धर्मांच्या जन्मकथा आणि चार्वाक

साभार: ‘कर्तव्य साधना’- चार्वाक लेखमाला  भाग – 4

– सुरेश द्वादशीवार

वेद हे जगाच्या इतिहासातले पहिले ज्ञानग्रंथ (धर्मग्रंथ) आहेत हे आता सर्वमान्य आहे. आपण वेदांचे संपादन केल्याचे महाभारताच्या अखेरच्या पर्वात व्यासांनी म्हटले आहे. वेदांचा काळ इतिहासाचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या मते इ. स. पूर्व 2300 वर्षे हा आहे. माणूस त्याआधीही जिवंत होता. तो पशुपालनाच्या वा शिकारी अवस्थेत असेल वा त्याहूनही अविकसित अवस्थेत.

त्या काळात माणसाला ज्ञानाचे वा शिक्षणाचे धडे वेदांवाचून कोणी द्यायचे? पर्जन्य होता, वारा होता, आकाश होते, पृथ्वी आणि अग्नीही होताच. त्यांची पूजा होती. त्यावरची पुस्तके होती. वेदांनी तीही संपादित केली. तेव्हाच्या माणसांचे ज्ञान कुठून आले? ते त्यांच्या अनुभवाने त्यांना दिले होते. शेती होतीच, शिकार होती, पशुपालन होते आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपात श्रद्धा व पूजाही होतीच. हे वेदपूर्व जीवन कोणत्या ज्ञानाने साकारले होते? त्या वेळी माणसांजवळ फक्त अनुभव होता आणि त्याचीच शिकवण होती.

वेदांचे संपादन व्यासांनी केले असेल… पण त्यातले ज्ञान वा श्रद्धा यांची उत्पत्ती त्याआधीची आहे. वेदातला समाज मौखिक वा लिखित परंपरा जपणारा व संस्कृत भाषेत बोलणारा होता. (त्या वेळी पाली ही लोकभाषाही होतीच…) त्यातले ज्ञान व भाषा वेदपूर्व आहेत. माणूस तर त्याही आधीचा आहे. आत्ताच्या डार्विनसारख्यांच्या सिद्धान्तानुसार त्याआधी लक्षावधी वर्षे तो राहिला व या अवस्थेला पोहोचला. इथवर पोहोचेपर्यंत ज्ञान, श्रद्धा, भक्ती, ईश्वर, पूर्वजन्म, पुनर्जन्म व मृत्यूनंतरचे जीवन यांसारख्या कल्पना त्याने विकसित केल्या होत्या व आत्मसातही केल्या होत्या.

हेही वाचायला विसरू नका -आपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्धhttps://bit.ly/3q5A71R

तात्पर्य, वेदकाळ हा माणसांच्या इतिहासातील बराच उत्तरकाळ होता व माणसाने त्याही अवस्थेतून पशुपालनाच्या व कृषिविकासाच्या अवस्थेत प्रवेशही केला होता. विवाहासारख्या संस्था निर्माण होऊन त्या प्रस्थापित झाल्या होत्या. लोकसंख्या कमी होती व ती वाढवण्यासाठी अधिकाधिक प्रजोत्पत्तीची गरजही त्याला वाटत होती.

…शिवाय राजतंत्र व गणतंत्र यांसारखी सत्तातंत्रे निर्माण झाली होती. मालक व मजूर, विचार करणारे व श्रम करणारे असे वर्गही तयार झाले होते. श्रमाची विभागणी झाली होती व स्त्रिया व पुरुष यांचे काम व श्रमाचे विषय व स्थानही निश्चित झाले होते. वेदांची निर्मिती समाजाच्या अविकसित अवस्थेतील नाही. विकसित व श्रद्धाश्रयीत काळात झाली. वर्ग निर्माण झाले होते व त्यांच्या जबाबदाऱ्याही ठरल्या होत्या. राजा सर्वश्रेष्ठ व त्याखालोखाल ब्राह्मणांचे स्थान होते. वैश्यांना त्यांच्या संपत्तीनुसार सन्मान होता तर शुद्रांना यात श्रमाखेरीज दुसरे क्षेत्र नव्हते.

