-भीमराव पांचाळे
मित्राचा मृत्यू हा त्या काळापुरता आपलाच मृत्यू असतो…या वाक्याचा पुन्हा प्रत्यय आला.. इलाही गेला…
गज़लच्या महावृक्षाची गज़ल-फळांनी लगडलेली फांदी निखळली…
पहाटे-पहाटे वाईट स्वप्न पडावे आणि ते तंतोतंत खरे ठरावे अशी ती सकाळ इलाहीच्या मरणाची भयंकर वार्ता घेऊन आली आणि सदतीस वर्षांच्या आमच्या मैत्रीला तिने आठवणींच्या कप्प्यात कायमचे ढकलून दिले…
१९८३ साली मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम अधिकारी , माझे चाहते अनिल दिवेकर यांच्यासोबत गज़लकारांच्या ‘ गाठीभेटी ‘ या कार्यक्रमासाठी पुण्याला गेलो होतो . बैठक काय , भरगच्च मैफिलच होती ती..ऐकण्याची अन ऐकविण्याची…
गज़लकारांच्या त्या घोळक्यात एक होता इलाही.. भिडस्त , बुजरा , मागे मागे राहणारा…
इतरांबरोबरच त्यानेही आपल्या गज़लांचा कागद माझ्या सुपूर्द केला .
साधा कागद नव्हता तो , तर दस्तावेज होता एका लॅंडमार्क गज़लचा आणि आमच्या मैत्रीचा…
ती गज़ल होती –
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा…
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा…
मुखवटा लावलेला माणूस बघून संभ्रमित झालेला व भांबावलेला आरसा सर्वांना दाखवला तो इलाहीने आणि काळजाला झालेल्या जखमा ‘सुगंधी’ असू शकतात ही अतर्क्य जाणीवही मराठी मनाला करून दिली , ती सुद्धा इलाहीनेच…
प्रेम , विरह , वेदना , वंचना , आनंद , दुःख , सामाजिक प्रश्न .. जगण्याच्या या सगळ्या प्रत्ययांची खाण आहे इलाहीची गज़ल…
आमची दोस्ती गज़लमुळे झाली आणि गज़लच्याही पलिकडे गेली . गज़ल क्षेत्रात आमच्या या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या मैत्रीचे सगळ्यांना खूप नवल वाटायचे .
गज़ल चळवळीत , प्रचार-प्रसाराच्या कार्यात , गज़ल संबंधीच्या सगळ्या आयोजनांमध्ये आणि घरी-दारी सुद्धा हे दोघे सोबत असतात , गज़लांच्या अल्बम्समध्ये इलाहीच्या गज़लांची संख्या पण जरा अधिकच असते , भीमरावच्या पत्नीला इलाही “माझी बहीण गीता” असे संबोधतो..( ..आणि खरोखरच गीता सुद्धा मोठ्या भावासारखेच सगळे करायची . ‘जखमा अशा सुगंधी’ चे स्क्रिप्ट तयार करणे असो , त्याच्या आवडीचे जेवण असो की अजून काही .
आमच्या भाग्यश्रीला ‘भाग्या’ व ‘कार्टी ‘ नावाने हाक मारायचा तो फक्त इलाही. लहानपणी भाग्यश्री पण त्याला ‘इली इली काका’ म्हणायची.. )
या सगळ्यांमधून वेगळाच अर्थ काढला जाई , वेगळेच उद्गार कानावर पडत …
” अच्छा ! म्हणजे , इलाहीच्या बहिणीशी भीमरावने लग्न केले म्हणून हे सगळे आहे तर ! “
आम्हाला याची मोठी गंमत वाटायची..,आनंद पण व्हायचा…
इलाही जामदार आणि भीमराव पांचाळे यांची पत्रकार महेश म्हात्रे यांच्यासोबतची एक अविस्मरणीय गप्पांची मैफिल– ऐकायला विसरू नका – लिंकवर क्लिक करा –https://bit.ly/3pHk1w1
प्रतिभेचे अमोघ देणे लाभलेला इलाही कल्पनेची उत्तुंग उडान भरतांना सुद्धा वास्तवाचे भान आणि सामाजिक प्रश्नांची जाण सुटू द्यायचा नाही …त्यामुळेच , उर्मिलेचे चवदा वर्षे एकाकी राहणे हाच त्याला खरा वनवास वाटायचा , हवेचा हुंदकाही त्याला ऐकू यायचा , वाळूचे घर बांधायचे स्वप्न तो बघायचा , वाटेत पडलेल्या प्रकाश-किरणांनाही ठेचाळायचा , वेदनेचे चिरंजीवित्व अनुभवायचा , आगीच्या उठलेल्या लपटी त्याला बहरलेल्या ज्वाळा वाटायच्या ,
त्याचे काळीज बहारायचे ते जखमांनी , एखादी सुंदर सांज मागायचा ती सुद्धा वेदनांनीच बहरलेली , आसवांना शिस्त लावून आपला हुंदका बंदिस्त ठेवू शकायचा , याचनेला गळफास आणि कुडीला कारावास समजायचा तो , जगणे म्हणजे श्वासांचा अघोरी खेळ वाटायचा त्याला…
व्यथेचा कैफ घेऊन जगण्याचा हा अघोरी खेळ त्याने अखेर आटोपता घेतला…
सुफियाना तबीयतची एक रचना “…निघुनी जावे म्हणतो ” इलाहीने मला दिली होती , धुन सुद्धा खूप मस्तं जमून आली होती .
मैफिलीत ही गज़ल आजवर का गावीशी वाटली नाही , हे मात्र अनाकलनीय आहे माझ्यासाठी… आणि यानंतर गाण्याचा हौसला कुठून आणू मी ?
या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो
आकाशाला कायमचे..टाळावे म्हणतो…
वेदनेचा हा सखा , वेदनेला कवटाळून आता खरोखरच निघून गेलेला आहे –
आकाशाला कायमचे टाळून ,
क्षितिजाच्याही पल्याड…
अलविदा दोस्त … !
विनम्र ,
भीमराव
(लेखक नामवंत गज़ल गायक आहेत)
8879430997