–सानिया भालेराव
“थोड़ा बर्दाश करना सीखना चाहिए औरतोंको “.. असं म्हणणारी तापसीची सासू… “एक बार ही मारा होगा उसने.. शायद पहिली बार.. बच्चे समझदार है.. अपना अपना देख लेंगे” असं म्हणणारी तापसीची आई, “जीजू घुस्सा थे, ऑफिस पॉलिटिक्स से परेशान थे,तो हो गया होगा” असं म्हणणारा तिचा सख्खा भाऊ… अनुभव सिन्हाचा “थप्पड” हा चित्रपट ही खरं पाहता नवऱ्याने त्याच्या बायकोला एक थोबाडीत मारलं आणि मग बायकोने बंड पुकारत वेगळं व्हायचं ठरवलं इतका साधा आणि सरळ नाहीये. ही गोष्ट आहे अगदी आजही विवाहसंस्थेत होत असणाऱ्या कॅज्युअल सेक्सिझमची आणि त्याकडे सोयीस्करपणे होत असणाऱ्या दुर्लक्षाची.
एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंब. तापसी ही नवऱ्यावर आणि घरावर प्रेम करणारी.. आणि त्यातच आपलं सुख मानणारी गृहिणी. तिचा नवरा पवेल (गुलाटी) भारताबाहेर जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे. सोबत सासू ( तन्वी आझमी) राहते. घरी काम करणारी मोलकरीण आणि शेजारी आपल्या मुलीबरोबर राहणारी कॉर्पोरेट वूमन दिया मिर्झा यांच्याशीच काय तो तिचा संवाद. आपण एका अत्यंत मिसोजिनिस्ट समाजाचा भाग आहोत याची कल्पना नसणारी आणि असली तरी ते तिच्या आदर्श पत्नी, सून, गृहिणी वगैरेच्या आवरणांमधून तिच्यापर्यंत पोहोचू सुद्धा न शकणारं. नवरा कामावर निघतांना त्याच्या काही वस्तू हातात घेऊन त्याच्या मागे मागे करताना, तो गाडीत बसत असताना, शेजारीण दिया मिरझा त्याच्यापेक्षा मोठ्या गाडीतून जाते. तेंव्हा फार नयी गाडी? ऐसा क्या काम करती है यह? असं तो जेंव्हा म्हणतो तेंव्हा त्याचं पाकीट, हातात पकडून उभी असलेली ती चटकन म्हणते.. मेहनत.. पण तरीही तिला त्याच्या असं म्हणण्यातला खोचकपणा दिसत नाही किंवा बघावासा वाटत नाही. मग एक दिवस सगळ्यांच्या समोर पार्टीमध्ये तिचा नवरा तिच्या थोबाडीत मारतो आणि तिचं जग बदलतं.
या चित्रपटातून आपल्याला वेगवेगळ्या सर्कमस्टानसेसमध्ये असलेल्या बायका दिसतात. प्रथितयश वकील जी तापसीची केस घेताना सुरवातीला म्हणते “बस एक थप्पड?” आणि ही केस लढताना तिच्या स्वतःच्या लग्नामधला फोलपणा तिला जाणवतो, तापसीच्या भावाची होणारी बायको.. न्यू एज गर्ल.. जी तापसीच्या भावाचं मिसोजिनिस्ट वागणं बघून थक्क होते, तापसीची घरी काम करणारी मोलकरीण जी नवऱ्याकडून रोज रात्री मार खात असते, तिची सासू जी आपल्या नवऱ्यापासून काही दिवसांसाठी दूर निघून आली आहे आपल्या लहान मुलाबरोबर राहण्यासाठी, तिची शेजारीण दिया.. नवरा गेल्यावर ही त्याच्यावर प्रेम करणारी, सेल्फ मेड वूमन, तापसीची आई.. जावईबापू वगैरे असल्या अगदी टिपिकल विचारांची.. आणि या सगळ्या बॅकड्रॉपवर तापसीचे क्युट बाबा..अमेझिंग कुमुद मिश्रा.. जो अगदी सहज आपल्या पोरीला समजावून घेतो आणि त्याच्या स्वतःकडून बायकोबरोबर वागताना झालेल्या संसारातल्या दुर्लक्षाला निदान आता उतार वयात लक्ष देऊ पाहतो आहे.. असा बाबा प्रत्येक मुलीला मिळायला हवा.. जो म्हणतो की तुला मनाच्या अगदी आतून जो आवाज येतो आहे.. तो एक.. असं वागल्यावर कदाचित सगळं ठीक होणार नाही पण ते तुझ्या मनाप्रमाणे असेल.. झालं मग..
हा चित्रपट मेलोड्रॅमॅटिक आहे काही ठिकाणी.. काही ठिकाणी क्लिशेड फेमिनिझम डोकावत राहतं.. म्हणजे बायको घर सोडून गेली की जेवताना होणारे नवऱ्याचे हाल.. चित्रटातले असे सिन बघताना काय वेडेपणा आहे हा.. असं मला वाटलं आणि खूप राग राग झाला. बाईचा घरातला ऍबसेन्स म्हणजे स्वयंपाकघर आणि त्या अनुषंगाने होणारी जेवणाची वगैरे होणारी नवऱ्याची फरफट.. हे इतकं मॅडछाप असावं.. पण मग जाणवतं की नाही.. हे दुर्दैवाने सत्य आहे.. आणि मग खोलवर आपण कुठेतरी बुडत आहोत असं वाटत जातं.. आपल्या आयुष्यातला फोलपणा कोणीतरी पडद्यावर दाखवतंय.. हे असं वाटणं.. काचेवर नखाच्या ओरखड्याने येणारा आवाज आणि त्याने होणारी दातांची सळसळ.. यात जे अगम्य कनेक्शन आहे.. तेच कनेक्शन हा चित्रपट पाहताना अनुभवत राहतो आपण.
