भालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन

प्रा. हरी नरके

शाळकरी वयात कोसला वाचली. खोलवर भिडली कोसला. लागोपाठ तीनदा वाचली. कोसलानं केलेलं गारूड त्यानंतर तिची कितीतरी वाचनं झाली तरी आजही उतरलेलं नाही. जी पुस्तकं, जे लेखक त्या वयात खूप आवडले होते त्यातले बरेचसे आता आवडत नाहीत. फार थोडे लेखक याला अपवाद आहेत. तेव्हाही आवडले, आजही आवडतात या यादीत नेमाडे अव्वल आहेत.

खरं तर मी नेमाडे वाचणार नव्हतो. कारण त्याकाळात पुल हे माझे दैवत होते. नेमाडे त्यांच्यावर टिका करतात म्हणून मी नेमाडेंवर फुली मारलेली होती. एकदा पुलंशी तावातावाने बोलताना मी नेमाडेंबद्दल काहीतरी बोलून गेलो. भाई म्हणाले, ” हरी, तू नेमाडेंची कोसला वाचलीयस का?” मी म्हटलं, “नाही वाचली आणि वाचणारही नाही.

” ते म्हणाले, “असं का?”  मी त्यांना कारण सांगताच ते हसायला लागले.

त्यांनी कपाटातून कोसला काढली आणि माझ्या हातात ठेवली. म्हणाले, ” ही आधी वाच मग नंतर आपण बोलू नेमाडेंवर.”

मी कोसला वाचली आणि नेमाडेंच्या प्रेमात पडलो. माझा भाई ( पु.ल. देशपांडे ) बद्दलचा आदर वाढला.  भाई म्हणाले, “त्यांनी माझ्यावर किंवा आणखी कोणावरही टिका केली तरी त्यांची कोसला ही मराठीतली सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे हे माझं मत कधीही बदलणार नाही. तुझ्या पुढच्या पिढीने आमच्या वादात पडू नये. हे वाद तात्कालिक असतात. काळाच्या रेट्यापुढे ते आपोआप मोडीत निघतात.

टिकतं ते फक्त श्रेष्ठ साहित्य!” आज आजूबाजूला अनेक किडके साहित्यिक आणि समीक्षक बघतो तेव्हा पुलंच्या मनाच्या मोठेपणची आठवण येते. पुढे मी बिढार, जरिला, झूल, हुल याही कादंबर्‍या वाचल्या. मनापासून आवडल्या.

त्या सुनिताताईंना फारशा आवडलेल्या नव्हत्या.
मला मात्र आवडल्या. भिडल्या. महत्वाच्या वाटल्या.

भालचंद्र नेमाडॆंवरील साहित्य अकादमीचा लघुपट-क्लिक कराhttps://bit.ly/2ZI6yK0

महाराष्ट्रातील जातीजमातींच्या ताब्यातील शिक्षणसंस्था आणि तिथलं ओंगळवाणं राजकारण यांचा नेमाडेंनी घेतलेला वेध मला स्तिमित करतो. जातीयता, प्रादेशिकता, शिक्षणाचा बाजार आणि मराठीच्या विविध बोलींची रसरशीत रूपं यांचा जो गोफ या कादंबर्‍यांमध्ये नेमाडॆंनी विणलाय तसं इंद्रधनुष्य मराठीतल्या अन्य लेखकांना क्वचितच जमलंय.

नेमाडे हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. माझ्या दृष्टीने ते थोर आहेत कारण त्यांना अनंत पैलू आहेत. पहिलं, नेमाडे आजचे लेखक आहेत. अतिशय दणकट लेखक आहेत. पाचदहा वर्षात लेखक मागे पडतात, विसरले जातात. आज ५७ वर्षे होऊनही नेमाडेंची कादंबरी शिळी होत नाही. लोकप्रियता आणि विद्वतमान्यता असे दोन्हीही साध्य केलेले लेखक मराठीत चारपाचसुद्धा नाहीत.  नेमाडे त्यात अग्रभागी आहेत. दुसरं, जातीव्यवस्थेवर टिका करणारे मोजके का होईना लेखक मराठीत आहेत. जातीव्यवस्थेवर आसूड ओढणारे आणि स्वत:च्या जातीची सालटी काढणारे एक महात्मा जोतीराव फुले आणि त्याच जातकुळीचे दुसरे नेमाडे आहेत. ही यादी आणखी वाढवायची झाली तर रंगनाथ पठारे सोडले तर आज तरी मला पहिल्या श्रेणीतले कुणी दिसत नाहीत.

