निकिता ठुकराल ते प्रियांका चोप्रा… ते प्रियांका चोप्रा… कहाणी सेम!

-अमोल उदगीरकर

आपल्या देशातल्या बहुतेक फिल्म इंडस्ट्री प्रमाणेच कन्नड फिल्म इंडस्ट्रीचा पाया पण सुपरस्टारच्या स्टारडमवरच आहे . एके दिवशी अख्खा कर्नाटक एका खळबळजनक बातमीने जागा झाला . एका अभिनेत्याच्या पत्नीने आपल्या पतीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली .आपल्या पतीचे दुसऱ्या एका अभिनेत्रीशी अफेयर चालू असून त्याला आपण आता पत्नी म्हणून नकोशा झालो आहोत अशी तिची तक्रार होती .पती रोज दारू पिऊन आपल्याला मारहाण करतो असं तिचं म्हणणं .एके दिवशी खूप मार खाल्ल्यावर तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली . हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून कन्नड फिल्म फिल्मइंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा स्टार दर्शन होता .दर्शन हा सातत्याने हिट देणारा कन्नड प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत .कन्नड प्रेक्षक प्रेमाने त्याला ‘द बॉस ‘ म्हणून संबोधतात. सहकलाकार निकिता ठुकरालसोबतच्या त्याच्या अफेयरच्या बातम्यांनी गॉसिप कॉलम्स ओसंडून वाहत होते .

अभिनेता दर्शन पत्नीसह

 तर या तक्रारीनंतर कर्नाटकात खळबळ उडाली . त्याच्या बायकोचे मार खाल्ल्यानंतरचे अंगावर ,चेहऱ्यावर व्रण असणारे फोटो सगळीकडे वायरल झाले .आता दर्शनची कारकीर्द संपणार आणि तो जेलमध्ये जाणार अशा वावड्या उठू लागल्या . दर्शनच्या सिनेमाचे प्रदर्शन थांबले .पण यात निर्मात्यांचं -वितरकांचं प्रचंड नुकसान होणार होतं .मग या सगळ्या प्रकरणानंतर कन्नड निर्मात्यांची संघटना उतरली .काही वरिष्ठ निर्मात्यांनी दर्शनच्या बायकोला वडीलकीच्या नात्याने खूप समजावलं .दर्शनने जाहीररीत्या बायकोची माफी मागितली . बायकोने तक्रार मागे घेतली .दोघांचा संसार पुन्हा सुरु झाला .दर्शनच्या सिनेमाच्या रिलीजचा रस्ता मोकळा झाला . दर्शनच्या चाहत्यांची तिकीट खिडकीवर पुन्हा झुंबड उडाली . पण या सगळ्याची मोठी किंमत एका तिसऱ्याच माणसाला अनपेक्षितपणे द्यावी लागली . कन्नड निर्मात्यांच्या संघटनेने या सगळ्या प्रकरणाचं खापर निकिता ठुकरालवर फोडलं .त्यांच्यामते या बाईमुळेच सगळं घडलं होत .निकिताची नुकतीच उमलू लागलेली कारकीर्द संपली .नताशा अज्ञातवासात निघून गेली .

Actor Deeleep

दिलीप म्हणजे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधलं मोठं प्रस्थ . मोहनलाल आणि मामुटीच्या खालोखाल दिलीपचं नाव घेतलं जातं . तर या दिलीपचं एका अभिनेत्रीसोबत वाजलं . ही अभिनेत्री आपल्या बायकोला आपल्याबद्दल ,आपल्या अफेयर्सबद्दल सांगते असा समज त्याचा झाला . दिलीपने याला प्रत्युत्तर दिलं ते भयंकर होत . एके दिवशी ही अभिनेत्री आपल्या शूटिंगसाठी आपल्या गाडीतून प्रवासाला निघाली होती .रस्त्यात काही गुंडानी तिची गाडी अडवली . गुंड तिच्या गाडीत शिरले .तिच्यासोबत बळजबरी करून त्याचं पद्धतशीर शूटिंग केलं . दिलीपच्या बायकोचे यापुढे कान भरले तर ही व्हिडीओ क्लिप सगळीकडे वायरल करू अशी धमकी देऊन तिला सोडलं . हादरलेली अभिनेत्री तिथून तडक पोलीस ठाण्यात गेली . दहशतीविरुद्ध झुकणं तिनं नाकारलं . मग कोर्टात केस उभी राहिली . कोर्टातली ट्रायल ‘दामिनी ‘ मध्ये अमरीश पुरीचा चढ्ढा वकील दामिनीची ज्या प्रकारे ट्रायल घेतो त्याची आठवण करून देणारी होती . अनेक अपमानास्पद प्रश्न जाहीररीत्या विचारण्यात आले . मल्लू प्रेक्षकांनी , व्यवस्थेने , इंडस्ट्रीने आपली बाजू निवडली होती .ती अर्थातच दिलीपची होती . उल्लेखित अभिनेत्रीवर बहिष्कार टाकण्यात आला . ती मल्याळम इंडस्ट्रीतून बाहेर फेकली गेली . दिलीप काही काळासाठी जेलमध्ये गेला .त्याच्या बायकोने त्याला घटस्फोट दिला . दिलीप जेलमधून बाहेर आला . त्याला पुन्हा सिनेमे मिळायला लागले . कोर्टात केस चालूच आहे .

