अनेक रोगराई या ख्रिस्तपूर्व काळापासून ग्रीक, रोमन, इंग्लंड, आणि एकूण युरोप येथून पसरल्याची नोंद सापडते. त्यामुळे त्यावरील उपचारांच्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांच्या इतिहासात दिसतो. भारतीय, चीनी, बौद्ध प्रयत्नांचा उल्लेख १७ व्या शतकानंतरच आढळतो. पौर्वात्य देशांमध्ये शरीर शास्त्रावर पुष्कळसा अभ्यास हा विशिष्ट जीवनशैली अनुसरणे, शरीर सशक्त करणे, रोग प्रतिकारशक्ती वाढविणे, मानसिक स्वास्थ्य जोपासणे, शरीरातील दूषित भागावर शस्त्रक्रिया करणे, यावर झालेला आहे. अशी रोगराई पसरल्याचे उल्लेख साधारणपणे १८ व्या शतकापासून सापडतात. भारतात मोठ्या प्रमाणात पटकीची साथ येऊन गेल्याचे उल्लेख १८१७ पासून सापडतात. भारत आणि चीन दोनही ठिकाणी बुबोनिक प्लेगची महामारी १८५५ ते १८९७ या काळात दिसते. चीनमध्ये मन्च्युरिअन प्लेगचा उल्लेख १८९४ पासून दिसतो.
भारतात १८१७ ला पटकीची साथ आली तशीच अनेक देशात ही साथ पसरली. हे उद्रेक अधून मधून १९०२ पर्यंत चालूच राहिले. पूर्वीच्या औषधांना ही साथ अर्थातच दाद देत नव्हती. काही ठिकाणीच ती भराभर फैलावते याचं कारण काही जीवजंतू असले पाहिजेत आणि त्यांचा भोवतालच्या पर्यावरणाशी काही संबंध असला पाहिजे अशा अंदाजाने निरीक्षणे केली गेली. शिकागो, स्पेन, ब्राझील, व्हेनेझुएला, ट्युनिसिया, येथे पटकीचा उद्रेक अशुद्ध पाण्याच्या आजूबाजूला पसरला. लंडन मध्ये १८६६ मध्ये पूर्व भागातली सांडपाण्याची व्यवस्था पूर्ण होत होती तेंव्हा पटकीचा फेरा आला. याच सुमारास दक्षिण वेल्स मध्ये कालव्याच्या दूषित पाण्यामुळे लोक पटकीला बळी पडले. इ.स. १८६७ च्या सुमारास इटली, अल्जिरीया, उत्तर अमेरिका, आणि मिसिसिपी नदीवरील अनेक बंदरांच्या ठिकाणी पसरलेल्या साथीमध्ये या सर्व ठिकाणची सांडपाण्याची व्यवस्था बिघडलेली होती. साथींच्या रोगांवर काम करणाऱ्या जॉन स्नो या ब्रिटीश डॉक्टरने दूषित पाण्यामुळे हा रोग होतो असे साथीचे निदान नक्की केले. त्यामुळे पटकीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेणे शक्य झाले. नवीन औषधे निघाली आणि पुन्हा एकदा साथींना आळा बसला.