गंगा, अमरीन आणि पूजा …

-समीर गायकवाड

आर.के.च्या ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये पहाडी भागात राहणाऱ्या भोळ्या भाबडया गंगाला मणिलालने फसवून कोलकात्यात ताजेश्वरी बाईच्या कोठ्यावर आणलेले असते. मणिलालने अंधाचे सोंग घेऊन फसवून तिला तिथे आणलेले असते. निष्पाप गंगाला तिथे आल्यावर काय करावे, कुठे जावे काहीच कळत नाही. शिवाय तिच्याजवळ तिच्या प्रेमाची निशाणी असते. नरेनचे मुल तिच्यापाशी असते. त्यामुळे तिला जीवही देता येत नाही. ते मुल नरेनच्या स्वाधीन केलं की पुढचा कोणताही मार्ग निवडायची तिची तयारी असते. पण या कोठ्यातून बाहेर कसे पडावे तिला उमजत नाही. न राहवून एकदा ती मणिलालला सुनावते देखील – “बाबा दोबारा ऐसा किसी के साथ न करना ! वरना दुनिया का अंधोंसे भरोसा उठ जायेगा…. औरत की हाय से दूर रहना…’ निळ्या डोळ्याची मंदाकिनी तिच्या किंचित घोगऱ्या आवाजात हा संवाद असा काही बोलून जाते की खल्लास ! तिचे बोल ऐकून मणिलालच्या डोळ्यात पाणी येते. तो निमूटपणे मान खाली घालून जातो.

पुढे एका सीनमध्ये नरेनचे मौसा कुंजविहारी हे गंगाच्या शोधात बनारसला निघालेले असतात. तिकीट काढून होतं आणि घाईघाईत लगबगीने रेशमी धोतराचा सोगा हातात धरून चालताना तिथून जाणाऱ्या मणिलालला त्यांची धडक बसते. कुंजविहारी गाण्यातला दर्दी माणूस आणि त्याची बायकोच मुळात कोठ्यावरची तवायफ असल्याने त्याची ह्या क्षेत्रातल्या सर्वांशी तोंडओळख असते. तो मणिलालला ओळखतो.

गालातल्या गालात हसत विचारतो, “कैसे हो मणिलाल ? शिकार से आ रहे हो या शिकार पे जा रहे हो ?”

मणिलाल चमकतो. अपराधी चेहऱ्याने उत्तरतो, “कुंज बाबू अब मैने वो धंदा छोड दिया है. एक चोट खाई हुई घायल पहाडन लडकीने मुझे सही रास्ते पे लाया है !”

कुंज ओळखतो की, ती मुलगी म्हणजेच गंगा असणार. मग तो मणिलालला गंगाकडे नेण्याची विनंती करतो आणि ते दोघे गंगाकडे जातात. नंतर पुढे जाऊन गंगाची सुटका होते. नरेनच्या प्रेमाचा प्रश्न असो वा मणिलालची फसवाफसवी असो किंवा ‘गंगा मेली आहे’ असं आधी खोटं सांगणारा कुंज असो सगळे स्त्रीचाच वापर करतात. गंगाचे नशीब तरी चांगले असते तिची शेवटी सुटका होते आणि नरेनशी भेट होते.

पण सगळ्याच स्त्रियांचे नशीब ‘गंगा’सारखे नसते. ‘अमरीन’सारख्या स्त्रिया जास्ती असतात. ‘आईना हमे देखके हैरान सा क्यू है?’ असा सवाल घेऊन फिरणाऱ्या देखण्या अमरीनचे पात्र साकारले होते रेखाने ! चित्रपट होता मुजफ्फर अलीचा ‘उमराव जान’ ! अमरीनची जगण्याची आणि प्रेमाची लढाई एकाच वेळी सुरु असते. खरे तर रोजच्या जगण्याच्या रोजीरोटीच्या लढाईत आजकाल जो तो हैराण आहे. प्रत्येकाला काही तरी हवंय, अन या हव्याहव्याशा हव्यासात नाती पणाला लागतात. ‘दिल की धडकन’ वगैरे सगळे नाजूक गोष्टी केव्हाच बेजान होऊन जातात कळत नाही अन काळजाचा दगड होत जातो. तर ही अमरीन म्हणजे जणू ‘दु:ख की लंबी काली सहमी सहमीसी रात’ असते !