अतिशुद्रांचाही एक वर्ग होता. तो अमंगल समजली जाणारी कामे करणारा होता. त्याला गावाबाहेर राहावे लागत होते. सन्मान व मोठेपण यांचीही विभागणी सर्वस्तरीय होती. महाभारतात आलेले वर्णन पाहिले तर नद्यांचे वरचे काठ राजांचे व ब्राह्मणांचे, नंतर दूतांचे व नंतरचे इतर जातिवर्गांचे असे त्यांच्या-त्यांच्या सामाजिक स्थानानुसार ठरले होते.

बुद्ध धर्माची स्थापना गौतमाने इ. स. पूर्व सहाव्या शतकात केली. त्याच काळात महावीरानेही त्याचा जैन धर्म स्थापन केला. ज्ञान, शिकवण व उपदेश त्यांनीही केला… पण त्याआधीही माणसे होती व त्यांच्याजवळ जीवनोपयोगी ज्ञान होते. पैगंबराचा जन्म इ.स. 570मधला. त्याच्यावर अल्लाची पहिली आयत (उपदेश) उतरली 612मध्ये. मग कुराणाची रचना व तोच इस्लामचा जन्मकाळ ठरला.

ख्रिस्ताचा जन्म इ.स.च्या आरंभीचा. त्याआधी काहीशे वर्षे ज्यू धर्मही स्थापन झाला. धर्माच्या शिकवणीवाचूनही माणूस जगत होता व त्याच्या जगण्यावागण्याचे नियम होते. ते कोणी निर्माण केले? जीवनाने दिलेल्या व अनुभवांनी आलेल्या शिकवणीनेच की नाही? मग शिक्षणाचा आद्य संस्थापक धर्म की अनुभव? धर्मगुरू की माणूस स्वतःच?

माणूसच ज्ञानाचा निर्माता असेल तर धर्म, श्रद्धा, ईश्वर वगैरे बाबी ही त्याचीच निर्मिती ठरते. त्याखेरीज वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळे ईश्वर, धर्म व श्रद्धा कशा जन्माला आल्या? आणि हे सारे ईश्वरनिर्मित असेल तर साऱ्या जगात ते एकच व एकाच भाषेत राहिले असते की नाही? जो विचार व जे संशोधन खरे असेल व सार्वत्रिक असेल तेच सत्य असेल. जे स्थळकाळपरत्वे बदलते ते ज्ञान कसे असू शकेल वा तो ईश्वर तरी कसा खरा ठरेल?

वेदांआधी समाज होता आणि काळही होता. तसा तो सर्वच धर्मांच्या आधीही होता. मग धर्म अनादी, अनंत वा सनातन कसे ठरतील? आणि त्यांचे आयुष्य व त्यांचा आरंभ हा ज्ञात आहे… परंतु धर्माचे प्रचारकी विद्धान त्यावर मात करण्यासाठी सांगतात की आमच्या धर्माचे ज्ञान जगात अगोदरच प्रकटले होते. आमच्या संस्थापकांनी ते संघटित व संपादितच तेवढे केले… मात्र हे सांगण्यातली लबाडी उघड आहे… कारण आत्ताचे जग इतिहास व ज्ञान यांना प्रमाण मानणारे आहे.

आपण, जग आणि चार्वाक : उत्तरार्धhttps://bit.ly/2NWuRR8

धर्माचे प्रचारक व प्रत्यक्ष धर्मांमधील काही कर्ते आचार्यही अशाच गमती करतात. महावीराच्या अगोदर तेवीस तीर्थंकर होऊन गेल्याचे सांगतात. बुद्धाच्या अगोदर दहा बोधिसत्त्व झाल्याचे म्हटले जाते आणि पैगंबरापूर्वी जगात अल्लाचे सव्वा लक्ष दूत येऊन गेले असे इस्लाम म्हणतो. या साऱ्यामागील खरी दृष्टी आपल्या धर्माचे प्राचीनत्व सांगण्याची व धर्माचे नसलेले सनातनत्व सांगणे एवढीच असते.

