बदामीपासून पाच किमी अंतरावर बनशंकरी हे चालुक्यांच्या कुलदेवतेचे स्थान आहे.हे मंदिर चालुक्यांनी इ.स. ७ व्या शतकात बांधले आहे. हे महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. मंदिराच्या आवारात पाण्याचा मोठा तलाव आहे.त्याच्या सभोवताली नारळाची झाडे आहेत. येथे वार्षिक रथोत्सव साजरा केला जातो. पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमेला हा उत्सव असतो. यावेळी भाविक अनवाणी पायाने दर्शनाला येतात. ही प्रथा अलीकडे पडली असावी.
# महाकूट
बनशंकरीवरून पट्टदक्कल कडे जाताना अकरा किमीवर महाकूट लागते. बदामीमधील अगस्त्य तलावापासून महाकूटकडे जाण्यासाठी पायवाट आहे. पूर्वी याचा वापर फक्त राजे करायचे . सध्या जो गाडी रस्ता आहे , तो महाकूटला जेथे मिळतो तेथून सर्वसामान्य लोकांना प्रवेश दिला जात असे.
अनेक मंदिराचा समूह असलेले हे स्थान अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शैव पंथाच्या प्रभावाखाली चालुक्य राजवट असताना सहाव्या- सातव्या शतकात येथील मंदिरे बांधली गेली आहेत. येथे बहुतेक सगळी शिवमंदिरे आहेत.’लुकालीश’ या शैव पंथाचा येथे प्रभाव जाणवतो. लुकालीशची शिल्पं मंदिरांवर कोरलेली आढळतात. तसेच येथे महत्त्वाची माहिती सांगणारा कन्नड व संस्कृत भाषेतील शिलालेख आहे. जागोजागी शंकराच्या पिंडी दिसतात. एके ठिकाणी शिवाचे पाऊल म्हणून पायाचा ठसा पूजला जातो. जसे कित्त्येक किल्ल्यांवर तो किल्ला बांधणाऱ्या राजाच्या पावलांचे किंवा हातांचे ठसे आढळतात ,तसाच काहीसा हा प्रकार असावा. काळाच्या ओघात राजाचे नाव विस्मरणात गेले असणार. तसेच या भागात आदिमानवाचे अस्तित्व असल्याने त्याचेही हे पाऊल असू शकते. कारण पावलाच्या ठशाचा आकार मोठा आहे.
येथील मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासारखे आहे. या मंदिराच्या आवारात नैसर्गिक पाण्याचा स्रोत असलेला एक छोटा तलाव आहे. त्याला ‘विष्णू पुष्करणी ‘किंवा ‘पापक्षालन तीर्थ ‘असे म्हटले जाते. त्या तलावात पंचमुखी शिवलिंग आहे. त्या पाण्यातच एका कोपऱ्यात एक छोटं प्रवेशद्वार आहे. त्याच्या आत काही माणसे बसू शकतील अशी गुप्त खोली आहे. पाण्याखालून या खोलीत जावे लागते. पूर्वी त्याचा वापर गुप्त खलबते करण्यासाठी किंवा ध्यान करण्यासाठी केला जात असावा. महाभारतात दुर्योधन पाण्यात लपून बसला होता असा उल्लेख आहे, ती अशीच काहीशी जागा असावी. या मंदिराच्या शेजारी महिषासुरमर्दिनी व नवग्रहांची मंदिरे आहेत. या ठिकाणाला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते.
# पट्टदक्कल
बदामीपासून २२ किमी अंतरावर पट्टदक्कल हे एक मोठा ऐतिहासिक वारसा असलेलं पर्यटनस्थळ आहे. इ.स. दुसऱ्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो. इ.स. सहाव्या, सातव्या आणि आठव्या शतकात चालुक्य सम्राटांनी येथे मंदिरे बांधली आहेत. याठिकाणी मलप्रभा नदी ही उत्तरवाहिनी आहे. त्यामुळे या ठिकाणास त्याकाळी खूप पवित्र मानले जात असे. या कारणास्तवच चालुक्य राजे आपला राज्याभिषेक येथे करून घेत असत.याठिकाणी असणारी मंदिरे व चौथरे यांचा वापर राज्याभिषेक सोहळ्यांसाठी होत असे .
