युवाल नोवा हरारी यांचे ‘ट्वेन्टी वन लेसन्स फॉर द ट्वेन्टीफर्स्ट सेंच्युरी’

(साभार : साप्ताहिक साधना)

-हमीद दाभोलकर , सातारा

धर्माचे मोठेपण, समाजवाद, साम्यवाद अथवा भांडवलशाही ह्यांचे श्रेष्ठत्व किंवा अगदी मानवी अधिकार अशा कोणत्याही गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत. ह्या सगळ्या आपण एकमेकांना शतकानुशतके सांगितलेल्या ‘गोष्टी’ आहेत. त्यातील प्रत्येक गोष्टीला कमी-अधिक वैज्ञानिक आधार शोधता येऊ शकतो, असे हरारीचे प्रतिपादन आहे. आपण ज्या रस्त्याने चाललो आहोत, त्या रस्त्यावर कोणते तरी शाश्वत सत्य गवसणार असे समजणाऱ्या माझ्या भाबड्या मनाला ह्या ‘सत्या’ने एक जोरदार धक्का दिला!

…………………………….

साधारण तीन/चार वर्षांपूर्वी, 2017-2018 च्या आसपास माझी पहिल्यांदा युवाल नोवा हरारीच्या लेखनाशी ओळख झाली. अगदी थोड्या काळातच तो माझा आवडता लेखक-भाष्यकार झाला. मागे वळून पाहताना दिसणारे त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, माझ्या वाचनाच्या पद्धतीला त्याची लिहिण्याची पद्धत एकदम पसंत पडणारी होती. मी शिस्तबद्धपणे वाचणारा वाचक नाही किंवा सातत्याने आणि भरपूर वाचणारादेखील नाही. माझी वाचनाची पद्धत जास्त करून एकवीस अपेक्षित वाचून परीक्षेला बसणाऱ्या मुलासारखी आहे. आयुष्याच्या ज्या-त्या टप्प्यावर मला पडणारे प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी दिशादर्शन करू शकेल, असे लिखाण मी शोधत असतो. बहुतांश वेळा माझे वाचन हे त्याच्या आसपास घुटमळत राहते. त्या वाचनपद्धतीला हरारीची ‘सेपियन्स’, ‘होमो देऊस’ आणि ‘ट्वेंटीवन लेसन्स फॉर ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी’ ही पुस्तकत्रयी एकदम पसंत पडावी अशी होती, म्हणून माझी त्याच्याशी एकदम गट्टी जमली.

ह्या त्रयीमधील पहिले पुस्तक सेपियन्समध्ये (2011) हरारीने, 13.5 बिलियन वर्षांपूर्वी विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासून अनेक वळणे घेत आजपर्यंत झालेला मानवसमूहाचा संक्षिप्त इतिहास लिहिलेला आहे. ‘होमो देऊस’ (2015) ह्या दुसऱ्या पुस्तकात त्याने मानवी समूहाचे भविष्य येत्या कालखंडात कसे असेल, ह्याविषयी लिहिले आहे. ह्या त्रयीमधील शेवटचे ‘ट्वेंटीवन लेसन्स फॉर ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी’ हे पुस्तक आपण आत्ता ज्या शतकात जगत आहोत, त्यामधील प्रमुख प्रश्नांविषयी मांडणी करते. सध्या तरी माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख  पुस्तकांमध्ये निवड करायची तर मी या पुस्तक त्रयीची आणि खास करून ‘एकविसाव्या शतकासाठीचे एकवीस प्रश्न’ यांची निवड करेन. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, सध्याच्या कालखंडात मला सातत्याने भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे बघण्याचा एक नवा कोरा करकरीत दृष्टिकोन ह्या पुस्तकांनी दिला. हे कशामुळे घडले ते समजून घ्यायचे असेल, तर आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मला काय प्रश्न पडत होते, त्यांच्याविषयी सांगणे आवश्यक आहे.