स्वत:च्या जातीवर टिका करायला फार मोठे धैर्य आणि नैतिकबळ असावे लागते, ते नेमाडेंमध्ये जबरदस्त आहे. असे बळ असलेले काही लोक आजूबाजूला जरूर आहेत पण ते प्रथम श्रेणीचे ललित लेखक नाहीत.

तिसरे कारण नेमाडे द्रष्टे आहेत. त्यांचा आवाका लांब पल्ल्याचा आहे. त्यांची जातीव्यवस्थेबद्दलची मांडणी वादग्रस्त आहे. त्यांची इतर बरीच मतं अनेकांना पटत नाहीत. पण ती मांडण्याचं धाडस नेमाडेंमध्ये ठासून भरलेलं आहे. याविषयावर स्वतंत्रपणे केव्हातरी लिहायला हवे. तथापि आजची भारतीय जातीव्यवस्था नेमाडेंना जितकी आरपार समजलीय तितकी समज असलेले लोक आजूबाजूला क्वचितच दिसतात.

माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर नेमाडेसरांचे पोस्टकार्ड मला आले. आपल्या आवडत्या लेखकाने आपले पुस्तक वाचावे आणि त्याबद्दलचा अभिप्राय पत्राद्वारे कळवावा याचा आनंद अपार असतो. त्याच महिन्यात कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठाच्या सेमिनारमध्ये नेमाडेसरांची भेट झाली. मी त्यांना भेटलो. माझी ओळख सांगितली. मी त्यांच्या पायाला स्पर्श करणार तोच त्यांनी मला मिठी मारली. त्या भेटीत नेमाडेसरांचे रसायन नेमके काय आहे ते थोडेथोडे उलगडायला लागले. गेली ३१ वर्षे त्या केमिस्ट्रीचे आरभाट पदर उलगडतच आहेत. आजही हे काम पूर्ण झालेले नाही.

दरम्यान टिकास्वयंवर आले.त्याला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. लोकसत्ताकार अरूण टिकेकरांनी छाछू वादाला पुरस्कार नावाचा अग्रलेख लिहून त्यावर टिकेची झोड उठवली. टिकेकरसरांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असूनही मी या अग्रलेखावर खरपूस टिका केली. टिकेकरांशी तावातावाने वादही घातला. त्यातनं टिकेकरांची नाराजीही ओढवून घेतली.

बहुप्रतिक्षित हिंदू आली आणि तुफान गाजली. मला हिंदूही आवडली. त्यानंतर सरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

नेमाडॆंवर जळणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. खरंतर अशा भरपूर जळाऊ लाकडाच्या वखारीच आहेत असं म्हटलं तरी चालेल. माझा एक मित्र तर दर महिन्या दोन महिन्याला काहीही बादरायणी संबंध जोडून नेमाडॆंवर फेसबुकवर बरसत असतो. नेमाडॆंनाही वादविवाद आवडतात. तेही सुरसुरी आल्यासारखे त्यात भाग घेतात. नेमाडॆंमध्ये अफाट उर्जा आहे.

मध्यंतरी आम्ही त्यांना महात्मा फुले समता पुरस्कार दिला. तो स्विकारायला ते प्रतिभाताईंसमवेत सहकुटूंब सवड काढून आले. सलग तीन दिवस सरांचा सहवास लाभला. मोकळ्याढाकळ्या गप्पा हा सरांचा विशेष. मी त्या उभयतांना फुलेवाडा दाखवला. सुमारे तासभर ते त्यात रमून गेले.

