‘स्पेस एक्स’ ने घडविला इतिहास

‘टीम मीडिया वॉच’

अमेरिकेतील  ‘स्पेस एक्स’   या अंतराळ क्षेत्रात कार्यरत खाजगी कंपनीचे संस्थापक ‘एलॉन मस्क’ यांनी ‘नासा’ च्या (नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) सहकार्याने अंतराळवीर अवकाशात पाठवण्याचे कामगिरी यशस्वी करून दाखविली आहे. फ्लोरिडाच्या केप कनवरल येथील जॉन एफ केनडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्स ‘फाल्कन ९’  या अतिविशाल रॉकेटच्या सहाय्याने, स्पेस एक्सनेच बनवलेल्या ‘ड्रॅगन २ या अवकाश कुपीतून रॉबर्ट बेनकेन  आणि डग्लस हुर्ले या दोन अंतराळवीरांनी अवकाशात झेप घेतली आहे. १९ तासांचा प्रवास करत ही कुपी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला जोडली जाईल. त्यानंतर हे दोन अंतराळवीर अवकाश स्थानकात प्रवेश करतील, तिथे सुमारे ४ महिने ते राहतील.

कोरोनामुळे संपूर्ण अमेरिकेवर अवकळा आली असताना या घटनेने अमेरिकेत उत्साह निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय उत्साहाने ही माहिती जगाला दिली. ते स्वतः यावेळी उपस्थित होते.

स्पेस एक्स ही टेस्लासाठी प्रसिद्ध असणाऱ्या  एलॉन मस्क यांची कंपनी आहे. २००२ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने आतापर्यंत पुन्हा वापरण्याजोगी म्हणजेच रियुजेबल रॉकेट लाँच सिस्टीम तयार केलेली आहे. या कंपनीने अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यासाठी नासासोबत भागीदारी केली आहे. अंतराळात आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये माणसं पाठवणारी ही पहिली खासगी कंपनी ठरली आहे.अमेरिकेने त्यांच्याकडची स्पेस शटल्स २०११ पासून वापरणे मध्ये बंद केलं. त्यानंतर अमेरिकन अंतराळवीरांना घेऊन जाणारी ही पहिली मोहीम आहे. अमेरिकेच्या नासाने बोईंग कंपनीशीदेखील अंतराळवीरांना स्पेस स्टेशनपर्यंत नेण्यासाठी अशाच प्रकारचा करार केलेला आहे.

खाजगी कंपनी अवकाशात पाठवणार अंतराळवीर