धर्म व ग्रंथकर्ते, मग ते धर्मांचे का असेनात… कधी निर्हेतुक नसतात. माणसाला व समाजाला सुधारणेचा उपदेश करणे, त्यांच्यावर टीका करणे, सत्ताधारी वर्ग व प्रस्थापित समाज यांना बळकटी आणणे, त्यांना दुबळे करू शकणाऱ्यांवर टीका करणे वा त्यांची बुद्धीच श्रद्धेने बाधित करणे हे व यासारखे हेतू घेऊनच ते लिहिले जातात.

जगातले सर्व धर्म, पूर्वजन्म, पुनर्जन्म, मृत्यूनंतरचे जीवन, स्वर्ग वा नरक यांची कल्पना मांडतात. सगळे भारतीय धर्म (बौद्धांचा अपवाद वगळता) या बाबींचा पुरस्कार करतात. पाश्चात्त्य धर्म, ख्रिश्चन वा इस्लाम कयामतचा दिवस सांगतात. तो दिवस येतो तेव्हा परमेश्वर साऱ्यांना त्यांच्या कबरींमधून बाहेर काढून त्यांना त्यांच्या पुण्यकृत्यासाठी स्वर्गाची वा पापकृत्यासाठी नरकाची वाट दाखवतो. खरेतर ईश्वर व पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म कुणीही पाहिलेला नसतो.

मार्क्सने याची केलेली चिकित्सा जगप्रसिद्ध आहे. तो म्हणाला, ‘या जीवनात ज्यांच्या वाट्याला दारिद्र्य, वेदना वा दुःखभोग येतात… त्यांना त्यांचा हा जन्म पूर्वजन्मीच्या पापांमुळे लाभला आहे. तो त्यांनी शांतपणे जगून काढला तर त्यांना पुढचा जन्म सुखाचा व चांगला मिळतो. उलट ज्यांचा जन्म चांगला व वैभवाचा त्यांचे पूर्वसंचित चांगले असते व त्याचमुळे त्यांच्या वाट्याला सुखी जीवन आलेले असते.’

मार्क्सच्या या चिकित्सेचा खरा अर्थ वंचितांना वंचित ठेवणे व प्रस्थापितांचे वर्चस्व कायम ठेवणे हा यामागील या ग्रंथांचा हेतू आहे. दुर्दैवाने धर्माची ही खोटी शिकवणच साऱ्या जगाच्या मनाचा ताबा घेणारी व तिच्यातून माणसांची सुटका होऊ न देणारी आहे. ती पिढ्यान्‌पिढ्या व शतकानुतके केवळ बिनबुडाच्या श्रद्धेच्या बळावर टिकून आहे.

मार्क्स हा वंचितांचा, कष्टकऱ्यांचा व गरिबांचा प्रतिनिधी आणि प्रवक्ता म्हणून बाजूला सारला तरी त्याचे प्रतिपादन सहजासहजी कुणाला नाकारता येत नाही. त्याच वेळी जगातला कोणताही ईश्वर, धर्म, धर्मग्रंथ वा गुरू श्रमिकांच्या व गरिबांच्या बाजूने बोलत वा लिहीत नाही हेही इथे लक्षात घेतले पाहिजे. जणू काही ईश्वर व धर्म धनवंतांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी व प्रस्थापितांसाठीच निर्माण झाले आहेत.

मार्क्स हा त्यांचा कालचा तर चार्वाक हा पूर्वापार राहिलेला प्रतिनिधी व प्रवक्ता आहे. मार्क्सचे नशीब थोर म्हणून त्याला एका शतकाएवढे अनुयायी मिळाले… शिवाय रशिया व चीन यांसारखे देश त्यांच्या विचारसरणीचा स्वीकार केलेल्या सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात आले. परिणामी एकोणिसाव्या व विसाव्या शतकावर त्याला त्याचा प्रभाव निम्म्या जगावर गाजवता आला. चार्वाकांच्या वाट्याला ते भाग्य आले नाही.

