वैशाली महाडिक आणि निसार अली सय्यद: ‘अंडरस्टँडिंग आणि ॲडजस्टमेंट’ महत्वाची!

(साभार:’कर्तव्य साधना’ –आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : भाग १३)

(मुलाखत व शब्दांकन – हिनाकौसर खान-पिंजार)

वैशाली महाडिक आणि निसार अली सय्यदधर्म भिन्न असले तरी कुटुंबाची ओढगस्त अवस्था दोघांच्या घरी सारखीच होती. त्यांतूनच नोकरी ही त्यांची गरज झाली आणि एका एनजीओच्या माध्यमातून दोघांची भेट झाली. पुरेसे समंजस निसार अली आणि अवखळ हसऱ्या वैशाली… अशी दोघांची स्वभाववैशिष्ट्यं… दोघांनाही पूर्ण करत होती. कामाच्या सहवासातून दोघांनी एकमेकांची पारख केली आणि 6 जून 2003 रोजी विशेष विवाह कायद्यानुसार विवाहबद्ध झाले.

……………………………………

वैशाली यांचं बालपण मुंबईत गोरेगाव पूर्वमधल्या संतोषनगर परिसरात गेलं. चौकोनी कुटुंब असलं तरी परिस्थिती बेताची होती. त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण कसंबसं घेतलं आणि त्यानंतर लगेच नोकरीची वाट धरली. लग्नानंतर नाशीकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून त्या बीकॉम झाल्या. प्रत्यक्ष फिल्डवर्कमधून आणि सामाजिक कामातूनच त्यांनी सामाजिक भान आत्मसात केलं. लोकांच्या भल्याबुऱ्या प्रतिक्रियांतून जगण्याचं तत्त्वज्ञान मिळवलं. हसमुख स्वभावाच्या वैशाली यांनी मुलीच्या जन्मानंतर नोकरी सोडली. त्यांनी मुंबईत प्रसिद्ध असलेल्या टिफिन सर्व्हीसच्या व्यवसायात उडी घेतली. टिफिनप्रमाणे आणि ऑर्डरप्रमाणे घरगुती जेवण देण्याचं अन्नपूर्णाचं काम त्या करत आहेत. सोबतच ते त्यांच्या सामाजिक संस्थेतून विविध उपक्रम राबवतात.

निसार अली सय्यद हेसुद्धा मुंबईचे. वडील पोलीसखात्यात असल्यानं त्यांचं बालपण विविध पोलीस वस्त्यांमध्ये गेलं आहे. निसार यांचं कुटुंब मोठं आहे. आठ भाऊ, एक बहीण आणि आईवडील. वडलांच्या आजारपणानंतर निसार यांचं शिक्षण सुटलं, मात्र तरुण वयातच राष्ट्र सेवा दलाच्या संपर्कात आल्याने ते विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी झाले. कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी त्यांनी विविध नोकऱ्या केल्या. त्यांतून त्यांचं व्यक्तिमत्त्व घडत गेलं. सध्या ते स्वतःची सामाजिक संस्था चालवतात. तसंच सकाळ आणि पुढारी या दैनिकांसाठी फ्रीलान्स पत्रकारिता करत आहेत.

वैशाली आणि निसार यांच्या सहजीवनाला आता 18 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यांना इशा नावाची 13 वर्षांची एक मुलगी आहे. त्यांच्या सहजीवनाविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी केलेला हा संवाद.

प्रश्न – तुमची जडणघडण कशी झाली?

निसार अली – माझा जन्म मुंबईतलाच. माझे वडील पोलीस विभागात होते. आई अशिक्षित होती. दोघंही मूळचे खानदेशातले होते. वडील अंमळनेरचे तर आई धुळ्यातली होती. वडलांच्या नोकरीमुळं लग्नानंतर दोघंही मुंबईतच स्थायिक झाले. त्यामुळं आमचं बालपण मुंबईच्या विविध पोलीस वस्त्यांमध्ये, पोलिसांच्या इमारतींमध्येच गेलं. माझा जन्म झाला तेव्हा वडलांचं माहीम इथं पोस्टिंग होतं. मला आठ भाऊ आणि एक बहीण. मी कुटुंबातलं सहावं अपत्य. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण उर्दू माध्यमातून झालं. पुढं वडलांची कॉफ्रेड मार्केट इथं बदली झाली. सहावी ते दहावीपर्यंत मालाडच्या म्युनिसिपल शाळेत शिकलो. तिथंच बीएसएस कॉलेजमधून बारावी केली. त्यानंतर मात्र शिक्षण सुटलं. त्या काळात वडलांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. घरची परिस्थिती बिकट होत गेली. आधीच मोठं कुटुंब. त्यातून एक भाऊ अचानक गायब झाला. एकदोघांची लग्न होऊन ते विभक्त झाले होते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे माझं अभ्यासातून लक्ष उडालं. बीकॉमच्या पहिल्या वर्षी मी नापास झालो आणि शिक्षण सुटलं. मग कुटुंबासाठी काहीतरी कामधंदा करावा या विचारातून एका रिसॉर्टमध्ये नोकरी स्वीकारली. तिथल्या युनिअनमध्ये सहभागी झाल्यानंतर युनिअननं मॅनेजमेंटशी हातमिळवणी केली आणि मला नोकरीवरून काढलं. त्याविरोधात मी कोर्टातही गेलो. अजूनही ती केस चालू आहे.

