रामायणात राम सीतेला अग्निदिव्य करायला लावतो व त्यानंतरही तिचा त्याग करून तिला अरण्यात सोडून देतो. द्रौपदीची विटंबना होते. नंतर झालेल्या एकाही ग्रंथाचा कर्तेपणा स्त्रीकडे नाही. सगळे आचार्य पुरुष होते. शंकराचार्यांच्या गादीवर गेल्या बाराशे वर्षांत एकही स्त्री आली नाही. तिकडे पोपचे पद पुरुषांसाठी राखीव आहे. मुल्ला आणि मौलवी हेही सारे पुरुषच असतात. आपले सगळे आचार्य व बुवाबाबा बहुधा पुरुष आहेत.
प्रत्यक्षात बायबल जिला वेश्या म्हणते ती मेरी मॅगडेलिनी ही येशूची पत्नी होती. आपल्या पश्चात धर्माची सूत्रे तिच्या हाती द्यावीत असे येशूला वाटत होते… पण आपल्या धर्मसत्तेवर एका स्त्रीचा अधिकार मान्य करायला त्याची शिष्यपरंपराच तयार नव्हती. त्यांच्यातल्या सेंट पॉलने मग मेरीला वेश्या ठरवून तिची तशी कथा बायबलात टाकली. आजचे बायबल येशूच्या पश्चात चारशे वर्षांनी संपादित झाले. त्या वेळी धर्मगुरूंसमोर येशूची 84 चरित्रे (गॉस्पेल्स) होती. त्यातले एक चरित्र प्रत्यक्ष मेरीने लिहिलेले होते… पण धर्मगुरूंनी त्या चरित्रासकट बाकीची सारी चरित्रे जाळून नाहीशी केली. चार धर्मगुरूंनी लिहिलेले आत्ताचे छोटेसे बायबल आपल्या हाती आहे.
वैदिक धर्मात स्त्रियांना गुलाम करण्यासाठी मनुस्मृतीला दोष दिला जातो व तो योग्यही आहे… मात्र त्याच वेळी वैदिकच नव्हे तर जगातील कोणताही धर्मग्रंथ, धर्मगुरू वा धर्मपरंपरा स्त्रीला स्वातंत्र्य व पुरुषांच्या बरोबरीचे स्थान देत नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. प्रत्यक्ष गौतम बुद्धानेच आपल्या भिक्षू संघात स्त्रियांना प्रवेश न देण्याची भूमिका घेतली होती. आनंद या त्याच्या शिष्याने त्याचे मन वळवले व स्त्रिया भिक्षू संघात आल्या… मात्र त्याच वेळी आपल्या धर्माच्या अवनतीला आत्ताच सुरुवात झाली असे बुद्धाने म्हटले आहे. चीन, जपान, तिबेट, भूतान, ब्रह्मदेश व श्रीलंका इथे आजही हा धर्म मोठ्या वर्गाने स्वीकारलेला आहे… पण त्याने स्त्रीला मुक्ती दिली असे तिथेही दिसत नाही.