कठोर परिश्रमामुळे अधिक पैसा व आनंद मिळतो, या गोष्टीला काहीच पुरावा नाही-सेलेस्टी हेडली

अनुवाद -अन्वय जवळकर

अमेरिकन लेखिका,पत्रकार व वक्त्या सेलेस्टी हेडली यांचे ” Do Nothing : How To Break Away from overworking , overdoing and Underliving ” हे नवीन पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. त्या पुस्तकात त्यांनी कठोर परिश्रमामुळे पैसा व आनंद मिळतो, हे सपशेल खोडून काढले आहे. सेलेस्टी हेडलीचे हे पुस्तक त्यातील या अशा वेगळ्या विचारांमुळे सध्या गाजते आहे. या चर्चेत असलेल्या पुस्तकाच्या निमित्ताने Sunday Times मध्ये आज शर्मिला गणेशन यांनी घेतलेली त्यांची मुलाखत प्रसिध्द झाली आहे.त्या मुलाखतीचा हा स्वैर अनुवाद.

………………………………………………….

सेलेस्टी हेडली यांना तुम्हाला मनसोक्त हसावायचं असेल तर तुमच्या वाक्यांमध्ये ‘Self-made man’ , ‘Multitasking’ असले गंभीर शब्द वापरा. ” Do Nothing : How To Break Away from overworking , Overdoing and Underliving ” या त्यांच्या नव्या कोऱ्या पुस्तकात त्यांनी या व अशा औद्योगिकीकरणावर आधारलेल्या फसव्या आणि भंपक कल्पनांना उधळून लावलं आहे. त्यांच्या मते या कल्पनांनीच लॉकडाऊनच्या काळातही आपल्या आयुष्याला चिंताग्रस्त केलं आहे. त्याहून भयंकर म्हणजे आपल्या सर्जनशीलतेला सदोष करून टाकलंय. निवांतपणे आयुष्य जगू इच्छिणाऱ्या, आरामखुर्चीत बसून दिवास्वप्न पाहायला आवडणाऱ्या लोकांच्या कडव्या पाठीराख्या असणाऱ्या हेडली यांनी निरंतर चढाओढ आणि केवळ धावपळच केंद्रस्थानी असलेल्या विद्यमान संस्कृतीचा पुनर्विचार करण्यासाठी लॉकडाऊन ही  उत्कृष्ट संधी असल्याचे या मुलाखतीत सांगितले आहे

१. जवळपास १०० वर्षापूर्वी बर्ट्रांड रसेल याने इन डिफेन्स ऑफ ईडलनेस ( निष्क्रियतेच्या च्या बाजूने) हा निबंध लिहिला होता, आजच्या अटेंशन इकॉनॉमिच्या युगात तुला “आर्ट ऑफ डुइंग नथिंग” (काहीच न करण्याची कला) चा बचाव का करावासा वाटतो?

-आपण रसेलच्या सूचना तर ऐकल्या नाहीतच पण रसेलाच्या मते नव्वद वर्षांपूर्वी सुद्धा आपल्यासाठी अतिशय घातक असलेली काही धोरणं आणि सवयी आपण अधिक जवळ करत गेलो . जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण जर फक्त विश्रांतीलाच महत्त्व देत बसलो तर आपण कुठलीच गोष्ट पूर्णत्वाला नेऊ शकणार नाही, तर लक्षात घ्या.  मानवी इतिहासात आपण वर्षभरात  निम्मा काळच  काम करत आलेलो आहोत. प्रत्येक दिवशी , संपूर्ण दिवसभर काम करणे ही आता अलीकडे उदयाला आलेली संकल्पना आहे.

– तुला या पुस्तकाचं नाव Cult of Efficiency (कार्यक्षमतेचा पंथ) ठेवायचं होतं, हे खरं आहे का? 

-हो हे खरं आहे. हा वाक्यप्रचार  रसेलने त्याच्या निष्क्रियतेवरच्या जगप्रसिद्ध निबंधात वापरलेला आहे. मला वाटतं हा शब्द अगदी समर्पक आहे कारण आपल्याला पूर्वीपासून शिकवण्यात आलेल्या कष्ट करण्याविषयीच्या नितीतत्वांना आपण डोळे झाकून पूज्यभावाने अंगिकारत आलेलो आहोत. आणि आपला असा दृढ समज झालेला आहे की, प्रचंड कष्ट आपल्याला जास्तीत जास्त पैसा ,आनंद आणि अधिक चांगल आयुष्य मिळवून देऊ शकतात. पण संशोधन काहीतरी वेगळ सांगतात. अतिप्रमाणात केलेले कष्ट तुम्हाला अधिक संपत्ती मिळवून तर देत नाहीतच पण तुमच्या स्वास्थ्यावर त्याचे गंभीर परिणाम झालेले आहेत. कार्यक्षमता आणि प्रचंड कष्टासंबंधीच्या पारंपरिक शिकवणी आपल्या डोक्यात इतक्या घट्ट बसलेल्या आहेत की त्या आपल्यासाठी लाभदायक तर सोडाच उलट अधिक घातकआहेत याची समज येण्यासाठी दीर्घकालीन नवीन शिकवणीची गरज भासणार आहे.

-लेझीनेस आणि इडलनेस यात काय फरक आहे?

