गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड (1914-1948)

(साभार : साप्ताहिक साधना)

-अमरेंद्र धनेश्वर

गांधींच्या सर्वधर्मसमभावाची अथवा धार्मिक अनेकतावादाची व्याख्या करताना, गुहांनी त्याचे विविध घटक अधोरेखित केले आहेत. कोणताही धर्म हा परिपूर्ण नसतो, हा पहिला मुद्दा. सर्व धर्म घडत राहण्याच्या प्रक्रियेत असतात, आपल्यातील वैगुण्ये झटकत असतात आणि सत्याच्या दिशेने धडपडत जात असतात. आपल्या धर्मातील त्रुटी दूर करण्यासाठी इतर धर्मांच्या आरशातून त्याच्याकडे पाहावे आणि परस्परसंवादातून त्या दूर कराव्यात. पुजारी किंवा धर्मोपदेशकांवर फाजील विश्वास ठेवू नये. त्यांच्याकडून धर्माचा योग्य अन्वय लावला जाईलच असे नाही. त्या-त्या धर्मातील शक्तिमान अथवा बलवान अनुयायांच्या कर्तृत्वानुसार धर्माविषयी मत बनविण्याऐवजी त्या धर्मातील सर्वाधिक चांगल्या अनुयायांकडे पाहूनच मत बनवावे. हे पाच निकष इहवादाच्या कक्षेजवळचे आहेत.

…………………………………………………….

‘वर्तमान जगातील सर्वांत महान व्यक्ती कोण आहे?’ असा प्रश्न सतत चर्चेला येत असतो. अमेरिकेतल्या वृत्तपत्रांमधूनही तो 1920 मध्ये चर्चिला जात होता. तेव्हा न्यूयॉर्क टाइम्स या दैनिकात महात्मा गांधींवर पाच कलमी लेख छापून आला होता. क्लेअर प्राइस या लेखकाने तो लिहिला होता. अर्थातच त्यात गांधींची मुक्तकंठाने स्तुती करण्यात आली होती आणि जगातील सर्वाधिक महान असे बिरुद त्यांना देण्यात आले होते. जॉन हेन्स होम्स या धर्मोपदेशकानेही गांधींच्या नावाचाच पुरस्कार केला होता. गांधींकडे आणि त्यांच्या कार्याकडे, कार्यपद्धतीकडे पाहून त्याला येशू ख्रिस्ताची आठवण येत होती. ‘ते ख्रिस्ताप्रमाणे आपले आयुष्य जगतात, आपल्या भावना व्यक्त करतात, आपल्या यातना भोगतात आणि एक दिवस ख्रिस्ताप्रमाणेच पृथ्वीवरच्या आपल्या साम्राज्याखातर त्यांना उदात्त मरण येईल.’

गांधींच्या निर्घृण हत्येनंतर अवघे जग शोकसागरात बुडाले होते. जगभरातल्या मोठमोठ्या नेत्यांनी आणि विचारवतांनी गांधींचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली; परंतु तमिळनाडूतल्या थिरुपत्तुर या छोट्या शहरातल्या ख्रिस्ती धर्मीयांच्या एका आश्रमातील अभिवादन सभेत बोलणाऱ्या मुस्लिम लीगच्या नेत्याचे उद्‌गार हेलावून टाकणारे होते.

‘गांधी हे विसाव्या शतकातले येशू ख्रिस्त होते आणि त्यांनी आम्हा मुसलमानांसाठी मरण पत्करले.’ महात्मा गांधींसंबंधी जगात हजारो ग्रंथ निर्माण झाले आहेत आणि अजूनही होत आहेत. ‘गांधी हे हिंदूंचे शत्रू आहेत’ असे चित्र रंगवत हिंदू जमातवाद्यांनी गांधींचा बळी घेतला आणि आजही त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्यात ते धन्यता मानत आहेत. गांधी आणि हे हिंदुस्थानातील मुसलमानांचे खरे वैरी आहेत, असा आक्रोश करीत महंमदअली जीनांनी पाकिस्तान पदरात पडून घेतले आणि हिंदुस्थानचे लचके तोडले. त्यांच्याच लीगचा पदाधिकारी एका ख्रिस्ती धर्मीयांच्या व्यासपीठावरून गांधींना विसाव्या शतकातला येशू ख्रिस्त ठरवतो आणि ‘आम्हा मुसलमानांसाठी त्यांनी मरण कवटाळले’ असे पश्चात्तापदग्ध उद्‌गार काढतो, ही गोष्ट काय दर्शविते? हेच की, विसाव्या शतकातील खरोखरच सर्वांत टोलेगंज व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा गांधी.