राजसत्ता विरोधात, धर्मसत्ता विरोधात व त्यांच्या पाठीशी असलेले प्रस्थापितही विरोधात… परिणामी एके काळी सन्माननीय असलेला त्यांचा विचार, त्यांचे ग्रंथ, त्यांची परंपरा या साऱ्यांचाच त्यांच्या शत्रूंनी नायनाट केला. त्यांचे ग्रंथ नाहीत, परंपरा नाही, शिकवण नाही आणि फार कशाला त्यांची आठवणही नाही. चार्वाकांचा विचार त्यांच्या टीकाकारांच्या ग्रंथांमधून शिल्लक राहिला. सगळे वैदिक ग्रंथकार आपल्या ग्रंथांची रचना एका विशिष्ट पद्धतीने करतात. तीनुसार ग्रंथाच्या आरंभी त्यांना अमान्य असलेली इतरांची मते ते सांगतात व ती कशी चुकीची आहेत हे लिहून ती मते खोडून काढतात. इतरांची मते खोडली की मग ते आपला विचार विधायक व परिणामकारक ठरेल अशा पद्धतीने लिहितात. गंमत ही की, सगळ्या वैदिक ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथरचनेत चार्वाकांना खोडून काढूनच त्यांचा विचार मांडला आहे.

एका अर्थाने चार्वाक त्यांच्या टीकाकारांनीच जिवंत राखला व आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. त्यातून चार्वाक राहिले. त्यांच्या विचारांचे थोडे का असेना… पण अनुयायी राहिले. त्यांचा ग्रंथ नसला तरी त्यांच्यावर टीका करणारे, त्याचे खंडन करणारे धर्मग्रंथ, पोथ्या अन्‌ पुराणे राहिली. त्या टीकाग्रंथांतून चार्वाकांचा विचार वेगळा करून वाचता येतो व त्याची मांडणीही करता येते. अलीकडे ती अनेकांनी करण्याचा प्रयत्न त्याच मार्गाने केला.

महाभारतात गौरवलेले चार्वाक आद्य शंकराचार्यांच्या काळापर्यंत सामान्य ठरले होते. पुढल्या काळात त्यांची व त्यांच्या विचारांची टिंगल केली गेली. त्यांना अनैतिक, चंगळवादी व अनीतिमान ठरवले गेले. यातील सर्वात मोठा वाटा (माधवाचार्य चौदावे शतक) यांचा आहे. जे विचार वा संशोधन मारता येत नाही ते गाडून व लोकांच्या नजरेपासून दडवून ठेवावे लागते. तसा जो विचार विचाराने पराभूत करता येत नाही तो बदनाम करून लोकांच्या मनातून हटवावा वा तिरस्कृत करावा लागतो.

चार्वाकांचा विचार अनुभवजन्य सत्यावर व सत्याधारित तर्कावर आधारलेला होता. खरेतर चार्वाकांची प्रमाणे (अनुभव व तर्क) ही सारी विज्ञानाची व संशोधनाचीच प्रमाण साधने आहेत. विज्ञान व संशोधन यांत शब्द हे प्रमाण चालत नाही… कारण आजचा शब्द उद्या खोटा वा चुकीचा ठरण्याची भीती असते. श्रद्धा व श्रद्धेवर आधारित धर्म आणि ईश्वर यांचा एकमेव आधार शब्द हाच होता. इकडे वेदांचा शब्द, तिकडे बायबलचा वा कुराणाचा शब्द… त्यामुळे शब्द नाकारणाऱ्या चार्वाकांना नष्ट करणे व तिरस्कृत करणे एवढेच श्रद्धावाद्यांना शक्य होते. मग त्यांनी चार्वाकांना चंगळवादी, सुखलोलुप व अनीतिमान ठरवले.

दक्षिण भारत के संत (13) सन्त माधवाचार्य (द्वैत सम्प्रदाय) - Pravakta.Com | प्रवक्‍ता.कॉममाधवाचार्यांची पातळी व यातली मजल टोकाची आहे.

