पूर्वजांचे ‘पेहोवा’

-मंदार मोरोणे

वेदांनी गौरविलेल्या सरस्वती नदीचा बराचसा प्रवास हा सध्याच्या हरयाणा राज्यातून होतो. कुरुक्षेत्रासारखी अनेक ऐतिहासिक प्राचीन स्थळे या राज्यात आहेत आणि त्यातील बहुतांश स्थळे ही तत्कालिन सरस्वती नदीच्या काठावर आहेत. ज्या भागातून ही नदी वाहत होती त्या भागात संस्कृती विकसित होत गेली. याच अनेक ठिकाणांवर भारतीय संस्कृतीची निरनिराळी वैशिष्ट्ये वर्षानुवर्षे विकसित आली आहेत. `पेहोवा’ हे असेच एक अनोखे वैशिष्ट्य मिरवणारे ठिकाण आहे.

कुरुक्षेत्रापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर पेहोवा हे लहानसं खेडं वसलेलं आहे. लोकसंख्या जेमतेम ५० हजारांना टेकणारी. सरस्वती नदीच्या काठावरचं हे गाव. तसे पाहिले तर हरयाणातील कुठल्याही लहानखुर्या गावासारखे. पण, तरीही याचं एक वैशिष्ट्य आहे. या गावात वंशावळींचा साठाच आहे. आपल्या वंशाचा इतिहास लिहून ठेवण्याची, कोण कोण माणसे वंशात होऊन गेलीत हे नमूद करून ठेवण्याची माणसाची ओढ जुनीच आहे. `रम्य तो भूतकाळ’ अशी जाणीव प्रत्येकाला हवीहवीशी असते आणि अशा वंशावळ्या त्या भूतकाळाच्या पदराचे एक टोक धरून ठेवण्यास उपयोगी पडतात. कदाचित आपल्या पूर्वजांनी केलेल्या, न केलेल्या चांगल्या-वाईट कामांचा आठव वर्तमान सुखावणाराही वाटत असावा. कारण, काहीही असो पण पूर्वजांची ही नोंद माणसांच्या पिढ्या सातत्याने करीत आल्या आहेत, आजही करीत आहेत. छोटेखानी पेहोवाचे वैशिष्ट्य नेमके हेच आहे. कित्येक पिढ्यांच्या वंशावळ्या जपण्याचे काम पेहोवा येथे केले जाते.

परंपरागतरीत्या पुरोहित किंवा ब्राह्मण वर्गच या वंशावळी लिहीत आणि सांभाळीत आला आहे. आम्ही पोचलॊ तेव्हा त्या गावात बाजाराचा दिवस होता आणि स्वाभाविकपणे आजूबाजूच्या खेड्यांमधून लोक खरेदी-विक्रीसाठी जमा झाले होते. याच बाजारातून वाट काढत आम्ही स्थानिक पुरोहितांच्या छोटेखानी कार्यालयांपर्यंत पोहोचलो. लहानखुर्या बैठ्या खोल्यांमधून पुरोहित आपापल्या वंशावळ्या घेऊन बसले होते. त्यांच्यासमोर आपल्या वंशजांच्या खाणाखुणा शोधत आलेले ग्रामस्थ बसले होते. प्रत्येक पुरोहितासमोर पिवळ्या पडत चाललेल्या कागदांची चोपडी होती आणि एकेकीचा आकार प्रचंड म्हणावा असा होता.

पेहोवातील बहुतांश पुरोहित गौड सारस्वत ब्राह्मण समुदायातील आहे. या एकेका पुरोहिताकडे अनेक वंशाच्या वंशावळ्या जतन करून ठेवल्या आहेत आणि अगदी २५० ते ३०० वर्षांपासूनची नावे त्यात सांभाळून ठेवण्यात आली आहेत. या जीर्ण चोपड्यांमधील आपल्या वंशाचा भूतकाळ शोधायला केवळ भारताच्याच नव्हे तर पाकिस्तानच्या विविध भागांमधील लोकही पेहोवाची वाट धरतात. पेहोवामध्ये हे असा दस्तावेज जवळ असलेली सुमारे २५० कुटुंबे होती आणि त्यापैकी सुमारे १०० कुटुंबे अजूनही याच व्यवसायात होती. ही गोष्ट २०१३ मधील. प्रत्येक पुरोहिताचे यजमान ठरलेले आहेत आणि वर्षानुवर्षांपासून ही कुटुंबे त्याच पुरोहितांकडे जात असतात.

एका कुटुंबाच्या वंशावळीत त्या परिवारातील सर्व सदस्यांची नावे असतात. या चोपड्यांमधील मजकूर लिहिण्याचे पुरोहितांचे स्वतंत्र तंत्र आहे. सर्व कुटुंबांची एक अनुक्रमणिका तयार केलेली असते. एखादी व्यक्ती आली की अनुक्रमणिकेत त्या वंशाचे नाव शोधले जाते आणि मग पुरोहितांच्या संग्रहातून वंशावळीची भली मोठी चोपडी बाहेर येते. या चोपडीत त्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याचे नाव असते. एखादी व्यक्ती वारली तर तिचे नाव गाळले जाते आणि मूल जन्माला आले की चोपडीत एका नव्या नावाची भर पडते.