गांधींविषयी आजपावेतो जगात हजारो ग्रंथ निर्माण झाले आहेत आणि अजूनही होत आहेत. त्यात आणखी एक वजनदार आणि दर्जेदार भर रामचंद्र गुहा यांनी आपल्या ‘गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड’ (1914-1948) हा ग्रंथ लिहून टाकली आहे. यापूर्वी गुहा यांनी ‘गांधी बिफोर इंडिया’ हा जाडजूड ग्रंथ लिहून गांधींच्या जन्मापासून ते दक्षिण आफ्रिकेतल्या वास्तव्याची आणि तिथल्या ऐतिहासिक लढ्यापर्यंतची तपशीलवार कहाणी शब्दबद्ध केली होती. ही कहाणी लिहिताना त्यांनी आपली विश्लेषक वृत्ती कुठेही म्यान केली नव्हती. गांधी 1914 पर्यंत दक्षिण आफ्रिकेत राहिले आणि नंतर त्यांनी हिंदुस्थानकडे प्रयाण केले. सन 1915 ते 1948 या तेहतीस वर्षांच्या कालखंडात फक्त एकदा म्हणजे 1931 मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेत सामील होण्याच्या निमित्ताने ते हिंदुस्थानबाहेर गेले होते. ही तेहतीस वर्षे म्हणजे, जगाच्या इतिहासातील प्रचंड घडामोडीचा काळ होता. या काळात दोन महायुद्धे झाली. बोल्शेविक क्रांती आणि राजवट आली. शिवाय हिटलरचा उदयास्त झाला आणि गांधींच्या महत्प्रयासांमुळे जगावर वर्चस्व गाजविणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याचा विलय झाला. या पार्श्वभूमीवर रामचंद्र गुहा यांनी गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा विस्तृत आढावा घेतला आहे. गांधींच्या लेखनाची आणि पत्रव्यवहाराची समग्र माहिती ‘कलेक्टेड वर्क्स’ 80 खंडांत उपलब्ध आहे.

गांधींचे अखेरच्या काळातील सचिव प्यारेलाल यांनी लिहिलेले द अर्ली फेज’आणि ‘द लास्ट फेज’ हे चार खंड उपलब्ध आहेत. शिवाय डी.जी. तेंडुलकरांनी आठ खंडांत गांधीचरित्र लिहिले. रोमा रोला आणि लुई फिशर या पाश्चात्त्य लेखकांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. तरी, ‘वेगळे पुस्तक कशासाठी?’ याचे उत्तर गुहांनी दिले आहे. गांधींचे हिंदुस्थानातले वास्तव्य प्रामुख्याने अहमदाबादच्या साबरमती आश्रमात 1930 पर्यंत आणि नंतर सेवाग्राम/वर्धा येथे होते. गांधींची सर्व कागदपत्रे आणि पत्रव्यवहार प्यारेलाल यांच्या ताब्यात होता आणि त्यांनी तो अक्षरश: कब्जात ठेवला होता. प्यारेलाल हे गांधींच्या अनुयायी आणि सहकारी डॉ. सुशीला नय्यर यांचे बंधू. त्यांनी हा संग्रह आपली खासगी मालमत्ता असावी, अशा पद्धतीने बळकवून ठेवला होता. त्यांचे निधन 1982 मध्ये झाले. नेहरू मेमोरियल लायब्ररीचे उपसंचालक हरिदेव शर्मा यांनी हा संग्रह नेहरू मेमोरियलकडे सुपूर्द करावा, यासाठी डॉ. सुशीला यांचे मन वळवले. त्यांनी तो गुप्त ठेवण्याच्या अटीवर सुपूर्द केला. सुशीला नय्यर यांचे निधन झाल्यावर हरिदेव शर्मांनी तो अभ्यासक्रमासाठी खुला केला. हे हरिदेव शर्मा डॉ. राममनोहर लोहिया आणि मधू लिमये यांचे अनुयायी होते, हे नमूद केले पाहिजे. कारण खासगी ताबा असलेला हा दस्तावेज सार्वजनिक हितासाठी मोकळा करण्याची उपजत प्रेरणा त्यांच्यापाशी होती. हा संग्रह वापरून पुस्तक लिहिणारे रामचंद्र गुहा हे गांधींचे पहिले चरित्रकार आहेत.

