भूतान:आनंदी व सुखी माणसांचा देश

-राकेश साळुंखे

भूतान – ‘आनंदी व सुखी माणसांचा देश’ अशी जगभरात ओळख असणारा भारताचा सख्खा शेजारी. हिमालयीन पर्वतरांगा व दऱ्याखोऱ्यात वसलेला  नितांतसुंदर प्रदेश . हिरव्यागार निसर्गाने संपन्न असलेला , शिस्तप्रिय, शांत, आपल्या राजावर निस्सीम प्रेम करणाऱ्या हसतमुख लोकांचा हा देश आहे . रोजच्या धावपळीतून मनाला शांती हवी असेल तर भूतानला एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे. पावसाळा सोडून इतर कोणत्याही ऋतूत आपण भूतानला जाऊ शकतो . शक्यतो मार्च ते मे मध्य पर्यंत जाणे सोयीचे.  कारण येथे हिवाळा सुद्धा पावसाळ्याप्रमाणे तीव्र असतो . आम्ही तर मे मध्ये सुद्धा गारठलो होतो . या देशात रस्ता मार्गाने तसेच हवाई मार्गाने जाता येते . विमानाने दिल्ली ते पारो ( भूतान मधील एकमेव विमानतळ ) असे थेट जाता येते किंवा दिल्ली ते बागडोगरा ( पश्चिम बंगाल ) पर्यंत जाऊन पुढे टॅक्सीने जाऊ शकतो . रेल्वेने जायचे झाल्यास जलपायगुडी पर्यंत जाऊन पुढे टॅक्सीने जाऊ शकतो . भूतान मध्ये भारतीयांना व्हिसाची गरज नाही . पासपोर्ट /वोटिंग कार्ड मात्र आवश्यक आहे . आधारकार्ड चालत नाही .

भारतीय हद्दीतील ‘जयगाव ‘ हे शेवटचे शहर तर ‘ फुशोलिंग’ हे भूतान चे प्रवेशद्वार आहे . दोन देशामध्ये फक्त एक गेट आहे . हे गेट सकाळी ६ वाजता खुले होते व रात्री ८ वाजता बंद होते . या गेटमधून भारतीय व भूतानी लोक सहजपणे इकडून तिकडे जा- ये करताना दिसतात . फुशोलिंग मधील इमिग्रेशन ऑफिस मधून या देशात फिरण्यासाठी परमिट घ्यावे लागते . ते ७ दिवसांसाठी मिळते . जर त्यापेक्षा जास्त दिवस रहायचे असेल तर थिंपू ( भूतान ची राजधानी )मधून पुन्हा परमिट घ्यावे लागते . येथे भारतीय सोडून इतर परदेशी नागरिकांना राहण्यासाठी दिवसाला साधारणपणे २०० ते २५० डॉलर्स फी भरावी लागते . ही फी आकारणी या देशाची संस्कृती व नैसर्गिक साधन संपत्तीला धक्का लागू नये व पर्यटकांची संख्या मर्यादित राहावी यासाठी आकारली जाते. भारतीय पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता जुलैपासून भारतीयांकडूनही  प्रती दिवस १८०० रुपये  फी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यामुळे  भूतान महागडा देश ठरतो .

भूतानची लोकसंख्या कमी आहे .  निसर्गाला कुठेही धक्का न लावता डोंगर कपारीत स्थानिक लोक राहतात . येथे हाताच्या बोटांवर मोजता येणारी शहरे आहेत . या शहरांतच थोडी लोकवस्ती एकवटलेली दिसते , इतरत्र मात्र विरळ वस्ती आढळते . येथे स्थानिकांपेक्षा भारतीय पर्यटकच जास्त दिसतात . येथील माणसे निसर्गाशी एकरुप झालेली , त्यावर प्रेम करणारी माणसे असल्याने त्यांच्या गरजाही कमी आहेत . स्थानिक लोकांची चेहरेपट्टी हसरी आहे.  माझ्या संपूर्ण सहलीत एकही चिडका,रागीट भूतानी माणूस मला दिसला नाही . येथे सुख हे भौतिक साधनांनी न मोजता आरोग्य , शिक्षण , समाधान यांनी मोजले जाते . येथे देशाच्या सकल उत्पादनापेक्षा सुख आणि समाधान या गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात .

