नेटफ्लिक्सवर ‘पगलैट’ हा सिनेमा रिलीज झाला आणि माझ्या अत्यंत आवडता पण काहीसा विस्मृतीत गेलेला हा शब्द पुन्हा एकदा जिवंत झाला. हा शब्द मी जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला होता तेव्हाच इतकं भारी गारगार वाटलं होतं नं.. हे असं वाटण्याचं कारण म्हणजे हा शब्द मला उद्देशून म्हटला गेला होता. मी जेव्हा एम.टेकला होते तेव्हा एक खास बिहारन पोरगी होती आमच्यासोबत. ती मला म्हणायची “छोरी पगलैट है रे तू”.. यात ‘लै’ या अक्षरावर असला जबरी जोर द्यायची की काय सांगू.. आता मला आजवर असंख्य विशेषणं लाभली आहेत पण माझ्या आवडत्या विशेषणांपैकी एक हे पगलैट झालं, ते तेव्हापासून.. योगायोग हा की ‘पगलैट’ या चित्रपटात काम केलं आहे सान्या मल्होत्रा या नायिकेने. जी मला जाम आवडते. सो थोडक्यात सांगायचं तर हा पिक्चर आवडला आहे.
पण प्रॉब्लेम हा आहे माझा, की जे मला आवडतं ते मला थोडक्यात तर सांगताच येत नाही.. घाबरू नका पिक्चरची ष्टोरी मी कधी सांगत नसतेच; कारण ती आपण आपली उलगडण्यात मजा असते. पण या पिक्चरने जो फील दिला नं… तो म्हणजे कैच्या कै होता राव.. सो हा पिक्चर एकदम ढासू, ढिंच्याक वगैरे कॅटेगरीमधला आहे. आज आपण काय कसे जगतो आहोत.. सोशल मीडिया ते आपलं सोशल लाईफ कसं वरकरणी दिखाव्यामध्ये गटांगळ्या खातं आहे याचं लाईव्ह पोट्रेट हा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर आणून ठेवतो. लखनौमध्ये आपला नवरा, सासू सासरे आणि आजे सासू यांच्या सोबत राहत असणारी संध्या (सान्या मल्होत्रा) लग्न होऊन पाच महिनेच झालेले असतात आणि तिचा नवऱ्याचा मृत्यू होतो. आता या चित्रपटाची गोष्ट ही फक्त संध्यापुरती मर्यादित राहत नाही. नवरा गेल्यावर त्याच्या पत्नीला काय वाटायला हवं पासून ते घरात मृत्यू झाल्यावर सगळे विधी कसे पार पडायला हवे, या समाजमान्य चौकटीला धरून जे काही घडतं आणि जे घडायला नको असं वाटतं त्याची ही गोष्ट आहे.
चित्रपटाचा शेवट थोडा मेलोड्रॅमॅटिक आहे आणि प्रेडिक्टेबलसुद्धा. तेवढं सोडलं तर उमेश बिष्ट यांनी चित्रपटाची कथा आणि डायरेक्शन फार छान केलं आहे. अरिजित सिंगने या चित्रपटाला संगीत दिलं आहे आणि यातली गाणी सुरेल आहेत. घरातला माणूस अचानक गेल्यावर काय घडतं या जॉनरवर तसे मोजके चित्रपट बनतात. ‘नाईव्ज आऊट’, ‘द जज’ किंवा मागच्या महिन्यात रिलीज झालेला ‘राम प्रसाद की तेरहवी’ हे चित्रपट काही प्रमाणात या जॉनरचे. पण ‘पगलैट’ हा बऱ्यापैकी लाईट कॉमेडीकडे झुकणारा चित्रपट. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे संध्याचं करेक्टर फार ब्रिझि आणि सुरवातीला काहीसं बिझार वाटणारं. आशुतोष राणाने साकारलेले वडील, शिबा चड्डा यांनी वठवलेली आईची भूमिका.. अत्यंत संयमित आणि नॉन मेलोड्रॅमॅटिक! चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे दिग्दर्शक अलिप्तपणे हा चित्रपट आपल्याला दाखवतो.
