समाज आणि वादाची चौकट

नामवंत लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचे नवीन पुस्तक ‘समाजवाद : आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’ नुकतेच मीडिया वॉच पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाले आहे . या पुस्तकातील हे पहिले प्रकरण

……………………………………………………….

-सुरेश द्वादशीवार

            माणूस किंवा त्याचा वर्ग कोणत्या तरी चौकटीत बसायला जन्माला येत नाही. तो त्याच्या स्वतंत्र वाढीसाठी आणि विकासासाठी या जगात येत असतो. तसा तो वाढला आणि विकसित झाला, तरच तो त्याच्या खर्‍या स्वरूपापर्यंत पोहोचतो. मात्र, जगभरच्या व्यवस्था त्याला तशा वाढू देत नाहीत. त्या धार्मिक असोत वा राजकीय, सामाजिक असोत वा आर्थिक किंवा अगदी कौटुंबीक असोत नाही तर शेजारधर्माच्या, या व्यवस्था मुळात व्यक्‍तीच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी जन्माला येतात. परंतु, जसजसा काळ लोटतो, तसतशी त्यांची लवचीकता कमी होते आणि त्या कर्मठ होऊ लागतात. माणसाला मुक्त करणार्‍या या व्यवस्थांचेच कालांतराने मग तुरुंग होतात. हे एवढ्या सहजपणे घडते की, हातात घातलेल्या बांगड्या या बांगड्या नसून बेड्या आहेत, हे बाईला आणि सुखासाठी निवडलेला संसार हाच कैदखाना झाल्याचे तिला आणि पुरुषालाही कळत नाही. हे आपल्या डोळ्यांदेखत घडते आणि हे आपण नित्य पाहातो, पण त्यातले स्वातंत्र्याचे वा मुक्ततेचे मरण आपल्या कधी लक्षातच येत नाही. जेव्हा ते लक्षात येते, तेव्हा माणूस कैदी आणि व्यवस्था कैदखाना झाली असते.

            पुराणात एक कथा आहे. पृथ्वीवर अनाचार माजला. माणसे माणसांना मारू लागली. कुणाचेही जीवित वा वित्त सुरक्षित राहिले नाही. तेव्हा पृथ्वी गायीचे रूप घेऊन विष्णूकडे गेली व त्याला हा अनाचार थांबविण्याची विनवणी तिने केली. तेव्हा विष्णूने मनू नावाचे एक दैवत पृथ्वीवरील व्यवस्था लावायला पाठविले. मात्र, व्यवस्था लावण्याच्या सुमारासच त्याने व त्याच्या वंशजांनी माणसांना पूर्णपणे जखडून टाकणारी मनुस्मृती बनविली. या मनुस्मृतीने माणसांच्या एका वर्गाचे अनेक विषम वर्गात विभाजन केले. त्यातले माणुसपण घालवून त्यांच्यात ब्राह्मणपण, क्षत्रियपण, वैश्यपण आणि शूद्रपण आणले. शिवाय एक अतिशूद्रांचाही वर्ग निर्माण केला.

            तिकडे अरबस्थानातही हेच घडले. समाजात अव्यवस्था होती. अतिरेक होता. माणसांना कितीही लग्ने करता येत. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या स्त्रिया त्याच्या मुलाच्या स्त्रिया बनत. त्यातली स्वतःची आई सोडून इतरांशी त्याला संबंध राखता येत असत. आठव्या शतकात तेथील क्युरेश जमातीत सलिवुल्‍ला वसल्लम महमंद पैगंबर जन्माला आला. तो खादिजा या श्रीमंत व्यापारी महिलेचा मुनीम होता. त्याला या अनाचाराला आळा घालावासा वाटला. युद्धात पुरुष मारले जात व स्त्रियांची संख्या त्यांच्या तुलनेत अधिक असे. म्हणून फार तर पुरुषाने केवळ चार लग्ने करावी, असे तो म्हणू लागला. पण, मुनिमाचे म्हणणे कोण ऐकणार? सारेच त्याची हेटाळणी करीत. त्याच्या त्या गरजेतून मग अल्लाने त्याच्यावर आपले संदेश उतरवायला सुरुवात केली. ‘तू माझा अखेरचा प्रेषित आहेस,’ असे त्याला अल्लाने सांगितले. मग तो धर्मोपदेशक व धर्मसंस्थापक झाला. मात्र, मक्केच्या लोकांनी त्याला हाकलून दिल्याने तो हिजर करून मदिनेला (तेव्हाचे यथे्रब)आला. तेथे तो धर्मसंस्थापक व राजाही झाला. त्याचे नियम हेच धर्मनियम (शरियत व कायदे) बनले. जगातल्या सगळ्या धर्मव्यवस्था अशाच जन्माला आल्या. इकडे मनुस्मृतीने समाज बांधला. तिकडे कुराणाने त्याची बांधबंदिस्ती केली. इतर धर्माच्या कथाही याहून वेगळ्या नाहीत.

            राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था अशी चांगली नावे घेऊन ज्या व्यवस्था निर्माण झाल्या, त्याही अशाच. त्या सार्‍याहून अर्थव्यवस्थांची कथा (फार नसली तरी) वेगळी आहे. राज्यव्यवस्था आणि धर्म यांना सांभाळत अन् त्यांच्या आश्रयानेच अर्थव्यवस्था वाढल्या आणि मोठ्या झाल्या. काही काळ त्यांनी त्या दोन्ही व्यवस्थांना आपल्या कह्यात ठेवल्याचेही दिसले. पण, सामान्यपणे राज्यव्यवस्थेचे नियंत्रण आणि धर्मव्यवस्थेची साथ, हेच अर्थव्यवस्थांच्या मागचे खरे बळ राहिले. त्यांनी सरकारांना मदत केली आणि धर्माच्या पुजार्‍यांनाही मोठ्या देणग्या दिल्या. परिणामी, राज्यकर्ते अर्थकारण्यांना सहसा दुखवीत नाहीत आणि धर्म तर त्यांच्यातील अन्यायाबाबत मौन पाळतानाच दिसतो. कदाचित कधी तरी त्याचे एखादे वाक्य त्यांच्या विरोधात गेलेले दिसते. पण, ते समाजातील मोठ्या वर्गांना (गरिबांना) सांभाळण्यासाठी, उदा. वसुधैव कुटुंबकम् (वैदिक धर्म), शेजारची घरे उपाशी असतील तर आपण जेवू नये (इस्लाम), सुईच्या छिद्रातून एकदा उंट जाईल, पण धनवंत जाणार नाहीत (ख्रिश्‍चन). ही वचने केवळ समाजाला शांत व संघटित ठेवून त्यातले शोषण अबाधित राखण्यासाठीच आहेत. धर्म सोडा आणि धर्मग्रंथही सोडा. जगातले ईश्‍वरही कधी समाजातील दरिद्री व वंचितांच्या बाजूने उभे राहिले नाहीत. ते आपापल्या वर्गांसाठी, जातींसाठी व श्रेष्ठांच्या वर्चस्वासाठीच लढताना दिसले. याला रामराज्य अपवाद नाही. कृष्ण नाही, शिव, ब्रह्मदेव आणि विष्णूही नाही. तिकडे अल्ला वा होली घोस्टही तसेच निघाले आणि खलिफा व पोप तर अर्थसत्ता आणि राजसत्तेचे पाठीराखेच राहिले. तात्पर्य, गरिबांना ईश्‍वर, धर्म, धर्मगुरू वा समाजव्यवस्था मदत करीत नाहीत. त्यासाठी गरिबांना स्वतःच्या शोषणाची जाणीव होऊन संघटित व्हावे लागते. पण, त्यांच्या त्या प्रयत्नात अडसरच अधिक आहेत. भारतात जात आहे. भाषा आहे. धर्माची मतमतांतरे आहेत. इस्लाममध्ये शिया अन् सुन्नी आहेत. पाश्‍चात्यांत वर्णभेद आहेत आणि ते टिकविण्यासाठी गोर्‍यांची एकवाक्यता राहिली आहे. सत्ता विरोधात, धर्म विरोधात, परंपरा विरोधात. मग अशावेळी माणसे आपल्या वंचनेविरुद्ध एकत्र कशी येतील?