वेगवेगळ्या शैलीतील मंदिरांचा समूह येथे पहायला मिळतो. द्रविडी व नागर शैलीतील मंदिरे येथे आहेत. त्यापैकी विरुपाक्ष व मल्लिकार्जुन ही दोन मंदिरे खूप प्रसिद्ध आहेत. विक्रमादित्य दुसरा याने पल्लव राजावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याची पत्नी त्रैलोक्यमहादेवी हिने ही दोन्ही मंदिरे बांधून घेतली होती. या मंदिराच्या बाह्य भागांवर विष्णू व शिव यांच्याशी संबंधित कथांमधील वेगवेगळी रूपे कोरलेली आहेत. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्याचे शिल्प, रावणाने कैलास पर्वत उचलल्याचे शिल्प, बळी-वामनाचे शिल्प, एका शैव पंथाचा संस्थापक लुकालीश याचे शिल्प अशी असंख्य शिल्पे येथे आपल्यासमोर भारतीय पौराणिक कथा उलगडून दाखवतात. विरुपाक्ष मंदिराच्या रचनेवरूनच वेरूळच्या प्रसिद्ध कैलास लेण्याची रचना चालुक्यांनी केली आहे. विरुपाक्ष मंदिरासमोर काळ्या ग्रॅनाइटचा भव्य नंदी आहे. हा नंदी कल्याणी चालुक्यांच्या काळातील असावा, कारण त्याच्या शेजारीच वालुकाश्म दगडातील झीज झालेल्या स्वरूपातील एक दुसरा मोठा नंदी आहे. भारतात जे काही भव्य नंदी आहेत, त्यापैकी हा एक आहे. नंदीच्या मंडपामध्ये आनंदी जोडप्यांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. या ठिकाणी एक जैन मंदिरही आहे. हा परिसर पाहताना पाहणाऱ्याचे भान हरपून जाते. सुंदर स्थापत्यशास्त्राचा हा देखणा परिसर युनेस्कोने ‘वर्ल्ड हेरिटेज’ म्हणून घोषित केला आहे.
ज्यांना इतिहास व कलेची आवड नाही त्यांनी या परिसरात शक्यतो उन्हाळ्यातील दुपारी जाऊ नये. हा परिसर पाहण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागतात व बऱ्यापैकी चालावे लागते. त्यामुळे बाहेर येईपर्यंत पोट भुकेची जाणीव करून देऊ शकते. या परिसरात स्थानिक खाद्यपदार्थ मिळतात, पण तितकासा स्वच्छ परिसर नसल्याने ते रिस्क घेऊन खावे लागतात. त्यामुळे आपल्याजवळ थोडेफार खाद्यपदार्थ ठेवणे आवश्यक आहे. तेथे शहाळी,चहा व त्या भागातील वैशिष्ट्य असणारी पापडासारखी ज्वारीची भाकरी मिळते.
तसेच येथे काही छोटे फिरते विक्रेते असतात. त्यांच्याकडे पर्यटनावर आधारलेली पुस्तके,नकाशे, ताक, दही वगैरे विकण्यासाठी ठेवलेले असते. अशा लोकांना एक मदत म्हणून मी दरवेळी त्यांच्याकडून काही पुस्तके खरेदी करतोच. ऐहोळे येथेही असेच दृश्य असते पण तेथे काही फळ विक्रेतेही असतात. ऐहोळे येथे आता KSTDC च्या छोट्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंट चालू झाले आहे . तेथे दुपारचे जेवण आपण करू शकतो.
# ऐहोळे
बदामीपासून ३२ किमी अंतरावर ऐहोळे हे प्राचीन मंदिरांचा समूह असणारे एक ठिकाण आहे. पाचव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत चालुक्य सम्राटांनी शंभर पेक्षा जास्त मंदिरे येथे उभारली आहेत. सुरुवातीला चालुक्यांची राजधानी ऐहोळे ही होती. कला व संस्कृतीचे उपासक असणाऱ्या चालुक्यांनी आपल्या राजधानीत तसेच पट्टदक्कल येथे अनेक मंदिरे बांधली. त्यासाठी त्यांनी जगभरातून तज्ज्ञ मंडळींना बोलावून त्यांचे मार्गदर्शन घेतले होते. चालुक्यांनी ऐहोळेला वास्तुकलेचे सर्वोत्तम केंद्र बनवले. भारतीय मंदिर शिल्पकलेचा पाया येथे रचला गेला तर त्याचा कळस बेल्लूर-हळेबीड येथे गाठला गेला. येथे असणाऱ्या अनेक मंदिरांपैकी दुर्गा मंदिर हे मुख्य आकर्षण आहे. या मंदिराच्या बाह्य आकारावरून भारतीय संसदेच्या इमारतीची बाह्यरचना करण्यात आली आहे. या मंदिर समूहाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या खिडक्यांचे नक्षीकाम . येथे एकाही खिडकीचे नक्षीकामाची पुनरावृत्ती झालेली नाही. त्याकाळच्या कलाकारांनी या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग केल्याने भविष्यात मंदिर निर्माण करताना ते उपयोगात आले. येथे असणाऱ्या वस्तूसंग्रहालयात या संपूर्ण भागाची प्रतिकृती, अश्मयुगापासुनचा या भागातील इतिहास मांडला आहे. हे वस्तूसंग्रहालय आवर्जून बघावे.
