डॉ. हरारींच्या मते, मानवजातीला संघटीत करणारी दुसरी महत्वाची प्रक्रिया म्हणजे साम्राज्यांचा ‘विस्तार’! आपण जरी भारतापुरते तपासायचे ठरवले तरी, एखाद्या हल्लीच्या जिल्ह्यांएवढा विस्तार असणारी असंख्य छोटी-छोटी राज्ये भारतात पूर्वी अस्तित्वात होती. कालौघात मौर्य, गुप्त, मुघल, मराठा, इंग्रज इत्यादी साम्राज्यांमुळे त्या छोट्या-छोट्या राज्यांचा ‘लय’ होऊन आकाराने अधिक मोठी नि सुसंघटीत व शक्तिशाली राज्ये वाढत गेली. अनेक राज्यांच्या एकत्रीकरणा-सोबतच, प्रजेच्या भिन्न-भिन्न संस्कृतींचे देखील ‘संमिश्रण’ होत गेले. नवनवीन कल्पित रचना मोठ्या संस्कृतींच्या रूपात प्रसृत होऊ लागल्या. छोट्या राज्यांच्या आपांपसांतील सततच्या लढाया थांबून प्रजेला बरेचसे स्थैर्य लाभू लागले. असेच ‘ऐक्य’ एकेश्वरवादी धर्मांनी देखील साध्य केले, असे डॉ. हरारींचे मत आहे. ‘ख्रिश्चन’ व ‘मुस्लिम’ या दोन्ही एकेश्वरवादी धर्मांचा, तसेच केवळ बुद्धालाच ‘तथागत’ मानणाऱ्या बौद्ध धर्माचा आश्चर्यकारक ‘प्रसार’ जगातल्या दूर-दूरच्या भागांमध्ये झाला. त्यामुळे, त्या-त्या धर्मातील परस्परांना अपरिचित असणाऱ्या व एकमेकांपासून हजारो मैल दूर राहणाऱ्या व्यक्तींच्या मनात आपुलकी व एकजुटीची भावना बळावत गेली.