 यावत्‌जिवेत्‌सुखम्‌जिवेत
नास्ति मृत्यू अगोचरः
भस्मिभुतस्य देहस्य
पुनरागमनम्‌कुत:

 हा मूळचा  नवव्या शतकातील जयंत भट्ट या नैय्यायिकाचा चार्वाकांविषयीचा श्लोक त्यात नको त्या सुधारणा घुसळून माधवाचार्याने,

 यावत्‌जिवेत्‌सुखम्‌जिवेत
ऋणम्‌कृत्वा घृतं पिबेत
भास्मिभुतस्य देहस्य
पुनरागमनम्‌कुत:

असा केला. ऋण काढून तूप प्या व मजा करा असा चंगळवाद त्याने चार्वाकांच्या नावावर टाकला. लोकायताच्या टिंगलटवाळीची व त्यावरील टीकेची ही परंपरा जुनीही आहेच. वैदिक वाङ्‌मयापासून माधव व माधवोत्तर ग्रंथकारांनी ती जिवंत व अधिक धारदार केली आहे.

वैदिक वाङ्‌मय चार्वाकांचा निषेध करते. त्यानंतरचे पाणिनी व इतर ग्रंथकर्तेही कमीअधिक प्रमाणात तो करताना दिसतात. पाणिनीने लोकायताला सामान्य जनांचे, समजुतींवर आधारलेले ज्ञान म्हटले आहे. बौद्धांच्या दिव्यावदानसुत्तात लोकायताचे वर्तन सामान्य जनांचे ज्ञान वा समजुती असेच आले आहे.

गुणरत्न या चौदाव्या शतकात झालेल्या जैन धर्मगुरूने त्याच्या सर्वदर्शनसमुच्चय या ग्रंथातही तसेच मत मांडले आहे. त्याआधी मणिभद्राच्या (आठवे शतक) ग्रंथातील भाष्यात लोकायत हे फारसा वा जराही विचार न करणाऱ्या समुदायाचे मत असेच म्हटले आहे. शंकराचार्यांनीही त्याला प्राकृत जनांचे फारसे ज्ञान अवगत न केलेल्या लोकांचे मत असे म्हटले आहे. माधवाचार्य हा पुढे शंकराचार्यांच्या गादीवर आलेला त्यांचा अनुयायी त्यांच्या जरा पुढे जातो एवढेच.

गौतम बुद्धाने आपल्या शिष्यांना चार्वाकांचे ग्रंथ न वाचण्याचा उपदेश केला होता. पाश्चात्त्य धर्मांना चार्वाक भेटला नाही… पण त्या धर्मांना वैज्ञानिकांनी व संशोधकांनी आव्हाने दिली. ख्रिस्ती व इस्लाम धर्माने त्यांना अत्यंत कठोर शिक्षा केल्या. काहींना त्यांचे संशोधन मागे घ्यायला लावले. काहींच्या कलाकृतींवर बंदी घातली तर स्त्रियांना स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार नाही हे स्पष्टपणे सांगून टाकले. ग्रीक तत्त्वज्ञ म्हणायचे, गुलामांना आत्मा नसतो. स्त्रियांना त्यांचे स्वातंत्र्य नाकारण्यामागे बहुधा हीच दृष्टी होती. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान पौर्वात्य आणि पाश्चात्त्य यांतील एकाही धर्माने दिले नाही.

विचार करा… पण तो वेदानुकूलच असला पाहिजे. वेदविरोधी विचार म्हणजे धर्मद्रोह ही वैदिकांची आग्रही भूमिका विचारस्वातंत्र्याएवढीच संशोधनाच्या व विज्ञानाच्या विकासासाठी मारक ठरली… त्यामुळे भारतात विज्ञानाच्या व संशोधनाच्या परंपरा विकसित झाल्या नाहीत. रामाचे विमान किंवा महाभारतातील शस्त्रांना अण्वस्त्रे ठरवण्याचे अलीकडे झालेले हास्यास्पद प्रकार जगाच्या व्यासपीठावरही कुचेष्टेचे विषय झाले. गणित संपले, वैद्यकशास्त्र संपले, खगोलचे अध्ययन मागे पडले. स्त्रीस्वातंत्र्य कधी नव्हतेच. जे होते तेही नंतरच्या काळात लयाला गेले. राजसत्ता मजबूत झाल्या. पुढे सम्राटांनी त्यांची जागा घेतली. त्यांनी गणराज्ये व त्यातली लहान-लहान लोकशाहीही मोडीत काढली. या साऱ्यांना धर्माचा पाठिंबा होता.