मुद्दा नवऱ्याने बायकोला थोबाडीत मारण्याचा आहे का? एका थोबाडीत मारण्याने काय होतं इथपासून ती पण त्याला मारू शकते.. सिंपल.. इथपर्यंत.. हे खरंतर यांच्यापलीकडंच आहे. चपराक बसणं.. असा तो एक मेटाफर आहे खरं तर.. ही चपराक काही जणींच्या बाबतीत अंगावर, चेहेऱ्यावर असू शकते तर काही जणींच्या बाबतीत मनावर.. अशा जागा असतात जिथे मारलं की वळ देखील उमटत नाही. मॉडर्न एज इंडीपेंट वूमन असे कित्येक न दिसणारे वळ घेऊन जगत राहतात.. आणि म्हणून तोंडावर बसणारी एक चपराक असा इटुकला मुद्दा हा नाहीये. डोमॅस्टीक व्हायलन्स सारखाच इमोशनल व्हायलन्स नावाचा प्रकार.. त्याची होणारी जाणीव.. आपण पितृसत्ताक समाजात आजही वावरतो आहोत याची होणारी जाणीव.. आणि ती जाणीव करून देणारी चपराक.. ही अशी चपराक प्रत्येक स्त्री आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर मिळवते.. हो मिळवते असंच म्हणणार.. कारण स्वतःच सर्वस्व देऊन मिळणारी तिची मिळकत असते ती.. चपराक मिळाली की ती बदलते.. कधी चमकते तर कधी विझते.. तो तिचा स्वतःचा असा प्रवास असतो. असंख्य विझलेल्या पणत्या मग उगाच बाहेरच तेल टाकून, नवी वात टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला जातो.. पण पेटली तरी तेवत नाही ती पुन्हा.. कितीही आव आणला इतरांनी, तिने स्वतः तरीही.. तिच्या प्रकाशातला फोलपणा दिसत राहतो.. इतरांना आणि तिला स्वतःला सुद्धा.. जी न विझता चमकते.. तिला होतो त्रास पण तिचा प्रकाश डोळे दिपवणारा असतो.. वाटतं काही जणांना आपल्या अंगणात ठेवावं तिला.. पण तिला हात लावताच चटका बसतो आणि मग स्वतःचा हात पोळून घेण्यापेक्षा हे प्रकरण दुरून बघणं ठीक असा विचार करून तिच्या जवळ जायला कोणी धजावत नाही.. जवळ तोच जाऊ शकतो ज्याच्या मनगटात बळ आहे आणि तिचा प्रकाश पेलण्याचं काळीज आहे..
दोन वेगवेगळ्या जीवांमध्ये बरोबरी होऊ शकते. दोन जणं एक झाले की बरोबरी होण्याची गरज उरत नाही. जे एक आहे त्यात समानता असणारचं.. नातं सहज फुललं की एकमेकांसाठी करणं आपसूक होत जातं. मन जपलं एकमेकांचं की स्त्री आणि पुरुष, नवरा – बायको वगैरेंच्या पलीकडे जातं नातं. मग तिथे फक्त साथ असते, प्रेम असतं आणि सगळं सगळं दोघांचं असतं. प्रेमासाठी लग्नाची गरज उरत नाही पण लग्नामध्ये प्रेम उरलं नाही की मग अनेक गोष्टी डोकं वर काढायला लागतात. तापसीला एका ठिकाणी तिची वकील म्हणते की “प्रत्येक नातं सदोष असतं. नातं जोडून ठेवण्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतात”.. . यावर तापसी विझलेल्या डोळ्यांनी उत्तरते “नात्याला जोडून ठेवावं लागतंय म्हणजे ते तुटलेलं आहे अगोदरच”… हजार गोष्टी आहेत या चित्रपटात..सांगितल्या तरीही न कळणाऱ्या.. माझं जेंडर विसरून बघायचा प्रयत्न केला पण ते शक्य नाही झालं. त्यामुळे जे लिहिलं आहे ते बायस्ड असेलही कदाचित पण ज्या समाजात मी वापरते तो तर आहेच बायस्ड.. मिसोजनीपासून बचाव अशक्य आहे. अजूनही. हे खरं आहे आणि याची जाणीव करणारी चपराक प्रत्येक स्त्रीला मिळायला हवी असं मला मनापासून वाटतं.
स्वतःची ओळख स्वतःला पटण्यासाठी अशी एक ‘थप्पड’ आवश्यक असते. कार्ल युंग यांचा एक कोट आहे.. “I am not what happened to me. I am what I choose to become.” जिथे कुठे असाल, कोणत्याही जेंडरचे असाल.. चपराक ही मिळकत आहे असं समजून, आयुष्य स्वतःच्या टर्म्सवर जगण्याचा प्रयत्न करून बघूया.. ज्या समाजात आपण वावरतो आहोत तो अन्यायकारक वाटत असेल तर काही न बोलता शारीरिक, मानसिक थपडा खात राहण्यापेक्षा बदलाची सुरवात स्वतः पासून करूया. स्त्री असणं आणि स्त्री बनणं यातलं अंतर पार करण्याचा प्रयत्न करूया.. Cheers to that Slap which Awakens Us from within.. Cheers to Thappad”
(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे )
[email protected]