सकल राष्ट्रीय समाधान ‘ ही अर्थनीती ची संकल्पना तेथील राजे चौथे जिग्मे सिंग्ये वांगच्युक यांची आहे . आता जगभर याला मान्यता मिळाली आहे . हा बुद्धिस्ट लोकांचा देश आहे . तिबेटीयन संस्कृतीशी साम्य असणारी येथील संस्कृती आहे .मातृसत्ताक पद्धती असल्याने सगळीकडे स्त्री राज्य दिसते . सर्वत्र स्त्रियाच काम करताना दिसतात . हॉटेलमध्ये मॅनेजर , रिसेप्शनपासून ते रूम मध्ये सामान पोहचवण्यापर्यंतची सर्व कामे तरुण मुलीच करताना दिसत होत्या . सगळे व्यवहार शांतपणे सुरू होते . कुठेही गडबड -गोंधळ दिसला नाही . भूतानी लोक सार्वजनिक जीवनात त्यांच्या राष्ट्रीय पोशाखात वावरताना दिसतात . पुरुषांच्या पोशाखाला ‘घो’ तर स्त्रीयांच्या पोशाखाला ‘किरा’ म्हणतात . आकर्षक रंग असलेले हे पोशाख व त्यात आनंदाने आणि अभिमानाने वावरत असलेले लोक यामुळे येथील वातावरण रंगेबेरंगी व उल्हासित असते .  स्थानिक लोक क्वचितच पाश्चिमात्य पोशाखात दिसतात. मी सुद्धा ‘घो’ घालून फिरण्याचा आनंद घेतला होता . भारतीय चलन व्यवहारात सर्रास वापरले जाते . ५० व १०० रु. च्या नोटा स्विकारल्या जातात . नोटबंदी नंतर ५०० ,१०००,२००० च्या नोटा तेथील दुकानात,हॉटेलात स्विकारल्या जात नाही .

येथे खवय्यांसाठी शाकाहारात विविध ताज्या भाज्या उपलब्ध असतात . पण बटाट्याचा वापर जवळपास प्रत्येक भाजीत केलेला आढळतो . Red Rice व Ema Datshi या राष्ट्रीय डिश आहेत . यांची चव चाखलीच पाहिजे . बुद्धांची तत्वे पाळणारा देश असला तरी स्थानिक लोक मांसाहार मोठ्या प्रमाणात करताना दिसतात . बीफ , पोर्क , चिकन भरपूर खाल्ले जाते . मांसाची आयात भारतातूनच केली जाते . बऱ्याच गोष्टींसाठी भारतावर अवलंबून असणारा हा देश सार्वजनिक स्वच्छता , रहदारीचे नियम , पर्यावरणाचे जतन आदींमध्ये भारतापेक्षा खूप सरस आहे . जेव्हा आपण जयगावमधून फुशोलिंग मधे प्रवेश करतो तेव्हाच हा फरक जाणवल्याशिवाय रहात नाही . जयगावमधील वेडीवाकडी दुकाने, रस्त्यावरील कचरा, वाहणारी गटारे, लोकांचा कलकलाट, बेसुमार व बेशिस्त रहदारी तर फुशोलिंग मधील शांतता, स्वच्छ रस्ते ,तुरळक वाहतूक, हळू आवाजात बोलणारी (आपल्या भाषेत कुजबुजणारी ) माणसे हा फरक कोणाच्याही लक्षात येईल असाच आहे .

भूतानमध्ये फिरताना आपल्याला गाड्यांचे हॉर्न ऐकू येत नाहीत . भारतात परत आल्यावर हॉर्नच्या आवाजाचा त्रास काही दिवस तरी आपल्या कानांना नक्कीच होतो. मी फुशोलिंगमध्ये रात्री पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता इमिग्रेशन ऑफिसमध्ये जायचे होते. पूर्वकडे देश असल्याने संध्याकाळी सहालाच अंधारून येते व पहाटे पाचलाच उजाडते . हॉटेलच्या समोरच मुख्य रस्ता होता . स्थनिकांची शांतपणे लगबग सुरू होती . तुरळक वाहतूक सुरू होती . १० वाजता इमिग्रेशन ऑफिसमध्ये जायचे होते . माझ्या टूर मॅनेजरने ठरवलेला तेथील टॅक्सीड्रायव्हर ९.३० लाच गाडीसह हजर होता . परमिटचे काम लगेचच झाले आणि भूतान पहाण्याचा मार्ग मोकळा झाला . आमचा हसमुख ड्रायव्हर शिरींग (T Shring ) त्याचा देश दाखवायला तयारच होता . आम्ही ‘ थिंपू ‘ च्या दिशेने कूच केले .