महात्मा गांधी हिंदुस्थानात कायमचे दाखल झाले, तेव्हा त्यांच्यापुढे चार प्रमुख उद्दिष्टे होती. हिंदुस्थानला स्वराज्य मिळवून देणे, हे पहिले. हिंदुस्थानातल्या विविध धार्मिक समुदायांमध्ये विलक्षण तेढ आणि कटुता होती. ती दूर करून परस्परसद्‌भावना आणि सलोखा निर्माण करणे, हे दुसरे उद्दिष्ट. हिंदू धर्माला कलंक असणाऱ्या अस्पृश्यतेसारख्या अन्यायकारक रूढीचा अंत करणे, हे तिसरे उद्दिष्ट. आणि देशाला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविणे व नैतिक दृष्ट्या हिंदुस्थानी माणसांना आत्मनिर्भर बनविणे, हे चौथे उद्दिष्ट. या चार ध्येयांचा पाठपुरावा करण्यात 1915 ते 1948 या कालखंडात गांधींचे संपूर्ण आयुष्य कसे गुंतले होते, हे गुहा यांनी या पुस्तकात उलगडून दाखविले आहे.

‘एकाच वेळी तुम्ही या चार ध्येयांची सांगड कशी घालता?’ असा प्रश्न गांधींना विचारण्यात येई. त्यावर गांधींनी फार मार्मिक उत्तर दिले होते. ‘‘एखादा पियानोवादक ज्याप्रमाणे एक सूर आधी वाजवतो आणि मधेच दुसऱ्या सुरावर जातो आणि तिथून तिसऱ्यावर- तसा मी या उद्दिष्टांच्या मागावर असतो.’’ हिंदू व मुसलमान या दोन धर्मीयांमध्ये वितुष्ट वाढू नये आणि सहिष्णुता वाढीला लागावी, या ध्येयासाठी गांधींनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. या ध्येयाला ते किती समर्पित होते आणि त्यासाठी आपल्या प्राणाची किंमत कशी मोजली, हे आपल्याला अंदाजे माहीत असते. परंतु, गुहांनी जो भव्य पट विणला आहे, त्यातून गांधींच्या विशाल मानवतावादाचे दर्शन घडते.

गांधींवर लहानपणापासून धार्मिक सहिष्णुतेचे संस्कार घडले. त्यांची आई प्रणामी नामक पंथाची अनुयायी होती. या प्रणामी पंथीयांच्या देवळांच्या भिंतीवर एकीकडे भगवद्‌गीतेतील श्लोक लिहिलेले असत आणि दुसरीकडे कुराणातील आयाती. रामचंद्रभाई जैन या संतवृत्तीच्या स्नेह्याचा संस्कारही उपकारक ठरला. गीतेतील ‘स्थितप्रज्ञ’ अवस्था म्हणजे, सर्व मोहांपासून आणि वासनांपासून मुक्त. ती त्यांना आदर्शवत्‌ वाटत असे. बायबल आणि कुराणाबद्दलही आपल्याला तितकाच आदर वाटतो, असे त्यांनी गुजरात विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर बोलताना सांगितले होते. आपण इतर धर्मग्रंथांचा आदर करतो आणि तरीही आपण सनातनी हिंदू आहोत, असे ते म्हणत. सर्व धर्मांमध्ये सत्य दडलेले आहे आणि वैगुण्येही आहेत, असे म्हणायला गांधी कचरत नसत. आपण हिंदू असलो तरी, एखाद्या ख्रिस्ती धर्मीयाला अथवा मुसलमानाला हिंदू कसा बनविता येईल किंवा ख्रिस्ती धर्मीय/मुसलमान असला तर हिंदूंचे कसे धर्मांतर करता येईल, असा विचार न करता आपापल्या धर्मांचे अधिक चांगल्या रीतीने कसे पालन करता येईल, असा विचार करावा. त्यातून धार्मिक सलोखा वाढीला लागेल. ‘स्पिरिच्युअल सुपिरिऑरिटी इज अ डेजरस थिंग टु फील.’ आध्यात्मिक अहंगंड अत्यंत धोकादायक असतो, असे त्यांना वाटे.

