– मोहिनी मोडक
“माझी बायको जेव्हा किचनमध्ये काम करते ना, ते तिच्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशन असतं.” आमचे एक स्नेही परवा कौतुकाने सांगत होते. ते आणि त्यांची बायको प्रथितयश डॉक्टर. कामाच्या व्यग्रतेमुळे रोजचा स्वयंपाक, सगळं घरकाम करायला मदतनीस आहेत. कधीतरी बदल, छंद, मुलांची एखादी फर्माईश पुरी करायला म्हणून ती तिच्या अद्द्यावत किचनमध्ये जाते तेव्हा तिचं आनंदात असणं अगदी स्वाभाविक आहे. एखाद्या पुरुषासाठीही असा बदल म्हणजे मेडिटेशन असू शकतं. अशा वेळी मेनू ठरवणं, निगुतीने पूर्वतयारी करणं, मन लावून पदार्थ रांधणं, आपल्या माणसांना आग्रह करून प्रेमाने खाऊ घालणं, यातला आनंद अपूर्व असतो. आपल्या नात्यातल्या स्त्रियांबद्दलच्या आपल्या आठवणी सुद्धा बहुतेक वेळा त्यांची खासियत असलेल्या विशिष्ट पदार्थांशी निगडीत असतात. जुन्या हिंदी सिनेमातल्या आयांना तर आपण कायम, अपने हाथोंसे बनाया हुआ गाजर का हलवा किंवा मूली के पराठे त्यांच्या मुलांना खाऊ घालताना पाहत आलो आहोत. प्रत्यक्षात जेव्हा हे काम तुझंच म्हणून लादलं जातं, ते करण्यावाचून पर्याय नसतो आणि त्यात एकसुरीपणा येतो तेव्हा घर व नोकरी/व्यवसाय अशी दुहेरी कसरत करणार्या बायकांबरोबर गृहिणींनाही त्याचा प्रचंड कंटाळा येऊ शकतो.
घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्या पुरुषांना त्यांचे काम करताना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का? नक्कीच! परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. अपवाद वगळता बहुतेक पुरुष या संधीचा मनापासून लाभ घेतात. A woman must have money and a room of her own if she is to write fiction या व्हर्जिनिया वुल्फच्या वाक्याकडे, हक्काचा अवकाश मिळाल्याशिवाय स्त्रियांना आवडीच्या क्षेत्रात आपल्या क्षमतेचा संपूर्ण वापर करता येत नाही, अशाही अर्थाने पाहता येईल. अशी मुभा स्त्रियांना क्वचित मिळते. मिळाली तरी तळाशी बारीक अक्षरात ’अटी लागू’ लिहिलेलं असतं. “तू ’घर सांभाळून’ हवं ते कर, आम्ही तुला सगळं स्वातंत्र्य ’दिलं’ आहे” असं अजब औंदार्य त्यात असतं. घरकामाच्या बाबतीत ’आता कुठे राहिलंय असं काही, उलट शेफ म्हणून पुरुषच जास्त दिसतात, आता सगळं विकत मिळतं, शिवाय यंत्र असतात हाताशी’ असं वाटणार्या मंडळींनी आपल्या पांढरपेशा खिडकीतून गगनचुंबी इमारतींपासून खेडोपाडी पसरलेल्या आपल्या महाकाय देशात नीट डोकावून पाहावं. शेतावर मजुरी करुन खोपट्यात थकून परतलेले अशिक्षीत जोडपे असो किंवा आपापल्या ऑफीसमधून दमून घरी पोहचलेले सुशिक्षित जोडपे, रात्रीच्या जेवणाचे आणि उद्याच्या डब्याचे काय करायचे याची चिंता आणि तजवीज करण्याची जबाबदारी आजही प्रामुख्याने बाईवर असते. बाईला बरेचदा वैताग येतो तो प्रत्यक्ष कामाच्या श्रमापेक्षाही अशा पद्धतीने तिला गृहित धरण्याचा. तिला तिचा अवकाश न मिळण्याचा. हे गृहित धरणं नंतर फक्त स्वयंपाक किंवा घरकामापुरतं मर्यादित राहत नाही. याच वेदनेकडे Jeo Baby या दिग्दर्शकाला प्रेक्षकांचं लक्ष वेधायचं आहे.
