – वीस असे मार्क दिले होते, त्यामुळे मी नापासच राहीलो. बडोद्याला जाऊन तिथल्या सयाजीराव गायकवाड स्कूल ऑफ आर्ट मध्ये पीजी वगैरे करायच्या माझ्या स्वप्नांची पूर्ण माती झाली होती. मी अकोल्यात आलो आता सप्लीमेंट्री शिवाय पर्याय नव्हता. तोपर्यंत व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले होते मासिकं, वर्तमानपत्र वगैरे वाचून हा माणूस शुद्ध राजकारणी आहे आणि अतिशय नाटकी आहे हे माझं मत झालं होतं. पुढे त्यांनी गांधीजीं सारखे फोटो काढून ते सिद्धच केलं. राजीव गांधी यांनी बोफोर्स प्रकरणात लाच खाल्ली असून आपण पंतप्रधान झाल्याबरोबर ते सिद्ध करू असं त्यांनी जाहीर केलं होतं मात्र पंतप्रधान झाल्यानंतर महिनाभरात स्वीडन सरकारने आपल्याला नाव सांगायला मनाई केली आहे असं सांगून त्यांनी हात झटकले. भारतासारख्या देशाच्या पंतप्रधानांनी काय करावे नी काय करू नये, हे स्वीडन सारखा छोटासा देश कसे काय सांगू शकतो हे मला कळेना. त्यावर मी पहिला व्यंगचित्र रेखाटले, ‘चित भी मेरी…पट भी मेरी…! ते काढून मी चुपचाप मातृभूमी दैनिकात तेव्हाचे संपादक स्व कमलकिशोरजी बियाणी यांच्या टेबलवर ठेवून आलो, ते छापून आलं आणि मग मी व्यंगचित्र काढण्याचा सपाटाच लावला.

त्यावेळेस देवीलाल वगैरे प्रभूती राजकारणात होत्या त्यांनी व्हीपींच्या नाकातोंडात पाणी घालणं सुरू केलं, वर्षा दीड वर्षांने ते सरकार पडलं मग चंद्रशेखर पंतप्रधान झाले. दरम्यान मला ‘देशोन्नती’ ने नोकरीची ऑफर दिली. वडील सेवानिवृत्त व्हायला आलेले आणि मी नापास रिकामा बसलेला, म्हणून मग मी देशोन्नतीची आठशे रुपये  पगाराची नोकरी स्वीकारली.  ‘देशोन्नती’मध्ये मी व्यंगचित्र काढण्याबरोबरच पुरवण्यांची आखणी, जाहिरातीचे डिझाईन, ३ – ४ कॉलम लिहिणे असं बरंच काही करायचो. हळूहळू माझी व्यंगचित्रे लोकप्रिय होऊ लागली त्याचे ‘साईड इफेक्ट’ झाले आणि मी त्र्याण्णव साली नोकरी सोडली.

थोरल्या भावाच्या मित्राच्या दुकानात माझं ऑफिस थाटलं. घराण्यात यापूर्वी कोणी व्यवसाय केला नव्हता, मी कुठे काम नाही केलं नव्हतं, डिझाईन चे किती पैसे घेतात हे ही मला माहीत नव्हतं, एकूणच चित्रकलेचा व्यवसाय करायला मी ठरवलं खरी पण त्याचा शून्य अनुभव माझ्या गाठीशी होता. व्यंगचित्रकार म्हणून माझं झालेलं नाव ही माझी एकमेव जमेची बाजू होती. मार्गदर्शनासाठी म्हणून काही ज्येष्ठ मंडळींना मी भेटलो तर त्यांनी तुझा रियाज नाही, तुला प्रसिद्धीमुळे ‘ग’ ची बाधा झाली आहे, इतकं सोपं नसतं हे… अशा शब्द सुमनांनी माझं स्वागत केलं. मग काय, ‘खुद ही रोये और खुद ही आसूँ पोछे’ असं करत करत व्यंगचित्र आणि ग्राफिक डिझाईन दोन्ही क्षेत्रात मार्गस्थ राहिलो. देशोन्नती बरोबरच इतरही अनेक वृत्तपत्रं, मासिकं, साप्ताहिकं ह्यात व्यंगचित्र प्रसिद्ध होत गेली.

