बीइंग इन्क्विझिटिव्ह -३
-उत्पल व्ही. बी.
एक-दोन वर्षांपूर्वी ‘मुक्त शब्द’च्या एका अंकात ‘गरज हिंदू डाव्यांची’ असा एक लेख प्रकाशित झाला होता. (मी शीर्षक कदाचित चुकत असेन, पण आशय हाच होता.) तो लेख म्हणजे मराठी लेखन-संपादन क्षेत्रातील काही मित्रांची झालेली एक चर्चा होती. त्यातील राम जगताप हे एक नाव मला आठवतं. इतर आत्ता आठवत नाहीत. (याबाबत रामने कॉमेंट केली आहे ती जरूर पहावी. त्यात त्याने अधिक तपशील दिला आहे.) ‘द हिंदू’ मध्ये अलीकडेच ‘ड्रीमिंग ऑफ अ हिंदू लेफ्ट’ या शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला होता. तो वाचून ती चर्चा आठवली आणि हा विषय अलीकडे मनात सतत घोळत असल्याने त्यावर लिहावंसं वाटलं.
संघटित धर्म ही सामाजिक बांधणीची गरज होती/आहे. त्यामुळे संघटित धर्माला वगळता येत नाही हे धर्मवाद्यांचं म्हणणं असतं. धर्मविहीन जगण्याचा विचार करणारे माझ्यासारखे लोक एका अर्थी असा विचार करू शकण्यासाठी ‘प्रिव्हिलेज्ड’ असतात. कारण त्यांचं सामाजिक स्थान त्याला पूरक असतं. हा मुद्दा आहेच आणि तो आपण कायमच लक्षात ठेवूया. एखाद्या संकल्पनेने आपलं नुकसान जास्त केलं की फायदा हा प्रश्न नुकसान किंवा मोजता येत नसल्याने अनुत्तरित राहतो. म्हणजे संघटित धर्म आहे म्हणून कट्टरता आहे, धार्मिक दंगली आहेत, त्यात माणसं मरतात म्हणून नुकसान जास्त आहे असं म्हणता येतं, तर दुसरीकडे संघटित धर्म आहे म्हणून मानवी वर्तनाला चौकट आहे, त्यामुळे ‘संभाव्य नुकसान’ पुष्कळ प्रमाणात टळतं असंही म्हणता येतं. धर्मविहीन जगण्यातलं मुख्य आव्हान ‘केवळ तर्क आणि विवेकाचं अधिष्ठान असताना रसभरित, आनंदी, मानवी आकांक्षांना न्याय देणारं आणि मानवी मर्यादांमुळे येणाऱ्या दुःखावर मात करणारं जगणं कसं घडवायचं’ हे आहे. माझं असं आग्रही प्रतिपादन आहे की तर्क, विवेक आणि अतार्किक मानवी भावना या सगळ्याला कवेत घेऊन अशा प्रकारचं जगणं निर्माण करता येईल. परंतु हा थोडा पुढचा भाग झाला. त्यावर सविस्तर लिहिता येईल.
आत्ताचा मुद्दा धर्माने प्रभावित केलेल्या वर्तनाला वळण देणं हा आहे. मार्क्सच्या धर्माविषयीच्या प्रसिद्ध अवतरणातील काही भाग लक्षपूर्वक वाचावा असा आहे. धर्माचं स्वरूप स्पष्ट करणारा आहे. काही वाक्यं गाळून संपादित भाग खाली देतो आहे –
Religion is the general theory of this world, its logic in popular form, its enthusiasm, its moral sanction, its solemn complement and its universal basis of consolation and justification. It is the fantastic realization of the human essence since the human essence has not acquired any true reality. Religious suffering is, at one and the same time, the expression of real suffering and a protest against real suffering. Religion is the sigh of the oppressed creature, the heart of a heartless world, and the soul of soulless conditions.
यानंतर शेवटचं वाक्य आहे – It is the opium of the people.
Human essence – माणूस असण्याचं मूलतत्त्व (अधिक चांगलं भाषांतर कुणाला सुचलं तर सांगा) जे आहे त्याने अद्याप कुठलेही सत्य स्वरूप न घेतल्याने या मूलतत्त्वाचं धर्म हे एक आविष्करण आहे. धार्मिक व्यथा ही खऱ्या व्यथेची अभिव्यक्ती आहे आणि त्याच वेळेला खऱ्या व्यथेच्या विरुद्ध केला गेलेला एल्गार आहे. धर्म हा आत्मा हरवलेल्या जगाचा आत्मा आहे, हृदयशून्य जगाचं हृदय आहे. (‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेत गणेश गायतोंडेंची बायको सुभद्रा एका दृश्यात त्याला गरीब लोकांनी सण-उत्सव साजरा करण्याबद्दल नेमकं हेच सांगते. तो सीन बघत असताना मार्क्सची आठवण होतेच होते.) धर्माबाबतचं हे विवेचन पटतं आणि त्याचवेळी असा प्रश्नही पडतो की म्हणजे मग भौतिक सुबत्ता असेल तर धर्माची गरज संपेल का? तसं होईल असं वाटत नाही कारण भौतिक सुबत्ता असली तरी ‘आत्मा हरवलेला’ असू शकतो. धर्माचं मुख्य काम (आणि आजची एक मुख्य अडचण) ‘माणसाची कल्पित ओळख’ निर्माण करणं ही आहे आणि ‘सेपियन्स’मध्ये युव्हाल हरारी म्हणतो त्याप्रमाणे ‘कल्पित वास्तवाला’ (Imagined reality) माणूस जो कायम बळी पडत आलाय तो आजही पडतो आहे. जात-धर्म-मूर्तीतील ईश्वर ही ‘कल्पित वास्तवा’चीच उदाहरणं आहेत.
