Online Education हा सध्या एक महत्वाचा प्रश्न आहे. नेट आणि स्मार्टफोनची उपलब्धता, सोयीची वेळ, अनुकूल वातावरण सगळ्यांना शक्य नाहीये. परंतु संवेदनशीलतेने या आव्हानांकडे पाहिलं आणि ठरवलं तर ‘अक्षरनंदन’सारखी शाळा यातल्या बहुतेक समस्यांवर मात करु शकते हे सांगणारा, हा लेख वाचायलाच हवा –
—————————————
-गौतमी आशा सचिन
ऑनलाईन क्लासेसना हजर राहता न आल्याने केरळमधील एका दलित कुटुंबातील १४ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. पंजाबमध्ये ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहण्यासाठी स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने १७ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. हिमाचल प्रदेशातील एका दूधविक्रेत्याला आपल्या मुलांना स्मार्टफोन घेऊन देण्यासाठी त्याच्या उत्पन्नाचे एकमेव साधन असलेली त्याची गाय विकावी लागली कारण शाळेतील शिक्षकांनी त्याला सांगितले की फोन नसेल तर तुमच्या मुलांना पुढे शिकता येणार नाही.”
कोरोनाच्या काळात सर्व शाळा-कॉलेजेस ऑनलाईन सुरू करण्याचे आदेश दिले गेले. त्यानंतर काहीच काळात आलेल्या ह्या मन विषण्ण करणा-या बातम्या. सर्वसमावेशक शिक्षण हा सर्वसमावेशक विकासाचा पाया आहे! आपल्या संविधानात ‘Right to education’ हा मूलभूत हक्क सर्वांना प्रदान करण्यात आला आहे, त्याचमध्ये `Right to online education’ चाही समावेश झाला पाहिजे अशी रास्त मागणी आज अनेक स्तरांतून होत आहे.
ह्या सर्व बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील `अक्षरनंदन’ ह्या विनाअनुदानित शाळेने अवलंबलेली धोरणं ही विशेष नोंद घेण्यासारखी आहेत. अक्षरनंदन ही एक प्रयोगशील, मूल्याधिष्ठित, ‘अनुभवातून शिक्षण’ ह्या तत्त्वाला अनुसरून चालणारी मराठी माध्यमाची शाळा आहे. सर्वसमावेशकतेवर शाळेचा कायमच विशेष भर राहिलेला आहे. जेव्हा ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले गेले तेव्हा सर्वप्रथम शाळेतील ताईंची (शिक्षकांची) एक बैठक घेतली गेली ज्यात ऑनलाईन माध्यमातून वर्ग चालू करण्यात काय काय अडचणी येऊ शकतात, ह्याचा विचार केला गेला. त्यातून पुढे आलेली पहिली अडचण म्हणजे शाळेतील शिक्षकांना ऑनलाईन तंत्रज्ञान वापरण्याची सवय नव्हती. त्यासाठी मग त्यांना वेगळं प्रशिक्षण दिलं गेलं. ज्यात शाळेच्याच तंत्रस्नेही पालकांनी मदत केली. गूगल क्लासरूम कसं वापरायचं, पीपीटीचा वापर कसा करून घ्यायचा, मुलांना गृहपाठ कसा व कशाद्वारे द्यायचा ह्या सर्वांचा ह्यामध्ये समावेश होता.
