मुशायरा जिवंत ठेवणारा शायर-राहत इंदोरी!

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक- २०२०

-वसुंधरा काशीकर

1975 साल… सगळ्या देशभर इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारनं आणीबाणी लावलेली… त्यावेळी एका मुशायर्‍यात एक शायर जाहीररित्या म्हणाला, ‘सरकार चोर है…’ दुसर्‍या दिवशी सरकारी अधिकारी शायरच्या घरी दाखल झाले, आणि जाब विचारला…

‘‘आपने कल कहा था की, सरकार चोर है?’’ – अधिकारी

‘‘हाँ कहा था… पर मैंने ये नही कहा की, कहाँ की सरकार चोर है… अमरिका की, ब्रिटन की, जापान की…मैंने सिर्फ इतना कहा की सरकार चोर है’’- शायर

‘‘आप क्या हमें बेवकूफ समझ रहे हैं क्या? क्या हमें नही मालूम कहाँ की सरकार चोर है…’’ – अधिकारी

आणिबाणीच्या भयाच्या सावटात सरकारला चोर म्हणण्याचं धैर्य दाखवणारा हा शायर होता डॉ. राहत इंदोरी. हा किस्सा राहत इंदोरी अनेक मुशायर्‍यात सांगत असत.

व्यवस्थेवर टीका करण्याच्या बाबतीत ते दुष्यंतकुमारांचा वारसा चालवणारे होते.

मत कहो आकाश में कोहरा घना है

यह किसी की व्यक्तिगत आलोचना है

अशी अतिशय सूचक आणि उपहासात्मक टीका दुष्यंतकुमारांनी सरकारवर केली होती. राहत इंदोरी हे त्याच जातकुळीतले शायर.

     सुरुवातीला अनेक वर्ष चित्रकलेचे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून राहत साहेब काम करत होते. त्यांनी इंदोरला स्वत:चा स्टुडिओही काढला होता. चित्रपटांची पोस्टर्स रंगवण्यापासून ते पुस्तकाची मुखपृष्ठ करण्यापर्यंत सर्व कामं त्या स्टुडिओत होत. चित्रकला हीच सुरुवातीच्या काळात त्यांच्या चरितार्थाचं साधन होती. त्यांची चित्र बघितली असता त्यांनी चित्रकला लेपींळर्पीश केली असती, तर त्यांच्यात एक उत्तम मॉडर्न आर्टिस्ट बनण्याचं सामर्थ्य होतं असं दिसतं.

     राहत साहेबांनी स्वत:च एका मुलाखतीत सांगितलं आहे. ते नेहमी चित्रकला आणि शायरीची तुलना करताना निदा फाज़ली साहेबांच्या एका शेरच्या हवाला देत..

     ‘हर आदमी में होते है दस-बीस आदमी’ असं एके ठिकाणी निदाजींनी म्हटलंय. राहत साहेब म्हणत, ‘माझ्यातही एकाच वेळी दोन व्यक्ती, दोन कला एकाच शरीरात नांदत होत्या. चित्रकला आणि शायरी. त्या दोघी जणू जुळ्या बहिणी. त्या सोबत राहत होत्या, पण त्यांची एकमेकींशी स्पर्धा होती. दोघींमध्ये रस्सीखेच होती.’ राहत साहेब वर्णन करतात… ‘और अचानक एक दिन… शायरने ऐलान कर दिया… मैं हूँ… अकेला मैं हूँ… इस जिस्म पर, इस दिमाग पर, सोच पर सिर्फ मेरा अधिकार है…’

     आणि शायर जिंकला… शब्द जिंकले… रंगांनी माघार घेतली… राहत साहेब पूर्णवेळ केवळ आणि केवळ शायर झाले..

     10 वर्ष मुशायर्‍यांमध्ये राहत इंदोरी या नावाने धूम केली. त्यानंतर 1985 मध्ये राहत साहेबांनी उर्दू भाषेत एम.ए. केलं. त्यानंतर त्यांनी उर्दू भाषेतच पीएचडीही केली. त्यांचा पीएचडीचा विषय अतिशय इंटरेस्टिंग होता. तो म्हणजे… ‘मुशायरा आणि त्यातले किस्से!’

