सांख्य आणि चार्वाक

(साभार: ‘कर्तव्य साधना’- चार्वाक लेखमाला  भाग – ९)

– सुरेश द्वादशीवार

चार्वाकांचा देहवाद, त्यांतील देहमाहात्म्य, देह व इंद्रियगोचर जगत याखेरीजचे सारे अमान्य करण्याची त्यांची तयारी व त्यांना जोडून येणारा स्त्री-पुरूष समागमाचा व त्यातून वंशविस्ताराचा भाग यांनी त्यांना नास्तिक, देहात्मवादी व जडवादी ठरवले. तंत्राने मंत्रतंत्र स्वीकारले… मात्र त्यांनीही ईश्वर नाकारून मंत्रफलाची निष्पत्ती सांगितली. देहपूजा, स्त्रीपूजा, स्त्री व भूमी यांची सर्जनता यांचे माहात्म्य सांगितले.

हीच भूमिका सांख्यांची असून त्यांतील मूळ सांख्यांनी ईश्वर नाकारला. पुरुष नाकर्ता मानला व प्रकृतीच साऱ्या सृष्टीची रचना व चालना करते असे म्हणून प्रकृती माहात्म्य आळवले… त्यामुळे चार्वाक, तंत्र व सांख्य यांचा विचार नास्तिकांनी वा जडवाद्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला.

सांख्य हे भारतीय षड्‌दर्शनांपैकी एक दर्शन आहे. ते अथर्ववेदाच्या काळातच प्रादुर्भूत झाले असे काहींचे मत आहे. काहींच्या मते ते इसवी सन पूर्व 800 वर्षे अस्तित्वात आले… तर काहींनी या दर्शनाला उपनिषदांच्या काळानंतर अढळपद मिळाल्याचे म्हटले आहे. कठ, श्वेताश्वतर, प्रश्न व मैत्रायनी या प्राचीन उपनिषदांवर सांख्य विचारांचा प्रभाव आहे.

सांख्य व वेदान्त या विचारांचा समन्वय करून प्राचीनांनी दार्शनिक विचारांची उभारणी केली असेही काहींचे म्हणणे आहे. महाभारत, गीता, पुराणे व मनूच्या संहितेवरही त्याचा प्रभाव आहे. बुद्धांच्या व जैनांच्या उत्तरकालीन विकासावरही तो आहे.

स.रा. गाडगिळांच्या मते सांख्य दर्शन हा ‘भौतिक दृष्टीकोनातून’ विश्व विकासाची मीमांसा करण्याचा पहिलाच भव्य प्रयत्न आहे. प्राचीन इहलोकवादाला शास्त्रीय चिंतनाची जोड देऊन सांख्यांनी एक सुसंगत असे हे जीवनदर्शन निर्माण केले. स्त्रीला निर्मितिकेंद्र मानून तांत्रिकांनी आपली विश्वविषयक उपपत्ती मांडली होती. त्यांतूनच सांख्यांचा पुरुष-प्रकृती विचार उद्‌भवला… पण सांख्य म्हणजे तंत्र व त्यांचा वामाचार नव्हे. त्याला तत्त्वचिंतनाची पातळी आहे. शंकराचार्यांनी त्यांचा सांख्य तंत्र असा उल्लेख केला. स्वतः सांख्यकारिकर्त्यांनीही त्याला तंत्र म्हटले. कदाचित सांख्य व तंत्र यांचा अर्थ तेव्हा एकच केला जात असावा… मात्र सांख्यांनीही तांत्रिकांचा पुरुष-प्रकृती विचार घेऊन त्यातून आपला अचेतन प्रधान कारणवादाचा सिद्धान्त मांडला. तो पुढे शुद्ध स्वरूपात टिकला नाही… पण त्याचे मूळ वैदिकांच्या न्याय वैशिषिक, सांख्ययोग व पूर्व आणि उत्तर मीमांसा या तत्त्वविचारातच आहे.