गांधींच्या सर्वधर्मसमभावाची अथवा धार्मिक अनेकतावादाची व्याख्या करताना, गुहांनी त्याचे विविध घटक अधोरेखित केले आहेत. कोणताही धर्म हा परिपूर्ण नसतो, हा पहिला मुद्दा. सर्व धर्म घडत राहण्याच्या प्रक्रियेत असतात, आपल्यातील वैगुण्ये झटकत असतात आणि सत्याच्या दिशेने धडपडत जात असतात. आपल्या धर्मातील त्रुटी दूर करण्यासाठी इतर धर्मांच्या आरशातून त्याच्याकडे पाहावे आणि परस्परसंवादातून त्या दूर कराव्यात. पुजारी किंवा धर्मोपदेशकांवर फाजील विश्वास ठेवू नये. त्यांच्याकडून धर्माचा योग्य अन्वय लावला जाईलच असे नाही. त्या-त्या धर्मातील शक्तिमान अथवा बलवान अनुयायांच्या कर्तृत्वानुसार धर्माविषयी मत बनविण्याऐवजी त्या धर्मातील सर्वाधिक चांगल्या अनुयायांकडे पाहूनच मत बनवावे. हे पाच निकष इहवादाच्या कक्षेजवळचे आहेत.

कोहट या ठिकाणी दंगली झाल्यानंतर गांधींचे ‘खिलाफत’ आंदोलनातील सहकारी शौकत अली यांनी भडकवणारी भाषणे केली. आपल्या दृष्टीने देशापेक्षा धार्मिक श्रद्धा अधिक महत्त्वाची आहे, असे त्यांनी सूचित केले. त्याबाबत गांधींनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आणि ‘मला माहीत असलेला शौकत अली हा नव्हे,’ असेही सुनावले. ‘हिंदूंनी अनेक दुष्कृत्ये केली असतील, त्याबद्दल मी तुमच्याबरोबरीने हिंदूंना दोष द्यायला तयार आहे; परंतु नेहमी हिंदू हाच आक्रमणकारी असतो, जुलूम करणारा असतो आणि मुसलमान हा बिचारा जखमी बळी असतो, हे मानायला मात्र मी तयार नाही.’ असे गांधी म्हणाले होते. गांधींवर मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे खापर सदैव फोडणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे.

हिंदू आणि मुसलमान यांच्यात दुही माजविण्यात ब्रिटिश सरकारने मोठीच भूमिका बजावली, असे गांधींनाही वाटे. या दोन धार्मिक समुदायांना दोन विभिन्न राष्ट्रांमध्ये विभागणे अशक्यप्राय आहे, असे त्यांना वाटत असे. दोघेही एकाच खेडोपाडी राहतात, एकाच प्रकारचे अन्न खातात, एकच भाषा बोलतात; मग वेगळी राष्ट्रे कसली? गाईचे संरक्षण आणि मशिदीसमोर वाद्ये वाजवणे हे संघर्षाचे मुद्दे जरूर आहेत, पण ते अंधश्रद्धेतून निपजतात आणि तिथेच सर्व गफलत आहे- असे त्यांचे म्हणणे होते. ते मुस्लिमधर्जिणे असल्याचा आरोप केला जातो, त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली. पण गांधींची भूमिका विवेकनिष्ठ तर्काच्या समीप होती. ते म्हणतात की, ‘कुराणातल्या प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे, असे मी कधीही म्हटले नाही. वास्तविक, जगातल्या कोणत्याही धर्मग्रंथाबाबत मी तसे म्हणणार नाही. इतर धर्मांच्या ग्रंथांवर टीका करण्याचा उद्योग मी करणार नाही. हां, त्यातील जे चांगले आहे, त्या सत्याला मी जरूर अनुसरेन.’

डॉ. क्रेन या अमेरिकन धर्मोपदेशकाला ‘येशू ख्रिस्त हा सर्वाधिक दैवी होता’ हे वदवून घ्यायचे होते. गांधी त्याच्या घोळात अडकले नाहीत. त्यांनी स्पष्ट नकारात्मक उत्तर दिले. आपल्याकडे असे विधान करायला पुरेशी माहिती नाही. इतिहासाचा विचार केला, तर आपल्याकडे महंमदांविषयी जास्त तपशील आहे, कारण तो सर्वांत अलीकडचा. येशूबद्दल तेवढा तपशील उपलब्ध नाही आणि बुद्ध, राम, कृष्ण यांच्याबद्दल तर नाहीच नाही. मग अमक्यापेक्षा तमका अधिक ईश्वरी अवतार आहे, असे म्हणणे हास्यास्पद नाही काय? निरीश्वरवादी किंवा इहवादी याहून कोणता वेगळा तर्क मांडतो? आपल्या स्वप्नातला स्वतंत्र हिंदुस्थान कसा असेल? तर, तिथे सर्व धर्म समान असतील आणि प्रत्येक धर्माला पूर्ण स्वातंत्र्य असेल.