वाढत्या वयातल्या चांगल्या संस्कारांतून तुमचं व्यक्तिमत्त्व आकाराला येत जातं. बाहेरची परिस्थिती विचित्र घटना-घडामोडींतून जात असेल तर विशेषकरून चांगल्या माणसांचा सहवास तुमच्यात चांगुलपणा टिकवून ठेवतो. 1989 ते 1992 हा कालखंड बाबरी मशीद, हिंदु-मुस्लीम अस्मिता अशा काही प्रश्नांनी  प्रभावित होता. मी साधारण तेव्हा 18-19 वर्षांचा होतो. त्या काळात आम्ही मालवणमधल्या साने गुरुजी वसाहतीत राहत होतो. तिथं धार्मिक सलोखा बऱ्यापैकी होता. तिथंच राष्ट्र सेवा दलाची एक शाखासुद्धा होती. आमच्या शेजारी राहणारे प्रमोद निगुडकर यांनी माझी सेवा दलाशी ओळख करून दिली. मी तिथं रमून गेलो. तिथल्या वातावरणात  माझा निधर्मी आणि धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन विकसित होत गेला. त्यानंतर 1992मध्ये मुंबईमध्ये दंगल झाली. त्याचा प्रभाव आमच्या मालवण परिसरावरही झाला. त्या दंगलीनंतरच्या पोलीस फायरिंगमध्ये फारूक शेख नावाचा एक तरुण जखमी झाला होता. ही माहिती माझ्या मित्रांना प्रदीप खरात, सुरेश बनसोडे, श्रीधर क्षीरसागर यांना मिळाली. त्यांनी पोलिसांची मदत घेण्याचा, ऍम्ब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न केला. ते काही जमून येताना दिसत नव्हतं तेव्हा फारुखच्या जिवाला धोका आहे हे ओळखून  त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि त्याला बोरिवलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पुढं 24 तास त्याच्या उशाशी बसून राहिले. माझ्यावर या घटनेचा खोल परिणाम झाला. माणुसकीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्याच काळात मी राष्ट्र सेवा दलात प्रचंड सक्रिय झालो होतो. दंगलीच्या काळात आम्ही शांततेसाठी वेगवेगळे उपक्रम करायला लागलो. वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जाऊन काउन्सलिंग करायला लागलो. त्यातही हिंदू कुटुंबांमध्ये मी आणि मुस्लीम कुटुंबांमध्ये माझे मित्र असं जायला लागलो. याचा फायदा असा झाला की, एकमेकांविषयीचं शंकानिरसन होऊन विश्वास निर्माण झाला. अशा घटनांनी माझ्या अनुभवाच्या गाठी बळकट होत गेल्या. जगण्याच्या आकलनाचं माझं फाउंडेशन पक्कं झालं.

वैशाली – आमचं चौकोनी कुटुंब होतं… मी, माझा भाऊ आणि माझे आईवडील. आम्ही मुंबईतच गोरेगावला राहायला होतो. माझे वडील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत नोकरीला होते. आता ते रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करतात. माझी आई आरोग्य कर्मचारी म्हणून काम करते. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण पार्ल्यातल्या शाळेतून झालं. बारावी पार्ला कॉलेज म्हणजे आत्ताचं साठे कॉलेज इथून केलं. लग्नानंतर मी पदवीचं शिक्षण घेतलं. घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे मला शिक्षण सोडून नोकरी करणं भाग होतं. माझं सरळ आयुष्य चालू होतं. लग्नाआधी मला ना जगाचा व्यवहार कळत होता ना सामाजिक भान होतं. आयडियॉलॉजी, वैचारिकता, आपण समाजाचं काही देणं लागतो वगैरे मला काहीच समजत नव्हतं. निसार अली यांच्याशी  लग्न झाल्यावर त्यांच्या सहवासानं, विचारानं सामाजिक भान आलं. जगण्याचं, मुक्त होण्याचं प्रयोजन लक्षात येत गेलं.

प्रश्न – तुम्हा दोघांची भेट कुठं झाली?
वैशाली – एकाच एनजीओच्या नोकरीतून भेट झाली. नोकरीच्या गरजेतूनच आम्ही भेटलो.

निसार अली – रिसॉर्टमधली नोकरी गेल्यानंतर माझ्या एका मित्रानं त्याच्या एनजीओमध्ये नोकरीसाठी विचारणा केली. ‘नवनिर्माण सामाजिक विकास केंद्र’ या नावाची त्याची एक एनजीओ होती. त्या संस्थेचा क्षयरोग (टीबी) विभाग होता. वस्त्यांमधल्या टीबी नियंत्रणाचं काम होतं. वस्त्यांमध्ये फिरून टीबी रुग्ण शोधणं आणि ते औषधं घेत आहेत की नाही हे पाहणं अशा स्वरूपाचं साधारण ते काम होतं. त्या प्रोजेक्टमध्ये मी हेड म्हणून काम करत होतो. तिथंच माझी वैशालीशी ओळख झाली. वैशाली कामात चोख होती, बोलकी होती मात्र काहीशी ‘रॉ’ होती. विचारांची परिपक्वता नसली तरी ती जीव ओतून शंभर टक्के काम करत होती. त्या टीबीच्या एकाच प्रोजेक्टवर आम्ही एकत्र होतो. मी तिथं प्रमुख होतो. कामाच्या निमित्तानं सातआठ तास आम्ही सोबत होतो. मला तिचा प्रामाणिकपणा आवडत होता. कुठलेही डावपेच नाहीत, लपवाछपवी नाही, अगदी स्वछ. ती आजही तशीच आहे. तिचं निर्मळ मन, तिची सादगी मला फार आवडली होती. मला तिच्या घरची परिस्थिती माहीत होती. तिची काळजी वाटायची. मग एक दिवस थेटच मी तिला विचारलं, ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय. नवरा म्हणून मी तुला चालेल का?’