तिकडे ख्रिस्तविरोधी, बायबलविरोधी व ख्रिस्ती धर्माच्या शिकवणीविरुद्ध जाणे हे पाखंड ठरवले गेले. पाखंडाला मृत्युदंड होता. परिणामी, ग्रीक व नंतरची तत्त्वज्ञाने मागे पडली. सॉक्रेटीस, ॲरिस्टॉटल मागे पडले आणि धर्मगुरूच साऱ्या जीवनाचे मालक व नियंत्रक झाले. संशोधन व विज्ञान यांचीही परवड झाली. गॅलिलिओला त्याचा पृथवी गोल असण्याचा व ती सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असल्याचा शोध मागे घ्यावा लागला.

हेही नक्की वाचा -आद्य धर्म आणि धर्मव्यवस्था…https://bit.ly/3bgwh1y

इस्लामच्या बंद्यांनी अरबांचे तत्त्वज्ञान मारले. अल्‌किंदी, अल्‌फराविया आणि त्यांच्यासारखे विचारवंत मागे पडले. अलेक्झाँड्रियाचे प्रचंड ग्रंथालय त्याचमुळे जाळले गेले. प्रथम ते रोमनांनी जाळले व पुढे ते इस्लामने राख केले… सारे ज्ञान कुराणातच आले असल्याने जगातील ग्रंथालये जाळून टाका अशी हाळी इस्लामच्या बंद्यांनी दिली.

धर्म हे केवळ सत्ताधीशांच्याच बाजूने असतात असे नाही. ते लोकविरोधीही असतात. त्यांनी लोकसत्तेहून राजसत्तेलाच व त्यातही राजालाच महत्त्व दिले आहे. पूर्वीच्या सम्राटांनी गणराज्ये बुडवली तेव्हा धर्मसत्ता गणराज्यांच्या बाजूने उभी राहिली नाही. ती सम्राटांच्या बाजूने गेली. महाभारतात कौरवांची पापकर्मे साऱ्यांना दिसतात… पण त्यांच्या दरबारातले व बाहेरचेही तत्त्वज्ञ त्यांचीच बाजू घेतात. श्रीकृष्ण हा पुण्यपुरुष आहे व तो पांडवांच्या बाजूने आहे हे दिसत असतानाही भीष्म, द्रोणादी धर्मपुरुष कौरवांच्याच बाजूने लढले.

धर्म ज्ञानाला विरोध करतात. विचार व तर्क यांची वासलात लावतात. संशोधन व विज्ञान त्यांना मान्य नसते आणि सत्तेसारखेच त्यांनाही सत्य चालत नाही. त्यांचा सारा भर श्रद्धेवर व भक्तीवर असतो. अशा इतिहासात व युगात स्वतंत्र विचार करणारे व त्यासाठी प्रसंगी प्राणार्पण करणारे लोकायतिक कितीसे टिकणार? तरीही ते राहिले आणि आग्रहाने धर्मांना व धर्मश्रद्धांना अवघड ठरतील असे प्रश्न विचारत राहिले… त्यामुळे धर्मही त्यांच्याविरुद्ध साऱ्या ताकदीनिशी व सत्तांच्या मदतीनिशी उभे राहिले. आपल्याच आप्तांचे रक्त सांडून सत्ता मिळवली ती पापावर उभी आहे. असे म्हणत कुरूक्षेत्रावरून परतणाऱ्या पांडवांना शाप देणारे चार्वाकही असेच जाळले गेले.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)
98224 71646

Previous articleआद्य धर्म आणि धर्मव्यवस्था…
Next articleहवीतच कशाला वैधानिक विकास मंडळे ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here