अॅमेझॉन प्राईमवरील त्यांचा #The great Indian kitchen हा मल्याळम सिनेमा व्यवस्थेपुढे मान तुकवू न शकणार्या एका संवेदनशील भारतीय स्त्रीची व्यथा उघड करुन दाखवतो. पार्श्वभूमी केरळची असल्याने यात सातत्याने दिसणारा आणि मग बोचणारा स्वयंपाक, भवताल, केरळी पद्धतीचा असला तरी तपशीलात माफक बदल करुन ही कथा भारतातल्या कोणत्याही प्रांताला लागू होऊ शकते. त्यामुळे यातल्या नायिकेलाच काय कोणत्याही पात्राला नाव नाही. केरळी कुटुंबातली नवविवाहित स्त्री, तिचा नवरा, सासूसासरे यांच्याबरोबरच स्वयंपाक किंवा एकूणच घरकाम हेही या सिनेमातलं एक महत्वाचं पात्र. ते पात्र चिरणे, कापणे, खवणे, सोलणे, तळणे, झाडणे, आवरणे, विसळणे, धुणे, पुसणे अशा न संपणार्या कृतींच्या त-हत-हेच्या आवाजातून सिनेमाभर सतत बोलत राहतं. या पात्राला सिनेमात इतकं फूटेज आहे की एका टप्प्यावर या अंतहीन कामामुळे त्या सूनेच्या दिनचर्येचा भाग असलेला वैताग आणि कंटाळा आपणही अनुभवायला लागतो. तरीही आपण तिची कथा खिळून पाहत राहतो कारण त्या क्षणापासून दिग्दर्शकाचा सिनेमा आपला सिनेमा झालेला असतो. त्याच्या कॅमेर्याची आणि आपली वेव्हलेंग्थ जुळलेली असते.
एक साधी सुशिक्षित नृत्यशिक्षिका मुलगी एका लहान गावातल्या शिक्षकाशी विधीवत लग्न करुन त्याच्या मोठ्या, सुखवस्तू पण जुन्या पद्धतीची रचना असलेल्या घरात येते. स्वयंपाक, घरकाम इतकंच नव्हे तर नवर्याला प्रत्येक गोष्ट हातात नेऊन देणं, हे बाईचं प्राक्तन म्हणून स्वीकारलेल्या द्विपदवीधर सासूची तिला नव्या संसारात सुरुवातीला मदत होते. मुलीची प्रसूती जवळ आल्याने नाईलाजाने सासूला घराचा रामरगाडा नायिकेवर सोपवून जावं लागतं. तिची मुलगी (नायिकेची नणंद) निर्णय घेण्याचा हक्क असलेल्या मोजक्या स्त्रियांपैकी एक असल्याचे केवळ एका संवादातून, तिच्या देहबोलीतून सहज लक्षात येतं.
नायिकेच्या कामाला खंड नसतो. तिला बदली मदतनीस उपलब्ध असते ती केवळ ’त्या’ दिवसात. तीही अर्थातच स्त्री. अंगण झाडले जाते, पडवी नियमित पुसली जाते, दिवे सवयीने घासले, पेटवले जातात, तव्यावर एकामागोमाग दोसे पसरवले जातात, सांबाराला फोडण्या दिल्या जातात, भात वैरला जातो, भाज्या चिरल्या जातात, बादली कचर्याने भरत जाते आणि कुपात रिकामी होत राहते. आपलं ताट उचलणं तर राहोच पण ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. चहा, नाश्ता, दुपारचं, रात्रीचं जेवण, पैपाहुणे… स्वयंपाक तिन्हीत्रिकाळ शिजत राहतो आणि मूक होत गेलेल्या नायिकेला ’च’ पीडत राहतो. असे ’च’ घरोघरी असतात. कपडे हाताने धुणंच योग्य नाहीतर मशीनमुळे ते लवकर विरतात, आपल्याकडे सांबार आणि चटणी दोन्हीही लागतंच, ह्यांना चटणी पाट्यावरच वाटलेली आवडते, भात कुकरपेक्षा चुलीवरचाच चांगला लागतो. आणि हे सगळं असंच्च. रोज. अव्याहत.