प्रश्न – यावर वैशालीमॅमची प्रतिक्रिया काय होती?
निसार अली तिची पहिली प्रतिक्रिया होती पण आपण तर हिंदू-मुस्लीम आहोत…

वैशाली – लग्नाविषयी विचारणा केली तेव्हा मी आधी ते उडवून लावलं. म्हटलं आपल्याला तर काही जमणार नाही आणि आपल्या घरचेही फार डेंजर आहेत. मी ते स्पष्टपणे त्यांना सांगितलं पण आम्ही रोज मालाड ते गोरेगाव चालत जायचो. त्या वेळी भरपूर गप्पा, चर्चा व्हायच्या. त्यादरम्यान मी सांगितलं की, मी माझा धर्म आणि नाव बदलणार नाही. बुरखा मी घालू शकत नाही. हे चालणार आहे का… असं विचारलं. या सर्व गोष्टी निसार अली यांना आधीच मान्य होत्या. त्यांचा मोकळाढाकळा स्वभाव, समजून घेण्याची वृत्ती आणि प्रगत विचार यांचा माझ्यावर प्रभाव होताच आणि मग त्या एकदीड महिन्याच्या सातत्यपूर्ण चर्चेनंतर मी लग्नाला तयार झाले. अर्थात मला माझ्या घरच्यांचीही भीती होती. त्यांना माहीत झालं तर ते मला घराबाहेरच पडू देणार नाहीत असंही वाटायचं. पण आता काय करणार… स्वतःसाठी उभं राहायचं म्हणजे धाडस तर करावंच लागणार होतं.

निसार अली वैशाली आमच्या भिन्न धर्मांमुळं गोंधळलेली होती. मी म्हणालो, ‘एवढीच गोष्ट असेल तर आपण तुझ्या घरी विचारू… मी त्यांना समजावू शकतो. मला काही प्रॉब्लेम नाही, पण घरातलं वातावरण पाहून काही बोललो नाही आणि परतलो. खरंतर मी त्याआधी एकदा सहज म्हणून तिच्या घरी गेलो. त्या वेळेस तिच्या कुटुंबीयांनी चांगली वागणूक दिली होती. पण लग्नाविषयी सांगण्याच्या विचारानं गेलो तेव्हा तिच्या वडलांचं एकूण वागणं; वागण्यातला कोरडेपणा, तुसडेपणा पाहून बोलायची हिंमत झाली नाही. जर आम्ही सांगितलं तर हे आडकाठी आणणार, मोठा गोंधळ घालणार असं वाटायला लागलं. लग्न करायचं ठरलंच आहे  तर सांगून संकटं का वाढवून ठेवा असा विचार आम्ही केला.

प्रश्न – मग पुढं तुमचा लग्नापर्यंतचा प्रवास कसा झाला? त्यात काही अडचणी आल्या का? 
निसार अलीमाझ्या घरून कसलीही अडचण नव्हती. माझ्या लग्नाचा निर्णय मीच घेणार हे स्पष्ट असल्यानं भावांची कसलीही आडकाठी नव्हती. त्यांचं एकच म्हणणं होतं की, ‘तू  हिंदू मुलीशी लग्न करत आहेस तर लग्नानंतर तिलाही मुस्लीम व्हावं लागेल. अन्यथा अशा लग्नाला लग्न म्हणता येणार नाही. ‘

आम्ही विशेष विवाह कायद्याखाली लग्न करणार असल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यामुळं कायदेशीर मान्यतेची काहीच अडचण नाही. दुसरी गोष्ट अशी की, इस्लामिक रिवाजाप्रमाणे हिंदू-मुस्लीम ‘निकाह’च होत नाहीत. होत असतील तर मी जरूर करेन. माझी कुठलीही हरकत नाही.’ त्यांचा एक आगळावेगळा दूरगामी दृष्टीकोन होता… निकाह न करता मुलं झाली तर ती ‘हराम’ मानली जातील. तेवढ्यासाठी तरी निकाह केला पाहिजे.  अशा तऱ्हेनं दबाव आणण्याचा प्रयत्न कुटुंबीय करत होते. पण आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडलो नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. निकाहच्या मुद्द्याला मी सपोर्ट न केल्यानं माझी भावंडंही फारशी खूश नव्हती. मात्र आम्ही या कुठल्याही गोष्टीला महत्त्व दिलं नाही. लग्नासाठी आम्ही एक महिना आधी नोंदणी करून नोटीस दिली. आमच्या चर्चेमध्ये आम्ही लग्नानंतर आपण कसं राहायचं, लोक आपल्याशी जर तुच्छतेनं वागले तर आपण काय करायचं, एकत्र येत असताना कुठल्या तडजोडी करायच्या याही गोष्टींचा विचार सुरू केला होता. एकमेकांना समजून घ्यायला आम्हाला या काळात मदत झाली.