एक निरीक्षण इथे सांगतो मी कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा काँग्रेस विरोधात सर्व अशी विभागणी होती म्हणजे व्ही. पी. सिंग यांना चक्क कम्युनिस्ट आणि भाजपा अशा दोघांनीही पाठिंबा दिला होता. वडील असतानाच हे चित्र बदलू लागलं होतं आता भाजपा विरुद्ध सगळे असं झालं. तेव्हा बाबा म्हणाले होते, ‘बेटा, यालाच राजकारण म्हणतात ! राजकारणात कोणीच कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू असत नाही !

बरं, मी अकोल्यात असल्यामुळे आणि मी व्यंगचित्र, सुलेखन, ग्राफिक डिझायनिंग असे दोन – तीन प्रकार हाताळत असल्यामुळे, ‘माझिया जातीचा भेटो मज कोणी…’ ही ओढ फार होती. आपल्या क्षेत्रातल्या कुणीतरी आपल्या कामाचं मूल्यमापन करावं असं वाटायचं. नव्व्याण्णव सालच्या आसपास एका वृत्तपत्रात कार्यरत असणाऱ्या परंतु उभ्या आयुष्यात एकही राजकीय व्यंगचित्र न काढलेल्या एका ज्येष्ठ व्यंगचित्रकाराला मी माझी व्यंगचित्रे दाखवलीत तर ते म्हणाले, तू फॅक्ट ड्रॉ करतोयस,… हे कार्टून्सच नाहीत…!

२०११ मध्ये मला बंगलोर येथील  प्रतिष्ठित अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट या संस्थेचा स्व. माया कामत स्मृती जकीय व्यंगचित्रकारिता पुरस्कार (क्रिटिक्स कॅटेगिरी) मिळाला मी देशभरातून पहिला होतो. तेव्हा वाटलं, चला, आपण चांगलं काम करतो आहोत. मग २०१४ ला पुन्हा त्याच श्रेणीत देशातून प्रथम पुरस्कार मिळाला.२०१५मध्ये ग्राफिक डिझाईन साठी भारत सरकारतर्फे देशातून पहिला पुरस्कार मिळाला. पुढे ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ मिळाला. त्यापूर्वी २००२ मध्ये मला स्व. अरविंदबाबू देशमुख स्मृति विदर्भस्तरीय व्यंगचित्रकारीता पुरस्कार देखील मिळाला होता.

व्यंगचित्रकार म्हणून नाव व्हायला लागल्यानंतर वडील मला म्हणाले, ‘तुला लोकांनी इतकं प्रेम दिलं, तुझं इतकं कौतुक केलं की आता तू ते परत करायला हवं, हा जो तू वाढदिवसाला गाणं – बजावण्याचा कार्यक्रम करतोस, त्याऐवजी दरवर्षी व्यंगचित्र स्पर्धा घे. तुझ्या वेळेस तुला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं, तुला साधा व्यंगचित्राचा साईजही माहीत नव्हता, आज असे अनेक असतील त्यांना मार्गदर्शन कर. १९९९ ला  मी पहिल्यांदा स्पर्धेचे आयोजन केले आणि स्पर्धेच्या पंधरा-वीस दिवस आधी त्यांचं निधन झालं… ही स्पर्धा सुरू करून आता तेवीस वर्षे झालीत. नित्यनेमाने घेतली जाणारी ही देशातली एकमेव स्पर्धा आहे. सध्या ‘इंडिया टुडे’ मध्ये असणाऱ्या सिद्धांत जुमडे या गुणवान व्यंगचित्रकाराला पाचवीत असताना याच स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं होतं तिथून त्याचा प्रवास सुरु झाला. या स्पर्धेतून पुढे आलेला अभिजीत बनाफरआज सनफ्रान्सिस्को अमेरिका येथे अकॅडमी ऑफ आर्ट युनिव्हर्सिटी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. त्याला ऑफर झालेले पॅकेज ऐकून आपल्याला भोवळ येते. तिसरा पवन देवाते, आमिर खान प्रोडक्शन्स मध्ये सहाय्यक कला दिग्दर्शक आहे. आणखीही अनेक असतील पण ही मुलं माझ्या संपर्कात आहेत.