हरारीचे लेखन मी साधारण 2018 च्या आसपास वाचायला सुरुवात केली. त्याच्या आधीची पाच वर्षे माझे वाचन जवळजवळ बंदच होते. ऑगस्ट 2013 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यानंतरची ही पाच वर्षे होती. वाचन-चिंतन-मनन करण्यासाठी मनाला आवश्यक असलेली स्थिरता त्या कालखंडात मला अजिबात नव्हती. आयुष्याचे खूप सारे संदर्भ एकदम बदलून गेले होते. एका बाजूला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत म्हणून रस्त्यावर आणि न्यायालयात चाललेली लढाई, ह्या कामाच्या स्वरूपातून निर्माण होऊ शकणारा धोका; दुसऱ्या बाजूला अंनिस, परिवर्तन, साधना ही कामे निर्धाराने चालू राहावीत यासाठी आपला वाटा उचलणे, विरोधकांनी घातलेल्या केसेस, माझे स्वत:चे मनोविकारतज्ज्ञ म्हणून असलेले काम आणि कुटुंब व कार्यकर्ते या सगळ्यांमध्ये त्या-त्या वेळी समोर आलेल्या प्रश्नाला भिडणे- असे त्या कालखंडातील सर्वसाधारण आयुष्य होते. परिणामी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात सामान्य परिस्थितीमध्ये साधारण एक ते दोन दशकांमध्ये जेवढे अनुभव एखाद्या व्यक्तीला मिळू शकतात, ते सर्व अनुभव परिस्थितीच्या रेट्याने पाच वर्षांत माझ्या अंगावर कोसळले. या कालखंडात राज्यातील आणि देशातील पक्षीय राजकारण, त्यांचे प्रमुख लोक यांच्याशी संपर्क आला. न्यायालय, प्रसारमाध्यमे यांचा खूप जवळून संबंध आला. सामाजिक चळवळीमधील छोट्या-मोठ्या संघटना, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते ह्यांना जवळून अनुभवता आले. ह्यामधून खूप निरीक्षणे झाली. मानवी स्वभावाची वेगवेगळी रूपे दिसली. आपण जीवनविषयक धारणा म्हणून काही पणाला लावून एखाद्या गोष्टीसाठी लढण्याचा प्रयत्न करतो, त्या धारणांना समूळ हादरवून टाकेल असा हा कालखंड होता. माझ्या मनाला त्यांची तर्कसंगती नीट लावता येत नव्हती.

केवळ व्यक्ती म्हणून नाही, तर समाज म्हणूनदेखील आपल्या सगळ्यांना अत्यंत आव्हानात्मक वाटावा, असा हा कालखंड होता. महाराष्ट्रात आणि देशात 2014 मध्ये सत्तांतर झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील अमेरिकेत ट्रम्पवादाचा उदय, ब्रिटनचे युरोपियन समुदायातून बाहेर पडणे, धर्मवाद आणि राष्ट्रवाद ह्याचा सातत्याने चढा राहणारा आलेख असा हा कालखंड होता. आपण जीवनविषयक मूल्ये म्हणून समजत असलेली विज्ञाननिष्ठा, उदारमतवादी विचारसरणी, मानवतावाद, विवेक ह्या गोष्टींची सार्वजनिक जीवनात झपाट्याने पीछेहाट होत असल्याचा हा कालखंड होता आणि आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर एखाद्याच्या डोक्यात जो काही कोलाहल असू शकतो, तो सगळा माझ्या डोक्यात चालू होता. फेकन्यूज, सत्त्योतर जग, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद यापासून ते कृत्रिम बुद्धिमता, मानवी समुदायाचे भवितव्य, सत्य आणि योग्य काय याचा शोध, ह्या सगळ्यामध्ये स्वत:चे स्थान- असा हा आडवा-तिडवा गोंधळ होता.

हिंदी सिनेमात डोक्यावर जोरदार प्रहार केला की जशी अवस्था दाखवतात तशी- ‘मै कहाँ हुँ?’, ‘तुम कौन हो?’, ‘ये क्या चल रहा है?’… अशा स्वरूपाचे प्रश्न माझ्या मनात चक्र धरून नाचू लागले होते. त्या वेळी मला हरारी भेटला.