हा वैदिकांकडे वळणारा विचार सांख्यांच्या मूळ व खऱ्या स्वरूपाला लागू होणारा मात्र नाही. मुळात सांख्य जडवादी व वेदविरोधी होते. कपील मुनी हे सांख्यांचे आद्य प्रवर्तक. हा विचार वस्तुमानांची संख्या महत्त्वाची मानतो व त्यांचे वेगळेपण समजून घेणे ही गुणवत्ता महत्त्वाची मानतो. पाच महाभूते, पाच कर्मेद्रिंये, पाच ज्ञानेंद्रिये, मन, ही 16 विकृत तत्त्वे, महद्‌तत्त्व, अहंकार, शब्दतन्मात्र, रूप, रस व गंध ही आणखी तीन तन्मात्रे, प्रकृती-विकृती या सदरात मोडतात. पुरुष या तत्त्वाचा समावेश यांतल्या कुणातही होत नसून तो स्वतंत्र आहे. त्याचे साऱ्यांपासून (प्रकृतीसह) वेगळपणे ओळखणे हेच सांख्यात ज्ञान मानले जाते. वैदिकांत तोच मोक्ष ठरतो.

कपिलाच्या शिष्यांच्या मालिकेत आसुरी, पंचशीख, ईश्वरकृष्ण, रुद्रिय (विधावास) व विज्ञानचक्षू यांचा समावेश होतो. सांख्य पुरुष व प्रकृती या दोन वेगळ्या गोष्टी मानत असल्याने ते द्वैतवादी ठरतात. सांख्यांच्या मते सारी तन्मात्रे व इतर सर्व तत्त्वांना सत्त्व, रज व तम या तीन गुणांनी युक्त असलेली प्रकृती आपल्या लहरीनुसार खेळवते. त्याच वेळी ती पुरुषाला वश करण्यासाठी त्याला स्वतःकडे आकर्षितही करते. प्रकृती व पुरुष यांच्या मीलनातूनच विश्वाची निर्मिती होते.

सांख्यांचे तत्त्वज्ञान वैदिक विचारांच्या नंतर द्वैताचा विचार घेऊन येते. त्यात ईश्वराचा मुळात समावेश नाही… परंतु उत्तर सांख्यांपैकी काही त्याच्या इतर तत्त्वांसोबत, पुरुषानंतर ईश्वराची जोड देतात. त्यांना सेश्वर सांख्य म्हणतात… मात्र ते सांख्यांचे मूळ रूप नव्हे.

सारांश… सारे विश्व 25 (किंवा 24) तत्त्वांचे मिळून तयार होत असले तरी त्यांतली प्रमुख व मध्यवर्ती तत्त्वे दोनच… प्रकृती आणि पुरुष. यांतील स्त्री कर्ती आणि पुरुष नाकर्ता. प्रकृती साऱ्या निर्माणाची जननी आहे. तीच सारे विश्व जन्माला घालते, जोपासते आणि वाढवते. त्याच वेळी ती नाकर्त्या पुरुषाला रिझवते. त्यांचा समागमच मग या निर्मितीला कारण होतो.

यात ईश्वराचा सहभाग नाही. सांख्यविचार पूर्वजन्म, पुनर्जन्म व मृत्यूनंतरचे जग अमान्य करतो. इंद्रियगोचर जगतच तेवढे तो खरे मानतो. प्रत्यक्षात स्त्री-पुरुषांचे संबंध जसे जवळचे व वंशवृद्धीला कारण ठरणारे तसेच प्रकृती व पुरुष या मूलतत्त्वांचेही आहे असे सांख्यांचे म्हणणे आहे. जोवर वेदान्त्यांनी त्या विचाराचा ताबा घेऊन त्याला आपल्या षड्‌दर्शनांपैकी एक केले नाही तोवर सांख्यविचार त्याच्या मूळ रूपात असाच होता व आहे.