     राहत साहेबांना मुशायरा किती प्रिय होता, हे यातून दिसून येतं. तब्बल सातशे पानांचा प्रबंध त्यांनी लिहिला होता. ज्येष्ठ शायर शहरयार यांनी राहत इंदोरींना प्रबंधातला अनावश्यक भाग काढून तीनशे-साडेतीनशे पानांचं पुस्तक काढावं, अशी सूचनाही केली होती. काही काम सुरू झालं, पण शेवटपर्यंत नाही पोहोचलं. ते पुस्तक आलं, तर फार मोठा संदर्भ अभ्यासकांना उपलब्ध होईल.

     या मुशायर्‍याच्या वेडापायी त्यांनी अनेक गोष्टींची किंमत दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रकलेचा जम बसलेला व्यवसाय त्यांनी एका क्षणात सोडून दिला. 1972 पासून ते मुशायर्‍यात शायरी सादर करायला लागले. महिनों-महिने प्रवास, महिन्यातले किमान वीस दिवस तर ते मुशायर्‍यातच असत. त्या दिवसात बाहेरचं खाणं, रात्री-बेरात्री प्रवास, ट्रेनचा प्रवास, बसचा धक्के खात केलेला प्रवास, रात्रीचे जागरणं… यात तब्येतीकडे झालेलं दुर्लक्ष.

म्हणून राहत साहेब म्हणतात…

     उनसे पूछो ग़ज़ल मांगती है कितना लहू

     सब समझते हैं ये धंदा बड़े आराम का है

मुशायर्‍यांचे अनभिषिक्त सम्राट, ही ओळख राहत साहेबांनी मोठ्या कष्टानं तयार केली होती. एक तर त्यांची शायरी ही समजायला सोपी आहे. हा सोपेपणा राहत इंदोरी यांनी फार जाणीवपूर्वक जपला. राहत साहेब एके ठिकाणी ‘इशरत’ यांच्या शेरचा हवाला देतात.

शेर उसीको कहिये इशरत

दिल से निकले दिल में जाये..’

     ‘शायरी में उलझन नहीं होनी चाहिये’ -इति राहत साहब. राहत साहेबांच्या लोकप्रियतेचं आणखी एक कारण म्हणजे, राहत इंदोरी यांची सर्वसमावेशकता. मुशायर्‍यात 15-20 वर्षांच्या मुलांपासून ते 60-70 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्व लोक येतात. या सर्वांना एकाच वेळी संतुष्ट करणं सोपं नाही, त्यासाठी तुमच्या पोतडीत तर्‍हेतर्‍हेचे शेर हवे. डॉ. दीपक रुहानी यांनी राहत इंदोरींवर लिहिलेल्या चरित्रपर पुस्तकात छान वर्णन केलंय. मुशायर्‍यात राहत साहेब सुरूवातीला 15 ते 30 वयोगटातल्या तरुणांसाठी रुमानी वा रोमँटिक शेर पोतडीतून काढतात. मग यांचा हल्लागुल्ला शांत होतो. त्यानंतर 35 ते 50 वर्षांपर्यंतच्या गृहस्थाश्रमी व्यक्तींसाठी दुनियादारीचे शेर ऐकवले जातात. मग तिसरी रेंज पन्नाशीच्या पुढच्या लोकांसाठी आहे. परत आपल्या पोतडीतून ते काही शेर काढतात आणि सगळा मुशायराच ताब्यात घेतात. रुहानींच्या मते, ‘सर्वांना संतुष्ट करण्याची ही रेंज फार कमी शायरांजवळ आहे. केवळ मुशायर्‍यासाठी राखीव म्हणून राहत इंदोरींनी आपली अर्ध्यापेक्षा जास्त शायरी प्रकाशितही केली नाही.’