फुशोलिंग ते थिंपू हे अंतर चार तासांचे आहे. खड्डे विरहित रस्ते , हिरव्यागार डोंगर दऱ्या , मे महिना असूनही सुखावह अशी गार हवा यामुळे प्रवास अगदी मजेत चालला होता . तरीसुद्धा प्रत्येक वळणावर काळजाचा ठोका चुकत होताच , कारण एकीकडे शिखर दिसत नसलेला पर्वत तर दुसरीकडे तळ दिसत नसलेली दरी सोबतीला होती. शिरींग मात्र भूतानी स्टाइल हिंदी बोलत मजेत गाडी चालवत होता. आम्हाला वाटेत गेडू येथे जायचे होते . तेथील रॉयल विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये नांदेडचे प्राध्यापक तिवारी यांना भेटून पुढे जायचे ठरले होते. हिरव्यागार पर्वतरांगांमध्ये वसलेले गेडू ढगांच्या चादरीत गुरफटून गेले होते . मे महिना असूनही थंडी खूपच वाजत होती . गेडू हे गाव तसे वर्षभर थंडच व धुक्यात हरवलेले असते . गेडूमध्ये तिवारी सरांनी रॉयल कॉलेज चा परिसर फिरून दाखवला . तेथील कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये वेगवेगळे भुतानी खाद्यपदार्थ अगत्याने खाऊ घातले. त्यांचा तेथे राहण्याचा आग्रह नम्रपणे नाकारत परतीच्या वेळी पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन पुढे थिंपूकडे निघालो .डोंगरउतारावरून वाहणारे छोटे छोटे फेसाळते धबधबे , चित्रातल्यासारखी डोंगर उतारावरची भातशेती , सोबत हवेतील मस्त गारवा ही या देशाची येथील सलामी पुढे काय अनुभवणार आहोत याची झलक दाखवून जात होती.

धुक्याची चादर पांघरुण बसलेल्या गेडूचा निरोप घेऊन आम्ही थिंपूच्या दिशेने निघालो . हिरव्यागार डोंगर दऱ्यातून प्रवास सुरू होता. मे महिना असूनही जणू पावसाळ्यात असावी अशी हिरवाई व छोटे मोठे फेसाळते धबधबे मनाला प्रफुल्लित करत होते. न राहवून एका छोट्या धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेतला , पण बर्फासारख्या थंड पाण्यामुळे पुन्हा मात्र धबधब्याच्या पाण्यात उतरण्याचे धाडस झाले नाही. थिंपूला पोहचायला रात्र झाली. राजधानीचे शहर असूनही रात्री ९ ला रस्त्यावर सामसूम होती. तुरळक वाहने , माणसे दिसत होती . हॉटेलचा झालेला घोळ निस्तरून ‘ वांगच्युक ‘ हॉटेलमध्ये पोहचायला रात्रीचे ११ वाजले . हॉटेलही शांत झोपले होते . स्वावलंबनाचा धडा गिरवून स्वतः चे सामान स्वतः उचलून चौथ्या मजल्यावरील रूम मध्ये गेलो . एवढ्या सगळ्या घोळात आणि रात्रीच्या अंधारातही थिंपू चित्रातल्या सारखे रेखीव वाटले . सकाळी  ९ वाजताच लवकर बाहेर पडलो.