हल्ली चुलीवरच्या स्मोकी चवीच्या स्वयंपाकाचं अप्रूप आहे. चवीने जेवणार्याला वैविध्य हवंच असतं पण ही हौस पुरवायला चुलीपासून सुटका झालेल्या बायकांना पुन्हा चुलीकडे जावं लागतंय. ना. ग. गोरे म्हणत, जात्यावरच्या ओव्यांचं कौतुक करणं वेगळं आणि स्वत: जातं ओढणं वेगळं. आपल्याकडे स्त्रीच्या अन्नपूर्णा या रुपाचं असंच उदात्तीकरण होतं. याविषयी एका लेखकाचा भावनाबंबाळ लेख समाजमाध्यमावर मध्यंतरी बराच फिरत होता. ह्या लेखकाला त्यांच्या एका चाहत्या जोडप्याने घरी जेवायला बोलावले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य झाले. जेवणाचे बहुतेक पदार्थ दर्जेदार उपाहारगृहातून मागवण्यात आले होते. त्यांचा आस्वाद घेत जोडप्याने त्यांच्याशी अनेक विषयांवर मनापासून गप्पा मारल्या. लेखकरावांना असे तयार पदार्थ मागवणे अजिबात रुचले नाही. त्याऐवजी घरी केलेली साधी मुगाची खिचडी जरी खाऊ घातली असती तरी मला बरे वाटले असते अशी त्यांनी टिप्पणी केली. आता अशा मानसिकतेचे काय करावे! एक तर पाहुण्यांना बोलावले की कुणी फक्त मुगाची खिचडी करणार नाही. केलीच तर ती कुणी करायची तर अर्थात घरच्या बाईने. या बाईंना अन्नपूर्णेची नेहमीची भूमिका करण्याऐवजी आवर्जून आमंत्रित केलेल्या लेखकाबरोबर चर्चा करण्यात जास्त स्वारस्य होते हे स्वीकारणे लेखकाला एवढे अवघड का वाटावे. हळव्या, विचारी म्हणवणार्या सुबुद्ध लोकांच्या बायकांकडून इतक्या पठडीतल्या अपेक्षा असतील तर सर्वसामान्यांबद्दल काय बोलावे!
तर या सगळ्या ’च’ मुळे येणारा ताण, ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जाणं नायिकेच्या आत कुठेतरी धुमसू लागतं. नवर्याच्या दृष्टीने तुंबलेलं, गळणारं सिंक म्हणजे स्वैपाकघरातला अगदी क्षुल्लक प्रश्न. पण त्या सांडपाण्याच्या वासातून तिच्या मनाची सुटका होणं अवघड होतं. नवर्याबरोबर एकांतातही तो वास.. घरकाम नावाचं अदृश्य पात्र, तिच्या मेंदूत दबा धरून बसलेलं असतं. त्या यांत्रिक क्रियेचा तिटकारा आल्याने त्याने आपल्याला आधी किमान खुलवावं ही साधी अपेक्षा ती व्यक्त करते. ती पूर्ण होणं तर दूरच. त्याला तिच्यात शेजे आणि पेजेच्या गरजेपलिकडे काही रस नाही, हे तो स्पष्टपणे सांगतो. नायिका दुखावते. तिची घुसमट इथे थांबत नाही. तिच्या नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला ठाम नकार, त्यातच मासिक पाळीचं स्तोम, शबरीमाला पार्श्वभूमीवर तिने फेसबुकवर टाकलेली पोस्ट डिलिट करण्याचा नवर्याचा आदेश, व्यवस्थेला शरण गेलेल्या तिच्या आईचीही तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एकामागोमाग घडणार्या अशा घटनांमुळे तिच्या मनात धुमसणार्या ठिणग्या पेट घेऊ लागतात आणि एका क्षणी याचा उद्रेक होतो. त्याची परिणीती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. तिथे आपण श्वास रोखून धरतो. सिनेमा फार ग्रेट नसला तरी तो भिडतो. Nimisha Sajayan आणि Suraj Venjaramoodu या मुख्य पात्रांचा जिवंत अभिनय, प्रत्ययकारी चित्रण, बांधीव पटकथा यामुळे तो आणखी प्रभावी ठरतो.