ब्रिटिशांच्या आशीर्वादामुळेच 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. त्यापूर्वी 21 वर्षे, म्हणजे 1885 मध्ये काँग्रेस अस्तित्वात आली होती. आपल्या स्थापनेपासूनच आपल्या संघटनेत सर्व धर्मांची व जातींची तसेच सर्व भाषा बोलणारी हिंदुस्थानी माणसे आहेत, असेच या संघटनेचे स्वरूप असणार आहे आणि राहणार आहे, हे काँग्रेसने स्पष्ट केले होते. गांधींनी हेच धोरण आणि तत्त्व पुढे अधिक निष्ठेने रेटले. मुस्लिम लीगने आपला सवतासुभा सांभाळण्यासाठी विभक्त मतदारसंघांची मागणी केली आणि त्याचा तार्किक परिणाम 1947 मध्ये पाकिस्तानच्या निर्मितीत झाला. फाळणीला महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू अथवा काँग्रेस जबाबदार आहे, असे सतत म्हणून एक हिंदू व्होट बँक पन्नास वर्षांनंतर जरूर तयार झाली; पण त्यातून सत्याचा अपलापच होतो. हिंदुस्थान अखंड राहावा आणि धर्माच्या आधारे त्याची फाळणी होऊ नये, म्हणून गांधींनी कसे जीवापाड प्रयत्न केले, याचा प्रत्यय गुहांच्या पुस्तकात पानोपानी येतो.

महंमद इक्बालला पुरोगामी मंडळी सेक्युलर आदर्श मानतात. त्याची धर्मातीतता एका विशिष्ट कालखंडापुरती मर्यादित होती. त्या काळात त्याने ‘सारे जहाँसे अच्छा हिदोस्ताँ हमारा’ आणि ‘पत्थर की मूरत तू समझा की तू खुदा है, खाके वतन का मुझको हर जर्रा देवता है’सारखी कवने लिहिली. पण उत्तरायुष्यात इक्बाल संकुचित जमातवादी होत गेला. जीना 1920 नंतर 1935-36 पर्यंत हिंदुस्थानातल्या राजकारणापासून अलिप्त होते आणि लंडनमध्ये वकिली करत होते. त्या काळात मुस्लिम लीगच्या अलाहाबादमध्ये भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद इक्बालने भूषविले होते. इक्बालने आपल्या त्यापूर्वीच्या पुरोगामित्वापासून पूर्ण फारकत घेतली होती, हे त्याच्या अध्यक्षीय भाषणातून स्पष्ट झाले. युरोपात शासन संस्था आणि धर्म संस्था यांचे विभक्तीकरण झाल्याबद्दल त्याने खेद व्यक्त केला. व्यक्तीच्या तसेच समष्टीच्या जीवनातील सर्वाधिक मोठी शक्ती म्हणजे धर्म, हे लक्षात घेतले पाहिजे. इक्बालने या भाषणात प्रथमच पंजाब-सिंध, वायव्य सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तान हे प्रदेश एका छत्राखाली आणून ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत एक अलग राष्ट्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली. पाकिस्तान या संकल्पनेचे हे बीज होते.

जीनांनी हिंदुस्थानात परतल्यानंतर मुस्लिम लीगचे नेतृत्व आपल्या ताब्यात घेतले आणि उत्तरोत्तर अधिकाधिक जहाल जमातवादी भूमिका घेऊन आठमुठे व अडेलतट्टूपणाचे राजकारण सुरू केले. सावरकरांनी हिंदू आणि मुसलमान ही दोन राष्ट्रे असल्याचे म्हटलेच होते, जीनांनी त्याचाच पुनरुच्चार करायला सुरुवात केली आणि 1940 मध्ये मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनात पाकिस्तानच्या मागणीचा ठरावच मंजूर करून घेतला. इक्बाल यांनी हिंदुस्थानच्या वायव्येकडील प्रांताचा उल्लेख केला होता. जीनांनी त्याला बंगालची जोड देऊन आक्रस्ताळी भाषणे करायला सुरुवात केली. पाकिस्तानच्या मागणीचा ठराव फझलुल हक यांनी मांडला. हे पुढे बंगालचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी हे मंत्री होते. ‘चले जाव’ आंदोलन 1942 ते 1945 या काळात सुरू असताना हे सर्व प्रताप सुरू होते. काँग्रेस हा सर्वसमावेशक पक्ष आहे; तो कोणा एका धर्मापुरता मर्यादित नाही, हे गांधी आपल्या कृतीतून व उक्तीतून सतत ब्रिटिशांना आणि जीनांना पटवू पाहत होते. त्या दोघांनाही नेमके हेच मान्य करायचे नव्हते. त्यातून फाळणी अटळ होऊ लागली होती. गांधींना शेलक्या शिव्या देण्यात लीग, जीना, तसेच सावरकरवादी मग्न होते. (टोटॅलिटेरियन ज्युन्टा ऑफ वर्धा = वर्ध्याची लष्करी हुकूमशाही)