            तसे प्रयत्न काही तत्त्वज्ञांनी व विचारवंतांनी 18 व 19 व्या शतकात केले, पण त्यांच्या कृतीचे स्वरूप तुटक, प्रादेशिक व वर्गवार राहिले. 19 व्या शतकातील भांडवलशाही शोषणाविरुद्ध पहिले तत्त्वज्ञान मार्क्स आणि एंजल्स यांनी मांडले. पण, त्यांचाही प्रयत्न कामगारांपुरताच मर्यादित राहिला. त्यात शेतकरी, शेतमजूर नव्हते. त्यातही सगळ्या गरिबांचा विचार नव्हता. तरीही, त्या विचारातील बंदिस्त व शिस्तबद्ध मांडणीमुळे त्याला वैज्ञानिक समाजवाद म्हटले गेले. त्याला धनवंतांची हिंसा वर्ज्य नव्हती. धर्मही अमान्य होता. शिवाय, त्यात क्रांती व क्रांतीनंतर येणार्‍या कामगारांच्या हुकूमशाहीचे समर्थन होते. हा विचार जगातल्या अनेक कडव्या विचारवंतांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी स्वीकारला. विसाव्या शतकात त्याच बळावर त्यांनी रशिया व चीनमध्ये आपली हुकूमशाही आणून निम्म्याहून अधिक जग ताब्यात घेतले. शेवटी गरिबांच्या मदतीला ईश्‍वर आला नाही, माणूसच आला.

            या माणसांचेही दोन वर्ग राजकारणाने निर्माण केले. एक सत्ताधार्‍यांचा व दुसरा प्रजाजनांचा. आज्ञा करणारे व तिचे पालन करणारे वेगळे झाले. त्यातही हुकूमशाही असल्याने प्रजेचा आवाज दाबला व मारलाही गेला. सगळे हुकूमशाहा तेच करीत असतात. राजकारणातले, सरंजामशाहीतले आणि समाजवादी म्हणविणारे राज्यकर्तेही असेच वागले. एका अमेरिकन अभ्यासकाच्या मते, एकट्या विसाव्या शतकात जगातील हुकूमशाहांनी मारलेल्या अभागी जीवांची संख्या 16 कोटी 90 लाखांवर जाणारी आहे.

            यावरचा मानवी मार्ग कोणता? समाजवादातून हुकूमशाही वजा करणे, क्रांती व हिंसा बाजूला सारणे आणि हुकूमशाहीच्या जागी लोकशाही आणणे. तात्पर्य, साम्यवाद (हिंसा, क्रांती व हुकूमशाही) समाजवाद. हा सार्‍या समाजाला कवेत घेईल व तो खर्‍या अर्थाने समाजाचे (गरिबांसह) राज्य आणील, हा विचार मग प्रभावी होऊ लागला. जगभराच्या देशात समाजवादी पक्ष उभे होऊ लागले. पण, त्यात साम्यवादाची वैज्ञानिक मांडणी नव्हती. मग तो देशोदेशी व समाजपरत्वे वेगळा उभा होताना दिसला.

            मी जगभराचे तत्त्वज्ञानाचे कोश पाहिले. पण त्यातल्या प्रत्येकातला समाजवादाचा अर्थ वेगळा होता आणि होते, त्यातला कोणताही अर्थ पटण्याजोगा नव्हता, असे मत गांधीजींनी नेहरूंना 1925 च्या सुमारास पत्रातून कळविले. त्यात या गोंधळाचा सारा तपशील आला आहे. शिवाय, एकाच देशात समाजवादी म्हणविणार्‍यांचे भाषिक, जातीय, वर्गीय व अन्य गट उभे झाले. धर्मांधांना समाज एक करता आला नाही, तसा तो समाजवाद्यांनाही एक करणे जमले नाही. नेहरू रशियाहून परतले, तेव्हा ते तेथील पंचवार्षिक योजना आणि साम्यवादी विचारांनी कमालीचे प्रभावित झाले होते. त्यांचे मत वळविण्यासाठीच गांधींनी हे पत्र त्यांना लिहिले. समाजवादाचे सामर्थ्य कोणते? आणि त्यातले दोष कोणते? गांधी समाजवादी नव्हते. उलट ते त्यांचे टीकाकार होते, तर त्यांचे राजकीय वारसदार झालेले नेहरू स्वतःला समाजवादी म्हणवून घेत होते. मात्र, तेव्हाही देशाने, इतर समाजवादी नेत्यांनी त्यांच्यावर स्युडो समाजवादाचा आरोप करीत त्यांना नावेच ठेवली. समाजवादाची शोकांतिका यात दडली आहे.

