मी व माझे पुतणे एकदा इकडे गेलो असता, फोटो काढण्यासाठी या खिंडीतील चहाच्या मळ्यात गेलो . चालत असताना माझ्या एका पुतण्याच्या पायाला जखम झाली व त्यामधून रक्त येऊ लागले . त्या परिस्थितित त्याला साप चावला असावा असे वाटले . आम्ही व तेथील चहाच्या टपरीवरील एक वृद्ध व्यक्ती ती जखम साप चावल्याने झाली आहे का हे निरखू लागलो. नंतर ती जखम ही चहाच्या झाडाची वाळलेली फांदी लागल्याने झाली आहे असे लक्षात आले . परंतु त्याच्या मनातील सर्पदंशाची शंका मात्र दूर होईना. आम्ही समजूत काढूनही काही उपयोग झाला नाही . मग मात्र आम्ही परत माघारी फिरायचे ठरवले. परतीच्या मार्गावरील चहाच्या मळ्यातील सुंदर अशी दृश्ये पाहून ही घटना त्याच्यासह सर्वजणच विसरले व पुनः एकदा सर्व जण या मळ्यांचे सौंदर्य निरखण्यात मग्न झाले.