एसटी म्हणजे आयुष्याच्या ऊनसावलीचा कॅलिडिओस्कोप आहे. तिची सिंगल – डबल बेल म्हणजे धावण्या- थांबण्याचे संकेत नाहीत, तर आयुष्याच्या धावपळीचा हिशोब आहे!! लोक विमान प्रवासाच्या गमज्या मारतात,पण एसटीत बसण्याचे स्वप्नही कित्येकाचे राहून गेले आहे. एसटी न पाहिलेली असंख्य गावे अजूनही महाराष्ट्रात आहेत. गावात एसटी सुरू करा,म्हणून अनेक गावकरी निवेदने देत असतात,मागणी करत असतात. एसटीच्या आगमनाचे सोहळे बँडबाजा लावून, फटाके फोडून साजरे होतात. गावखेड्यातील मुली निर्धास्त होऊन शहरात शाळा-कॉलेजात एसटीनेच जातात. जगातील नामवंत मोटारींचे ब्रँड आणि कारखानदारी महाराष्ट्रात आली आहे, पण रात्रीच्या मुक्कामी गावात थांबलेली एसटी बघून आनंद पावणाऱ्या पिढ्या अजूनही एसटीच्या गोष्टी सांगतात.
दुसरे छायाचित्र मंगळवारी दुपारचे. पुण्याजवळच्या दिवेघाटातील. या घाटातील वारीचे विहंगम दृश्य आनंद, उत्साहाचे जगणे असते. दरवर्षी आपण ते बघत असतो, अनुभवत असतो, डोळ्यांत साठवीत असतो. लाखो वारकरी, भगवे ध्वज, पताका असे सगळे बघून हरिनामाची नुस्ती धुंदी प्रत्येकाला चढते. भक्तीचा ठेवा नजरेत पडत असतो….त्याच ऐतिहासिक दिवेघाटात यापूर्वी कधीच नव्हे असे दृश्य छायाचित्रकारांनी टिपले. चित्र बोलत होते. संवाद साधत होते. गलबलून आले. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पांढऱ्या सरकारी मोटारीचा ताफा, पोलीसांच्या व्हॅन आणि अग्रभागी हारांच्या माळांनी लपेटलेली ” एसटी” होती… त्या बसमध्ये माऊलींच्या पादुका होत्या. श्री क्षेत्र आळंदी येथून आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे एस टी बस मधून मार्गस्थ झाल्या होत्या. ती निव्वळ एसटी नव्हती. हारफुलांचे आच्छादन असलेला ‘माऊलींचा रथ’ होता. साक्षात माऊलींनी आपले प्रस्थान यंदा एसटीतून ठेवले होते. माऊलींपाठोपाठ त्रंबकेश्वरातून निवृत्तीनाथ, देहूतून तुकोबाराय, सासवडातून सोपानदेव, खान्देशातून मुक्ताबाई, कौडण्यपुरातून रुख्मिणी असे सगळे ‘एसटीतून’ पंढरीला मार्गस्थ झाले. निवृत्तीनाथ ‘विठाई’ नावाच्या बसमधून निघाले. अर्थात, एसटीने नेहमी आपले रूप बदलले.एशियाड, शिवनेरी, हिरकणी, शिवशाही असे तिचे बारसे होत गेले. लालडब्याची ती कधी ‘लालपरी’ झाली ; आता तर ती निवृत्तीनाथांची ‘विठाई’सुद्धा झाली..!!