            मार्क्सच्या साम्यवादातील हुकूमशाहीचे समर्थन, हिंसेची तरफदारी आणि हुकूमशाहीला पाठिंबा या गोष्टी न आवडणारा मोठा वर्ग समाजात व जगात होता. त्याला त्या वादात समाजवादाने केलेली सुधारणा व त्याला दिलेले माणुसकीचे रूप आवडणारे होते. परिणामी, रशिया व चीन वगळता जगभरच्या अनेक देशात स्वतःला समाजवादी म्हणवून घेणारे अनेक पक्ष उदयाला आले. इंग्लंडचा मजूर पक्ष स्वतःला समाजवादी म्हणवून घेऊ लागला. जर्मनी, फ्रान्स, इटली व दक्षिण अमेरिकेतील देशांसह आफ्रिका व आशियाच्या अनेक देशांतील पक्षांनीही ते नाव घेतले. अगदी हिटलरसारखा वंशश्रेष्ठत्वाचे तत्त्वज्ञान सांगणारा हुकूमशहाही स्वतःच्या पक्षाला नॅशनल सोशालिस्ट पार्टी (नाझी) म्हणत होता. याच्याच अनेक आवृत्या भारतासह पौर्वात्य देशातही निघाल्या. 1934 च्या सुमारास अंकुरलेला व 1935 मध्ये काँग्रेस समाजवादी गट म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होणारा भारतातला समाजवादी पक्षही त्यातलाच एक होता.

            जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, डॉ.राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, ना.ग.गोरे, एसएम यासारखे नेते त्याला सर्वत्र मिळाले. नेहरूही स्वतःला समाजवादी म्हणवून घ्यायचे. 1936 ची काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी त्याचेच नाव पुढे करून लढविली. 1942 च्या ‘चले जाव’च्या लढ्यात काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते तुरुंगात बंद झाले. तेव्हा या समाजवादी नेत्यांनी तो लढा भूमिगत राहून लढविला. परिणामी, त्याला जनतेत खूप मोठी लोकप्रियता मिळाली. एकेकाळी स्वतःला समाजवादी म्हणवून घेण्याची फॅशनच त्या दरम्यान निर्माण झाली. तो एक क्रांतिकारक विचार आहे. याची त्या सार्‍यांना मनोमन खात्री होती. पण, कोणताही विचार अमलात आणायला संघटना लागते व ती राष्ट्रीय पातळीवर असावी लागते. याची जाणीव व त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, याचाच त्यात अभाव होता. त्यातून प्रत्येक समाजवादी हा एक स्वतंत्र विचारवंत होता. त्याला त्याच्याशिवाय दुसर्‍याचे म्हणणे मान्यच होत नव्हते. समाजवाद्यांना समाजाचे पाठबळ नव्हते आणि ज्याला ते होते, त्या नेहरूंचा तिरस्कार करण्यात या सार्‍यांना धन्यवाद वाटत होती. हा भारतीय समाजवाद्यांचा विरोध बाजूला ठेवून काही गोष्टी लक्षात घ्यायच्या.