उन्हाच्या तडाख्याने करवादलेल्या माणसाला थंड वाऱ्याच्या झुळकेने जसे फ्रेश वाटते, एकदम तसा हा अनुभव होता. तेच ते प्रश्न, त्यांची तीच-ती मांडणी वाचून आणि तीच-ती घिसीपिटी उत्तरे ऐकून कंटाळलेल्या वाचकाला एकदम नवे आणि आकर्षित करणारे वाटावे, असे त्यामध्ये काही होते. माझ्यावर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या त्यातल्या काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला सांगायलाच हव्यात अशा आहेत.

मी आजपर्यंत मानत आलेल्या अनेक मूलभूत प्रमेयांना त्यातील काही गोष्टींनी जोरदार धक्का दिला. ‘अंतिम सत्याचा शोध’ हे त्यामधील पहिले! संवेदनशील पद्धतीने आणि गांभीर्याने जीवन जगू इच्छिणाऱ्या माझ्यासारख्या बहुतांश लोकांची, ‘आपण हा शोध करीत आहोत’ अशी धारणा असते, असे माझे निरीक्षण आहे. सत्य शोधण्याचा प्रयत्न आणि त्यामधील आपल्याला जे कळले आहे ते दुसऱ्याला समजावून सांगण्याची धडपड आणि ते दुसरे का समजून घेऊ शकत नाहीत, ह्यामधील वैताग ह्यामधून त्यांची बरीचशी तगमग येत असते. ह्या

ला धक्का देण्यासाठी हरारी एकदम सत्याच्या दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या मिथकांचा आधार घेतो! त्या मांडणीचा गाभा काहीसा पुढीलप्रमाणे आहे की, ‘मानव ही प्रजाती मिथक तयार करणारी असून, छोट्या-छोट्या टोळ्यांच्या मर्यादेपलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणावर एकमेकांशी सहकार्य करण्यासाठी मानवी समूहाला मिथकांवर विश्वास ठेवणे ही क्षमता उपयोगी पडली आहे!’ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये अनेक वेळा ‘मिथक’ म्हणजे त्याज्य गोष्ट आणि आपण केवळ रोकड्या सत्याचा व ज्ञानाचा शोध घेत आहोत, असा आवेश नकळत तयार होतो. त्या आवेशाला एकदम धक्का देणारे हे विवेचन होते. थोडा विचार केल्यावर मला ते पटू लागले. पण एवढेच मांडून हे पुस्तक थांबत नाही, तर ‘जगातील अंतिम सत्य आम्हालाच कळले आहे’ असा दावा करणारे विविध धर्म व विविध विचारधारा ह्यांचा जन्म व प्रसार होण्यासाठी ह्या मानवी प्रजातीच्या मिथक तयार करण्याच्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या क्षमतेचा कसा उपयोग झाला आहे, ह्याविषयीचे विवेचन वाचून माझी सत्याचा शोध, ते आपल्याला कधी तरी गवसणार आहे आणि अजून का गवसत नाही ह्याविषयीची- तगमग बरीच कमी झाली!

धर्माचे मोठेपण, समाजवाद, साम्यवाद अथवा भांडवलशाही ह्यांचे श्रेष्ठत्व किंवा अगदी मानवी अधिकार अशा कोणत्याही गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत. ह्या सगळ्या आपण एकमेकांना शतकानुशतके सांगितलेल्या ‘गोष्टी’ आहेत. त्यातील प्रत्येक गोष्टीला कमी-अधिक वैज्ञानिक आधार शोधता येऊ शकतो. ह्या त्याच्या प्रतिपादनाने, आपण ज्या रस्त्याने चाललो आहोत, त्या रस्त्यावर कोणते तरी शाश्वत सत्य गवसणार असे समजणाऱ्या माझ्या भाबड्या मनाला ह्या ‘सत्या’ने एक जोरदार धक्का दिला! वरून पाहता अशा स्वरूपाचे युक्तिवाद हे विज्ञानविरोधी आहेत, असे वाटू शकते; पण सत्याच्या शोधात आपण ज्याचा आधार घेऊ लागतो तेच कसे पुढच्या टप्प्यावर वैरी ठरू शकते, अशी नम्र नोंद आपण घ्यावीएवढाच त्याचा उद्देश आहे. विज्ञानाची चिकित्सक पद्धती हा जरी ह्या पुस्तकाचा गाभा असला, तरी विज्ञानाचा धर्म होण्याचे धोकेदेखील ती आपल्याला समजावून सांगते!