वैशाली 6 जूनला आमच्या नोटिशीचा महिना पूर्ण होणार होता. मी 5 जूनला आदल्या दिवशीच माझं घर सोडून निसार यांच्या बहिणीच्या घरी गेले. त्या दिवसांमध्ये निसार अली बहिणीच्या कुटुंबातच राहत होते. त्यांच्या कुटुंबात बहीण, भाईजान, त्यांची तीन मुलं होती. त्यांच्या बहिणीला आमच्या लग्नाची पूर्ण कल्पना होती. लग्न ठरवल्यानंतर निसार अली मला त्यांच्या घरी घेऊनही गेले होते. मी माझ्या घरी संस्थेच्या एका प्रशिक्षणासाठी एक दिवसासाठी बाहेरगावी जात असल्याचं सांगून सकाळीच निघाले होते. घरातून बाहेर पडले होते. 6 जूनला लग्न झालं. लग्नाविषयी घरात कधीतरी सांगायचंच आहे तर आत्ता का नको? मध्ये वेळ गेला तर आपण जमवून आणलेली हिंमतही कमी पडेल. असा सगळा विचार करून मी त्याच संध्याकाळी फोन करून लग्न केल्याचं सांगितलं. त्यांनी हंगामा सुरू केला. तेव्हा मोबाईल नव्हते.

निसार अली तिच्या माहेरची काही माणसं आली. त्यांनी तिच्या आईची तब्येत खराब असून तिला  हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय असं सांगितलं. म्हटलं, हॉस्पिटल सांगा. आम्ही तिथं जातो मात्र ते काहीच न सांगता नुसताच आरडाओरडा करून गेले. रात्री दहा वाजता वैशालीची आई, मामामामी, नातेवाईक आले. त्यांनीही तिला खरीखोटी सुनावली. संबंध तुटले म्हणून सांगितलं आणि गेले. तिच्या नातेवाइकांचा असाच प्रकार आणखी दोनतीन दिवस रोज चालला. पुन्हा दहापंधरा लोक गाडी घेऊन आले. आईची तब्येत सिरिअस आहे म्हणत राहिले. मात्र आमच्या घरच्यांनी आम्हाला लपवून ठेवलं. आम्ही घरात नसल्याचं सांगितलं. त्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी फूस लावली, पळून गेली अशी तक्रार केली.  दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनमध्ये लग्न केल्याची पावती आणि इतर कागदपत्रं पाठवली. सर्टिफिकेट अद्याप मिळालेलं नव्हतं. शेवटी पोलिसांनी त्यांना सांगितलं की, मुलगी सज्ञान आहे. या कागदपत्रानुसार तिचं लग्न झालंय. आता तुम्ही जा. तुम्ही ऐकलं नाही तर तुमच्यावर कारवाई करू. त्यांना समज देऊन पाठवलं. चारपाच दिवसांनी ते पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले. किमान आम्हाला आमच्या  मुलीला पाहायचं आहे. जिवंत आहे की नाही ते तरी पाहू द्या. तोवर सर्टिफिकेटही मिळालं होतं. ते पाहून तर तिचे कुटुंबीय नाराज होऊन निघून गेले.

प्रश्न – त्यानंतर तुमचे संबंध पुन्हा पाहिल्यासारखे झाले का?
निसार अलीथोडा वेळ जाऊ द्यावा लागला… मात्र संबंधांमधली कटुता संपली. आर्थिक स्थैर्य आल्यावर लोकांना विश्वास वाटतो. आमचीही घराची घडी बसायला लागल्यावर वैशालीच्या कुटुंबीयांना माझ्याविषयी विश्वास निर्माण झाला. त्यानंतर तिचे मोठा मामा, आईबाबा आणि  भाऊ यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले.

त्याआधीची घटना सांगतो. लग्नानंतर दहा दिवसांनी वैशाली परत कामाला गेली आणि मीसुद्धा. आमच्या कामाच्या ठिकाणांमध्ये दोन किलोमीटरचं अंतर होतं. पुन्हा तिचे मामा तिथं पोहोचले आणि त्यांनी वैशालीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तिनं मला फोन केला. हकिकत सांगितली. मी तिला म्हणालो, ‘आपण भेटू यात. त्यांना माझ्या ऑफिसजवळ घेऊन ये.’

रिक्षा करून ते ऑफिसजवळ आले. बराच वेळ आम्ही चर्चा केली. त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न मी केला. आम्ही बधणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग ते निघून गेले. लग्नानंतर दोन महिन्यांनी वैशालीच्या आईनं  आम्हाला बोलावून घेतलं. वडीलही होते. दोघंही आमच्याशी नॉर्मल वागत होते. त्यानंतर हळूहळू आमचे त्यांच्याशी फोन, बोलाचाली सुरू झाल्या आणि नातं स्थापित झालं. अधूनमधून ‘परत ये’ असं उफाळून यायचं, पण त्यानं आम्हाला फरक पडत नव्हता. त्यातच आमचं लग्न होऊन पाच वर्षांनी म्हणजे 2008मध्ये मुलगी झाली त्यामुळे दरम्यानच्या काळात वैशालीच्या माहेरकडची काही मंडळी तिला म्हणत असत, ‘अजूनही मूलबाळ नाही तर तू सोडून ये. पुढचं आम्ही सगळं निभावू.’ अर्थात या सगळ्या हवेतल्या गप्पा.