प्रचंड मोठा ’डाटा’ असलेल्या चोपड्या अत्यंत नजाकतीने लिहिलेल्या असतात. जुने आहे म्हणून गचाळ आहे, अव्यवस्थित आहे असे चुकूनही सापडणार नाही. नीटस, रेखीव अक्षरांमध्ये, विशिष्ट पेनांचा वापर करून अत्यंत सुव्यवस्थितपणे लेखन केलेल्या या चोपड्या बघताना आपल्यालाही मजा येत असते. नावे लिहिण्याची पद्धत, त्यासाठी वापरली जाणारी शाई, सर्वत्र एकसारखी, सगळ्याच पानांवर. आणि हा सारखेपणा किती काळापासून जपलाय तर किमान १० पिढ्यांपासून. एका वेगळ्या प्रकारची ही ’व्यावसायिकताच’! पुरोहितांनी आपल्या व्यवसायाचा एक ’पॅटर्न’ निश्चित केला आहे आणि त्यामुळेच कितीही जुनी नोंद असो, अवघ्या काही मिनिटांत ती यजमानासमोर काढून देण्याचे कसब या पुरोहितांमध्ये आहे. आणि हे काहीही सांगोवांगी नाही. यातील प्रत्येक गोष्टीची प्रात्यक्षिकेच आमच्या डोळ्यांसमोर घडत होती.

वैदिक काळात सरस्वतीच्या काठावर वसलेल्या पेहोवाचे सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या महत्वाचे स्थान होते असे सांगितले जाते. या ठिकाणाचे धार्मिक महत्त्व तर अद्यापही टिकून आहे आणि विविध धार्मिक क्रिया करण्यासाठी लोक येथे सातत्याने येत असतात.

आम्ही बोलत होतो ते विनोदकुमार पंचोली हे स्थानिक पुरोहित अनेक वर्षांपासून या व्यवसायात होते. साठीला पोचलेल्या पंचोलींनी या व्यवसायाची अनेक वैशिष्ट्ये आम्हाला वर्णन करून सांगितला. वंशावळ्यांचा बहुतांश संबंध हा जरी भूतकाळाशी असला तरी त्या वर्तमानातही उपयोगी ठरतात. कित्येक कुटुंबामध्ये कधी काळी काही वाद होतात, बहुतांशवेळी मालमत्तेवरून. अशा कज्जाखटल्यांमध्ये या वंशावळ्यांचे पुरावे उपयोगाचे ठरतात आणि प्रशासनाच्या स्तरावर ते ग्राह्यही धरले जातात. “ पूर्वीच्या पुरुषसत्ताक पद्धतीत वंशावळीत केवळ पुरुषांचीच नावे असत. बदलत्या काळानुसार आता महिला आणि मुलींच्या नावांनाही या दस्तावेजांमध्ये स्थान मिळू लागले आहे. महिला देखील हे वंशावळी सांभाळ्ण्याचे काम करू लागल्या आहेत,” पंचोली सांगत होते.

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, हरयाणा आणि राजस्थानमधून अनेक कुटुंबे पुरोहितांकडे येतात. शिवाय, सीमेपल्याडच्या पाकिस्तानातूनही लोक येत असतात. आज मध्ये सीमा असली तरीही त्यांच्या जुन्या खाणाखुणा भारतातच आहेत. सियालकोट, मुलतान, गुजरानवाला, लाहोर, रावळपिंडी आणि अगदी काबूलपासून लोक पेहोवाच्या पुरोहितांकडे आपल्या मुळांचा शोध घेत येत राहतात. नव्या पिढीला गतकाळाशी जोडत राहतात. शतकांपासून हा प्रवाह सुरू आहे.

पेहोवा अजूनही नदीच्याच काठावर आहे आणि अभ्यासकांमध्ये वाद असले तरी लोकांच्या मनात ही नदी अद्यापही सरस्वतीच आहे. पुरोहितांकडून उठलॊ आणि नदीकाठावर गेलॊ. सूर्य मावळतीला लागला होता, सरस्वती मंदिरात आरतीची तयारी सुरू झाली होती, लोक जमत होते. अवघ्या काही मिनिटांमध्ये उजेड अंधुक होऊ लागला, आरतीची ज्योत गोलाकार फिरू लागली आणि भाविकांचा स्वरही उंचावू लागला. मावळतीच्या सूर्याबरोबर एक वेगळाच माहोल तयार झाला होता. माझ्या वर्तमानाला भारताच्या संपन्न भूतकाळाशी जोडणारा हा बंध होता. बंध चोपड्यांपलीकडील नात्याचा !

(छायाचित्रे- मयुरेश प्रभुणे , पुणे)

(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या नागपूर आवृत्तीत सिनियर डिजिटल करसपॉंडंट आहेत)

7775095986

Previous articleसमाज आणि वादाची चौकट
Next articleवैशाली महाडिक आणि निसार अली सय्यद: ‘अंडरस्टँडिंग आणि ॲडजस्टमेंट’ महत्वाची!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.