ह्यालाच धरून येणारी दुसरी गोष्ट आहे सेक्युलॅरिझमविषयी. आपल्या देशात गेल्या काही वर्षांत सगळ्यात बदनाम केला गेलेला आणि ज्यावरून टोकाचे वाद झडले असा हा शब्द आहे. ‘सेक्युलर’, ‘फेक्युलर’, ‘स्युडो सेक्युलर’ अशी अनेक शेलकी विशेषणे आजदेखील त्यामध्ये प्रामुख्याने वापरली जातात. ह्या सगळ्या विषयीदेखील एकदम वेगळा आणि फ्रेश दृष्टिकोन ह्या पुस्तकाने मला मिळाला. केवळ राज्यसंस्था व धर्म यांची विभागणी किंवा देव व धर्म यांच्यापासून मुक्ती अशा कोणत्याही प्रचलित अर्थाच्या पलीकडे जाणारा सत्याचा शोध, स्वातंत्र्य व सहभाव ह्यांच्यावर आधारित सेक्युलॅरिझमचा अर्थ हे पुस्तक आपल्यासमोर मांडते. धर्मनिरपेक्षता ह्या विषयाची चर्चा सध्यापेक्षा एकदम वेगळ्या प्रतलात घेऊन जाण्याची शक्यता असलेली ही मांडणी आहे आणि म्हणूनच तिने माझ्या विचाराला भरपूर खाद्य पुरवले.

आणखी अशी एक गोष्ट म्हणजे- आपण मानत असलेली विचारधारा तेवढी योग्य आणि तिच्यामध्ये कधीच खोट निर्माण होऊ शकत नाही, असा आपला होणारा समज! जगातले कुठलेही धर्म आणि विचारधारा याला अपवाद नाहीत. तरीदेखील, उदारमतवादी लोकशाही व विज्ञानवाद मानणारा मी आणि माझी विचारधारा अजिबात अशी नाही, असा भ्रम मीदेखील मनाशी खोलवर पोसत होतो! त्यालादेखील ह्या पुस्तकाने सुरुंग लावला. शेवटी धर्म असो किंवा विचारधारा, ह्या सगळ्या आपण एकमेकांना सांगितलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण  कुठलाही धर्म किंवा विचारधारा घ्या- त्याच्या मूळ उद्देशाला व रूपाला छेद देणारी एक भ्रष्ट सावली त्याच्यासोबतच निर्माण होत असते, हे अगदी सहज समजून येणारे आणि इतिहासात असंख्य पुरावे असलेले रोकडे सत्य आहे. त्यामुळे जगाचा अन्वयार्थ लावण्यासाठी आपण जी ‘गोष्ट’ निवडणार आहोत, तिलादेखील कधी ना कधी एक भ्रष्ट सावली निर्माण होणार आहे, याचे भान कधीही आपण विसरता कामा नये; हा पण आणखी एक खूप मोठा धडा मला यामधून मिळाला. खरे तर अशा स्वरूपाचे मूलभूत अपेक्षाभंग झाल्यावर ते पुस्तक वाचणे सोडून द्यावे, असेच कोणालाही वाटू शकते! हे पुस्तक वाचताना माझेही अनेकदा असे झाले. पण हरारीची गंमत अशी आहे की- त्याच्या विचारातील स्पष्टता, युक्तिवादातील सोपेपणा आणि भाषेतील लालित्य ह्यामुळे मी तसे करू शकलो नाही. त्याहीपेक्षा मला त्याच्या लेखनाला बांधून ठेवणारा जो घटक होता, तो म्हणजे हे सर्व करण्यामागची त्याची तळमळ. त्याचे उद्दिष्ट हे आपल्याला घाबरवून टाकणे नसून, सध्याच्या जगाला आणि येणाऱ्या कालखंडाला आपण अधिक चांगले समजून घ्यावे, हे आहे.