वैशाली – आमच्या घरातल्या सगळ्यांसोबत नातं छान झाल्यावर चिपळूणहून माझे आजीआजोबाही एकदा मला भेटायला आले… मात्र आम्ही बाहेर कुठंतरी गेलो होतो त्यामुळं आमची भेट झाली नाही… म्हणून मग आम्हीच त्यांना भेटायला चिपळूणला गेलो. चिपळूणपासून सातआठ किलोमीटर अंतरावर आजोबांचं गाव होतं. कामठे गाव. आम्ही चिपळूणलाच एका हॉटेलमध्ये राहिलो. आजीआजोबा मला भेटायला आले. दोन दिवस आमच्याशी खूपच चांगलं वागले आणि  मग आम्ही परतलो.

निसार अली – काहींशी आमचे अगदी आता अठरा वर्षांनंतर संबंध सुधारले.

प्रश्न – इतका दीर्घ काळ…
वैशाली – हो, 2008च्या मार्चमध्ये आजोबांचं निधन झालं. त्या वेळेस मी प्रेग्नंट होते. माहेरच्या मंडळींनी गाडी केली होती. मी त्यांच्यासोबतच गावी गेले. तोपर्यंत गावातल्या काही नातेवाइकांचा निसार यांच्यावर राग होता आणि अशा प्रसंगी काही वाद नको म्हणून तेही आले नव्हते. आजोबांचा अंत्यविधी झाल्यानंतर काही नातेवाईक मला म्हणाले की, ‘इथून पुढं तू गावी येऊ नको. पुढच्या कुठल्याही विधीला उपस्थित राहू नकोस.’

मी खूप रडले. मला खूप वाईट वाटलं. असा प्रसंग पुन्हा एकदा आला. माझ्या चुलत भावाच्या लग्नाच्या वेळीसुद्धा असंच झालं. काही गावकऱ्यांनी तर गावातच प्रवेश दिला  नाही.

निसार अली – गावकरी आम्हाला गावात येण्यापासून कसं काय अडवू शकतात… असं म्हणून आम्ही ठोस पाऊल उचलायचा निर्णय घेतला आणि पोलीस, सरपंच, तहसीलदार, जिल्हाधिकारी, एसपी यांना पत्र लिहून तक्रार केली… आम्हाला गावात येण्यासाठी का बंदी घातली आहे आणि हा निर्णय कुणाचा आहे? यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांची चौकशी केली आणि त्यांनी आम्हाला फोन करून कळवलं की, तुम्हाला तुमचा जबाब नोंदवण्यासाठी गावी यावं लागेल. आम्ही म्हटलं ‘हरकत नाही. तुम्ही जबाब नोंदवण्यासाठीचं पत्र पाठवा आणि आमच्या सुरक्षेची हमी घ्या. आम्ही येतो.’ पोलिसांकडून आम्हाला एक पत्र आलं ज्याच्यात म्हटलेलं होतं की, आम्ही गावकऱ्यांची चौकशी केली. त्यात गावकऱ्यांनी कुणालाही गावात यायला मज्जाव करणारा कुठलाही ठराव केला नसल्याचं आढळलं. त्यामुळे तुम्ही करत असलेला आरोप खोटा आहे. खरंखोटं आम्हाला नीट माहीत होतं. एक दबाव निर्माण व्हावा एवढंच आम्हाला अपेक्षित होतं. तसंही या पत्रानंतरही प्रत्यक्षात आम्हाला गावात कुणीही स्वीकारलं नाहीच. गावी जायचं असं ठरवलं तरी कुणाकडे जाणार हा प्रश्न होताच.

…पण आता  चिपळूणला आलेल्या पुरामुळे एक सकारात्मक गोष्ट आमच्या बाबतीत घडली. राष्ट्र सेवा दलाच्या मदतीनं तिकडच्या परिसरात मी वेगवेगळ्या स्वरूपांत मदत घेऊन जाणार होतो. ही गोष्ट वैशालीच्या काकामंडळींना आणि इतर नातेवाइकांना माहीत झाली. त्यांनाही मदत मिळेल का म्हणून त्यांनी आम्हाला फोन करून चौकशी केली. आम्ही त्यांना मदत पुरवली. या पुरात त्यांच्या मनात माझ्याविषयी असणाऱ्या शंकाकुशंका, जळमटंसुद्धा वाहून गेली. तब्बल 18 वर्षांनंतर वैशाली आपल्या आजीच्या-काकांच्या आणि इतर नातेवाकांकडे गावी जाऊ शकली. आता आमचे त्यांच्याशी चांगले बंध जुळले आहेत. यादरम्यान आमच्या लक्षात आलं की, खऱ्या कुटुंबीयांना आमच्याशी संबंध ठेवण्यात काहीच अडचण नव्हती. मात्र अन्य लोकांनी त्यांच्या मनात गैरसमज निर्माण केले होते आणि म्हणून इतके दिवस आमच्यात अंतर पडलं होतं… म्हणूनच संवाद महत्त्वाचा असतो. तो जर नसेल तर तुमच्यातली गॅप वाढत जाते.

