-सीमा शेटे (रोठे), अकोला
‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखले जाणारे ख्यातनाम लेखक मारुती चितमपल्ली यांनी रविवारी ४५ वर्षाच्या वास्तव्यानंतर विदर्भाचा निरोप घेतला. ४५ वर्षांपूर्वीवन विभागातील नोकरीनिमित चितमपल्ली विदर्भात आले आणि विदर्भाचेच झाले होते . मात्र वृद्धापकाळामुळे त्यांनी आता आपले मूळ गाव सोलापूरला जाण्याचा निर्णय घेतला . त्यांच्या या आठवणी …
……………………………………………………………………………….
प्रत्येक वेळी लिहित्या लेखकाची आणि वाचकाची प्रत्यक्ष भेट होतच असे नाही किंवा त्याला समोरासमोर पाहिता येईलच, असेही नाही. कधीकधी त्या लेखकाचं लेखन आधी वाचलेलं असतं… आणि मग कधीतरी, अचानक कुठल्या प्रसंगानिमित्ताने त्यांची भेट होते. प्रत्यक्ष बघितलं जातं. कधी असंही होतं की, आधी लेखकाची भेट होते. त्याचे विचार, त्याचं बोलणं ऐकून त्याच्या लिखाणाविषयी उत्सुकता वाटायला लागते आणि मग त्याची पुस्तकं आपण वाचायला सुरुवात करतो. हे असंच, आधी भेट नंतर लेखन परिचय… असंच काहीसं झालं, मारुती चितमपल्ली यांच्या बाबतीत!
झालं असं की, सोलापूरच्या साहित्य संमेलन अध्यक्षपदी त्यांची निवड झाली . तेव्हा अकोल्याच्या विदर्भ साहित्य संघाच्या शाखेतर्फे त्यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. तोवर मारुती चितमपल्ली नावाचे एक लेखक आहेत. त्यांची बरीच पुस्तके प्रसिद्ध आहेत. जंगल, जंगल वाटा, प्राणी, पक्षी याबाबत त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. त्या अनुभवांवर त्यांचे लिखाण आहे… हे केवळ ऐकून होते. लेखन वाचलेलं नव्हतं. नागरी सत्कार ठरला. प्रतिभावंत कलावंत गजानन घोंगडे यांना स्मृतिचिन्ह तयार करायची जबाबदारी दिली. अकोल्यातील अनेक नामवंत सहभागी झाले होते. अतिशय देखणा समारंभ झाला.घोंगडे यांनी खूप सुंदर अर्कचित्र काढून स्मृतिचिन्ह तयार केलं होतं.
त्यावेळी त्यादिवशी चितमपल्ली सरांना पहिल्यांदा ऐकलं. वक्तृत्व झन्नाटेदार वगैरे नव्हतं. मात्र जे बोलत होते, ते मनापासून बोलत होते. संपन्न अनुभव मांडत होते. म्हणून ते कुठे तरी आत जाऊन भिडत होतं. तेव्हा त्यांना प्रत्यक्ष जवळून बघता आलं. त्यांचं भाषण ऐकता आलं. त्यांचे विचार ऐकले आणि जाणवलं, “आपण ही पुस्तक वाचायलाच पाहिजेत”. आणि मग एकामागून एक त्यांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. चकित करणारी, नवल वाटावी अशी बरीच माहिती त्यात होती. त्यात संशोधकाचा आविर्भाव नव्हता मात्र ते एक प्रकारचे संशोधनच होतं. त्यामधून जंगल, तिथलं जीवन, पक्षी, प्राणी, वृक्ष याबद्दल माहिती मिळाली. कधीच जंगल न पाहिलेल्यांनासुद्धा जंगल बघावे वाटू शकणारं, त्याबद्दल माहिती वाचायची ओढ निर्माण करणारं …. असं ते लिखाण होतं.
असं आगळं लिखाण करणारा हा लेखक त्यानंतर पुन्हा एकदा भेटला. पण यावेळी भेट प्रत्यक्ष नव्हती.