माझ्या घरात गांधी आणि आंबेडकरांचे फोटो आहेत. माझ्या आजीचा आणि वडिलांचा फोटोही आहे. गांधी-आंबेडकरांबद्दल माझ्या मनात आदराची, कृतज्ञतेची आणि ‘दिपून गेल्याची’ भावना आहे. आजी आणि वडील यांच्याशी माझं जैविक आणि हळवं नातं आहे. पण असं असलं तरी या सगळ्यांचे फोटो मी ठरवून पायाखाली घेऊ शकतो. किंवा उद्या जर एखादा फोटो नष्ट झाला तर मला त्यात काही विशेष वाटणार नाही. हे घरातील पुस्तकांनाही लागू आहे. मी ठरवून पुस्तक पायाखाली घेऊ शकतो. ज्यांच्याशी माझं विशेष नातं आहे अशा वस्तूंकडे मी वस्तू म्हणून बघू शकतो याचं कारण मी माझी आंतरिक भावना आणि त्याला पूरक असणारी – मी निर्माण केलेली/विकत आणलेली साधनं यात फरक करू शकतो. या गोष्टी माझ्या ‘दुबळ्या जागा’ बनत नाहीत. धर्मश्रद्धा मात्र माणसाला दुबळं बनवते आणि त्यामुळे कट्टर बनवते असं आपल्याला दिसतं.
हे मान्य केलं तरी त्यातून प्रश्न सुटत नाही. धर्माशी डील कसं करायचं हा मुद्दा उरतोच. ‘मी हिंदू आहे’ ही जाणीव माझ्यात कधीच तीव्र नव्हती कारण मी ‘मी’ असताना अजून कुणीतरी असणं हे मला मान्य होणारं नाही. माझा स्वाभाविक भावच ‘मला धर्म नाही आणि मला धर्म नको’ हा आहे. पण बहुसंख्यांचा स्वाभाविक भाव ‘मी हिंदू आहे’, ‘मी मुस्लिम आहे’ असा असतो. मग माझ्यात जो स्वाभाविक भाव आहे – ज्याला साधारणपणे नास्तिकता, डावेपणा म्हटलं जातं त्याला काहीशा नाईलाजास्तव, पण तरी काहीएका उद्देशाने धर्माची जोड देऊन मी स्वतःला ‘अज्ञेयवादी हिंदू’, ‘डावा हिंदू’ असं म्हणावं का?
याला काही हरकत असण्याचं कारण नाही असं मला वाटतं. मी वर म्हटलं तसं मुळात मी ‘मी’ आहे. त्यामुळे मला ‘हिंदू असणं’ अशी अधिकची ओळख जशी नकोशी वाटते तशीच अज्ञेयवादी, डावा, गांधीवादी याही ओळखी खरं तर नकोशा वाटायला हव्यात. पण या ओळखींबाबत मला तितकीशी अडचण नसते कारण त्या माझं अचूक नसलं तरी त्यातल्या त्यात जवळचं वर्णन करतात. पण ‘हिंदू असणं’ म्हणजे नक्की काय हे माझं मलाच न कळल्याने ती ओळख अडचण निर्माण करते. आता दुसऱ्या बाजूला मौज अशी आहे की माझ्या नियंत्रणात नसणाऱ्या काही कारणांमुळे मी जन्माने हिंदू आहे हे सत्यच आहे. तुझा धर्म कोणता असं विचारलं की ‘अज्ञेयवादी, डावा’ असं उत्तर मी देत नाही. ‘हिंदू’ असं देतो. ते सवयीने, उत्सफूर्तपणे, नेणिवेतून येतं.