या तीस वर्षात जाणवलेला एकमेव फरक म्हणजे आज पर्यंत मी वेगवेगळ्या सात पंतप्रधानांचा कार्यकाळ पाहिला. मोदी हे आठवे. पूर्वी वाचक व्यंगचित्र व्यंगचित्रासारखं घ्यायचे, हसायचे, सोडून द्यायचे. अलीकडे खूप  पर्सनली घेतात. उतारेच्या – उतारे खुलासे लिहून पाठवतात. सरकारने सरकार चालवावं, व्यंगचित्रकाराने व्यंगचित्र काढावे इतका सोपा आणि सरळ, साधा हा मामला आहे. मी तरी छोटा व्यंगचित्रकार आहे दस्तुरखुद्द आर. के. लक्ष्मण यांच्यासारख्या महान व्यंगचित्रकाराच्या व्यंगचित्रांनी कुठल्याच सरकारवर अगदी काडीचाही फरक पडला नाही. व्यंगचित्राने लोकांच्या मनातल्या अस्वस्थतेला वाट मिळते, त्याच्या मनातल्या विषकंदाचे गुलकंदात रूपांतर होतं, असे मी अनेक कार्यक्रमात सांगतो. आज-काल अनेकांच्या बाबतीत याच्या उलट अनुभव येतो.

आप्पासाहेब वैराळे

सुरुवातीच्या काळात माझी व्यंगचित्र पाहणारे जेव्हा मला भेटायचे तेव्हा म्हणायचे, यु आर क्वाईट यंग ! वयाच्या मानाने तुमची व्यंगचित्रं बरीच मॅच्युअर आहेत ! ती मॅच्युरिटी डॉक्टर ? घोंगडे यांच्या कडून आली हे मी त्यांना सांगायचो. व्यंगचितत्रासाठी ची परिपक्वता लागते, जी विनोद बुद्धी लागते, जी जाण लागते ती मला त्यांच्याकडून मिळाली. वृत्तपत्रीय संकेत काय असतात, व्यंगचित्रकाराने काय भान ठेवावं ही जाणीव देशोन्नतीचे तेव्हाचे संपादक स्व. आप्पासाहेब वैराळे यांनी दिली.

‘देशोन्नती’चे संपादक श्री प्रकाश पोहरे यांनी तर मी काढलेल्या व्यंगचित्रांच्या छोट्या च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना म्हटलं होतं की, ‘देशोन्नती मुळे गजानन मोठा झाला की, गजानना मुळे देशोन्नती मोठी झाली, हा चर्चेचा, वादाचा आणि परिसंवादाचा विषय आहे. एका आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शनी साठी मी दिल्लीला गेलो असता तिथल्या महाराष्ट्र भवन मध्ये माझी काही केल्या राहायची सोय होत नव्हती. नेमके तिथे मला प्रकाश भाऊ दिसले प्रकाश भाऊंनी मग मी दिल्लीतून निघेपर्यंत त्यांच्या रूमवर माझी राहण्याची व्यवस्था करून दिली. व्यंगचित्रामध्ये भाषेचीही तुम्हाला जाण असणे आवश्यक आहे. माझी भाषा खूप वाचून वाचून सुधारली. आमची हिंदी आणि मराठी भाषा चांगली राहिली पाहिजे म्हणून वडील घरी चंपक, चांदोबा, हिंदी चन्दामामा, छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं असं बरंच काही आणायचे नंतर कॉलेजला असताना रोज दीड तास लायब्ररीत बसून मी वृत्तपत्र आणि इतर पुस्तकं, नाटकं, ललित लेख संग्रह असं बरंच काही वाचायचो.