1937 मध्ये प्रांतिक सरकारे आली. बहुतेक प्रांतांत काँग्रेस सत्ताधारी झाली. त्यामुळे जीनांचा पोटशूळ उठला. काँग्रेस सरकारांनी शाळांमध्ये ‘वन्दे मातरम्‌’ सक्तीचे केल्यावरून जीनांनी देशभर रान पेटवले आणि जमातवादी आगलावू भाषणे करून स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित केले. ब्रिटिशांनी 1940 मध्ये हिंदुस्थानला युद्धप्रयत्नात जबरदस्तीने सहभागी करण्याच्या निर्णय घेतला. त्या विरोधात काँग्रेस सरकारांनी राजीनामे दिले. त्यानंतर जीनांनी देशभर ‘मुक्तिदिन’ साजरा केला. त्यासाठी मुंबईला महंमद अली रोडवर आयोजित केलेल्या सभेत जीनांसोबत डॉ.आंबेडकरही होते. कटुता इतकी वाढत चालली होती की, तिला रोखण्यात गांधींचे भगीरथ प्रयत्नही तोकडे पडत चालले होते. जीनांचे मन वळवून त्यांना एकसंध हिंदुस्थानात राहण्यास राजी करावे, म्हणून गांधी प्रयत्नशील होते. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी हे प्रयत्न हाणून पाडायचे ठरवलेच होते आणि ते त्या दिशेने कार्य करत होते.

राजगोपालाचारींचा 1942 च्या आंदोलनाला तात्त्विक विरोध होता, त्यामुळे ते त्यापासून दूर होते. परंतु जपानने ब्रह्मदेश, सिंगापूर आणि मलाया जिंकल्यानंतर ब्रिटिश, काँग्रेस आणि लीग यांच्यात समेट घडून यावा यासाठी वाटाघाटी करण्यास राजाजी पुढे सरसावले. त्यांनी जीनांची भेट घेतली. अर्थात गांधींच्या संमतीनेच. ज्या प्रांतांत मुसलमान बहुसंख्येने आहेत, त्या प्रांतांना वेगळे सार्वभौमत्व प्रदान करावे, अशी जीनांची मागणी होती. युद्ध संपुष्टात आल्यानंतर सार्वमत घेऊन ते सार्वभौमत्व निकालानुसार कायम ठेवावे अथवा रद्द करावे, असे जीनांचे म्हणणे होते. काँग्रेसला हे मान्य असले तर आणि युद्ध संपल्यानंतर ब्रिटन माघारी जाण्याची हमी देत असेल, तर लीग व काँग्रेस यांनी संयुक्त मंत्रिमंडळ स्थापन करावे, असा जीनांचा प्रस्ताव होता. या प्रस्तावात देशाची धर्माच्या आधारे फाळणी करण्याची बीजे असल्यामुळे गांधींनी तो स्पष्टपणे तरीही नम्रपणे नाकारला, हे लक्षात घ्यायला हवे. ही घटना 1942 मधली. गांधींमुळे किंवा काँग्रेसमुळे देशाची फाळणी झाली, असे म्हणणे किती उथळपणाचे आणि असत्यावर आधारलेले आहे, याचा हा आणखी एक पुरावा.