सतरा-अठरा वर्षांपूर्वीची येथील एक आठवण येथे सांगावीशी वाटते . मी, माझे पुतणे व गावाकडील काही मित्र बदामी ट्रिपला गेलो होतो. त्यावेळी सर्वांना या वस्तूसंग्रहालयात असणारे ‘सप्तमातृका शिल्प’ पहायचे होते. सप्तमातृका हे आमचे ग्रामदैवत आहे. परंतु वस्तूसंग्रहालयाची वेळ संपत आली होती व त्यामुळे तेथील गार्ड आम्हाला आत सोडत नव्हता. त्यावेळी वस्तूसंग्रहालयाची बंद होण्याची वेळ माहीत नसल्याने आम्हीही वेळेत पोहचू शकलो नव्हतो. मग मुख्य अधिकाऱ्याला भेटून आम्ही खूप लांबून आलेलो आहोत व आमच्या ग्रामदैवताचे शिल्प पहावयाचे आहे त्यासाठी परवानगी द्या, अशी त्यांना विनंती केली. त्यावेळी त्यांनी आमच्या भावनांचा आदर करत परवानगी दिली.
पूर्वी बदामी भागात प्लास्टिकचे पाण्याचे हंडे घेऊन जाणारे स्त्री-पुरुष किंवा ढकल गाडीवर ओळीत ठेवलेल्या प्लास्टिक हंड्याना वाहून नेणारे लोक हमखास दिसायचे. ठिकठिकाणी रस्त्यावर कडेला कपडे धुणाऱ्या स्त्रिया दिसायच्या. तसेच छोटी-छोटी गावं अस्वच्छ असायची, गरिबी ठळकपणे दिसायची. पण आता हे दृश्य खूपच कमी दिसते. अलमट्टीच्या पाण्यानंतर हा भाग बागायती दिसू लागलाय . दुष्काळाची तीव्रता ,गरीबी आणि अस्वछताही कमी झालीय. बदामी गावही वाढतेय, सुधारतेय.पण त्याबरोबरच गुंफा, भूतनाथ मंदिराकडे जाणारा मार्गही सुधारेल, ही अपेक्षा करतो.
जशी माझी वर्षातून एकदा केरळ ट्रीप होते, चार ते पाच वेळा गोवा ट्रीप होते तशीच बदामी ट्रीपही दोन-चार वेळा होतेच होते. पण तरीही मला बदामी पहाण्याचा कंटाळा कधीच येत नाही. एकदा माझे वडील व त्यांचे काही तरुण मित्र , जे साधारणपणे माझ्याच वयाचे असतील ट्रीपला जायचे ठरवत होते.पावसाळ्याचे दिवस असल्याने वडिलांनी बदामी – हंपी ट्रीप निश्चित केली. पण तरुणाईच्या मनात ‘गोवा ‘ होते. वडिलांना नाही कसे म्हणायचे? म्हणून आम्ही सगळे बदामीला गेलो . तेथे गेल्यावर सर्वांनी बदामी – हंपी ट्रीप दोन दिवसात आटोपून, वडिलांना गोव्याला जाण्यासाठी राजी केले. गोव्यात पाऊस सुरू असूनही सगळेजण तिकडे गेलो. हा अनुभव येईपर्यंत २-३ दिवसाच्या ट्रीपसाठी सल्ले विचारणाऱ्या सर्वांना मी बदामी सुचवायचो,पण त्यानंतर मात्र इतरही स्थळे सुचवू लागलो. मी मात्र अजूनही दैनंदिन रहाटगाडग्याला कंटाळलो व वेळ कमी असेल तर कधी एक तर कधी दोन दिवस बदामीचीच ट्रीप करतो.
या भागात आता सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी, खाण्याचे हाल होऊ शकतात. त्यामुळे तिकडे जाताना सोबत खाण्यासाठी पदार्थ व पाणी ठेवणे गरजेचे आहे. हॉटेल्सची मर्यादा असल्याने बुकिंग करून गेलो तर गैरसोय होत नाही. बदामीत KSTDC चे ‘मयुरा चालुक्य’ हे हॉटेल राहण्यासाठी उत्तम आहे.हे हॉटेल गावाबाहेर व ऐसपैस असे असल्याने गर्दीचा त्रास होत नाही. बदामी गावात’ क्लर्क इन’ हे एक चांगले हॉटेल आहे. सवड काढून बदामीला गेल्यास, इतिहासातील हे सोनेरी पान तुम्हाला कधीच निराश करणार नाही.
खूप छान व सविस्तर माहिती.
बदामी हे ठिकाण खरच मनाला मोहून टाकणारे आहे. भारतीय कला संस्कृतीचे वैभव आपल्याला येथे पहायला मिळते. आपणासोबत झालेला इथला प्रवास आनंद देणारा आहे.
खूपच छान मांडणी !!
राकेशदादा सोबत केलेली ट्रीप अविस्मरणीय झाली 🙏
खूप छान व सविस्तर माहिती.
बदामी हे ठिकाण खरच मनाला मोहून टाकणारे आहे. भारतीय कला संस्कृतीचे वैभव आपल्याला येथे पहायला मिळते. आपणासोबत झालेला इथला प्रवास आनंद देणारा आहे.