भारतासह जगाच्या अनेक भागांत मातृसत्ताक जीवनपद्धती जगणाऱ्या जमाती पूर्वी होत्या. त्यांतल्या काही आजही शिल्लक आहेत. खासीसारख्या आसाम परिसरातील जमातीत ही पद्धत अजूनही आहे. तीत घर व घराची सारी मालमत्ता स्त्रीच्या (आईच्या) नावावर असते. तीच साऱ्या घराची मुख्य कारभारी व निर्णय घेणारी असते. बाकीच्यांनी तिच्या आज्ञेत व शब्दात राहायचे असते.

राहुल सांकृत्यायन यांनी ‘व्होल्गा ते गंगा’ ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. तिची सुरुवातच त्यांनी आई या मातृसत्ताक जीवनपद्धतीच्या वर्णनापासून केली आहे. कालांतराने यांतील काही जमाती पितृसत्ताक झाल्या… मात्र काहींनी ही पद्धत अजूनही जपली आहे.

1980च्या मार्च महिन्यात प्रस्तुत लेखकाने मेघालयचे तेव्हाचे विरोधी पक्षनेते मार्टिन नारायण माजाव यांची त्यांच्या बंगल्यावर मुलाखत घेतली. ती संपल्यानंतर ते म्हणाले,  ‘हे घर माझे नाही. माझ्या पत्नीचे आहे. इथे सारे काही तिचेच आहे व त्यावरील मालकीही तिचीच आहे. मी इथे नेहमी राहत नाही. मी माझ्या बहिणीकडे राहतो. अधूनमधून वा गरजेच्या वेळी मी इथे येतो.’

मातृसत्ताक पद्धती त्यांच्या जमातीत तेव्हाही शिल्लक होती याचाच तो पुरावा होता. या पद्धतीत आईच्या मृत्यूनंतर तिची सारी मालमत्ता तिच्या सर्वात धाकट्या मुलीकडे जाते. या पद्धतीत पती हा अधूनमधून येणारा व्हिजिटर असतो. त्याचे कुटुंबातील काम वा त्याचा आईशी असणारा शरीरसंबंध कोणी लक्षात घेत नाही व त्यांच्या तो लक्षातही येत नाही. परिणामी आई सारे काही करणारी तर पुरुष नाकर्ता व अधूनमधून दिसणारा होतो.

देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी ‘सर्वकर्ती प्रकृती आणि नाकर्ता पुरुष’ ही सांख्यांची संकल्पना या स्थितीवर बेतली असल्याचे म्हटले आहे. मातृसत्ताक कुटुंब पद्धतीतील स्त्री-पुरुष संबंधांचे सांख्यांनी उदात्तीकरण करून त्यांना प्रकृती व पुरूष केले असे त्यांचे प्रतिपादन आहे व ते वास्तवाच्या जवळ जाणारे आहे.

1950च्या सुरुवातीला प्रकाशित झालेल्या देवीप्रसादांच्या या प्रतिपादनाचा प्रतिवाद कोणी केला नाही. तो करता येऊ नये एवढा तो निर्विवाद वाटावा असाही आहे. कल्पनेतला नाकर्ता पुरुष इथे सरळ दिसतो व कल्पनेतली सर्वकर्ती स्त्रीही याच विचारांत दिसते.

या विचाराचा प्रतिवाद न करण्याचे वेदान्त्यांचे व श्रद्धावाद्यांचे महत्त्वाचे कारण हे की, ते अशा कोणत्याही वादाला व प्रतिवादाला उत्तर न देता त्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्या टीकाकारांकडे दुर्लक्ष करून त्यांना अलक्षित ठेवणे हा त्यांचा श्रद्धावाद  टिकवण्याचाच मार्ग आहे.