गांधी 1920 पासूनच म्हणत होते, काँग्रेसही धर्माधिष्ठित पक्ष नाही. हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिश्चन अशा सर्वधर्मांर्चे लोक काँग्रेसचे सदस्य होते. त्यांना काँग्रेसच्या जाहीरनाम्याने एकत्र बांधले होते. गांधींच्या सोप्या व्याख्येनुसार काँग्रेस म्हणजे एक भक्कम पलंग होता. त्याचे चार पाय म्हणजे आंतरधर्मीय सलोखा/सौहार्द, जाती- जातीतील समता, आर्थिक स्वयंपूर्णता आणि अहिंसा. जीना मात्र काँग्रेसला हिंदू ठरवून मुसलमानांना काँग्रेसविरोधी एकजूट करण्याची हाक देत होते. ‘‘मुसलमानांच्या मानसिकतेचे ते प्रतिनिधित्व करीत असतील, तर देशाची अखंडता टिकवण्याची सर्व स्वप्ने धुळीला मिळतील. हिंदुस्थानकडे एकसंध देश म्हणून न पाहता, परस्परांबद्दल मनात वैरभाव बाळगणाऱ्या धर्माधिष्ठित राष्ट्रांचा मिळून बनलेला उपखंड म्हणून पाहणे, म्हणजे गेल्या पन्नास वर्षांत काँग्रेसने केलेल्या कामावर बोळा फिरविण्यासारखे आहे’’, असे ख्रिन्न उद्‌गार गांधींनी काढले होते.

जीना आणि मुस्लिम लीग यांनी 1946 मध्ये जे वातावरण तापवले होते, ते पाहून ब्रिटिश अधिकारी पेंडरेल मून यांनी लिहिले होते- ‘The Muslims are deeply, however irrationally stirred. Fear of being eaten up by the Hindus is a quite widespread obsession. They are likely to act desperately and impulsively’ (हिंदू बहुसंख्याक आपल्याला खाऊन टाकतील, या भयाने मुसलमानांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ते सारासार विचार करण्याच्या पलीकडे पोचले आहेत. भावविवशपणे ते जिवावर उदार होऊन कोणतेही कृत्य करायला धजावतील.) मून यांचे भाकीत खरे ठरायला वेळ लागला नाही. दि. 16 ऑगस्ट 1946 रोजी पाकिस्तान हिसकावून घेण्यासाठी जीनांनी थेट कृत्याची (डायरेक्ट ॲक्शन) हाक दिली आणि हिंदुस्थानभर हिंसाचाराचा आगडोंब उसळला. विशेषत: पंजाब आणि बंगाल या प्रांतांमध्ये अकल्पनीय हिंस्र धार्मिक दंगली पेटल्या.

यानंतरचे गांधींचे आयुष्य म्हणजे, धार्मिक सहिष्णुता व शांततापूर्ण सहजीवन यासाठी आरंभलेला जणू एक यज्ञच होता आणि अखेरीस या यज्ञात त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. या यज्ञाचा हृदयस्पर्शी आलेख रामचंद्र गुहांच्या या पुस्तकात आहे. त्या काळात लीगने गांधींना प्रथम क्रमांकाचा शत्रू ठरविले होते. गांधी स्थितप्रज्ञ वृत्तीने म्हणत की- त्यांना तसे म्हणू देत, पण मी त्याच्याबरोबर बंधुत्वाचे नाते आहे, असे मानतो आणि ते मी मरेपर्यंत जपेन. थेट कृतीची हाक जीनांनी दिल्यानंतर बंगालमध्ये अक्षरश: आगडोंब उसळला होता. एका प्रार्थनासभेत गांधी म्हणाले, ‘‘मी मुसलमान नसलो तरी हे निश्चित म्हणू शकतो की, इस्लाम कुणाही विरुद्ध शत्रुत्वाची शिकवण देत नाही. मी जितक्या प्रमाणात हिंदू आहे तितक्याच प्रमाणात ख्रिस्ती, शीख आणि जैन आहे. आपल्याहून भिन्न धार्मिक श्रद्धा बाळगणाऱ्या भावाची हत्या करायला कोणताही धर्म शिकवत नाही. ’’ बंगालमध्ये मुस्लिम लीग सत्ताधारी पक्ष होता. कलकत्ता शहरात खूनबाजी आणि लूटमारीचे सत्र लीगने सुरू केले. त्याची प्रतिक्रिया अन्यत्र उमटली आणि पूर्व बंगालमध्ये नौआखालीत हजारो मुसलमानांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत हिंदू वस्त्यांवर हल्ले केले. दुकाने लुटली, घरे पेटवली आणि तरुण मुलींवर अत्याचार केला. तसेच त्यांची जबरदस्तीने धर्मांतरे करून लग्ने लावली. अनेक हिंदू पुरुषांचेही धर्मांतर घडवले.