कार्यक्रमाच्या स्टेजवर चढताना माझे जुने पत्रकारमित्र अद्वैत मेहता यांनी सरांची पुरस्काराबाबतची भूमिका आम्हाला हवीय, तेव्हढी घेऊन देण्याची मला गळ घातली. नेमाडेसर, मीडियापासून दहा हात दूर असतात. मी त्यांना बाईट देण्याची विनंती करताच त्यांनी ती ताबडतोब फेटाळून लावली. मला म्हणाले, ‘तुला कल्पना नाही, हे पत्रकार लोक फार चावट असतात. त्यांना तिसर्‍याच कुठल्यातरी गोष्टीत रस असतो. पुरस्काराबाबबतची भूमिका हा फक्त त्यांचा बहाणा आहे. या डॅंबीश लोकांना मी कधीच जवळ करीत नाही.’

नक्की पहा, ऐका-भालचंद्र नेमाडॆंची विशेष मुलाखत https://bit.ly/3eq1oXs

अद्वैतच्या भरोश्यावर त्यांना मी पुन्हापुन्हा विनवत राहिलो. शेवटी सरांना माझी कणव आली. ते वाहिन्यांशी बोलायला तयार झाले. पण मला म्हणाले, ‘त्यांना सांग, मी प्रत्येकाशी वेगवेगळे बोलणार नाही, सगळ्यांना एकच बाईट देईन.’ सगळे तयार झाले. सर महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, त्यांच्या विचारातील क्रांतिसुत्रे यावर भरभरून  बोलले. बाईट संपला. आम्ही जायला वळलो. चार पावले गेलो. इतक्यात जाता-जाता एकाने विचारले, ” सर, साहित्य संमेलन तोंडावर आलेय, जाणार का?” नेमाडेसर उसळले आणि चिडून म्हणाले, ”मी असल्या रिकामटेकड्यांच्या उद्योगाकडे फिरकत नसतो.”

पुरस्कार वितरण समारंभ अप्रतिम झाला. सरांचे “समाजशास्त्रज्ञ महात्मा फुलेंवर” अफलातून भाषण झाले. पण त्यातले अवाक्षरही कुणी दाखवले नाही. बहुतेक सगळ्या वाहिन्यांनी साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग यावर दिवसभर दळण दळले. असा काही वाद रंगवला की त्यावर मग आजचा सवाल आणि बेधडक, आणि कायकाय कार्यक्रम घेतले गेले. नेमाडॆसर अशा चर्चांना वाहिन्यांवर जात नाहीत म्हणून मग गाड्याबरोबर नळ्याची यात्रा तसे मला बोलावले गेले. अर्थातच मी वाहिन्यांवर गेलो नाही.

पण माझ्यामुळे सरांवर हा प्रसंग ओढवल्याने मला फार अपराधी वाटले. सर मजेत होते. मला म्हणाले, “सोड रे. काय घेऊन बसलास? कोण बघतो या ****ट! वाहिन्या. तुला सांगतो, म्हणूनच मी बोलत नव्हतो. तर तुला त्यांचा फार पुळका. एक सांगतो. पत्रकार हा कधीही कोणाचाही मित्र नसतो. तो फक्त पत्रकार असतो, हे यापुढे कायम लक्षात ठेव.”

मराठीला अभिजात दर्जा मिळायला पाहिजे हा माझा लेख ‘लोकराज्य’मध्ये प्रकाशित झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सचिव विजय नहाटा आणि संचालक प्रल्हाद जाधव यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली.

मी नेमाडे सरांना भेटलो. त्यांचा प्रमाण मराठीला [पुणेरी] अभिजात दर्जा मिळायला विरोध होता. मी माझी भूमिका सांगितले. मी वर्‍हाडी, खानदेशी [अहिराणी] कोकणी, मराठवाडी आदी ५२ बोलीभाषा हीच खरी मराठी असे सांगताच सर खुलले. त्यांनी सगळे सहकार्य देऊ केले. पुढे आमचे अध्यक्ष पठारे सरही त्यांचे निकटवर्ती असल्याने आम्ही नेमाडेसरांना याबाबतीत भरपूर त्रास दिला.

