कोस्टल कर्नाटक-२

-राकेश साळुंखे

मुरडेश्वर

मुरडेश्वर हे उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात असून व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विकसित केलेले हे  एक धार्मिक पर्यटन स्थळ आहे.  पूर्वी दक्षिणेकडे गेलो की हमखास मुरडेश्वर व गोवा करूनच सातारला यायचो .  कधी कधी पणजीला जास्त दिवस मुक्काम असेल तर एक दिवसाची ट्रिप पण करायचो .तेथील एक आठवण म्हणजे,  एकदा पणजीहून पुतण्यांसोबत मुरडेश्वरला गेलो असता , माझा एक पुतण्या त्याचा मोबाइल  मुरडेश्वरच्या किनाऱ्यावर विसरला .  लक्षात आल्यावर शोधाशोध केली पण फोन काही सापडला नाही . नंतर तो कारवारच्या एका मुलाला मिळाला. . त्याने तो प्रामाणिकपणे  कुरिअरने सातारला पाठवला. त्याला बक्षीस देऊ केले असता ते नाकारून फक्त कुरिअर चार्जेस मोबाईल रिचार्जच्या रुपात घेतले .


गोकर्ण ,मुरडेश्वर,आणि कारवार येथे बऱ्यापैकी मराठी समजली – बोलली जाते. मुरडेश्वर हे पनवेल- गोवा- कोचिन हायवेवर कारवारपासून ११८ किमी व गोकर्ण पासून ७८ किमी अंतरावर आहे.  मुरडेश्वरला तीन बाजूंनी समुद्र असलेल्या खडकावर शंकराची १२३ फूट उंच अशी भव्य मूर्ती आणि उंच गोपुर आहे.एका अत्यंत प्रसिद्ध क्रिकेटपटूने त्याच्या बॅड पॅचच्या काळात येथे नागबळी पूजा केल्यानंतर हे ठिकाण खूप प्रसिद्ध पावले . पूर्वी हे ठिकाण खूप स्वच्छ होते . पण आता तसे   राहिले नाही.येथील गर्दी व गजबजाट आता अंगावर येतो. येथील २३७ फूट आणि २० मजली उंच अशा राजा गोपुरात १७ व्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट असून तेथून भव्य शंकराची मूर्ती व समुद्र किनारा दोन्ही दिसते. अतिशय अविस्मरणीय असा हा अनुभव असतो. शंकराच्या मूर्तीखाली  रावण व आत्मलिंगची कथा कोरलेली आहे . येथे राम मंदिरही आहे. बाहेर रावण व गणेशाची मूर्ती आहे. मुरडेश्वरचे मंदिर मात्र  सुंदर आणि स्वच्छ आहे. महाशिवरात्रीला रात्री उशिरापर्यंत मंदिर व गोपुर यात्रेनिमित्त खुले असते.  मुरडेश्वर समुद्रात वॉटरस्पोर्ट्स व बोटींगची सोय आहे. ज्यांना कुणाला येथे रिव्हर राफ्टिंग करायचे असेल त्यांना काली नदीत ते करता येते.

उडुपी

उडुपी हे  नाव आपल्याला उडुपी  हॉटेल्स व खाद्यपदार्थांमुळे परिचित असते. उडुपी हे ठिकाण भव्य पुरातन मंदिरे  तसेच सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखले जाते .  येथील श्रीकृष्ण मंदिर तेराव्या शतकातील आहे. मंदिरातील रथ  व रथयात्रा गोकर्णप्रमाणेच असते . रथ सुंदर रंगीबेरंगी पताकांनी सजवलेला असतो.  तो सोहळा पाहण्यासारखा असतो. एकदा कालीकतवरून येत असताना उशीर झाला म्हणून उडुपीत मुक्काम केला होता .कालीकतवरून येताना जागोजागी एका आचार्य /स्वामींचे  पोस्टर लागलेले दिसत होते . मुक्काम ज्या   हॉटेलमध्ये केला होता तेथे जवळच श्रीकृष्ण मंदिर होते. मंदिरातून जोराचा घंटानाद ऐकू येत होता.  कसला एवढा उत्सव चालू आहे हे पाहण्यास मंदिरात गेलो तेव्हा  तेथे रथोत्सवाचा सोहळा पाहण्यास मिळाला.  गर्दी खूप नव्हती . त्या मठाचे वयोवृध्द  स्वामी ते त्यामंदिरात आले होते. (रस्त्यात ठिकठिकाणी दिसलेले पोस्टर त्यांचेच होते, हे लक्षात आले.) त्यानिमित्ताने पूर्वनियोजित उत्सव होता. सजविलेल्या रथातून स्वामी मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम सुरू होता .   या मंदिरातीळ मठाची  स्थापना प्रसिद्ध द्वैतवादाचे जनक मध्वाचार्य यांनी केली.  येथून जवळच आठव्या शतकातील अनंतेश्वरचे मंदिर आहे.  ते  तुलुनाडुमधील सध्या अस्तित्वात असलेले सर्वात प्राचीन मंदिर समजले जाते.
उडुपीची आणखी तीन आकर्षणे म्हणजे मालपे बीच,  सेंट मेरी बेट, मरवांथे बीच होय .  मालपे बीच हा सोनेरी वाळूचा बीच असून पार्किंगच्या पुढे जेथे प्रवेशद्वार आहे तेथे महात्मा गांधींचा सुंदर पुतळा आहे. तेथून मोटर बोटीने सेंट मेरी बेटावर जाता येते. हे बेट ज्वालामुखीपासून बनले असले तरी तेथे खूप मोठ्या प्रमाणात कोरल्स आहेत. सुंदर, स्वच्छ आणि पांढऱ्या वाळूचा किनारा असलेल्या या बेटावर संध्याकाळी बोटफेरी घेऊन गेलात तर अतिशय देखणा सूर्यास्त पाहणे , हा अविस्मरणीय अनुभव ठरतो.
मरवांथे बीच हा उडुप्पीच्या आधी ५० किमी व मुरडेश्वर पासून ५६ किमीवर आहे .  येथे महामार्गाच्या एका बाजूला समुद्रकिनारा व दुसऱ्या बाजूस नदीतून आपण  जात असताना वेगळाच अनुभव येतो . समुद्र किनाऱ्यावरील  रस्त्याची झीज होऊ नये म्हणून आता तिथे सिमेंटचे ब्लॉक टाकण्यात आले आहेत. उडुपीनंतर खाली दक्षिणेकडे मंगलोर किंवा पूर्वेला कुद्रेमुख घाटमार्गे या तुळूनाडु प्रदेशातून आपल्याला मालनाडुमध्ये जाता येते.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleगांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड (1914-1948)
Next articleकोलकत्याचं विशाल हृदय
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.