-अविनाश दुधे
दिनांक -२५ जून २०२१
आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ आठवतो?
त्या सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये आमिरखान पर्वतरांगांनी वेढलेल्या निळ्याशार पाण्याच्या विशाल तलावाकाठी लडाखी पोरांसोबत पतंग उडवत असतो. तेवढ्यात करीना कपूर नववधूच्या वेशात पिवळ्या रंगाच्या स्कुटरवर लाल रंगाचे हेल्मेट घालून त्याच्याकडे येते. (गजब कलर कॉम्बिनेशन होतं ते) आमिर चकीत होऊन पाहत असतानाच ती स्कुटरवरून उतरते, ‘न सांगता का निघून गेलास?’ असा प्रश्न करते.
आमिर काही उत्तर देण्याचा आतच ती त्याच्या गालावर सणसणीत एक लावून देते.
नंतर ती विचारते- लग्न केलं? तो उत्तर देतो- नाही
ती थोडी रिलॅक्स होऊन पुढचा प्रश्न विचारते-‘किसीं से प्यार करते हो?’
तो उतरतो-yaah
करिनाचा चेहरा एकदम पडतो. तरी शेवटचा प्रश्न विचारायचा म्हणून ती विचारते, -Who?
आमिर म्हणतो-You
त्याक्षणी सारं विसरून ती त्याच्या ओठाचे करकचून चुंबन घेते.
आवेग ओसरल्यावर ती म्हणते-देखा…नाक बिचमे नही आती है स्टूपिड…
……….
‘थ्री इडियट्स’ चा हा सीन लडाखमधील ज्या Pangong लेकवर चित्रित झाला, त्या लेकवर काल आणि आज आम्ही होतो.
या लेकबाबत जेवढं सांगितलं जातं, त्यापेक्षा तो अधिक सुंदर आहे. याचं सौन्दर्य अनुभवणं म्हणजे lifetime experience आहे.
चारही बाजूने सतत रंगसंगती बदलणाऱ्या पर्वतरांगा, त्यातील अनेक पर्वतरांगा बर्फाने झाकलेल्या आणि त्याच्या मधोमध निळ्याशार पाण्याचा हा विशाल जलाशय. Pangong लेकची लांबी १२० किमी (६२० चौरस मीटर) तर रुंदी काही ठिकाणी ६ ते ७ किमी आहे. या जलाशयाचा ७० टक्के भाग चीनमध्ये तर उरलेला भारतात आहे.
स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या दिवशी पर्वतरांगाचे सप्तरंगी प्रतिबिंब स्पटिकासारख्या चकाकत्या पाण्यात पाहण्याचा आनंद काही औरच असतो.
Pangong लेकच्या काठावर उभं राहून याचं सौदर्य डोळ्यात किती साठवू नी किती नाही, असं होतं. अशावेळी शरीराच्या विविध भागांवर डोळे उगवले असते, तर बरं झालं असतं, असे वाटल्याशिवाय राहत नाही. कितीही वेळ येथे बसलो तरी समाधान होत नाही. मात्र सतत वाहणारे बोचरे वारे फार काळ तुम्हाला तिथे बसू देत नाही. नितळ पाण्यात हात टाकण्याची अनिवार इच्छा होते. मात्र हात टाकला की थंड पाण्याचा झणझणीत झटका बसतो. ती थंडी पुढे बराच वेळ जात नाही.
Pangong lake आज भारतातील Hot destination पैकी एक आहे. या लेकवर देशातील अनेक राज्यातील पर्यटक भेटतात. कोरोनाची लाट ओसरल्यांनातर सध्या लडाखला पर्यटकांची चांगली गर्दी आहे. सध्या एकट्या दिल्लीतून दिवसाला दहा विमान लेहसाठी सुटतात. मुंबई, चंदीगड व इतर शहरातून येणारी विमान वेगळी. याशिवाय श्रीनगर वा मनालीवरून मोठ्या संख्येने बायकर्स येतात.
सोनू नावाचा Guide सांगत होता- ‘थ्री इडियट्स’ नंतर Pangong ला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. वर्षाला किमान दीड लाख लोक येतात.
Pangong lake हा भाग संरक्षणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात व वन्य जीव अभयारण्यात येत असल्याने येथे कायमस्वरूपी बांधकामाला परवानगी नाही. Tourist Season च्या काळात कापडी वा लाकडी तंबू उभारण्यास परवानगी दिली जाते. त्यात पुरेशा सोयी असतात. वीज मात्र रात्री काही तासच जनरेटरच्या साहाय्याने पुरवली जाते. मोबाईल येथे चालत नाही. कोणतंच नेटवर्क नाही.
जगात कुठला तरी भाग असा आहे की जिथे मोबाईल नेटवर्क नसतं आणि विजही नसते, हे पाहून खूप शांत वाटतं.
Pangong lake च्या ज्या भागात ‘थ्री इडियट्स’ चा तो सीन चित्रित झाला तिथे आता करीना कपूरच्या चित्रपटातील नववधूच्या गेटअपमध्ये फोटो काढून देण्याची सोय आहे. शिवाय ढुंगणाच्या आकाराच्या सीटवर बसून आमीर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी हे तिघे ‘ऑल इज वेल…’म्हणतात. तसे फोटोही युवक काढून घेतात.
थोडक्यात ‘थ्री इडियट्स’ चित्रपटामुळे या भागाचं अर्थकारण बदललं आहे
मात्र प्रचंड संख्येने येणारे पर्यटक, त्यांच्या गाड्या, त्यांच्या शहरी सवयी, त्या पूर्ण करण्यासाठी नियमांची मोडतोड करणारे व्यावसायिक, कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाट लावण्याच्या आपल्या भारतीयांची सवय यामुळे या परिसराचं Virgin सौन्दर्य किती दिवस कायम राहील, याबाबत शंका आहे.
या स्वर्गीय सौन्दर्याला मानवी नजर लागण्यापूर्वी एकदा नक्की जाऊन या.
…………………………….
दिनांक -२७जून २०२१
@Shey-रॅंचोची शाळा
आज आम्ही ‘थ्री इडियट’ चित्रपटातील रॅंचोच्या शाळेला भेट दिली. या शाळेचे खरे नाव Druck White Lotus School आहे.
‘थ्री इडियट’ सिनेमानंतर लडाखला आलेले पर्यटक आवर्जून या शाळेला भेट देतात. ही शाळा लडाखमधील उत्तम शाळा म्हणून ओळखली जाते. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्काराने ही शाळा गौरविली गेली आहे.
मात्र चित्रपटात उल्लेख झालेलं फुंगशुक वांगडू नावाचं Character प्रत्यक्षात नाही आणि त्याचा त्या शाळेसोबत काहीही संबंध नाही. ते कल्पनेतील एक पात्र होते.
फुंगशुक वांगडू हे पात्र सोनम वांगचुक या स्कॉलरवरून घेतलं आहे. लडाखच्या विद्यार्थी शिक्षण व सांस्कृतिक चळवळीचा तो संस्थापक आहे. शिक्षण क्षेत्रात तो अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतो.
सध्या कोरोनामुळे लडाखमधील शाळांना सुट्या असल्याने ही शाळा बंद होती. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना भेटता आले नाही. Goggle वर Druck White lotus School बाबत माहिती उपलब्ध आहे.
(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक आणि वेब पोर्टलचे संपादक आहेत)
8888744796