दुसरं म्हणजे शाळेत सर्वच सामाजिक-आर्थिक स्तरातील मुलं असल्यानी सर्वांकडे मोबाईल/नेटवर्क उपलब्ध असेल का हा एक मुख्य प्रश्न होता, जो सोडवल्याशिवाय ऑनलाईन वर्ग चालू करता येणं शक्य नव्हतं (किंबहुना काही मुलं अशा प्रकारे शिक्षणापासून वंचित राहणं हे शाळेच्या तत्त्वात बसणारं नव्हतं). प्रत्येक इयत्तेतील पालकप्रतिनिधींच्या सहाय्याने किती जणांकडे किमान एक मोबाईल व नेटवर्क कनेक्टिविटी आहे ह्याचा सर्व्हे केल्यावर, काही केसेस अशा समोर आल्या ज्यांच्या घरी एकही स्मार्टफोन नव्हता. तेव्हा शाळेतर्फे अशा मुलांना स्मार्टफोन उपलब्ध कसा होईल, यासाठी प्रयत्न करण्यात आले. ज्यांना नेटपॅक भरणंही शक्य नसेल, अशांना शाळेतर्फे नेटपॅक भरून देण्याची तयारीही शाळेने दाखवली होती, परंतु सुदैवाने अशी कोणती केस आली नाही. बालभारतीने ह्यावर्षी पीडीएफ स्वरूपात मोफत पुस्तकं उपलब्ध करून दिलीच होती, पण काही मुलांना ऑनलाईन पुस्तकवाचन शक्य होत नाही. अशा मुलांसाठी वरच्या वर्गात गेलेल्या मुलांना त्यांच्या आधीच्या वर्षाची पुस्तकं शाळेत जमा करण्याचं आवाहन शाळेने केलं आणि ती पुस्तकं ज्यांना नवीन पुस्तकं विकत घेणं सध्या शक्य नाही अशा मुलांपर्यंत पोहोचवण्यात आली.
अजून एक महत्वाचा मुद्दा पालकांकडून उपस्थित करण्यात आला तो म्हणजे स्क्रीन टाईमचा. तेव्हा, ७ वी ते १० वीचे आठवड्यातून तीन ते चार वेळा आणि एका दिवशी एकच तास असे ऑनलाईन वर्ग चालू करण्याचं सर्वांच्या सहमतीने ठरवलं गेलं. ह्यात पुन्हा एक मुद्दा असा आला की काही पालकांना ऑफिसला जावे लागते आणि मोबाईल घरी सोडून जाणे तर शक्य नसते. मग ह्यावर उपाय म्हणून प्रत्येक वर्गाच्या पालकांसोबत चर्चा करून त्यांच्या सोयीची अशी तासिकांची वेळ ठरवली गेली. अशा रितीने आता ७ वी ते १० वीचे आठवडयातून ३-४ वेळा शिक्षकांसोबत ऑनलाईन झूम क्लास होतात आणि इतर वेळी त्यांना विविध ऑडिओ/व्हिडिओज च्या माध्यमातून शिकवलं जातं, गृहपाठ दिले जातात, विषयाशी निगडीत एखादा व्हिडिओ पाठवून त्यावर आपलं मत लिहायला सांगितलं जातं. गणिताच्या बाबतीत, मुलं वहीत गणितं सोडवून व्हॉट्सॲपवर ताईंना त्याचे फोटो पाठवतात आणि मग ताई ती गणितं तपासून त्यांना परत पाठवतात. शाळा अगदी गूगल फॉर्म्सच्या मदतीनी १० वीच्या विद्यार्थ्यांच्या सराव चाचण्याही घेत आहे. लहान वर्गांचीही आठवड्यातून एकदा ताईंसोबत झूम भेट असते ज्यामध्ये मुख्यत: एखादा विषय घेऊन त्यावर गप्पा मारल्या जातात किंवा माहिती सांगितली जाते. (ऑनलाईन वर्ग घ्यायला ताईंना अधिक मेहनत घ्यावी लागते, पण सर्व ताई ती न थकता घेतात!) इथे हे ही नमूद करावे वाटते की ज्या पालकांना ऑनलाईन शिक्षणात सहभाग घ्यायचा नव्हता आणि मुलांची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी होती, शाळेने त्यांना तसा अवकाशही दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांना कठीण आर्थिक परिस्थितीस सामोरं जावं लागत आहे, अनेकांना शाळेची फी भरणंही अशक्य झालं आहे. अशावेळी शाळेने पालकांना ३ ते ४ टप्प्यात फी भरायची मुभा दिली आहे आणि ज्यांना अगदीच शक्य नाही त्यांना जमेल तितकी रक्कम भरायची सवलत दिली आहे. ह्यामुळे शाळेला मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. त्यासाठी (सर्व शिक्षकांच्या सहमतीने) शिक्षकांच्या पगारात काही महिने कपात करावी लागणार आहे. त्याचवेळी पालकांशी वैयक्तिकपणे बोलणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शाळेपुढील आर्थिक आव्हानाची कल्पना देणे हेही चालू आहे. त्यामुळे यातून लवकरच मार्ग निघेल आणि सध्या करावी लागलेली कपात नंतर जास्तीत जास्त भरून देण्याचा शाळेचा पूर्ण प्रयत्न असणार आहे.