झालं असं की, एम ए (मराठी) हा विषय अकोल्याच्या राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात शिकवत असताना ‘एकच लेखक’ याअंतर्गत मारुती चितमपल्ली यांचं आत्मकथन ‘चकवा-चांदण’ शिकविण्याचा योग आला. इथे या लेखकाची पुन्हा एकदा भेट झाली. पुस्तक शिकवायला सुरुवात केली तेव्हा एवढं जाडजूड पुस्तक विद्यार्थ्यांना कसं शिकवावं? वेळेची आणि मजकूराची सांगड कशी घालावी? हा प्रश्न मनात होता. यासाठी अनेक दिवस लागतील, असं वाटत होतं. पण एकदा सुरुवात केली आणि मीच नव्हे तर विद्यार्थी पण त्यात गुंतून गेले. एकाऐवजी सलग दीड-दोन तास बसलो तरी कोणीही कंटाळत नव्हतं. चितमपल्ली सरांचे समृध्द जंगलातील अनुभव… ते सारे अनुभव त्यांनी अगदी सहजपणे पुस्तकात मांडले होते. आजवर अपरिचित असणारी जगण्याची तऱ्हा! पुस्तकातील नवी, नवलपूर्ण माहिती..विद्यार्थ्यांना आकृष्ट करत होती.
लेखकाला लहानपणापासून आलेले जंगलाचे अनेक अनुभव आणि पुढे नोकरी लागल्यानंतर जंगलातील घडामोडींच्या केलेल्या नोंदी, थोरामोठ्यांच्या भेटी असे सगळे अनुभव त्यांनी पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. आता अनेक वर्ष झाली त्या पुस्तक वाचनाला, पण त्यातील बरेचसे प्रसंगही आजही स्मरणात आहेत. एकंदर त्याचा प्रभाव अजूनही मनावर आहे. ‘चकवाचांदण’ या शब्दाबद्दल मारुती चितमपल्ली यांनी जे लिहिलं, ते अद्यापही आठवतं. या शीर्षकाला समर्पक असे चित्र पुस्तकाच्या मुखपृष्टावर आहे. ते चित्र घुबडाचं आहे. ते पाहून आपल्याला आधी नवल वाटतं पण आदिवासी घुबडाला ‘चकवाचांदण’ म्हणतात ही माहिती, स्पष्टीकरण पुस्तकात आपल्याला मिळतं आणि उलगडा होतो. अशी अनेक खिळवून ठेवणारी माहिती त्या पुस्तकात आहे. म्हणूनच जाडजुड असलं तरी पुस्तक कधी वाचून संपतं, हे कळतही नाही. विद्यार्थ्यांना शिकवताना मीही त्यात गुंगून गेले होते.
विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या माध्यमातून मारुती चितमपल्ली रोजच भेटत होते . मात्र त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली ती नागपूरच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात. तो प्रसंग मी आयुष्यभर विसरणार नाही.झालं असं होतं- संमेलनाच्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद भालचंद्र जोशी हे करणार होते. ते स्वतः संचालन करणार असल्यामुळे त्यांनी कोणत्याही तर्हेचा क्रम अथवा त्याची रूपरेषा लिखित स्वरुपात तयार केली नव्हती. त्यांच्या मनात तो सगळा आराखडा तयार होता. पण झालं असं की ‘ग्रंथ दिंडी’ दरम्यान दिलेल्या प्रचंड घोषणा आणि सततच्या बोलण्यामुळे त्यांचा आवाज पूर्णपणे बसला. तोंडातून शब्द उमटणे कठीण झाले होते. संध्याकाळी पाच वाजता असणाऱ्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन करणे त्यांना अशक्य झाले. काय करावे? या विचारात ते असताना, मी त्यांना सहजच ऑफिसमध्ये आलेली दिसले. त्यावेळी साडेचार वाजले असतील. मला बघताच जोशी सरांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. “आराखडा काय आहे? रूपरेषा काय आहे? कोणता क्रम आहे? या विषयी तुम्हाला एक एक करुन लिहून देतो”, असं ते म्हणालेत. पण कामाच्या गडबडीत ते मागे पडलं.