चित्रपट काहीसा संथपणे सरकतो. म्हणजे जेव्हा आपल्याला कुठे पोहोचायचं नसतं , तेव्हा आपण कसे चालतो.. तसा काहीसा फील हा चित्रपट पाहताना येतो.. या चित्रपटातून दिग्दर्शक आपल्या अंगावर कोणतंही ओझं देत नाही.. ना जुन्या परंपरांना जज करण्याचं ओझं, ना तरुण मुलगा गमावलेल्या आई- वडिलांचे अश्रू पुसायचं ओझं.. इतकंच काय नुकतीच विधवा झालेली संध्या तिच्या मैत्रिणीला जेव्हा म्हणते की “मी आठवीत असतांना माझी मांजर मेली होती तेव्हा मला रडू आलं होतं पण नवरा मेला ते तरीही रडू येत नाहीये आणि भूक सुद्धा फार लागते आहे”.. तेव्हा ही पगलैट असं काय बोलते आहे, या तिच्या वेडेपणाच सुद्धा ओझं दिगदर्शक आपल्यावर टाकत नाही. आपण सगळं आरामात बघतो, हसतो आणि मनामध्ये काहीतरी हलतं सुद्धा..
पगलैट म्हणजे असतं काय बुवा? .. तर फ्युज उडालेली मॅड वगैरे अशी व्यक्ती.. सो अशी विशेषणं जेव्हा बाईला मिळतात तेव्हा ती नक्की काय करत असते? तर मोस्ट ऑफ द टाइम ती ‘बाई’ आहे हे विसरून जेव्हा वागते, तेव्हा ही खास विशेषणं तिला मिळत असतात.. हे काही एका जेंडरपुरत मर्यादित नाही. पण समाजाप्रमाणे या शहाणपणाच्या चौकटी बदलतात हे मात्र खरं . खूपदा कोणत्याही जेंडरची व्यक्ती सो कॉल्ड समजदारीची कुंपण पार करून उडी मारायला बघते तेव्हा तिला वेडं ठरवण्यात येत असतंच.. हा चित्रपट ही कुंपणं फार सटली आपल्याला दाखवतो.. आपण कुंपणाच्या कुठवर पोहोचलो आहोत याची सुद्धा जाणीव हा चित्रपट करून देतो.. आयुष्य जगण्यासाठी फार मोठ्या फिलॉसॉफीची गरज नसतेच. म्हटलं तर सगळं सोपं आहे आणि म्हटलं तर अवघड. एकाच सिचुएशनकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो त्यावर सगळं अवलंबून असतं. दुसऱ्याच्या ताटात ज्यांना जास्तं सुख दिसतं आणि स्वतःच्या ताटात जास्तं दुःख, ते सतत आम्ही अधिक दुःखी का याची कारणं देत बसतात. ज्यांना आपल्या दुःखाची किंमत चुकती करता येते, ते पुढे जातात आणि सुख हे मानण्यात असतं हे त्यांना उमजतं.
संध्याचा हा प्रवास थोडा क्लिशेड असला तरीही आपल्याला नेमकं काय वाटतंय याचा पत्ता तिला शेवटी लागतो.. सो हा पत्ता आपल्याला पण लागायला हवा बॉस.. मग आपल्या प्रवासात आपल्याला कोणी पगलैट म्हणो व अजून काही… संध्यासारखं गोड हसून ते उडवून लावता आलं पाहिजे.. कधी जमेल, कधी नाही जमणार… पण हळूहळू उमजतं जातं. की खरी मजा ‘पगलैट’ म्हणून जगण्यात आहे आणि त्यासाठी जी किंमत चुकती करावी लागणार आहे ती कमवण्याची आणि गमावण्याची औकात आपण स्वतःला घडवून निर्माण करू शकतो.. सो बॉस पिक्चर लाईट आहे. पगलैट म्हणून जगणं जमलं नाही तरी निदान पडद्यावर तरी पाहता येईलच. विषय म्हणून एक वेगळा प्रयोग आहे सो आवडू शकतो. चित्रपट आवडो न आवडो.. पण संध्याचं नितळ हसू बघून, तुमच्या चेहेऱ्यावर पण हसू उमटेल हे नक्की.. Cheers for all the madness that we carry within ourselves and still try to make this world a very sane and beautiful place..दिल तू उड जा रे.. असं म्हणणाऱ्या सगळ्या पगलैटसाठी.. चिअर्स…
(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर उस्फूर्तपणे लिहिणे ही त्यांची आवड आहे )