खूपदा भेटलो. चर्चा केल्या. तासनतास सरांसोबत बैठका झाल्या. नेमाडेसरांची मराठी निष्ठा इतकी बावन्नकशी आहे की, ते प्रत्येक बैठकीला येताना आमचा अभिजातचा मसुदा वाचून त्यावर टिपणं काढून मगच बैठकीला यायचे. त्यांच्या सुचना अत्यंत मौलिक, नेमक्या आणि शास्त्रशुद्ध असायच्या. आम्हाला आमच्या मसुद्याचे त्याबरहुकुम फेरलेखन करावे लागायचे. हे करताना त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. एव्हढे सगळे करूनही आभारात त्यांच्या नावाचा उल्लेखसुद्धा नको अशी नेमाडे सरांनी आम्हाला तंबी दिली.

त्यामुळे आमचाही नाईलाज झाला. आमच्या अभिजात मराठी प्रकल्पाला सर्वाधिक मदत, मार्गदर्शन आणि अचूकता येण्यासाठीचे सहकार्य जर कोणी केले असेल तर ते नेमाडेसरांनी केले. पण त्यांनी आमच्याकडून आधीच कबूल करून घेतल्याने आम्ही त्यांचा साधा आभारातही उल्लेख करू शकलो नाही.

नेमाडे सरांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करावे यासाठी मी त्यांना अनेकदा भेटून गळ घालत असे. फुले त्यांचेही आवडते असल्याने तेही विचार करायचे. पण त्या काळात सर अनेक व्यापांमध्ये बुडालेले होते. मुख्य म्हणजे त्यांना निवृत्तीनंतरचे पेन्शन मिळत नसल्याने त्याचा पाठपुरावा करता करता ते मेटाकुटीला आलेले होते. एकदा त्यांना तुमचे पेन्शनचे काम माझ्यावर सोपवा, तुम्ही भाषांतराला वेळ द्या ,अशी मी योजना सुचवली. ती त्यांनी मान्य केली. प्राध्यापकाच्या नोकरीत सरांनी ब्रेक घेतलेला होता.

म्हणजे ते महाराष्ट्राबाहेर गोव्याला काही वर्षे गेलेले होते, त्यामुळे त्यांना सलग सेवेअभावी पेन्शन मिळत नव्हते. मी आमचे उच्च शिक्षण खात्याचे तत्कालीन सचिव जे. डी. जाधव यांना भेटलो. त्यांनी आत्मियतेने केसमध्ये लक्ष घातले. आणि जादूची कांडी फिरावी तसे घडले. फाईल मार्गी लागली. जेडीसर म्हणाले, नेमाडॆंनी माझे एक काम केले तरच मी त्यांच्या फाईलवर अंतिम सही करीन.

आता आली का पंचायत?

नेमाडे सर तसे अतिशय वल्ली आहेत. किंचित विक्षिप्त म्हटले तरी चालेल. मला भिती होती की ते म्हणतील, “उडत गेली पेन्शन, मला जेडींची अट मान्य नाही.” मी त्यामुळे जेडींचे काय काम आहे ते विचारायचे टाळत होतो. पण एकदा भीड रेटून त्यांना त्यांची अट/काम मी विचारले. त्यांनी काय सांगावे?
तर ते म्हणाले, “नेमाडे माझी आवडते लेखक आहेत, त्यांनी एकदा माझ्याकडे चहाला यायला हवे!”
हत्ततेरीकी! एव्हढेच ना?

नेमाडॆ सर मंत्रालयात चहाला आनंदाने आले. मोठा चहासोहळाच झाला तो. त्यांनी चहासाठी दहा मिनिटे दिलेली होती. प्रत्यक्षात गप्पा इतक्या रंगल्या की तीन वेळा चहा झाला.

(लेखक नामवंत अभ्यासक व विचारवंत आहेत)

‘उदाहरणार्थ नेमाडे’ – ट्रेलर

Previous articleशरद पवारांच्या मनात काय ?
Next articleमाईसाहेब : डॉ. आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here