प्रियांका चोप्राची कारकीर्द फुल स्विंगमध्ये होती . एका मागे एक हिट्स देत होती . ‘फॅशन ‘ साठी राष्ट्रीय पुरस्कार .करीनासारख्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला तिने कधीच मागं टाकलं .सगळं कसं स्वप्नवत चालू होतं . दरम्यान तिच्या अक्षय कुमारसोबतच्या आणि शाहरुख खान सोबतच्या अफेयरच्या चर्चा उडू लागल्या होत्या . मग बॉलिवूडमधला ‘स्टार वाईव्ज ‘ क्लब एकत्र आला . प्रियांकाविरुद्ध सोशल मीडियावर ,मेनस्ट्रीम मीडियामध्ये मोहीम सुरु झाली . निर्मात्यांवर दबाव आणून तिला सिनेमे मिळू नयेत अशी व्यवस्था करण्यात आली . सातत्याने हिट देऊन पण प्रियांकाला मिळणारे सिनेमे कमी होऊ लागले . प्रियांकाविरुद्धच्या मोहिमेला यश मिळालं . आता काय प्रियांका संपलीच . तिची पण निकिता ठुकराल होणार याबद्दल कुणाला शंका नव्हती .पण प्रियांका खमकी होती . कुणीही येऊन आपल्या पायाखालची जाजम ओढून काढतो हे ती सहन करणारी नव्हती . तिलाचं बॉलिवूडची गरज आहे अशातला भाग नव्हता .तिने आपला मोर्चा डायरेक्ट हॉलीवूडकडे वळवला . ‘क्वांटिको ‘ सारखी सीरिज , ‘बेवॉचं ‘ सारखा सिनेमा केला .इतरही अनेक प्रोजेक्ट केले . पिटबुलसोबत अल्बम केला . छोट्या तळ्यातला मोठा मासा होण्यापेक्षा ,मोठ्या तळ्यातला छोटा मासा होणं तिन स्वीकारलं . आज तिची ब्रँड व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू पहील्यापेक्षा किती तरी जास्त आहे . हे फक्त प्रियांका चोप्राचं करू शकते .

वरील तिन्ही केसमधल्या व्हिक्टिम महिला आहेत .त्या कदाचित परिपूर्ण नसतील . आपल्या सारख्याच गुण दोष त्यांच्यातही असतीलच . पण प्रस्थापित व्यवस्थेने अशा गुन्ह्यांचं खापर शंभर टक्के त्यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला ज्यात त्या एकट्या गुन्हेगार नव्हत्या किंवा गुन्हेगार नव्हत्याचं . आपल्या व्यवस्थेमध्ये तुम्ही गुन्हेगार आहात की नाही हे तुमचं जेंडर , जात , धर्म बघून अनेकदा ठरवण्यात येतं . अनेकदा ऑफिसमध्ये शांत राहून , क्रेडिट न घेता काम करणाऱ्या माणसावर अपयशाचं खापर फोडण्यात येतं . घरात निमूटपणे आपली कर्तव्य बजावणाऱ्या मुखदुर्बळ माणसाच्या पदरात सगळ्या चुकांचं माप टाकलं जातं . कारण आपल्यापैकी प्रत्येक जण कुठे न कुठे ‘कमजोर कडी ‘ असतो . आवाजचं नसण्यापेक्षा आवाज न उठवणं हे जास्त मोठं पाप . कुणीही उठून तुमच्या डोक्यावर कशाचं खापर फोडू लागलं ,तर लगेच आवाज उठवायचा . असा उठवलेला प्रत्येक आवाज प्रस्थापित व्यवस्थेला बहिर करू शकतो . एवढंच .

(लेखक नामवंत स्तंभलेखक आहेत)

7448026948

Previous articleअर्थक्षेत्राचा खेला होबे:अराजकाकडे वाटचाल
Next articleभाऊ…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.