मातृसत्ताक कुटुंब पद्धतीविषयीचाही एक नवा दृष्टीकोन इथे नोंदवला पाहिजे. मातृसत्ता ही प्रत्यक्षात मातुलसत्ता असते असे हा दृष्टीकोन सांगतो. आईच्या नावावर मालमत्ता व कारभार असला तरी ते सारे वापरण्यावर तिच्या भावाचे वर्चस्व असते. आई आपल्या भावाच्या मर्जीनुसार व सांगण्यानुसार कुटुंब चालवते असे हे मत आहे… मात्र त्यामुळे देवीप्रसादांनी सांख्यांच्या पुरुष प्रकृतीचा लावलेला अर्थ बदलत नाही.

देवीप्रसादांचे प्रतिपादन सांख्य विचार जमिनीवर आणते व त्याला मानवी करते आणि जे मानवी असते तेच वास्तव असते. काल्पनिकाला केवळ श्रद्धेचा आधार असतो. त्यातून सांख्यांचे तत्ववेत्ते नेहमी (किमान आरंभ काळात) स्वतःला वेदविरोधी मानत होते. प्रत्यक्ष शंकराचार्यांनी त्यांच्या ब्रह्मसूत्रभाष्यात सांख्यांचा प्रतिवाद करताना त्यांना वेदविरोधी प्रधान मल्ल म्हटले आहे. सांख्यांचे माहात्म्य स्पष्ट करणारी व त्यांच्या विचारांनी घालवलेल्या श्रद्धावाद्यांची परंपरा सांगणारी ही बाब आहे. चार्वाकांचा जडवाद, तांत्रिकांचा देहवाद आणि सांख्यांचा आताचा पुरुष-प्रकृती विचार ही एक सलग व प्रदीर्घ परंपरा असल्याचे सांगणारी बाब आहे.

वेदांवरील भाष्यकारांनी सांख्यांवर लिहिताना त्यांचा पुरुष उदासीन, नाकर्ता व अस्वच्छ असल्याचे सांगताना त्याला ब्रह्माच्या जवळ नेले. हे भाष्यकार अर्थातच उत्तरकालीन आहेत. मुळात कपिल व आरंभीच्या सांख्यकर्त्यांनी मूळ प्रकृतीलाच प्रधान मानले व तीच या विश्वाच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात होती व तिनेच विश्वाची उत्पत्ती केली हे विश्व ही तिचीच निर्मिती असल्याचा निर्वाळा दिला. उदासीन पुरुषाला ती रिझवते व त्याच्या समागमातून विश्व जन्माला येते हे उत्तरकालीन सांख्य आहे.

देवीप्रसाद म्हणतात, ‘मातृसत्ताक पद्धतीत पुरुषाची कृती कुणाला कळत नाही, त्याचे अस्तित्व कोणी लक्षात घेत नाही व हेच सांख्यविचारांचे खरे व मूळ रूप आहे. नंतरचे त्याला जोडलेले विचार वा विकार हे वेदान्त्यांचे काम आहे.

वेद, वेदान्त, स्मृती व पुराणेच नव्हे… तर महाभारत व रामायण लिहिणाऱ्यांनीही केवळ लोकभयास्तव वा लोकप्रेमाखातर गणेश पुराणासारख्या अनेक भाकडकथा लिहिलेल्या आहेत. आजवरच्या श्रद्धावादी पिढ्यांनी त्या पचवल्या व डोक्यावर घेतल्या. नव्या साक्षरांच्या पिढ्या त्या खऱ्या मानणार नाहीत.

रामायणातील राम-लक्ष्मणादी चार भावांचे जन्म यज्ञातून प्रविष्ट झालेल्या कोणा देवपुरुषाने दिलेली खीर दशरथाच्या राण्यांनी खाल्ली व त्या गर्भवती राहिल्या अशी कथा आहे. ही कथा आजचा विज्ञानाचा विद्यार्थी खरी मानेल काय? सीता भूमिकन्या कशी असेल? वायुपुत्र हनुमंताचा घाम प्राशन करून एक मगर गर्भवती कशी राहील? कौरवपांडवांचे जन्म, द्रोण व कृप यांचे जन्मही असेच गुढांनी झाकले आहेत की नाही? द्रौपदी व तिचा भाऊ धृष्टद्युम्न यांच्या जन्माच्या खऱ्या कथा कोणत्या? तिकडे येशू हा कुमारी मातेचा पुत्र कसा असेल?