     त्यांची शायरी निर्विवाद आक्रमक आहे. आक्रमकता हा त्यांच्या शायरीतला स्थायीभाव आहे. म्हणूनच राहत इंदोरींना मुशायर्‍यातले ‘अँग्री यंग मॅन’ म्हटलं जातं. आणखी एक गोष्ट राहत इंदोरींना इतर शायरांपासून वेगळं करते, ती म्हणजे त्यांचा शायरी पेश करण्याचा, शेर ऐकवण्याचा अंदाज. राहत इंदोरी शेर ऐकवताना संगीताचा आधार अजिबात घेत नाहीत. चाल लावून, गाऊन ते शेर ऐकवत नाहीत. त्यांची शेर ऐकवण्याची वेगळीच स्टाईल आहे. ज्यात नाट्यमयता आहे, ज्यात गरज पडेल तिथे अभिनय आहे, हसणं आहे, उपहास व्यक्त करणं आहे, मध्येच डोळा मिचकावणं आहे, हातवारे आहेत, गर्जना आहे… हे सगळं ते शेरचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी करत असतात. त्यांची शेर ऐकवण्याची पद्धत अभिजात निश्चितच नाही, पण अर्थ पोहोचावा ही त्यांची धडपड प्रामाणिक आहे. सशपशीरश्रश्रू राहत साहेब शेरमधली पहिली ओळ तीनदा म्हणतात, तिहाई घेतात. ही तिहाई घेताना प्रत्येकवेळी त्यांचे चढउतार, शब्दांवरचं वजन बदलत जातं. काही प्रमाणात शास्त्रीय संगीताच्या गायकासारखं. शब्दाला ट्रीट करणं राहत इंदोरींना चांगलं माहीत होतं. हे सगळं मग त्यांना ‘शेर कहने से पहले दाद लूटनेवाला शायर’ करतं.

     राजकीय विषयांवर निर्भीडपणे आपले मत शायरीतून मांडणारे शायर, अशी ओळख राहत साहेबांनी तयार केली होती. राजकीय व्यवस्था, सरकार, त्यांचे निर्णय, धार्मिक दंगे या विषयांसाठी राहत इंदोरी ओळखले जात. पण, ही त्यांची ओळख अतिशय अपुरी आहे. त्यांनी रोमँटिक शायरीही फार अप्रतिम लिहिली आहे.

मेरी साँसों में समाया भी बहुत लगता है

और वही शख़्स पराया भी बहुत लगता है

लगेच राहत इंदोरींमधला खट्याळ प्रियकर जागा होतो,

तुमसे मिलने की तमन्ना भी बहुत है लेकिन,

आने जाने में किराया भी बहुत लगता है

किंवा कधी अतिशय बोल्ड वर्णन त्यांनी किती नज़ाकतीने केलंय-

एक मुलाक़ात का जादू, की उतरता ही नही

तेरी ख़ुशबू मेरी चादर से नही जाती है

राहत इंदोरी यांची राजकीय विषयांवरील काही शायरी ही फार अव्वल दर्जाची आहे. उदाहरणार्थ जिथे-जिथे ते सूचक, प्रतिकात्मक लिहितात तिथे विरोधकांच्याही तोंडून वाह..क्या बात है ! निघत असे.

ताज मछली ने सफाई का पहन रख्खा है

गंदगी है की समंदर से नही जाती है

किंवा

‘सबकी पगडी को हवाओं में उछाला जाये

सोचता हूँ की कोई अख़बार निकाला जाये’

किंवा

एक नये ख़ौफ का जंगल है मेरे चारों तरफ

अब मुझे शेर से नही गाय से डर लगता है

हम अपने शहर में मह़फूज़ भी हैं, ख़ुश भी है

ये सच नहीं है, मगर ऐतबार करना है

त्यांची शायरी आव्हान देणारी आहे, आव्हान स्वीकारणारी पण आहे. पण, कधी कधी त्यांची शायरी ही शायरी न राहता दुर्दैवानं ‘राजकीय नारेबाजीकडे’ झुकते.

     भारतातील अनेक शायरांमध्ये 1992 च्या बाबरी मशीद प्रकरणानंतर विषाद निर्माण झाला. त्यांना एक खिन्नता आली. काहीशी कटुताही आली. ती स्वाभाविकही होती.

राहत साहेबांचाच एक फार व्याकुळ शेर आहे-

टूट रही है हर दिन मुझमे इक मस्जिद

इस बस्ती में रोज दिसम्बर आता है

पण, नंतर नंतर मग राहत इंदोरींची कटुता ही त्याही पुढे जाऊन त्याला अतिरेकीपणाचा दुर्गंध येऊ लागला. तो राहत इंदोरींच्या अभिव्यक्तीतून जाणवतो.