लेखनाला प्रोत्साहन माझ्या कॉलेजच्या मराठी विषयाच्या प्रा. सौ कोलारकर मॅडम यांनी दिले तसंच आप्पासाहेबांनीहीखूप प्रोत्साहन दिले. पु. ल. देशपांडे, हिंदी साहित्यिक शरद जोशी, शिरीष कणेकर, श्रीलाल शुक्ल हरिशंकर परसाई अशा अनेक विनोदी आणि व्यंग लिखाण करणाऱ्या लेखकांचं सतत लिखाण वाचून – वाचून माझी विनोदाची धार कायम राहिली. यात वाटा चार्ली चॅप्लीन च्या सिनेमांसह आहे अनेक उत्तम हिंदी सिनेमांचाही आहे.

वडिलांचे मित्र स्व. प्रभाकरराव सपकाळ माझ्याकरिता नेहमीच व्यंगचित्रांची व त्या संबंधातली इतर पुस्तकं मुंबईत कधी दुकानात शोधून तर कधी फुटपाथवर फिरून शोधून आणून देत. अकोल्यात आल्यानंतर ते जमा झालेले सगळे पेपर पाहायचे, माझे कार्टून दिसले नाही की माझे कान उपटायचे. एकदा त्यांना सांगितलं की काही सुचत नाही आजकाल, तेव्हा त्यांनी वर उल्लेख केलेल्या सगळ्या हिंदी साहित्यिकांच्या पुस्तकांचा गठ्ठा जो त्यांनी स्वतः करता आणला होता मला देऊन टाकला म्हणाले हे वाचत जा सुचेल…

या सर्व धडपडीत माझ्यातला परफॉर्मर बाहेर यायला उतावीळ होता. कुठे संधी मिळत नाही हे पाहून मग मी व्यंगचित्रकार म्हणून व्यंगचित्रांच्या चौकटी बाहेरच्या टिपलेल्या सगळ्या गमती, सगळी निरीक्षणं, लिहून काढली आणि त्याचा दोन तासाचा एक कार्यक्रम तयार केला, त्याला नाव दिलं गंमत – जंमत. 2011साली गणेशोत्सवात याचा मी पहिला कार्यक्रम केला तिथ पासून आजपर्यंत मी महाराष्ट्रात, मध्यप्रदेशात, आंध्रप्रदेशात असे मिळून 135 च्या जवळपास शो केलेत. त्याचीच पुढची कडी म्हणून ‘घोंगडे की दुनिया’ नावाचे युट्युब चॅनेल सुरु केले ज्यावर व्यंगचित्रकाराच्या नजरेतून टिपलेल्या वेगवेगळ्या गमती मी सादर करतो, बरोबरच त्यावर व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके, सुलेखनाची प्रात्यक्षिके असे अनेक व्हिडिओ मी लोड केले आहेत.

कधी नव्हे ते यंदा मला दोन जून ही तारीख दोन जूनच्या आधी लक्षात आली. एरवी दोन जून गेल्यावर चार – पाच तारखेला मला लक्षात येतं, अरेच्या ! आपल्याला इतकी वर्ष झाली की…

आज व्यंगचित्रातील या रेषेशी जुळलेलं नातं आयुष्य रेषेचा भाग झालं आहे. बरं की वाईट याचं मूल्यमापन काळच करेल. हा काही जीवन गौरव पुरस्काराच्या उत्तराला दिलेला लेख नाही त्यामुळे एकतिशीनिमित्त इतकंच…!

Bookcover Designs by : Gajanan Ghongde

………………………

गजानन घोंगडे –९८२३०८७६५०

Comments are closed.