प्रश्न – लग्नानंतर आसपासच्या लोकांकडून कसे अनुभव तुम्हाला आले? 
निसार अली – लग्नानंतर सुरुवातीला काही भलेबुरे प्रसंग आले. जवळचे काही चांगले मित्र कायम पाठीशी उभे राहिले तर काही जण डिवचत राहायचे. बरेच जण आम्हाला विचारायचे- ‘मी हिंदू झालो की ती मुस्लीम?’ आम्ही विशेष विवाह कायद्याखाली लग्न केलं आहे; त्यामुळे धर्म बदलण्याची गरज नसते, हे सांगितलं तरी लोक ते हसण्यावारी न्यायचे. असा काही कायदा असतो आणि असंही लग्न होऊ शकतं हे लोकांना खरं वाटायचं नाही. लग्नानंतर दोन महिन्यांनी मी एनजीओची नोकरी सोडली. एनजीओचं काम समाधानकारक असलं तरी पगार फार उत्तम नव्हता. त्यानंतर मी एक रिसॉर्ट चालवायला लागलो. दरम्यानच्या काळात एका सद्गृहस्थानं आम्हाला राहण्यासाठी डिपॉझिट न घेता भाड्याची एक खोली दिली. ते कुटुंब अतिशय चांगलं होतं. पैसे द्यायला पुढंमागं झालं तरी त्यांनी कायम समजून घेतलं.

…मात्र परिसरातल्या काही मुस्लीम महिला मी नसताना वैशालीला एकटीला गाठून तिला टोमणे मारायच्या. डोक्यावरून दुपट्टा घेतला पाहिजे, तू टिकली लावणं योग्य नाही, तू नमाज पढला पाहिजे, कुराण वाचलं पाहिजेस, असं म्हणून तिच्यावर दबाव आणायच्या. पण आम्ही कुठल्याही गोष्टीला दाद देत नाहीये हे बघून लोकांनी आम्हाला ‘सुधारण्याचा’ प्रयत्न कालांतरानं सोडून दिला. लग्नानंतर 18 वर्षं झाली तरी लोक उलटसुलट प्रश्न करतातच. मलाही विचारतात ‘तुम्ही नमाज अदा करता का? मस्जिदमध्ये जाता का?’ आम्ही सांगतो की, ‘हा आमचा अत्यंत खासगी मामला आहे. त्याबाबत कुणीही प्रश्न विचारण्याचं कारण नाही.’ आम्ही बऱ्यापैकी सामाजिक कामांमध्ये असतो. कुणालाही कुठल्याही मदतीची गरज असेल तर लोक धावून आमच्या घरी येतात. त्या वेळेस आम्ही कोण आहोत याच्याशी त्यांना फारसं देणंघेणं नसतं. मात्र कुठलाही धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम असला तर मात्र आम्हाला दूर ठेवतात. मी राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारांमध्ये वाढलेला असल्यामुळे मला कधीही धर्मजातीची अडचण वाटली नाही. मात्र ना मी हिंदू झालो, ना ती मुस्लीम… मग आम्ही एकत्र राहतो कसं याचं आश्चर्य लोकांना वाटतं. त्यातून ते आम्हाला टोमणे मारतात.

वैशालीलग्नानंतर आम्ही पाचसहा महिने नणंदेच्या कुटुंबातच राहिलो. त्यांनी घरात खूप प्रेमानं वागवलं. मनावर दडपण यावं असं कुणीच काहीच वागलं नाही. मी हिंदू कुटुंबातून एकदम मुस्लीम कुटुंबात आले होते. तरी मला अजिबात काही वेगळं वाटलं नाही. उलट ते माझ्याशी छान मराठीत बोलायचे. खाण्यापिण्याच्या बाबतही त्यांनी खूप लक्ष दिलं. त्यांचं कधीच ऑबजेक्शन नव्हतं. उलट आजूबाजूचे लोक जेव्हा त्यांना म्हणतात की, वैशालीला मुस्लीम का नाही केलं? तर त्यांनाही त्या गप्प करतात. माझ्या भावाला चांगलं पाहतेय, त्यांचा संसार चांगला चालू आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणून त्यांना शांत करतात. पण लोक म्हणायचे मुस्लीम का होत नाही? मला प्रश्न पडायचा की मुस्लीम झाल्यानं काय होणार आहे? माझ रक्त काय हिरवं होणार आहे की निसार अली हिंदू झाल्यानं त्यांचं रक्त केशरी होणार आहे? तसं काही होणार असेल तर करूनही पाहू. आता कुणी काही म्हटलं तर आम्ही सरळ दुर्लक्ष करतो.

प्रश्न – वैशाली, तुम्ही आत्ता म्हणालात की, तुम्ही एकदम मुस्लीम कुटुंबात आलात… तिथं येण्याआधी तुमच्या मनात मुस्लीम कुटुंबाविषयी काही धारणा होत्या का?
वैशाली – आपण कुठल्या धर्मात जन्माला येतो हे आपल्या हातात नाही. त्यामुळं आपलं विशिष्ट जातिधर्मात जन्माला येणं चूकही नाही की आपलं भाग्यही नाही. आता मी हिंदू आहे. लहानपणापासून मुस्लिमांविषयी तर्‍हेतर्‍हेचे समज-गैरसमज ऐकतच मी मोठी झाले. त्यांच्यात माणुसकी नसते, ते फार बेदरकार असतात, भांडखोर असतात अशाच गोष्टी मी ऐकल्या होत्या. त्यामुळं मलाही तसंच वाटायचं. असा विचार करण्यात माझी काही चूक नाही. पण माझ्या मनात त्या रुतूनही बसल्या होत्या. कदाचित कुणा मुस्लीम कुटुंबात वाढणाऱ्या व्यक्तीच्या मनात हिंदूंविषयी काही समज असूच शकतात. पण ते संवाद आणि सोबत येऊनच मिटतात. सुरुवातीला कामाच्या ठिकाणी निसार भेटले तेव्हाही वाटत होतं की, आपल्याला कामाची गरज आहे, बाकी कशाला विचार करायचा? हळूहळू आपण किती चुकीचं ऐकतो आणि विश्वास ठेवतो याची खातरी पटत गेली.

