–नीलांबरी जोशी
“तेव्हा मुस्लीम जगतातून माणसं निवडून अमेरिकेनं एक सिक्रेट आर्मी तयात केली. त्यांना पाकिस्तानातल्या कॅंपमध्ये सीआयए / ब्रिटनच्या एमआय६ आणि पाकिस्तान इंटेलिजन्स यांच्या सहकार्यानं प्रशिक्षण दिलं गेलं. काहीजणांना “इस्लामिक कॉलेज आॉफ ब्रुकलिन”मध्ये प्रवेश दिला. “ट्विन टॉवर्स” नजरेसमोर असलेल्या या कॉलेजमध्ये प्रवेश दिलेला एक सौदी इंजिनिअर होता – ओसामा बिन लादेन.”
अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारा हा उत्कृष्ट लेख जॉन पिल्जर या पत्रकारानं लिहिला आहे.
***********
लेखातले काही मुद्दे-
“पाश्चिमात्य जग नक्राश्रू ढाळत असताना प्रत्यक्षात इतिहास दडपला जातोय. काही दशकांपूर्वी अफगाणिस्ताननं आपलं स्वातंत्र्य कमावलं होतं. जे अमेरिका, ब्रिटन आणि दोस्तराष्ट्रांनी बेचिराख केलं..”
***********
अफगाणिस्तानमध्ये १९७८ साली “पीपल्स पार्टी आॉफ अफगाणिस्ताननं (पीडीपीए)” या पक्षानं मोहम्मद दाऊदची (झहीर शेर या राजाचा पुतण्या) हुकूमशाही उलथून लावली. अमेरिकन आणि ब्रिटिश लोकांना याचं चांगलंच आश्चर्य वाटलं.
आधुनिक, सहिष्णू आणि समाजवादी विचारांचं नवीन सरकार अफगाणिस्तानात स्थापन झालं. महिला आणि अल्पसंख्यांक यांना समान हक्क देणारं ते सरकार होतं. राजकीय कैद्यांना या सरकारनं मुक्त केलं.
मोहम्मद दाऊदच्या राजेशाहीच्या काळात अर्भकांचं आयुर्मान फक्त ३५ टक्के होतं. तीन मुलांपैकी एक अर्भक मरण पावत होतं. ९० टक्के लोक अशिक्षित होते. नवीन सरकारनं देशात वैद्यकीय सेवा पुरवल्या. साक्षरता अभियान राबवलं. याचा परिणाम म्हणून १९८० साली अफगाणिस्तानात महाविद्यालयांमधल्या शिकणार््यांामध्ये निम्म्या मुली होत्या. तिथल्या डॉक्टर्सपैकी ४० टक्के महिला होत्या, शिक्षकांमध्ये ७० टक्के महिला होत्या आणि सरकारी नोकरदारांमध्ये ३० टक्के महिला होत्या.
सायरा नूरानी या सर्जननं २००१ मध्ये अफगाणिस्तान सोडलं तेव्हा ती म्हणाली होती “प्रत्येक मुलगी शाळा / कॉलेजमध्ये जाऊ शकत होती. आम्हाला हवं तिथे फिरण्याची आणि हवं ते परिधान करण्याची मुभा होती. आम्ही हव्या त्या कॅफेत जायचो आणि दर शुक्रवारी नवीन इंडियन सिनेमा पहायचो. मुजाहिद्दिन सत्तेवर यायला लागल्यापासून हे चित्र पालटलं. त्यांना पाश्चिमात्य देशांचा पाठिंवा होता.”
***********
१९७९ साली जिमी कार्टर या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं ५०० मिलियन डॉलर्स एका गोपनीय कार्यक्रमासाठी मंजूर केले. अफगाणिस्तानातलं पहिलं प्रागतिक सरकार उलथून लावणं हा तो कार्यक्रम. सीआयएच्या या योजनेचं नाव होतं “आॉपरेशन सायक्लॉन” . यातले ७० मिलियन डॉलर्स तर फक्त लाच देण्यात खर्च झाले होते. वॉशिंग्टन पोस्टचा वार्ताहर बॉब वूडवर्ड (आॉल द प्रेसिडेंटस मेन हा चित्रपट याच्याच पुस्तकावर आधारित आहे..) यानं सीआयएच्या एका एजंटची याबाबत घेतलेली एक मुलाखतही नमूद केली होती.
इस्लामिक मूलतत्ववाद आशियामध्ये पसरवून सोव्हिएत युनियनचा नाश हा या सगळ्यामागचा उद्देश होता.
तेव्हा मुस्लीम जगतातून अमेरिकेनं एक सिक्रेट आर्मी तयात केली. त्यांना पाकिस्तानातल्या कॅंपमध्ये सीआयए / ब्रिटनच्या एमआय६ आणि पाकिस्तान इंटेलिजन्स यांच्या सहकार्यानं प्रशिक्षण दिलं गेलं. काहीजणांना “इस्लामिक कॉलेज आॉफ ब्रुकलिन”मध्ये प्रवेश दिला. ट्विन टॉवर्स नजरेसमोर असलेल्या या कॉलेजमध्ये प्रवेश दिलेला एक सौदी इंजिनिअर होता – ओसामा बिन लादेन.
***********
त्यानंतर सहा महिन्यांतच अमेरिकेने तयार केलेल्या जिहादी लोकांपासून अफगाणिस्तानचं संरक्षण करण्यासाठी सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानात घुसल्या. मुजाहिदीननं रेड आर्मी अखेरीस अफगाणिस्तानातून हुसकावून लावली.
मुजाहिदीनांच्या ताब्यात अफूचा व्यापार होता. या तालिबानी लोकांमुळे अफगाणिस्तानातलं महिलांचं अस्तित्व धोक्यात आलं.
१९९६ साली पीडीपीएचा पंतप्रधान मोहम्मद नजबुल्ला याला रस्त्यावरच्या एका दिव्याच्या खांबावर फासावर लटकावलं.
***********
९/११ नंतर अफगाणिस्तानवर हल्ला करताना “आमचा दयाळूपणा अफगाणिस्तानमधल्या लोकांना दिसेल. आम्ही लष्कर तैनात केल्यावर जनतेसाठी खाद्यपदार्थ आणि आौषधं यांची पाकिटं टाकू..” असं जॉर्ज बुश हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणला होता.
१८ महिन्यांनंतर पाहिलं तर, विमानातून पडणारी पिवळी पाकिटं ही खाद्यपदार्थांची आहेत असं अफगाणिस्तानातल्या लोकांना वाटायचं. प्रत्यक्षात त्या बॉंबसमुळे अनेक भुकेली लहान मुलं मृत्युमुखी पडली. असं पिल्जर या लेखात म्हणतो.
ओरिफा नील या महिलेचा नवरा आणि सहा मुलं अशाच बॉंबहल्ल्यात मरण पावली. काही महिन्यानंतर तिला अमेरिकन लोकांनी नुकसानभरपाईचं पाकिट दिलं.. त्यात १५ डॉलर्स होते.. ७ जण मरण पावले.. त्या प्रत्येकासाठी २ डॉलर्स अशा हिशेोबानं दिलेले..
(हा प्रसंग ज्यात चित्रित केला आहे ती खालील – जॉन पिल्जरची २००३ सालची “ब्रेकिंग द सायलेन्स” ही डॉक्युमेंटरी बघायलाच हवी.)
***********
मूळ लेखाची लिंक-
https://zcomm.org/…/the-great-game-of-smashing-countries/
(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)
…………………………