तुलनात्मक उदाहरण घेऊ या. निदा फाज़लींचा शेर बघा-

पहले हर चीज़ थी अपनी, मगर अब लगता है

अपने ही घर में, किसी दूसरे घर के हम हैं

भयानक परकेपणाची पोखरून टाकणारी जाणीव त्यांनी काय दर्जेदारपणे व्यक्त केलीय बघा! आपल्याच घरी परकं वाटावं तसं वाटायला लागलंय आता या देशात, असं निदा म्हणतात.

तर, दंगलीत ज्यांचं घर जाळल्या गेलं ते बशीर बद्र किती संयतपणे घर पेटवणार्‍यांना कळवळून प्रश्न विचारतात-

लोग टूट जातें हैं एक घर बनाने में

उनको तरस नहीं आता बस्तिया जलानें में

त्याच धर्तीवर राहत इंदोरींची अभिव्यक्ती बघा-

सभी का खून शामील है इस मिट्टी में

किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है

     राहत साहेबांची काही शेरमधली अभिव्यक्ती त्यांना निर्विवाद कमीपणा आणणारी ठरते. अटलबिहारी वाजपेयींबद्दल एका मुशायर्‍यात ते म्हणतात, ‘मैं नाम नहीं लेता किसी का अपनी ज़ुबान से. इसलिए की मेरे शेरों की क़िमत करोड़ो रुपये है. मैं दो-दो कौड़ी के लोंगों का नाम लेकर अपने शेर की क़िमत ज़ाया नहीं करना चाहता.’

असं म्हणून मग वाजपेयींच्या गुडघेदुघीवर ते शेर ऐकवतात. थोडक्यात वाजपेयींना त्यांनी ‘दो कौडी का आदमी’ म्हटलं होतं. वाजपेयींबद्दल ते पुढे म्हणतात.

काम घुटनों से जब लिया ही नहीं

फिर ये घुटनों में दर्द कैसा

वाजपेयींच्या उदारमतवादी स्वभावाबद्दल/ व्यक्तिमत्वाबद्दल विरोधकांच्याही मनात शंका नव्हती; किंबहुना वाजपेयी हे भारतीय राजकारणातील ‘एकमेव अजातशत्रू’ व्यक्तिमत्व होतं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कोणाच्याही व्यंगावर वा आजारावर अशी उपहासात्मक टीका ही चुकीचीच आहे. त्याचं कोणत्याही आधारावर समर्थन होऊ शकत नाही. राहत साहेबांनी इथे पातळी सोडली, राहत साहेब अशोभनीय, दर्जाहीन वागले हे मान्य करावेच लागेल.

     दुसर्‍यांवर टीका करताना आपण इतके खाली जाऊ नये की, आपणच टीकेस पात्र व्हावे दुर्दैवानं हे भान राहत साहेबांकडून पाळलं गेलं नाही. साहिर लुधियानवी, निदा फाज़ली, गुलज़ार, अमृता प्रीतम कितीतरी नावं सांगता येतील, ज्यांच्या फाळणीच्या जखमांवर कधी खपल्या धरल्याच नाही. पण, ही माणसं कधी कटू झाली नाहीत. राहत साहेबांबद्दल असं म्हणता येत नाही.

पण त्यासोबतच हे ही सांगावे लागेल की, वाजपेयींच्या मृत्यूनंतर एका श्रद्धांजली सभेत त्यांनी वाजपेयींवर चांगले शेर ही ऐकवले होते. तसेच ‘निकाह किया ही नही तो मर्द कैसा’ या ओळी त्यांनी वाजपेयींवर लिहिल्या नव्हत्या वा म्हटल्याही नव्हत्या. त्यांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक या ओळी त्यांच्या मृत्यूनंतर पसरवल्या गेल्या, हेही तेवढेच खरे आहे. भारतीय संस्कृतीत मरणानंतर वैर संपते, अशी मान्यता आहे. राहत साहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर त्यांनी ज्या ओळी म्हटल्याच नाहीत त्या खपवणं आणि टीका करणं, हेही तितकंच चुकीचं आणि दर्जाहीन आहे.