मग ही ओळख इतर ओळखींसारखीच स्वीकारायला काय हरकत आहे? मी ‘हिंदू अज्ञेयवादी आहे’ किंवा ‘मी हिंदू डावा आहे’ असं म्हटलं की माझ्याबद्दलचा एक ‘विस्तृत मेसेज’ पोचतोच. धर्मश्रद्धेबाबत जे आग्रही आहेत त्यांच्याकडून धर्मचिकित्सा किंवा धर्मसुधारणा होताना दिसत नाही. चिकित्सा होत असेल, पण जी ओळख त्यांना प्रिय आहे त्या ओळखीचं विद्रूपीकरण ते थांबवू शकत नाहीत असं दिसतं. उदा. हिंदुत्ववादी संघटना दहीहंडी, गणेशोत्सव या उत्सवात शिरलेल्या वाईट प्रवृत्तींचा संघटितपणे रस्त्यावर उतरून प्रतिकार करत आहेत असं दिसत नाही. वास्तविक जिथे धर्माचं पावित्र्य भंग होतं तिथे जाऊन ते ‘रीस्टोअर’ करणं हा त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेवरील एक कार्यक्रम असतो. पण उत्सवातील उन्मादाबाबत या संघटना काही करताना दिसत नाहीत.
अशा वेळेला कदाचित स्ट्रॅटेजी म्हणून ‘डावा हिंदू’ ही ओळख माझं म्हणणं पोचवायला उपयुक्त ठरू शकेल. संघटित धर्मापासून मुक्त होण्याच्या वाटचालीत आधी धार्मिक ओळख पुढे आणणं हेच कदाचित उपकारक ठरेल. धर्माचा प्रभाव असलेल्या समाजात धर्माची चौकट संवादाची जागा मोकळी करते म्हणून हे करायचं. हिंदुत्ववादी संघटनांचं यश धार्मिक ओळखीला चेतवण्याच्या सोप्या मार्गावरून गेल्यामुळे आहे. तिथे ‘मूलभूत परिवर्तनाचं आव्हान’ घेणं टाळलेलं आहे किंवा परिवर्तनाचं आव्हान घेतलं तरी ते बहुतेकदा धर्म-जातीच्या स्ट्रक्चरला, आर्थिक संरचनेच्या स्ट्रक्चरला धक्का न लावता घेतलेलं आहे. परिवर्तनात जेव्हा मूलभूत वैचारिक परिवर्तन अभिप्रेत असतं तेव्हा ते मोठं आव्हान असतं. हिंदुत्ववादी विचारात मूलभूत वैचारिक परिवर्तनापेक्षा हिंदुहितवाद, सेवाभाव या गोष्टी अधिक प्रभावी आहेत. त्या बळावर त्यांनी संस्थात्मक बांधणीही केली आहे. परंतु त्याला धर्माची दृश्य-अदृश्य चौकट आहेच. मग परिवर्तनाच्या विचारानेदेखील ही दृश्य-अदृश्य चौकट स्वीकारावी. आज कदाचित या चौकटीपासून बरीच फारकत घेतल्याने परिवर्तनाचा विचार रूजवता येत नसेल. ‘मी तुमच्यातला नाही’ असं सांगण्यापेक्षा ‘मी तुमच्यातलाच आहे आणि मला माझं वेगळं म्हणणं मांडायचं आहे’ असं म्हणणं अधिक फलदायी ठरू शकेल.
धंनजय मुळी हा माझा मित्र मानवी उत्क्रांतीचा चांगला अभ्यासक आहे. त्याच्याबाबत सांगावी अशी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याने या विषयाचे लहान मोड्यूल्स तयार केले आहेत आणि तो शाळेतील मुलांसमोर ते सादर करतो. त्याचं काम आणि त्याचा अप्रोच मला खूप महत्त्वाचा वाटतो. एकदा गप्पा मारताना तो म्हणाला होता की उत्क्रांतीचा विषय निघाला की मी लोकांना सांगतो की देव आहे-नाही या वादात आपण पडायलाच नको. मी देवाचं अस्तित्व नाकारण्याकरता उत्क्रान्तीचा अभ्यास केलेला नाही. हा अभ्यास करताना मला जाम मजा आली म्हणून मी तो केला. ती मजा तुम्हालाही अनुभवता येईल म्हणून तुम्ही हा अभ्यास करा!
मला असं दिसतं की परिवर्तनाचा विचार लहान मोड्यूल्समधूनच प्रभावीपणे पोचेल. त्याचाच एक भाग ‘डावा हिंदू’ ही स्वतःची ओळख न्यूट्रॅलिटीने मान्य करणे हा असू शकेल. माणूस धार्मिक होतो, कट्टर होतो याच्या मुळाशी माणसाचं ‘व्हल्नरेबल’ (असुरक्षित) मन आहे. मग मन जर व्हल्नरेबल आहे तर ते परिवर्तनाकडेही झुकू शकेल. त्यासाठी परिवर्तनवादी विचारात परिवर्तनशीलता हवी!
हेही वाचा- हिंदुत्ववादी व पुरोगामी : एकमेकांना ‘सुधारण्याची स्पेस’ नाकारत आहेत का? https://bit.ly/33KlOWR-
हेही वाचा- उदारमतवाद्यांनी समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवायला हवा! https://bit.ly/2WQLTlw
(लेखक ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचे संपादक आहेत)
9850677875