कार्यक्रम सुरू झाला. पाहुण्यांचे स्वागत होत होते. एकामागे एक पाहुणे सत्कार स्वीकारत होते आणि मग भाषणं सुरू झालीत. त्याच वेळी जोशी सरांच्या मुलीने प्रेक्षकांमधून वडिलांना मोबाईलवर कळविले की, पूर्व अध्यक्ष मारुती चितमपल्ली यांचा सत्कार- स्वागत’राहिलं आहे. आता आली पंचाईत…! जोशी सर म्हणाले, “काही हरकत नाही. हे भाषण झाले की करू.” त्यावेळी दत्ता मेघेंचे भाषण सुरू होते. त्यांच्या बोलण्यात, “हे संमेलन म्हणजे एखाद्या लग्न समारंभासारखे आहे”, असा उल्लेख आला. झालं! तोच धागा मी पकडला आणि मारुती चितमपल्ली यांच्या सत्कार स्वागताची उद्घोषणा दिली. समोरील पंचवीस हजाराच्या प्रेक्षकांमधून काहीजण चिडून समोर आलेत आणि मोठ्यांदा विचारते झाले की, ‘तुम्हाला आता अक्कल आली का?”
माझ्या डोक्यात मेघे साहेबांच्या भाषणातील शब्द फिरतच होते. त्यातला ‘लग्न समारंभ’ हा धागा पकडून मी अक्षरश: अभिनय करत प्रथम हलके स्मित केलं. पॉझ घेतला. हात जोडले आणि शांतपणे म्हणाले , “आत्ताच मेघे साहेब बोलून गेलेत की, हा समारंभ एखाद्या लग्नकार्यासारखा आहे. लग्नात काही गोष्टी मागे, काही गोष्टी पुढे होत असतात. घाईगडबडीत काही सुटतं. पण ते मुद्दाम केलेलं नसतं. तसंच काहीसं इथे झालं आहे. चितमपल्ली सरांचा सत्कार आधी व्हायचा, तो आता होतो आहे, कारण ते अशा एकमेवाद्वितीय सत्काराचे धनी आहेत. गर्दीतले एक नाहीत. त्यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांचा हा सत्कारही आपल्या मनात वेगळा ठसा उमटवत आहे”. माझ्या या वाक्यावर पहिली टाळी दिली ती लोककवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी! त्यानंतर चितमपल्ली सर ‘व्वा!’ म्हणालेत आणि संपूर्ण सभामंडप टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला. ही आठवण मनात आयुष्यभर राहील.
चितमपल्ली सर विदर्भ सोडणार म्हटल्यानंतर त्या साऱ्या आठवणी आज मनात दाटून आल्यात. मनात आलं की, ‘केशराचा पाऊस’ असो ‘पाखरमाया’ असो वा ‘चकवाचांदण’… हा लेखक सतत वाचकांच्या अवतीभवती आहे. दैनंदिन जीवनात कोणत्या न् कोणत्या संदर्भात चितमपल्ली येतच असतात. त्यामुळे त्यांचं वास्तव्य विदर्भात असो अथवा सोलापुरात…! जंगल जीवनदर्शन ते सतत वाचकांना घडवतील . या वयातही जंगल कोशाचं काम चिकाटीनं करणाऱा हा लेखक यापुढेही स्वस्थ बसणार नाही, याची खात्री आहे.
चितमपल्ली सर,….आता यापुढील तुमचं वास्तव्य जरी सोलापुरात असलं तरी विदर्भाला तुमच्या हृदयात कायमच एक खास स्थान असणार, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही .तुमचं पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो ही आमची प्रार्थना असणार आहे.
लेखातील अर्कचित्र – गजानन घोंगडे-9823087650
(लेखिका अकोला आकाशवाणी केंद्रात उद्घोषिका आहेत.)
9422938040