सिनेमा बघताना आठवलं, गेल्या पिढीचे लेखक जयवंत दळवी यांनी आपल्या आईचं अवघं आयुष्य काळोख्या स्वयंपाकघरात किलो-किलोच्या पोळ्या करण्यात करपून गेल्याची कबुली एका लेखात दिली होती. हे गेल्या पिढीचे प्रातिनिधिक उदाहरण असले आणि आता परिस्थिती काही अंशी बदलली असली तरी या कामावरची ’दुय्यम’ आणि ’बायकी’ ही लेबल्स पुसली गेलेली नाहीत. “निवडणुकीच्या प्रचारातून वेळ मिळाला तर चेल्सीसाठी कुकीज बनवायला मला सर्वात जास्त आवडतं” हे हिलरी क्लिंटन यांचं वाक्य तेव्हाच्या काही अमेरिकन माध्यमांनी ’तर’च्या पुढच्या वाक्याची हेडलाईन करुन बाई शेवटी स्वयंपाकघरातच रमू शकते, अशा पद्धतीने सादर केलं होतं. भारतीय समाजाला तर हे मनातून मान्यच आहे. ’किचन पॉलीटिक्स’ या एकमेव विषयाभोवती घुटमळणार्या सुमार मालिकांना मिळणारी अफाट लोकप्रियता त्याचे निदर्शक आहे. काही उदार मंडळींची प्रगती ’बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी’ या धर्तीवर ’अडायला नको म्हणून मुलाला जुजबी स्वयंपाक आला पाहिजे’ इथपर्यंत झाली आहे. पण मुलीच्या जातीला मात्र तो व्यवस्थित आला’च’ पाहिजे याबाबत त्यांचे दुमत नाही.
मुळात स्वैपाक किंवा घरकाम हे केवळ जीवनावश्यक कर्तव्य नाही तर आयुष्याला ज्या छोट्या छोट्या गोष्टीतून सौंदर्य आणि अर्थ प्राप्त होतो त्यापैकी ती एक महत्वाची कृती आहे. उपलब्ध वेळ, आवड, कौशल्य आणि गरज याचा समन्वय साधून एकमेकांना हातभार लावत ती करणं ही घरातल्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. लॉकडाऊनमध्ये अचानक याची जाणीव झाल्याने जबाबदारी वगैरे म्हणणं जरा जास्त होईल, पण अनेक पुरुषांनी आपल्या घरातील स्त्रियांना स्वयंपाकात, घरकामात ’मदत’ केली. काहींनी त्यावरून विनोद व्हायरल केले. पुरुषांनी हे काम करण्यात विनोद आहे, असं अजूनही समाजाला वाटणं हाच मुळात एक विनोद आहे. सामाजिक संस्थांच्या पाहणीनुसार अनलॉकबरोबर यातील बहुतेकांचा उत्साह मावळला आणि ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये कामाची व श्रमाची असमान विभागणी पूर्ववत झाली. या सिनेमाच्या नावात ’किचन’ असलं तरी सिनेमा सांगू पाहतोय ते अशा मानसिकतेबद्दल. घरोघरच्या मातीच्या चुलींबद्दल. सिनेमापुरतं बोलायचं तर नायिकेने अमुक स्टँड घ्यायला हवा होता, तमुक करायला हवं होतं अशा प्रतिक्रिया येत राहतील. आपण काय करायला हवं याचा विचार करायला मात्र हा सिनेमा आपल्याला भाग पाडतो.
(लेखिका नामवंत स्तंभलेखिका , ब्लॉगर व Horizon Web Technologies च्या संचालक आहेत)
[email protected]
The Great Indian Kitchen चा Official Teaser- नक्की पाहा