एखाद्याच्या प्रसादाने वा कुणा एकाच्या आशीर्वादाने मुले होतात, पिके वाढतात, शत्रूवर विजय मिळवता येतो या सगळ्या श्रद्धा आहेत. वास्तवाच्या स्वरूपावर पांघरूण घालण्यासाठी त्या निर्माण झाल्या आहेत. त्या श्रद्धांचे तसे स्वरूप समजून घेण्यात धर्मद्रोह नाही, विज्ञाननिष्ठा आहे.

समाजाच्या रानटी अवस्थेत निसर्गाच्या भयातून ईश्वर निर्माण झाले. विजेचे चमकणे, पाऊस येणे, सूर्याचे उगवणे, ग्रहण लागणे, दुष्काळ इत्यादीच्या भीतीतून त्यांच्याशी संबंध असणारे देव जन्माला आले. साप, मगर, माकड ही जमातींची कुलचिन्हे काही जागी झाली. भीती, चमत्कार व श्रद्धा यांनी या ईश्वरांच्या कथांना श्रद्धेचे स्वरूप आणले.

शिवलिंगाची किंवा शाळुंखेची पूजा ही निर्मितीची पूजा होती. भूमिपूजनही त्यातलेच होते. स्त्रीची पूजा वा मातृपूजनाची बाबही त्यातलीच. लिंगपूजा ही जगात सर्वत्र होते… ती केवळ भारतातच होते असे नाही… त्यामुळे या पूजेची चिन्हे सर्वत्र आढळतात. त्यांचे सत्यस्वरूप समजून घेणे हे ज्ञानाचा मागोवा घेणे आहे. हाच चार्वाकांचा विज्ञानमार्ग आहे. त्याचा तंत्राशी वा जादूटोण्याशी संबंध नाही. तसा तो या भाकडकथांनी निर्माण केलेल्या श्रद्धांशीही नाही.

दैवते कशी जन्माला येतात आणि ती समाजाच्या श्रद्धेचा विषय कशी होतात याचा अभ्यास करणारे शास्त्र (डेईझम) भारतात फारसे विकसित झाले नाही. त्याचा आधार घेतला तर आणखी अनेक श्रद्धास्थाने त्यांच्या खऱ्या स्वरूपात आपल्यासमोर उघड झाली असती. तशीही आता ती उघड होत आहेत.

याच ठिकाणी शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर केलेल्या भाष्यातील एक वचन उद्धृत करण्याजोगे आहे. वेद आणि सांख्य यांत मूलतः फरक नसल्याचे सांगताना ते म्हणतात, ‘सांख्यांचा पुरुष निर्गुण, निराकार (वेदांतातील ब्रह्मासारखा) आहे.’

मात्र शंकराचार्यांचे हे वचन मान्य करता येत नाही… कारण सांख्यांनी पुरुषांची अनेकता सांगितली आहे. …शिवाय पुरुष निर्गुण, निराकार वा गुणरहित असला तरी तो प्रकृतीच्या परिणामांनी मोहवश होणारा आहे. वेदांचे ब्रह्म मात्र सदैव निर्गुण, निराकार राहणारे आहे.