राहत इंदोरी हे केवळ शायर नव्हते, तर ते उर्दूचे प्रोफेसरही होते. त्यामुळे त्यांच्याकडून विशेष अपेक्षा होत्या. एका मुशायर्‍यात ाश ीेें चळवळीनंतर ते म्हणाले होते की, ‘मी 25 वर्षांपूर्वी कोणाला ‘जानम’ म्हटलं किंवा कोणाला डोळा मारला, तर आता 25 वर्षानंतर माझ्यावर अचानक खटले, वकील, कोर्टकचेरी सुरू.’ इतकी मोठी आणि गंभीर चळवळ अशा पद्धतीनं टिंगलटवाळी करून एका फटक्यात निकालात काढायची आणि अशा श्रेेीश लेााशपीं करायच्या हे किमान राहत साहेबांकडून अपेक्षित नव्हतं.

     राहत साहेबांचे भान कधी कधी सुटत असे आणि ते घसरत असत. जसं की, एका मुशायर्‍यात ते म्हणाले होते, ‘की भई मर्दों की कुछ कमज़ोरियाँ होती है इश्क़ विश्क़’. किंवा ग़ज़ल समझने के लिए थोडा Characterless होना भी ज़रूरी है. आता हे ते On a lighter note वरच बोलले होते. पण याचं Interpretation वेगळं होऊ शकतं.  पण, राहत साहेब हे Politically Correct बोलणार्‍यातले  वागणार्‍यातले नव्हतेच. जे मनात आलं, जे मनाला पटलं तेच ते बोलले. त्यांनी कोणाचीही भीड बाळगली नाही आणि त्यासाठी किंमतही चुकवली.

     राहत साहेबांबद्दल ते धर्मांध आहेत, असं खोटं जाणीवपूर्वक पसरवण्यात आलं.  मुळात राहत साहेब असे नव्हते. कारण राहत साहेब धर्मांध असते वा धार्मिक तेढ पसरवणारे असते, तर त्यांच्या बायकोचं नाव त्यांनी सीमा ठेवलं नसतं वा त्यांच्या नातीचं नाव मीरा, तर नातवाचं कबीर ठेवलं नसतं. राहत साहेबांनी मग असंही लिहिलं नसतं.

दरे मस्जिद पे कोई शै पड़ी है

दुआ बेअसर होगी हमारी

किंवा

मैं जब मर जाऊ तो मेरी अलग पहचान लिख देना

लहू से मेरी पेशानी पर हिंदुस्तान लिख देना

     राहत साहेबांनी सिनेमासाठी गीतं लिहिलीत आणि त्यांची जवळपास सर्वच गीतं ही प्रचंड गाजलीत. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘सडक’, ़‘करहब’ ही नावं पुरेशी आहेत. मुशायर्‍यापेक्षा कितीतरी पट जास्त पैसे सिनेमाच्या एकेका गाण्यासाठी मिळतात. काही तुलनाच नाही. तरीही सिनेमामध्ये यश मिळत असताना त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण विचारलं असता राहत साहेब फार छान सांगतात, ‘आपके सामने प्रोड्यूसर, डिरेक्टर, और चार-पाच लोग बैठे हुए होते हैं. आपको उन सबको गीत सुनाना पड़ता है. फिर डायरेक्टर अपने इल्लीट्रेट ड्रायवर को पूछता है, ‘कैसा लगा?’ वो ड्रायवर बिडी पी रहा है और बिडी पीते पीते वो रुक कर बोलता है, ‘साहब, मज़ा नहीं आया…’

     एका इमानदार शायरला हे खरंच सहन होऊ शकत नाही. त्यामुळे राहत साहेबांनी सिनेगीत लेखन सोडलं नसतं, तरच नवल. ते आपल्या आत्म्याच्या आवाजाची हाक ऐकणारे व्यक्ती होते.

शब्दांचा अतिशय वेगळ्या पद्धतीने वापर, हे राहत साहेबांचं वैशिष्ट्य. पूर्वासूरींचे सर्व पायंडे त्यांनी मोडून काढले. खासकर दिल्ली आणि लखनौच्या शायरीची जी काही वैशिष्ट्य होती, ती सोडून त्यांनी स्वत:चं वेगळं इंदोरी घराणं तयार केलं, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

     त्यांच्या एका शेरमध्ये एकाच अर्थाच्या विविध शब्दांचा ते काय सुरेख वापर करतात बघा-

मुझमे कितने राज़ है बतलाऊँ क्या

बंद इक मुद्दत से हूँ खुल जाऊँ क्या

आजज़ी, मिन्नत, ख़ुशामत, इल्तेजा

और मैं क्या क्या करुँ मर जाऊँ क्या

या शेरनंतर दाद न मिळाली तरच नवल!