होरेस ॲलेक्झांडर याने गांधींना पत्र लिहून अगोदर दंगली पेटवणाऱ्या सुऱ्हावर्दींचे हृदयपरिवर्तन होऊ शकते आणि बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते, हे सांगितले. गांधींनी याकडे एक नवे आव्हान म्हणून पाहिले. त्या वेळी त्यांचे वय 78 होते. ‘बंगालमध्ये शांतता प्रस्थापित होईपर्यंत मी इथून हलणार नाही,’ हा आपला पण त्यांनी जाहीर केला. श्रीरामपूर, नौआखाली या ठिकाणी त्यांनी मुक्काम ठोकला आणि ज्या गावात दंगली झाल्या होत्या, तिथे-तिथे जाऊन शांतता प्रस्थापित केली. ‘जन्माने हिंदू असा अथवा मुसलमान- आपण हिंदुस्थानी आहोत, याचे भान राखा.’ असे आवाहन करत ते खेडोपाडी फिरले. लीगची आगपाखड गांधींवर अव्याहत सुरूच होती. ‘बिहारमध्ये आणि अन्यत्र दंगे होत आहेत, तिथे का जात नाही? इथे कशाला येता?’ असे कुत्सित प्रश्न गांधींना विचारण्यात येत होते.

हिंसाचार आणि धार्मिक शत्रुत्व शमवण्याचा गांधींनी ध्यास घेतला होता. श्रीरामपूर या छोट्या गावात ते सलग 43 रात्री राहिले. एकमेकांच्या धर्माविरुद्ध उभे ठाकण्याऐवजी बंगालच्या जनतेने रोगराई घाण यांचे उच्चाटन करावे, आपल्या जमिनीचा सुपीकपणा कसा वाढीला लागेल याकडे लक्ष द्यावे आणि आपल्या खेड्यात शांतता कशी नांदेल व त्यांची भरभराट कशी होईल याकडे लक्ष पुरवावे. अरे, हिंदू काय आणि मुसलमान काय- आपण एकाच प्रकारच्या अन्नावर पोसले जातो, एकाच आकाशाखाली राहतो आणि एकाच पाण्याने आपली तहान भागवतो. देशावर संकटे कोसळली, तर सारखेच भरडले जातो ना?

गांधींच्या पारदर्शक राहणीमुळे व आर्जवी विचारसरणीमुळे दंगलखोर भानावर आले आणि त्यांनी शस्त्रे टाकली. भरतपाडा नामक खेड्यातला एक हिंदू जीवाच्या भीतीने गाव सोडून पळून गेला होता. तो घराकडे परतला आणि आपल्या देव्हाऱ्यातल्या मूर्तींची गांधींनी पुन्हा प्रतिष्ठापना करावी, अशी गळ त्यांनी गांधींना घातली. गांधी जरी ईश्वरभक्त होते, तरी देवळे आणि मूर्ती यांच्यापासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवले होते. पण या माणसाची विनंती त्यांनी मान्य केली. मूर्ती ठेवून ते निघाले, तेव्हा गावातल्या वजनदार मुसलमानांनी पुढे येऊन आम्ही या कुलदैवताचे रक्षण सदैव करू, अशी हमी दिली. सिंरडी या गावातल्या एका मंदिरातल्या शोभेच्या तलवारी चोरीला गेल्या होत्या. त्या विरोधात गांधींच्या ताफ्यातील मुसलमान महिला अमृस सलाम यांनी उपोषण आरंभले होते. आसपासच्या गावांतल्या जनतेला एकत्र करून धार्मिक सहिष्णुतेची व अहिंसा आचरणात आणण्याची गांधींनी शपथ दिली आणि तो पेचप्रसंग मिटवला. हे सर्व बंगालमध्ये घडत असताना दिल्लीत सत्तांतरापूर्वीची खलबते आणि संबंधित नाट्य घडत होते. बंगालच्या ग्रामीण भागातून आपले बस्तान हलवावे आणि दिल्लीत परतावे म्हणून इतर काँग्रेस नेते त्यांच्यामागे लकडा लावत होते, पण शांतता प्रस्थापनेच्या आपल्या पवित्र कर्तव्यापासून गांधी यत्किंचितही ढळले नाहीत.

(क्रमश:)

(रामचंद्र गुहा यांच्या नव्या पुस्तकाचा परिचय करून देणारा दीर्घ लेख तीन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा पहिला भाग- विनोद शिरसाठ , संपादक, साप्ताहिक ‘साधना’ )

Previous articleतो एक वाल्मिकी…ही एक वाल्मिकी
Next articleकोस्टल कर्नाटक-२
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.