बीइंग इन्क्विझिटिव्ह -५
-उत्पल व्ही. बी.
काही वर्षांपूर्वी ‘काकस्पर्श’ या चित्रपटावरील एका लेखाच्या अनुषंगाने ‘साधना’ साप्ताहिकात एक चर्चा झडली होती. हा चित्रपट एका प्रतिगामी ब्राह्मण पुरूषांचं चित्रण करतो या व इतर मुद्द्यांभोवती ही चर्चा झाली. त्यात माझीही प्रतिक्रिया होती. व्यक्तिशः मला हा चित्रपट आवडला होता. महेश मांजरेकर यांचा ‘अस्तित्व’ वगळता इतर चित्रपट फारसे आवडलेले नसले तरी हा चित्रपट मला आवडला होता. माझा एक मुद्दा असा होता की एका ब्राह्मण कुटुंबाची कथा सांगितल्याबद्दल आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही, पण चित्रपटात केशवपनाच्या प्रसंगापुरता एक न्हावी येतो (आणि त्याचं नाव टिपीकलपणे ‘शांतू’ असतं) त्या न्हाव्याच्या आयुष्याची कथा चित्रपटातून सांगावी असं चित्रपपटसृष्टीत फारसं कुणाला वाटत नाही याची मात्र खंत वाटते. अर्थात हे निरीक्षणही ढोबळ आहे, पण मला मुख्यत्वानं हे सुचवायचं होतं की जे या माध्यमातील धुरीण आहेत त्यांना असं फारसं वाटत नाही. इतर कला-माध्यमांप्रमाणेच चित्रपट हे माध्यमही व्यक्तीकेंद्री (विशिष्ट व्यक्तींचं महत्त्व तयार होणं या अर्थी) माध्यम आहे, त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असणाऱ्यांनी जर सामाजिकदृष्ट्या संवेदनशील, नाजूक विषयाला हात घातला तर सकारात्मक फरक पडतोच.
पुढे कालांतराने ‘फँड्री’सारख्या चित्रपटांनी ही अपेक्षा पूर्ण केली आणि मराठी चित्रपटांमध्ये एक सशक्त प्रवाह सुरू झाला. मराठी मालिकांमधील ब्राह्मण प्रभावाबाबत अलीकडे नव्याने सुरू झालेल्या चर्चेतील ‘ब्राह्मणी प्रभाव’ या शब्दाबाबत विचार करताना पात्रनिवड, भाषा, सादरीकरण आणि सौंदर्यकल्पना या अंगांनी विचार करता येईल असं मला दिसतं. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊ. सामाजिक संदर्भात बोलताना आपण सहसा आकडेवारीचा फारसा आधार घेत नाही ही आपली एक स्पष्ट मर्यादा आहे. माझीही आहे. त्यामुळे आपण जेव्हा ‘ब्राह्मणी प्रभाव’ म्हणतो तेव्हा तो एकूण उपलब्ध कंटेंटपैकी किती कंटेंटला लागू होतो हे तपासायला हवं. यातला उपमुद्दा हा की एकूण उपलब्ध कंटेंटपैकी कुठल्या कंटेंटची रीच जास्त आहे. कारण त्या कंटेंटचा सामाजिक प्रभाव अधिक असणार हे सरळ आहे. मला असं दिसतं की आपल्या समाजमानसात ‘ब्राह्मणी सांस्कृतिक अधिसत्तेमुळे’ रूजलेल्या ब्राह्मणांवरील रागातून ‘ब्राह्मणी प्रभाव’ ही अधिक ठळकपणे लक्षात घेतली जाणारी आणि बोलली जाणारी बाब बनली आहे. मागच्या लेखात म्हटलं तसं मराठा वर्चस्वासाठी तसा शब्द तयार झाल्याचं दिसत नाही.
पात्रनिवड, भाषा, सादरीकरण आणि सौंदर्यकल्पना या अंगाने विचार करताना आठवणारी काही उदाहरणं सांगतो. याआधी ही इतरत्र माझ्याकडून लिहिली-बोलली गेली आहेत. नवीन ‘तुकाराम’ चित्रपटातील तुकारामाचं कुटुंब (निवडलेली पात्रं) कुणबी वाटत नाहीत. एका प्रसंगात तुकारामासाठी दुपारी भाकरी घेऊन आलेली जिजाई ‘एवढ्या उन्हाची आलीस?’ या प्रश्नावर ‘ठीक आहे’ असं म्हणते. संभाजी महाराजांवरील मालिकेत (मी टीव्ही बघत नाही, पण या मालिकेचे एक-दोन तुकडे कुठेतरी पाहिले गेले) एका विशेष प्रसंगी संभाजी महाराजांसाठी ‘उकडीच्या मोदकां’चा घाट घातला जात असल्याचं पाहून मी गहिवरलो होतो. कथावस्तू ज्या परिवेषातील आहे त्याच परिवेषातील वातावरणनिर्मिती व्हायला हवी ही इथे अपेक्षा आहे आणि ती योग्य आहे. त्या त्या कलाकृतीचा ‘होलिस्टिक’ विचार करायला हवा हे मान्य, पण काही गोष्टी लिटमस टेस्टसारख्या काम करतात.