किंवा

जिस दिन से वो रुठी मुझसे रुठे रुठे है

चादरवादर, तकिया वकिया, बिस्तरविस्तर सब

मुझसे बिछडकर वो भी कहाँ अब पहले जैसी है

फिके पड़ गये, कपडेवपडे, ज़ेवरवेवर सब

यातला सब या शब्दाचा उच्चार किंवा त्याला ट्रीट करणं ज़रूर बघावं. मुशायर्‍यात शेर ऐकवताना ते इतके खुश असतात, त्यांचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत असतो. जणूकाही त्यांना हेच करायचं होतं. हेच करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे असं. मुशायरा आणि शायरी यावर राहत साहेबांनी निर्विवाद, नितांत आणि निरपेक्ष प्रेम केलं…बेइम्तिहा…!!

     दीपक रुहानींनी फार चांगलं विश्लेषण केलं आहे. ते म्हणतात, ‘राहत साहब मुशायरों से ज़िंदा रहनेवाले शायर नहीं है, बल्कि ये वो शायर है जिन्होंने मुशायरा ज़िंदा रखा.’ डॉ. रुहानी यांनी त्यांच्या पुस्तकात एक किस्सा सांगितला आहे. पूर्वीला मुशायर्‍यात पैसे फारच कमी मिळत असत. दोनशे-तीनशे रुपये मुश्किलीने मिळाले तर मिळाले. त्याकाळात सर्वात जास्त पेमेंट ख़ुमार साहेबांचं होतं ते म्हणजे 500 रुपये. हातात बॅग घेऊन राहत साहेब या मुशायर्‍यातून त्या मुशायर्‍यात असा दौराच काढत. कधी बस, कधी ट्रेन, तर कधी टेम्पोने प्रवास. अंगावरचे कपडेही मर्यादित. एकदा बनारसला मुशायरा होता. राहत साहेब तीन-चार मुशायरे करून बनारसला जात होते. मोजकेच कपडे, ते वापरून वापरून खराब झालेले. राहत साहेब ज़ाफराबाद स्टेशनवर उतरले. दुपारची वेळ होती. स्टेशनवर पाणी प्यायची हापशी (हँडपंप) होती. राहत साहेबांनी अंगातला शर्ट पँट काढला. तो हँडपंपवर पाणी हापसून-हापसून धुतला. दुपारभर वाळवला आणि मग बनारसला गेले. आपण कल्पना करू शकतो, अंडरवियर, बनियन घालून हँडपंपवर शर्ट-पँट धुताना राहत साहेब कसे दिसत असतील! हा एक किस्सा झाला असे कईक किस्से आहेत. अशा कित्येक अडचणींचा सामना करत राहत साहेबांनी मुशायरा जिवंत ठेवला, शायरी जिवंत ठेवली, स्वत:चं स्वत्व जिवंत ठेवलं. आपल्या एका मुलाखतीत राहत साहेब म्हणाले होते, ‘एक ज़िंदगी में हज़ार ज़िंदगी तलाश कर सकते हो तो आप को तलाश करनी चाहिए.’

     राहत साहेबांनी निश्चितपणे एका आयुष्यात हजार जीवनांचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. राहत इंदोरी या जगात नाही. मला खात्री आहे, जन्नत में मुशायरा चल रहा होगा. सुननेवालों में राम, कृष्ण, पैगंबर, इसाह, बुद्ध होंगे और राहत साहब अपने उसी खास अंदाज़ में ये कह रहे होंगे-

किसने दस्तक दि ये दिलपर, कौन है?

आप तो अंदर हैं, बाहर कौन है?’

(लेखिका उर्दू शायरीच्या अभ्यासक व नामवंत स्तंभलेखक आहेत.)

[email protected]

Previous articleमुजऱ्याच्या पाऊलखुणा!
Next articleग्रेसफुल…अनकन्व्हेन्शनल-सुश्मिता सेन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here