शंकराचार्यांचा प्रयत्न वैदिकांच्या सर्व शास्त्रांना एकत्र आणण्याचा होता… त्यामुळे उत्तर सांख्यातील वेदान्ताला अनुकूल असणाऱ्या काही आचार्यांकडून त्यांनी ही भूमिका घेतली असणे शक्य आहे. सांख्यांच्या पुरुषांची अनेकता महाभारतानेही प्रतिपादन केली आहे. वेदान्ताची अडचण ही की, पुरुष-प्रकृती हे द्वैत त्यांना स्वीकारता येत नव्हते… त्याच वेळी पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये, पाच कर्मद्रिंये, मन, बुद्धी व अहंकार या मिथ्या बाबीही त्यांना स्वीकारणे ब्रह्मसत्य या भूमिकेमुळे जमणारे नव्हते… मात्र सांख्यांच्या विचारांचे महत्त्व व त्याची वैचारिक क्षेत्रातील लोकप्रियता मध्यांतरी एवढी वाढली की, त्याकडे दुर्लक्ष करणेही त्यांना जमणारे नव्हते. मग त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली व सांख्य हा वेदविचार वा त्याचे एक अंग मानायला सुरुवात केली.

एक गोष्ट आरंभापासून स्पष्ट आहे… जे अनुभवसिद्ध आहे ते सत्य ही बाब एकदा स्वीकारली की श्रद्धेची सगळी पटले दूर होतात. डोळ्यांनी दाखवले ते मनाने बुद्धीसमोर ठेवले व बुद्धीच्या आकलनानंतर ज्ञान झाले.  अशा गोष्टी सांख्यांचा अपलाप करणाऱ्यांनी मांडल्या आहेत. त्यांतून या साऱ्यांचे वेगळेपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात असे कोणी अनुभवत नाही.

डोळे, मन, बुद्धी व जाण या गोष्टी एकाच वेळी अनुभवाच्या आधारे काम करतात. ज्ञान डोळ्यांपाशी थांबले वा मनापाशी अडकले असे होत नाही. या सगळ्या गोष्टी एकसमयावच्छेदेकरून होतात. मनाहून बुद्धी वेगळी, डोळ्यांहून जाण निराळी हे आकलन अभ्यासासाठी ठीक… पण ते वास्तव नाही.

वास्तवात सारे एकात्म आहे. ते सांख्यांच्या मते प्रधानाच्या वा प्रकृतीच्या नियंत्रणात आहे. पुरुष वेगळे असले तरी नाकर्ते असल्याने ते त्या प्रक्रियेचा भाग नाहीत. ही सारी मांडणी ज्ञानानुभवाचे वेगळेपण व त्यातले नसलेले अंतर दाखवणारे प्रकार आहेत. सांख्यांना आपल्यात ओढण्याचा आणि तसे करताना जे अजिबात आपले होत नाहीत त्यांना दूर ठेवण्याचा हा धर्मातला राजकीय प्रकार आहे.

सांख्यांबाबत कितीही गौरवाने लिहिले वा वेदान्त्यांनी त्यांचा केलेला उपयोग कसाही दाखवला तरी एक गोष्ट स्पष्ट होणारी नाही. अनुभवातून ज्ञान हे सूत्र लक्षात घेतले व ज्ञानविज्ञानाचे चलन विचारात घेतले तर पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेद्रिंये, मन, बुद्धी, अहंकार व प्रकृती (व पुरुष) यांच्यामुळे पंचमहाभूतांच्या संघातातून विश्वाची उत्पत्ती झाली हे सिद्ध होत नाही. प्रकृती जीव व जगत जन्माला घालते यातले हे वास्तव सत्य ठरले तरी ते जगताच्या निर्मितीला लागू होत नाही. उलट जगाच्या विकासासोबत प्राणिसृष्टी व प्राणिसृष्टीच्या विकासासोबत कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी व प्रकृती-पुरुष या बाबी मानवी विचाराचा भाग झाल्या हे स्पष्ट व सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.