-काम करण्याची अजिबात तयारीच नसणं म्हणजे लेझीनेस. इडलनेस म्हणजे निष्क्रियता. संपूर्ण लक्ष केंद्रीत करून काम करणे आणि  काम आणि फुरसतीचा वेळ या दोन अवस्थांमध्ये आळीपाळीने काम करण्यासाठीच आपल्या शरीराची आणि बुद्धीची रचना निसर्गतःच करण्यात आलेली आहे.( या दोनपैकी कुठलीही अवस्था विनाकारण नाही.) आपल्या शरीराचं आणि बुद्धीचं हेच मॉडेल तर आपल्याला सर्जनशीलतेच्या आणि स्वहिताच्या पातळीवर सर्वोत्तम रिझल्ट मिळवून देण्यासाठी सर्वात योग्य आहे.

-तंत्रज्ञान ( technology) आपल्या निष्क्रिय रहाण्याची क्षमता नष्ट करतेय का?

-तंत्रज्ञान हे एक साधन आहे . ते काही मुळात वाईट नाही. खरंतर अडचण आपण जे साधन वापरतो त्यात नसतेच , आपण ते कसं वापरतो यात असते.

-Self Made man संज्ञा आपण साशंकतेने का घ्यावी?

-पहिली गोष्ट म्हणजे ‘सेल्फ मेड मॅन’ अशी काही गोष्ट अस्तित्वातच नाही. या जगात कुठलीही व्यक्ती कोणाच्याही मदतीशिवाय मोठी मजल मारू शकलेली नाही.सेल्फ मेड मॅन हि कल्पना लोकांना असं मानायला भाग पाडत की , अधिकाधिक कष्ट केल्याने त्यांना संपत्ती आणि यश प्राप्त होऊ शकेल. मात्र हे अजिबात खरं नाही. सांखिकीय आलेख तुम्हाला हेच सांगतील की, बहुतांश देशांमध्ये संपत्ती आणि सत्ता हस्तगत करणे प्रचंड कठीण आहे. जवळपास अशक्यप्राय आहे , तुम्ही किती मेहेनत आणि कष्ट सोसता याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

– मग मल्टी टास्किंग सुध्दा मिथ्या आहे का?

-मानव एकाच वेळी अनेक कामं करू शकतो , ही सुद्धा चुकीची कल्पना आहे.  त्याची मर्यादा समजून घ्यायला हवी. एकाच वेळी दोन काम करण्याऐवजी आपला मेंदू त्या दोन कामांवर जेवढ्या जास्त गतीने करता येईल तेवढ्या जास्त गतीने स्विच करत रहातो. ही क्रिया अतिशय कठीण असते आणि आपल्या मेंदूमधल्या ग्रे मॅटरचा (मेंदूला कार्यक्षम ठेवणारा अतिशय महत्त्वाचा स्त्राव.) प्रचंड प्रमाणात निचरा करत असते. रिसर्चनुसार Multitasking मुळे तुम्ही करत असलेल्या कामांचा दर्जा हा दुप्पट प्रमाणात खालावतो आणि तुमचा आयक्यू १० ते २० अंकांनी खाली घसरतो. कालांतराने याच मल्टिटास्किंगमुळे तुमच्या आकलनक्षमतेवर दूरगामी घातक परिणाम होतात आणि कुठल्याही कामावर लक्ष केंद्रीत करणं तुमच्यासाठी दुरापास्त होऊन बसतं.

 –तर थोडक्यात तू म्हणते आहेस की आनंदी रहाण्यासाठी आणि समाधानी होण्यासाठी सतत काम ( कष्ट) करत राहणं गरजेचं नाही?

-नाही. अजिबात नाही.हाच तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळाली तर तुम्ही निवांत असाल. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला तुमचा असा वेळ मिळेल. बिछान्यातून उठून कार्यरत होण्यासाठी तुमच्या जवळ तुमचं ध्येय आणि कारणं असतील. आणि तुम्ही तेवढेच आनंदी आणि निरोगी असाल जेवढे तुम्ही नोकरीवर असताना होता.

-संवादाची पुरस्कर्ती म्हणून तुला असं वाटतं का की लॉकडाऊनच्या काळात संवादाची कला पूर्ववत होत आहे?

-मला हे ऐकून खूप आनंद होतोय की लोक पुन्हा आपल्या प्रियजनांशी , मित्रांशी नियमितपणे बोलत आहेत. त्यांना वेळ देत आहेत. कित्येक रिसर्चनुसार असं दिसून आलंय की, रस्त्यावरच्या अनोळखी माणसांशी ,हॉटेलमधील वेटरसोबत केलेला प्रासंगिक संवाद हा आपल्या भावनिक स्वास्थ्यासाठी नेहमीच उपायकारक ठरलेला आहे. कदाचित असं असू शकेल की लोकांना सामाजिक सुसंवादाचं महत्त्व पटायला आता सुरवात झाली आहे.

 -शेवटी , तुला काय वाटतं , हा  कोरोना व्हायरस आपल्याला काय सांगू पाहतोय ? 

-आपल्याशी संवाद साधू पाहतोय खरंतर हा व्हायरस नाहीय. ते आपण स्वतःच आहोत जे स्वतःशी बोलू पाहतोय. मला वाटतं आपण एक आवाज ऐकतोय जो आपल्याला सांगतोय, ” हे सगळ एवढं कठीण का होऊन बसलय? स्वतःच्याच घरी थांबणं इतकं कठीण का होऊन बसलंय? जे घर माझ्यासाठी सदैव एक आसरा असायला हवं , एक आश्रयस्थान..तिथे असताना मी इतका दुःखी का व्हावं? ” आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच लागणार आहे , आपल्या स्वतःसाठी.

आपल्या पुस्तकाविषयी सेलेस्टी हेडली काय म्हणताहेत बघा

Previous article ‘स्पेस एक्स’ ने घडविला इतिहास
Next articleचंद्र आणि मंगळवारीचा दिवस आता दूर नाही!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.