प्रश्न – तुमच्या मुलीच्या इशा या नावाला हिंदू अर्थ आहे की मुस्लीम?
निसार अली – मुलीच्या जन्माच्या वेळची आठवण सांगतो आधी. मुलीच्या जन्माच्या वेळी माझी बहीण आणि माझी सासू या दोघीही वैशालीजवळ आळीपाळीनं राहिल्या. डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटलनं जन्मदाखल्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा एक फॉर्म दिला. त्यात धर्म आणि जात लिहायची होती. आम्ही धर्म म्हणून मानव आणि जातीचा कुठलाही उल्लेख केलेला नव्हता मात्र हॉस्पिटल स्टाफकडून आणि डॉक्टरांकडून आम्हाला सांगण्यात आलं की, अशा तऱ्हेनं आम्ही माहिती भरू शकत नाही. वडलांचा धर्म आहे तोच लिहावा लागेल. आम्ही डॉक्टरांना आमची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही. त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी केस चालू होती. शेवटी आम्ही हुज्जत न घालता त्यांनी सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरला. साधी माणसं एक पाऊल माणूसपणाच्या दिशेनं टाकण्याचा प्रयत्न करत असली तरी शिक्षित वर्ग त्याला अधिक आडकाठी घालतो हे त्या दिवशी आम्ही अनुभवलं.

सव्वा महिना माहेरी राहून वैशाली परत आली. त्यानंतर मुलीचं नाव काय ठेवायचं यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये रस्सीखेच सुरू झाली. आम्ही आमच्या मुलीचं नाव इशा ठेवायचं ठरवलं. माझे मुस्लीम नातेवाईक म्हणायला लागले की, हिंदू नाव का ठेवतो? काही मुस्लीम नातेवाइकांना वाटलं की, इशा हे रात्रीच्या इशाच्या नमाजवरून ठेवलेलं नाव आहे, तर वैशालीचे नातेवाईक खूश झाले की चला, इशा हे देवीचं नाव आहे. दोन्ही बाजूंनी आम्हाला बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागत होत्या. मात्र आम्ही नाव ठरवताना त्याचा हिंदू अथवा मुस्लीम असा कुठलाही अर्थ घेतला नव्हता. आमची भूमिका वेगळी होती. शेवटी आम्ही नामकरणाचा एक कार्यक्रम केला आणि त्यात एका मोठ्या बॅनरवर Vaishali+Nisar ali=Isha असं लिहिलं. आमच्या नावातल्या ‘इशा’ या  शब्दाच्या अक्षराखाली अधोरेखित केलं. अर्थात आमची ही भूमिका आमच्या नातेवाइकांना पटली नाही. त्यांना त्यांचा धार्मिक आधार अधिक महत्त्वाचा वाटत होता. आम्हाला याची मोठी गंमत वाटत राहिली. आम्ही ठरवलेलं नाव, आमची भूमिका, आमचा विचार या सगळ्याशी कुणालाच काहीही देणंघेणं नव्हतं. त्यांना त्यांचा धर्म, धार्मिक अर्थ अधिक प्रिय होता.

प्रश्न – आता मुलीला वाढवताना जाणीवपूर्वक काही गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत का?
वैशाली – आमचं तिला एकच म्हणणं आहे, तू तुझं शिक्षण पूर्ण कर. बाहेर कुठं शिकायला जायचं असेल तर त्यासाठीसुद्धा आपण नक्कीच प्रयत्न करू. काहीही झालं तरी तू स्वतःच्या पायावर उभी राहा. आम्ही तिला धर्माबाबतही कुठली सक्ती करत नाही. अठरा वर्षांची झाल्यानंतर तिला हिंदू व्हायचं आहे, मुस्लीम की माणूस हे तिचं ती ठरवेल.

निसार अली – घराबाहेरचे लोक, नातेवाईक आपल्या मुलांच्या वाढीत ही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत असतात. मुलगी जीन्स-शॉर्टसुद्धा घालते. नातेवाईक ते बघून नाक मुरडतात. स्पष्टपणे कुणी बोलत नसलं तरीही आपापसांत चर्चा करतात, ते कानांवर येतंच… पण आम्ही आमच्या मुलीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढवत असल्यानं अशा गोष्टींकडे खुबीनं दुर्लक्ष करतो. मुळात माझे वडीलसुद्धा कट्टर धार्मिक नव्हते. आईला किंवा बहिणीला बुरखा घालण्याची सक्ती त्यांनी कधीही केली नाही. तिथं मी तर त्यांचाच मुलगा. अनेक जण म्हणतात की, मुलीला दुपट्टा घ्यायला सांगा, तिला अरबीचं शिक्षण द्या. तुम्ही मोठे पुरोगामी झालात पण तुमच्या मुलीचं कसं होईल… तिचं लग्न कसं होईल…

आम्ही म्हणतो, ‘ती स्वतः याबाबत निर्णय घेईन. आपण कशाला याची काळजी करायची?’