स्वच्छ – प्रशस्त रस्ता , शिस्तबद्ध वाहतूक , एकसारख्या रचनेच्या टुमदार इमारती आणि सभोवताली हिरव्या डोंगररांगा हे दृश्य खूपच सुंदर दिसत होते . हे शहर भूतानमधील सर्वात मोठे शहर आहे . सरकारी कार्यालये, मंत्रालय ,भूतानच्या राजाचे निवासस्थान इ. महत्वाच्या वास्तू इथेच आहेत . १३ व्या शतकातील राजवाड्याची भव्य इमारत लांबूनही उठुन दिसते . अनेक सरकारी कार्यालये या इमारतीत आहेत .  Budha Dordenma बुद्धाची ही मूर्ती पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहे . थिंपू च्या दक्षिणेणकडील एका टेकडीवर ती पहायला मिळते. ५४ मीटर उंच असलेली ही मूर्ती ब्राँझची असून वरून सोन्याचा मुलामा दिलेला आहे .  येथून थिंपू व्हॅलीचा नयनरम्य असा पॅनोरोमिक व्ह्यू दिसतो. Changangkha Lhakhang १२ व्या शतकातील हे मंदिर आहे. पारंपारिक मंदिराचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर स्थानिक लोकांमध्ये खूप पवित्र मानले जाते . भुतानी लोक त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळांना नामकरणासाठी तसेच थोड्या मोठ्या मुलांना आशीर्वाद घेण्यासाठी येथे आणतात . मोठ मोठ्या Prayer Bells तसेच निरनिराळ्या रंगांचे Blessing Flags ने मंदिराचा आसमंत भरून गेलेला आढळतो . इथूनही थिंपू व्हॅलीचे मनमोहक दृश्य दिसते . Tashichho Dzong थिंपू शहराच्या जवळ वांग च्यु नदीकिनारी हा भव्य Dzong ( अशी इमारत की जिथे शासकीय आणि धार्मिक कार्ये करतात ) आहे . तेथील राजाचे ऑफिस तसेच काही सरकारी कार्यालये आहेत .येथील इमारती या भूतानिज वास्तुरचना आणि संस्कृती चा उत्तम नमुना आहेत . आतमध्ये अनेक मंदिरे आहेत . गाईड घेऊन हा Dzong बघितल्यास जास्त कळतो व समजतो.

Clock Tower Square थिंपू शहराच्या मध्यवर्ती भागात हा टॉवर आहे . सर्वात वरच्या भागात चार घड्याळे चार दिशेला आहेत . टिपिकल भूतानिज वास्तुकलेच्या दृष्टीकोनातून याची जडणघडण केलेली आहे . या टॉवरवर भूतानीज डिझाईनचे कोरीवकाम व पेंटिंग केले आहे . पारंपारिक हस्तकलेतून साकारलेला सोनेरी रंगाचा ड्रॅगन टॉवर चारही बाजूंनी काढला आहे . या टॉवरच्या सभोवताली अनेक हॉटेल्स , शॉप्स , रेस्तराँ आहेत. या सर्व इमारतींचे डिझाइन हे पारंपरिक व आधुनिक भूतानीज वास्तूकलेचे दर्शन घडवतात . विविध रंगी , छोट्या छोट्या खिडक्या असणाऱ्या सुबक अशा इमारती या भागात आहेत . मात्र या सर्व इमारती टॉवरपेक्षा कमी उंचीच्या आहेत . Motithang Preserve Center Motithang हे मिनी अभयारण्य आहे . ताकीन या प्राण्याचे हे संरक्षित क्षेत्र आहे . भूतान चा ताकीन (Takin ) हा राष्ट्रीय प्राणी आहे .

थिंपूमधे आणखी काही पहाण्यासारखी ठिकाणं म्हणजे — Memorial Chorten , Folk Heritage Museum ,Bhutan Textile Museum etc. येथे एका राष्ट्रीय वृत्तपत्राच्या कार्यालयाला भेट देण्याची संधी मिळाली . निमित्त होते माझ्या प्रकाशन संस्थेच्या एका पुस्तक प्रकाशनाचे . हे पुस्तक म्हणजे माझे मित्र व पत्रकार प्रभाकर ढगे यांनी लिहिलेल्या ‘ सुखी माणसांचा देश : भूतान ‘ हे होय . त्यावेळी भूतानमधील आदरातिथ्य जवळून अनुभवता आले . राजधानी चे व मोठे शहर असूनही रस्त्यावर कुठेही ट्रॅफिक सिग्नलचे दिवे दिसले नाहीत . शांतपणे , विना हॉर्न रहदारी सुरू होती . माणसेही झेब्रा क्रॉसिंगवरच रस्ता क्रॉस करत होती . माणसे रस्ता ओलांडत असताना कोणतीही गाडी पुढे यायचा प्रयत्न करत नव्हती . माणसे रस्त्यावर दिसली की क्षणात वाहने थांबायची .

क्रमश:- भूतानची उर्वरित सफर पुढील आठवड्यात

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Bhutan TripVideo by Rakesh Salunkhe

Previous articleदि. भा. घुमरे – एक भिडस्त संपादक !
Next articleरिया चमकेगी ; कंगना खनकेगी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here