बहुतांश इतिहासकार हे कुठला ना कुठला अभिनिवेश वागवत असतात; हरारीचे मात्र असे नाही. आजच्या वास्तवाचे आणि भवितव्यातील शक्यतांचे अधिक चांगले आकलन व्हावे, म्हणून इतिहास समजून घेण्याच्या त्याच्या भूमिकेपासून तो सहसा बाजूला जात नाही. केवळ त्यावर न थांबता माहिती-तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्र- विज्ञान ह्यांच्या आगमनाने आपल्या जीवनात जी काही उलथापालथ होत आहे आणि होऊ शकणार आहे, त्याविषयी तो बोलतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जैवतंत्रज्ञान यांच्या माध्यमातून मानवी इतिहासात पहिल्यांदाच आपल्याला स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोडीला तंत्रज्ञानाची बुद्धिमता वापरता येणार आहे! (जे आज फेसबुक आणि गुगल वापरताना आपण करतच आहोत) मानवी जीवनमान अजून काही दशकांनी वाढणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जैवतंत्रज्ञानाच्या हस्तक्षेपाने ज्याला आपण आपला स्व म्हणतो तो दुसऱ्याच कोणत्या तरी अल्गोरिदमच्या अधिक प्रभावाखाली जगायला लागणार आहे, हे पुस्तकात सप्रमाण वाचायला मिळते.

सगळ्या शक्यता पडताळून पाहताना, एका चांगल्या दार्शनिक भाष्यकारासारखे काही पर्याय हे पुस्तक आपल्याला सुचवते. आपला मेंदू आपल्याच ताब्यात राहावा आणि कुठल्या तरी फेसबुक किंवा गुगलसारख्या अल्गोरिदमने चोरून प्रभावित करू नये, म्हणून तरी स्वत:चा शोध घ्या- हे त्याचे सांगणे एकाच वेळी गंमतशीर आणि दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक म्हणावे असे आहे. आपले आयुष्य अर्थपूर्ण व्हावे आणि स्वत:चा शोध घेता यावा, या मानवी मनात खोलवर रुजलेल्या भावना असतात. या दोन्ही गोष्टींच्या विषयीदेखील ह्या पुस्तकाने मला खूप खाद्य पुरवले. स्वत:च्या शोधासाठी लेखक विपश्यनेच्या माध्यमातून त्याने केलेल्या प्रयत्नांविषयी बोलत राहतो. त्याविषयी मतमतांतरे होऊ शकतात, पण कुठल्याही धार्मिक अधिष्ठानाच्या पलीकडे जाऊन केवळ मेंदू- विज्ञानाच्या माध्यमातून स्वत:चा व जीवनातील अर्थपूर्णतेचा शोध घेता येऊ शकतो, ही माझी धारणा बळकट करायला ह्या पुस्तकाने बळ दिले. माझ्या अनेक पूर्वग्रहांना ह्या पुस्तकाने मुळापासून हलवले, पण त्याची पद्धत हसत-हसत फिरकी घेतल्यासारखी आहे. अत्यंत जोरकस युक्तिवादानंतरदेखील ह्या पुस्तकाचे काम, वाचकाला विचार करायला उद्युक्त करणे हे आहे, याची हरारी परत-परत आठवण करू देत राहतो. ह्या पद्धतीचा माझ्यावर खोल प्रभाव पडला.

‘अनेक वेळा अवघड प्रश्नांची उत्तरे सापडण्याइतकेच किंवा त्यापेक्षा अधिक त्या प्रश्नांची व्यामिश्रता समजून घेणे महत्त्वाचे असते’, हे ह्या पुस्तकाच्या विवेचनातून मला नव्याने उमगले. स्वत:च्या शोधापासून ते मानवी समुदायाच्या आणि विश्वाच्या सामुदायिक उत्थानासाठी आवश्यक नवा अजेंडा समजून घेणाऱ्याने मनातील सगळा गोंधळ कमी होत नसला तरी त्या गोंधळाला सामोरे जाण्याची दिशा तरी ही त्रयी आणि खास करून एकविसाव्या शतकाचे एकवीस धडे ह्या पुस्तकाने मला दाखवली.

(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती , परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र व साधना साप्ताहिक यांच्याशी निगडित आहेत)
९८२३५५७५३१

Previous articleअल्बर्ट एलिस यांचे ‘अ गाईड टू रॅशनल लिविंग’
Next articleमे महिन्यात अनुभवता येईल शून्य सावली दिवस
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.