प्रश्न – तुम्ही कोणते सण साजरे करता…
वैशाली – आम्ही सगळे सण साजरे करतो… दिवाळी, ईद, ख्रिसमस, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन,महापुरुषांच्या जयंती, स्मृतिदिन. माझ्या मुलीला ख्रिसमस खूप आवडतो. पाच वर्षं दीड दिवसांचा गणपतीसुद्धा बसवला. मला वाटतं की, जर हिंदू-मुस्लीम माणसं एकत्र आनंदानं राहू शकतात तर तिथं देव का नाही राहू शकत? गणपतीची प्रतिष्ठापनासुद्धा मी स्वतः करायचे. त्यात पर्यावरणाचा विचार म्हणून शाडूच्या मातीचा गणपती बसवायचो आणि कृत्रिम तलावात विसर्जन करायचो. शिवाय गणपतीच्या नैवद्यासाठी आणि प्रसादासाठी मोदक आणि शिरखुर्मा करायचो. अशा तऱ्हेनं गणपती मोठ्या उत्साहानं साजरा करायचो. त्यातून धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करायचो.

निसार अलीबकरी ईदला आम्ही पैसे जमा करून गरजवंतांना मदत करतो. एखादं बोकड कापून कुर्बानी देण्यापेक्षा आपण त्याला व्यापक अर्थ देऊ असं जनजागरण करतो. त्यातून लोक पुढं येतातही. करोना काळातही आम्ही जनजागृती मोहीम, स्वच्छता मोहीम, रेशन वाटप, मास्क वाटप असे उपक्रम केले  आहे.

प्रश्न – तुमचं सहजीवन कशाच्या आधारे फुलत आहे असं तुम्हाला वाटत आहे?
वैशाली – कुठल्याही प्रकारचं लग्न झालं तरी भांडणं आहेतच. ‘अंडरस्टँडिंग आणि ॲडजस्टमेंट’ समजूतदारपणा आणि थोडी तडजोड असेल तर प्रत्येक घरात शांतता नांदू शकते आणि प्रत्येक नवरा-बायकोचा संसार खूप चांगला होऊ शकतो. आमच्या नात्यात पुष्कळ समंजसपणा आहे. त्यामुळंच आमचं सहजीवन फुलत आहे असं वाटतंय.

निसार अली – तुम्हाला कदाचित तुमच्याच धर्मातला जोडीदार मिळूही शकतो… मात्र वैचारिकता कुठून आणणार? त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. वैशालीसोबत मला विचारांची तीच मोकळीकता अनुभवता आली. नव्या विचारांचा तिनं स्वीकार केला. आम्हा दोघांच्या नात्याला तिनं अधिक प्रेमानं जोपासलं आणि वाढवलं. मी तिच्या सोबत आहे फक्त…!

[email protected]

(ही मुलाखत ‘कर्तव्य साधना’ च्या https://kartavyasadhana.in/ या वेब पोर्टलवरून घेतला आहे .अनेक विषयांवरील उत्तमोत्तम लेख/मुलाखती वाचण्यासाठी या पोर्टलला नियमित भेट द्यायला विसरू नका.)

१. समीना-प्रशांत: विवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल-https://bit.ly/3sACons

२. धर्मारेषा ओलांडताना-श्रुती पानसे आणि इब्राहीम खाhttps://bit.ly/30HHulP

३. प्रज्ञा केळकर – बलविंदर सिंग: सहजीवनात कुटुंबाची सोबत अधिक अर्थपूर्ण! https://bit.ly/2PdAUkU

४. अरुणा तिवारी-अन्वर राजन: सहजीवनाची भिस्त प्रेम, विश्‍वास आणि कमिटमेंटवर!https://bit.ly/3mBVFmF

५.  दिलशाद मुजावर आणि संजय मुंगळे:माणूस म्हणून वाढण्यासाठी धार्मिक भिंती तोडल्या पाहिजेतhttps://bit.ly/2RZ1izX

६.हसीना मुल्ला – राजीव गोरडे: धर्मजातीच्या आंधळ्या संकल्पनांतून बाहेर यायला हवं https://bit.ly/2QJrePQ

७.महावीर जोंधळे आणि इंदुमती जोंधळे: एकमेकांच्या पायांत गुंता न करताही छान जगता येतं.https://bit.ly/3x8cVnp 

८. मुमताज शेख – राहुल गवारे…तक्रार करण्यासाठी जागा मिळाली की निम्मी भांडणं कमी होतातhttps://bit.ly/2U7YEJh

९.जुलेखा तुर्की-विकास शुक्ल: आम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही!-https://bit.ly/3xQB56Q

१०.वर्षा ढोके आणि आमीन सय्यद: जात-धर्म-लिंगनिरपेक्ष राहणं हाच आमच्या सहजीवनाचा आधार-https://bit.ly/2TYwMYw

११.शहनाज पठाण आणि सुनील गोसावी: आम्ही विचारांशी, तत्त्वांशी ठाम राहिलो.https://bit.ly/2Y9UbIb

१२. डॉ. आरजू तांबोळी आणि विशाल विमल: एकमेकांना कशी स्पेस देतो, यावर सहजीवन फुलतं…  https://bit.ly/3hXxQEw

Previous articleपूर्वजांचे ‘पेहोवा’
Next articleअजित पवारांवरील छापे आणि इन्कमटॅक्सची राजकीय हुशारी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here