प्रेमात हरलेल्या अमरीन (रेखा) तवायफच्या काटेरी एकाकीपणाची दर्दभरी दास्ताँ ‘उमराव जान’मध्ये पेश केली होती. एकापेक्षा एक दिलकश गझला यात होत्या आणि जोडीला आरस्पानी सौंदर्याच्या रेखाचा जिवंत सशक्त अभिनय. या अमरीनने आयुष्याचा वळणावळणाचा मोठा प्रवास एकटीने घालवलेला. दारोदार धक्के खाऊन ती योगायोगाने तिच्या बालपणीच्या गावी पोहोचते. तिच्या आई आणि भावाला भेटते. पण तिचे भाऊबंद तवायफ झालेल्या बहिणीला स्वीकारायला साफ नकार देतात. प्रियकराने ठोकरलेल्या, आई-भावाने नाकारलेल्या, प्रीतीच्या, रक्ताच्या नात्यामधले फिजूलपण उमगलेल्या अमरीनला भूतकाळाच्या पडद्याआडचे ते सोनेरी दिवस आठवतात. तिच्यासाठीही या अलम दुनियेत कुठंतरी.. कुणीतरी व्याकूळ झालं असेल, अशी फोल आशा ती करत राहते.

‘बुला रहा है कौन मुझको, चिल्मनो के उस तरफ

मेरे लिए भी क्या कोई उदास बेकरार है?’ तिची ही विराणी हवेत विरत जाते ….

वापरून झाल्यावर जे एकाकीपण असतं ते वाईट असतं. त्यामुळे आपला वापर होऊ न देता आपल्या नवऱ्याला खडसावणारी ‘अर्थ’मधली शबाना आझमीची पूजा मल्होत्रा मला जास्त पटते. तिचा टोन विद्रोहाचा असला तरी तो अस्मिता जपणारा आहे. अर्थात हे सांगता यायला स्त्रीमध्ये तितके बळ आणि धाडस हवे. ‘अर्थ’मधील ‘इंदर मल्होत्रा’ची पहिली पत्नी ‘पूजा’ त्याच्या आयुष्यात सुखैनैव असूनही ‘कविता सन्याल’च्या रूपाने दुसरी स्त्री त्याच्या आयुष्यात येते अशी कथेची प्राथमिक मांडणी होती. इंदरला जेव्हा पूजाच्या आयुष्यात ‘राज’ येईल असे वाटते तेव्हा मात्र तो बेचैन होतो. त्याचवेळी तो स्वतः कवितामध्ये गुंतलेला असतो. तो स्वतःला पूजापासून विलग करतो. सिनेमाच्या अखेरीस तो पुन्हा तिच्याकडे परततो. तेव्हा ती त्याच्यासाठी आपली दारे बंद झाल्याचे सांगते ! जे पुरुषाने केले तेच स्त्रीने केले तर चालेल का असा रोकडा सवाल विचारत ती आपला आणखी वापर होऊ देत नाही…

आयुष्य म्हणजे केवळ जगण्याची लढाई नाही. ही तर प्रेमाची अन आस्थेचीही लढाई आहे याचा जेव्हा विसर पडतो तेंव्हा माणसं एकमेकाला वापरू लागतात. पुरुष सहीसलामत एकेमकाला कधी गंडवत तर कधी दुसऱ्याला अडकवून यातून बाहेर पडतात. पण स्त्रियांमध्ये एखादीच ‘पूजा मल्होत्रा’ असते जी आपला निर्णय सदसदविवेकबुद्धीच्या आधारे ठामपणे घेऊ शकते. बहुतांश स्त्रिया ह्या गंगा आणि अमरीन सारख्या असतात, ‘नियती खेळवेल तसे खेळत जाते’ असं म्हणत आपल्या दुबळेपणाची ढाल नियतीला करून जगणाऱ्या….

(लेखक नामवंत स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत)

८३८०९७३९७७

समीर गायकवाड यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –समीर गायकवाड– type करा आणि Search वर क्लिक करा.