सांख्यांनी हे सत्य उलट फिरवून ते डोक्यावर उभे करण्याचा प्रयत्न केला. ते कल्पनेला व मनाला चालना देईल, त्याची करमणुकही करील… पण हे सत्यकथन असणार नाही. आधुनिक ज्ञानविज्ञानाचे नियम प्राचीन विज्ञान परंपरेला लावण्याचा हा प्रयत्न नाही. उलट प्राचीन विचार, परंपरा व त्यांचे नियम त्रिकालाबाधित असल्याचे जे सांगितले जाते ते खरे नाही हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

वेदान्ताला सर्वात मोठा शह सांख्यांनी दिला हे मात्र खरे. पंचमहाभूतांपासून प्रकृती, पुरुषापर्यंतची त्यांची मांडणी एका बाजूला पंचमहाभूतांमुळे जगताला, ज्ञानेंद्रियांमुळे जिवाला व प्रकृती-पुरुषामुळे या साऱ्यांच्या उत्पत्तीला चालना देऊ शकेल अशी आहे… त्याचमुळे वेदान्त्यांनी त्यांचा अर्धवट का होईना… अंतर्भाव आपल्या विचारात केला. तांत्रिकांनी त्यांना स्वतःशी जोडून घेतले.

फारसे साहित्य व ग्रंथ उपलब्ध नसताना कपिल मुनींपासूनच्या परंपरेने सांख्य विचारांची जी मांडणी केली ती सर्वस्वी नाकारणे कोणत्याही श्रद्धावादी परंपरेला जमले नाही. त्यांचा संबंध ज्यांच्याशी जुळत नाही वा जुळल्याचे सांगितले तरी पटत नाही तो विचार चार्वाकांचा आहे. चार्वाकांना प्रकृती-पुरुष या संकल्पनांचे विलंब  व त्यातून विश्वाची उत्पत्ती हा प्रकारच मान्य होणार नाही. तो कल्पनेने मनात आणला तरी विचार व तर्क यांच्या कसोटीवर उतरणारा नाही.

पुरुषाचे नाकर्तेपण व प्रकृतीचे सर्वशक्तिमान रूप हा चार्वाकांना मातृसत्ताक जीवनपद्धतीची तात्त्विक उपपत्ती वाटते. त्या पद्धतीत पुरुषांचा स्त्री-सहवास वा घरातले असणे जाणवत व दिसत नाही. तरीही आईला मुले होतात, ती वाढतात आणि घराचा वंश अखंडपणे चालतो. त्याला केवळ आईचे कष्ट व तिचे असणे हेच कारण दिसते. तिला अधूनमधून भेटणाऱ्या पुरुषाचा त्या साऱ्यातील सहभाग मात्र दिसत नाही.

मन, बुद्धी, अहंकार किंवा ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये या अनुभवाच्या गोष्टी आहेत. त्यांवर प्रत्यक्षाची कसोटी चालते. पुढचे प्रकार त्या कसोटीवर उतरत नाहीत. या कसोट्या आजच्या विज्ञानाच्या नाहीत. पूर्वापार चालत आलेल्या तर्कांच्या व विचारांच्याच आहेत. त्यांतून काही सांख्य ईश्वर मानतात… तर काही त्यांचा पुरुष ब्रह्मरूप मानतात. वेदान्त्यांनी हीच बाजू उचलली आहे… पण अनुभव व प्रत्यक्षाधारित अनुमान या प्रमाणांवर यांतील कोणतीही बाब टिकणारी नाही… त्यामुळे चार्वाक हे वेदान्ताएवढेच सांख्यांपासूनही दूर आहेत.

काही साम्यस्थळे शोधून त्यांच्यातील जवळीक दाखवण्याचा प्रयत्न निश्चित झाला. तो आजचे काही विचारवंतही करतात… पण चार्वाकांची मूळ जडवादी भूमिका लक्षात घेतली की या प्रयत्नांचे निष्फळपणच अधिक स्पष्ट होते.

