मी : मृत्यू. मृत्यूचा विचार केलाच पाहिजे.
गांधीजी : काय रे? काय झालं? आणि असं खिडकीतून बाहेर बघत का बोलतोयस?
मी : बाहेर पाहिलं की मृत्यू नाही दिसत तुम्हांला? असा पसरलेला जाणवत नाही?
गांधीजी : हं. अतीव शांततेमुळे?
मी : शांततेमागच्या कारणामुळे.
गांधीजी : राइट.
मी : माणूस श्रेष्ठ आहे असं तुम्हांला वाटतं? किंवा माणसाला तो श्रेष्ठ आहे असं मानून त्याला जगवण्याचा अट्टाहास केला पाहिजे असं वाटतं तुम्हांला? विशेषतः माणूस संकटकाळात जे वागतो ते पाहता?
गांधीजी : फिलॉसॉफिकल.
मी : आय थिंक एव्हरीथिंग इज फिलॉसॉफिकल.
गांधीजी : तुला जर उद्या कोरोनाची बाधा झाली तर डॉक्टरांकडे जाशीलच ना?
मी : हो, जाईन. कारण जगण्याच्या इच्छेपायी मी मजबूर आहे.
गांधीजी : मग प्रश्न कुठे येतो?
मी : प्रश्न असा की जे झालं आहे ते स्वीकारणं अधिक सामर्थ्याचं आहे की कसं? सर्व्हाइव्ह व्हावं ही माझी आदिम प्रेरणा आहेच, पण मी, म्हणजे माझ्या प्रजातीनं, सर्व्हायव्हलला बेकार ताणलंय.
गांधीजी : आणि ते बरोबर आहे की चूक असा प्रश्न पडतोय तुला?
मी : कदाचित हो.
गांधीजी : पण आता हा प्रश्न गैरलागू नाही का?
मी : म्हणजे?
गांधीजी : म्हणजे मृत्यू हे वास्तव असलं तरी त्यावर विजय मिळवायचा प्रयत्न करत राहणं हेही एक वास्तवच आहे. आणि ते काही आजचं नाही. शेकडो वर्षांपासूनचं आहे.
मी : हं
गांधीजी : पण व्यक्तिशः मी तुझ्या बाजूने आहे. मृत्यूचा विचार केला पाहिजे हे तर एकदम मान्य आहे. सत्याग्रही मृत्यूसाठी तयार असतोच.
मी : आणि समोर हिटलर असेल तर मृत्यू अटळच असतो. म्हणजेच तुमचा पराभव अटळ असतो.
गांधीजी : पराभव?
मी : हो.
गांधीजी : मृत्यू म्हणजे पराभव? आत्मबल जागृत झालेला माणूस जर शोषित म्हणून जगण्यापेक्षा सत्याग्रहाच्या मार्गाने विरोध करत मरण पत्करत असेल तर तो पराभव कसा? तो मृत्यूची निवडच करतोय. पण शोषित म्हणून नव्हे. गुलामीतलं सर्व्हायवल नाकारणारा जागृत माणूस म्हणून. मग समोर हिटलर असो की अजून कुणी…
मी : नाऊ दॅट्स फिलॉसॉफिकल.
गांधीजी : नो. दॅट्स फिलॉसॉफी इन अॅक्शन.