शाळा फक्त इथेच थांबलेली नाही; ह्या काळात अनेक लोकांपुढे अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला. शाळेतील अशा काही पालकांसाठी शाळेत, काही पालकांच्या पुढाकाराने लॉकडाऊनच्या काळात धान्यबँक सुरू करण्यात आली ज्यात शाळेनी आणि अनेक शिक्षकांनीही सहभाग घेतला. शाळेशी जोडलेला आणखी एक घटक म्हणजे रिक्षावाले/व्हॅनवाले काका. लॉकडाऊनमध्ये शाळाच बंद असल्याने त्यांचाही व्यवसाय ठप्प आहे. अक्षरनंदन शाळेशी संलग्न असणा-या रिक्षा आणि व्हॅनवाल्या काकांनी शाळेला खास पत्र लिहिलं आहे ज्यात त्यांनी शाळेचं वेगळेपण नमूद केलेलं आहे. ते लिहीतात, “इतर शाळांतील पालकांनी त्यांच्या रिक्षावाल्या काकांना मार्च महिन्यापासूनचे पैसे दिलेले नाहीत. मात्र, अक्षरनंदन शाळेतील ताई व पालक प्रतिनिधींनी सर्व पालकांसोबत चर्चा करून आमचे मे महिन्यापर्यंतचे सर्व पैसे जमा केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुढचाही विचार केला की ह्यापुढचे काही महिने शाळा बंदच राहणार आहे, तर रिक्षा आणि व्हॅनवाल्या काकांना आपण सर्व जमेल तशी मदत करूया. या अनुभवांमधून आम्हाला माणुसकीचे दर्शन झाले!”
इथे सर्वात महत्वाची गोष्ट अशी, की ह्या सर्व गोष्टींना शाळेने आपली जबाबदारी मानलं! ऑनलाईन वर्गांसाठी मोबाईल वा इंटरनेट कनेक्शनची व्यवस्था शाळेने पालक वा मुलांवर सोडून न देता तिला आपली जबाबदारी मानलं, रिक्षावाल्या-व्हॅनवाल्या काकांचा विचार केला. केवळ फी भरता आली नाही म्हणून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जाण्याचे प्रसंग आजूबाजूला अगदी सहज घडत असताना शाळेने पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून फीमध्ये सवलती दिल्या. त्यासाठी शिक्षकांनी स्वत:च्या पगारात कपात करून घ्यायला तयार होणं, पालकांच्या सूचना विचारात घेऊन वेळापत्रक बनवणं, पालक आणि शाळेचं परस्परसहकार्य ह्या सर्व गोष्टी विशेष उल्लेखनीय आहेत! ऑनलाईन शिक्षण हे मुलं व पालकांशी संवाद साधत आणि गरज पडेल तिथे बदल करत शक्य तितके सर्वसमावेशक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शाळा करत आहे. शाळेशी-शिक्षणाशी जोडलेल्या प्रत्येक घटकाचा आणि समाजातील इतरही वंचित घटकांचा विचार करणा-या शाळा तशा अपवादात्मकच! केवळ शाळेची माजी विद्यार्थीनी म्हणून नव्हे, तर ह्या समाजातील एक नागरिक म्हणूनही मला अक्षरनंदन शाळेचा अतिशय अभिमान वाटतो!
(लेखिका अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये Development ह्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.)