वेदान्त विचारांचे माहात्म्य पसरवण्यासाठी वा त्याला मध्यवर्ती ठरवण्यासाठीच प्रत्यक्ष जीवनापासून दूर असलेली प्रमेये ही माणसे संशोधनाच्या नावावर आणतात. सांख्यांच्या कारिकांनी जे म्हटले नाही ते त्यांच्या श्लोकांच्या अर्थात बसवण्याचा प्रयत्न ही माणसे करतात. हा सारा प्रयत्न आजही ज्ञान, विज्ञान व तर्क यांच्याजवळचे आहेत हे सांगण्याचा आहे. फक्त तो दुबळा आहे एवढेच.

याच ठिकाणी एका महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार करणेही आवश्यक आहे. देवीप्रसादांसारख्या विद्वानाला व नंतर चार्वाकांवर पुस्तके लिहिणाऱ्या इतरांना त्यांच्या विचारांची सांगड तंत्राशी वा त्याच्याशी जुळलेल्या विधींशी करावीशी का वाटली असेल? देवीप्रसाद जडवादी व मार्क्सवादी आहेत. नंतरचे लेखकही त्याच मार्गाने जाणारे आहेत. मार्क्सचा जडवाद मंत्रतंत्र वा विधी मानत नाही. भारतातील जडवादाला त्यांच्याजवळ नेण्याचे भारतीय विचारवंतांचे एक कारण त्यांनी माणूस हा इतर प्राण्यांप्रमाणेच केवळ खाद्यपदार्थ, त्यांचे उत्पादन व उपजीविका यांच्याशी जुळला आहे असे मानले.

माणूस व वन्यप्राणी एकाच तऱ्हेचे जीवन त्यांच्या रानटी व पशुपालनाच्या अवस्थेत जगत ही यामागची भावना आहे… शिवाय उपजीविकेचा प्रश्न जडवादाशी व जडाशी जुळलेला आहे… त्यामुळे शेतीची व उत्पादनाची स्त्रीसारखी साधने ही केवळ तंत्रमंत्राच्या साहाय्यानेच अधिक उपयुक्त व अधिक उत्पादन देणारी ठरतात असे त्यांनी मानले आहे. त्यातून तंत्राचा व सांख्यांचा संबंध जुळवून पुढे तो त्यांनी थेट चार्वाकांपर्यंत नेला.

…पण चार्वाक हे केवळ जडवादी नाहीत. ते विज्ञानवादी आहेत… शिवाय त्यांच्या विचारातला माणूस हा केवळ उपजीविकेच्या मागे लागलेला प्राणी नाही. तो नाती मानणारा, आप्तसंबंध ओळखणारा, विचारी व भावनाप्रधान असा ज्ञानी प्राणी आहे. तसाच तो त्याच्या रानटी व पशुसत्ताक अवस्थेतही होता. या भावना असणारा व विज्ञानवादी असणारा चार्वाक केवळ उपजीविकेसाठी या तंत्राधारित जडवादाचा अवलंब करणार नाही. माणसाचे माणूसपण नाकारण्याच्या व त्याला जडवादाचा एक जड भाग मानण्याच्या मानसिकतेतून हा प्रकार वा प्रमाद घडला आहे.

माणूस उपजीविका शोधत होताच… पण त्याच वेळी समूहात वा कळपातही राहत होता. त्याला इतरांशी संबंध राखावे लागत… पण चार्वाक यापलीकडे जाऊन विज्ञानाची कास सोडणारे नव्हते. मानवतावाद व विज्ञानवादी यांची सांगड घालणारे होते हे लक्षात घेतल्याखेरीज त्यांचा विचार मुळातून नीटपणे समजून घेता येत नाही.

(चार्वाक लेखमालेतील अगोदरचे भाग ‘मीडिया वॉच’ वर उपलब्ध आहेत . ही लेखमाला पुस्तकस्वरुपात येत्या २० तारखेला साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. )

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)
98224 71646

Previous articleतंत्र आणि चार्वाक
Next articleकुतूहल निर्माण करणारा कुंभमेळा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here