अशा वेळी विरुद्ध उदाहरणंही आठवतात. ‘जैत रे जैत’ चित्रपटात मोहन आगाशेंनी साकारलेला ‘नाग्या’ हा पूर्णपणे ‘नाग्या’ वाटतो, कथेतील ठाकर नाग्या ज्या मातीत जन्मला त्या मातीत उगवलेला वाटतो हे दिग्दर्शक, अभिनेता, रंगभूषाकार यांचं यश आहे. ‘ओंकारा’ चित्रपट आठवा. सैफ अली खान कुठल्याही कोनातून नेहमीचा ‘नवाब सैफ’ वाटत नाही. (‘सेक्रेड गेम्स’मध्येही त्याचं रूपांतर असंच प्रभावी होतं.) अलीकडचा ‘सोनचिडिया’ पहा. वातावरणनिर्मितीने थक्क व्हाल आणि पात्रं आणखी थक्क करतील. सुशांत सिंग राजपूतसह प्रत्येकजण अंतर्बाह्य ‘डकैत’ वाटतो. थोडक्यात सांगायचं तर मालिका आणि चित्रपट ही अत्यंत गंभीरपणे करायची गोष्ट आहे याचा विसर पडल्याची उदाहरणं जास्त प्रमाणात समोर आल्याने त्यांच्याविषयीची नकारात्मकताही वाढत जाते.
तर मुद्दा असा की मराठी मालिका वा चित्रपट कुठल्याही परिवेषातील कथा सांगत असले तरी सहसा ते जो ‘सांस्कृतिक फील’ देतात तो ब्राह्मणी आहे असा सूर दिसतो आणि त्यात तथ्य आहे. पुढचा प्रश्न असा की हे ‘ब्राह्मणी’ का वाटतं? ‘मराठी’ का वाटत नाही? या प्रश्नाच्या उत्तरात मराठी आणि भारतातील इतरही समाजांच्या सांस्कृतिक विश्वाची शोकांतिका दडलेली आहे. कारण सांस्कृतिक विश्व हे वर्ण-जातीप्रभावित विश्वच राहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूने पाहता, सांस्कृतिक अधिसत्ता एका वर्गाकडे राहणं याचा सुटा विचार न करता ‘समाजातील विविध क्षेत्रात विविध वर्गांची अधिसत्ता असते, त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातही ती असणारच’ या वास्तवाच्या कक्षेत तो विचार करावा असं कुणी म्हणू शकेल. (उदा. रीटेल बिझनेसमध्ये उच्चवर्णीय गुजराती लोकांची अधिसत्ता आहे). तर इथे हे समजून घ्यायला हवं की सांस्कृतिक अधिसत्ता समाजमानस घडू-बिघडवू शकते. इतिहास घडू-बिघडवू शकते. एखादा समाज स्वतःबरोबर, स्वतःच्या आत जे समजुतींचे प्रवाह घेऊन चालतो ते प्रवाह घडू-बिघडवू शकते. म्हणून ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ या शब्दावर आक्षेप घेतला जातो आणि हा शब्द शिवाजीमहाराजांच्या नावाअगोदर कुणी-कधी लावायला सुरूवात केली हा प्रश्न विचारला जाऊ लागतो. थोडक्यात माणसाचा इतिहास बघताना, प्रत्यक्ष रणांगणावरील लढायांच्या बरोबरीने ‘गाणं असं म्हणत नाहीत. इतके कसे रे तुम्ही अडाणी?’ अशासारखी विधानंही नकळतपणे तलवारीचं काम करत असतात हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं.
एक गोष्ट सरळ आहे. ‘जात’ हे ज्या समाजाचं वैशिष्ट्य आहे, वास्तव आहे, रचनेचा अनेकपैकी एक आधार आहे, तिथे ‘जातीय दृष्टीने’ गोष्टी पाहिल्या जाणार नाहीत, आकळून घेतल्या जाणार नाहीत हे म्हणणं आणि म्हटलं तर मान्य होणं अवघड आहे. ‘प्रजनन’ हा सजीवांचा एक मुख्य गुणधर्म आहे. त्याच्याशी जोडलेला मुद्दा नर-मादी संबंधांचा आहे – मानवसमाजाच्या संदर्भात विवाहसंस्थेचा आहे. विवाहसंस्थाच जिथे जातीने ड्राइव्ह केली जाते (केवळ माणूस जन्माला घातला जात नाही, आपल्या जातीचा माणूस जन्माला घातला जातो) तिथे जगण्याच्या इतर अंगाकडेही कधी जाणिवेच्या तर कधी नेणिवेच्या पातळीवर जातीय दृष्टिकोनातून पाहिलं जाणार यात आश्चर्य नाही. मुद्दा हा की शांततामय मानवी सहअस्तित्वाच्या, स्वांतत्र्य आणि समतेच्या मूल्यांच्या संदर्भात ही गोष्ट म्हणजे आपला ‘वीकनेस’ आहे हे कळलं की त्यावर करायचं काय? भिंत नको आहे म्हणताना ती पाडताही येत नाही असं लक्षात आलं की करायचं काय?
या लेखात खरं तर मागील लेखातील काही मुद्दे पुढे न्यायचे होते. ब्राह्मणांविषयी जी कठोर भावना – जिला सूडभावनाही म्हणता येईल – प्रकट होताना दिसते त्याविषयी बोलायचं होतं. जातीअंताच्या ‘सोशल इंजिनियरिंग’साठी आपण काय करू शकतो यावर बोलायचं होतं. मुख्य म्हणजे त्या संदर्भाने बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘अनाहिलेशन ऑफ कास्ट’विषयी बोलायचं होतं. पण ते आता पुढील भागात करूया. लेखांना मी जाणीवपूर्वकच शब्दमर्यादेचं बंधन घालतोय. त्यामुळे चर्चा पुढे सुरू ठेवू.
(लेखक ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचे संपादक आहेत)
9850677875
………………………………………………………………………………..