            मार्क्सचे तत्त्वज्ञान विज्ञाननिष्ठ (सायंटिफिक) म्हणून जर समाजवाद्यांचे विचारस्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठपण विस्कळीत (अनसायंटिफिक) म्हणूनच विस्तारले. त्याने त्यात ठिकठिकाणच्या नेत्यांच्या इच्छेप्रमाणे (समाजाच्या गरजेप्रमाणे नव्हे) वेगवेगळे अवतार धारण केले. जर्मनांचा समाजवाद वेगळा. तो प्रथम कमालीचा साम्यवादविरोधी व पुढे हिटलरविरोधी बनला. त्यातले अनेकजण हिटलरच्या तुरुंगात राहिले आणि काही त्याच्या ज्वालागृहात मृत्युमुखी पडले. ऑस्ट्रियात तो वेगळा होता. इंग्लंडच्या मजूर पक्षाने स्वतःला समाजवादी म्हटले. पण, आरंभापासूनच तो कधी तेथील उदारमतवाद्यांशी (लिबरल), तर कधी इतरांशी संगनमत करून निवडणुका लढवीत व सरकारे चालवीत होता. फ्रान्सचा समाजवाद एकाच वेळी भांडवलशाहीशी आणि नाझीवादाशी लढला. नंतरच्या काळात त्याचे रूप एवढे पालटले की, त्यातला समाजवाद आणि भांडवलशाही यांना वेगळे करणेच अवघड झाले. (भारतातही नेहरूंनी समाजवाद आणि भांडवलशाही यांची संमिश्र अर्थव्यवस्था ते सत्तेवर आल्यानंतर स्वीकारली.) बाकीचे देश स्वतःला समाजवादी म्हणवीत आले. पण, त्यांच्यातला राष्ट्रवादच एवढा प्रखर की, त्याने समाजवादाला फारसे स्थान व वजन मिळूच दिले नाही.

            भारतात आज अनेक पक्ष असे आहेत की, जे स्वतःला समाजवादी म्हणवितात. पण, ते प्रत्यक्षात समाजवादी नाहीत. नेतृत्ववादीच अधिक आहेत. पवारांचा (अगोदरचा) समाजवादी पक्ष, लालूंचा राष्ट्रीय जनता दल, मुलायम सिंगांचा समाजवादी पक्ष हे सारे त्यातलेच. शिवाय, काँग्रेस, ममता, द्रमुक हे पक्षही स्वतःला समाजवादी म्हणवितात. पण, त्यांचाही विचार नेतृत्वापाशी थांबणारा आहे. स्वतःला समाजवादी म्हणविणारा, जयप्रकाश व लोहिया वगैरेंचा जुना समाजवादी पक्ष आज कुठे दिसत नाही. नाही म्हणायला, त्यातले काही कार्यकर्ते अजून आहेत. पण, त्यांची ताकद स्थानिक म्हणावी एवढीही नाही. समाजवाद आणि समाजवादी यांच्या या अवस्थेला त्यातली माणसे जबाबदार की स्वतः तो वाद जबाबदार? की त्या सार्‍यांच्याच दोषांमुळे त्याला आजची दुर्दशा आली ? ही दुर्दशा केवळ भारतीयच नाही. ती जागतिक आहे. तिकडे रशियाने मार्क्सवादाला तिलांजली दिली आहे. चीननेही त्याच्यापासून फाररकत घेतली आहे. वैज्ञानिक म्हणवून घेणारा विचार जर असा परास्त झाला, तर मुळातच अवैज्ञानिक असलेल्या तत्त्वचिंतनाचे काय व्हायचे होते?

            1957 च्या सुमारास संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यासपीठावर आपला बूट संतापाने आपटून रशियाचे साम्यवादी नेते ख्रुश्‍चेव्ह म्हणाले होते, ‘तुम्हाला आमचा साम्यवाद आवडत नाही. आम्हाला तुमची भांडवलशाही आवडत नाही. पण, दुर्दैव हे की आपण एकमेकांचे शेजारी आहोत. म्हणून हा शेजारधर्म पाळणे आपल्याला भाग आहे.’ त्या घटनेला आता पाऊणशे वर्षे होत आली. शेजार कायम राहिला. पण, ज्यावर संघर्ष होता, तो वाद कुठे आहे? तो तर कधीचाच बेपत्ता झाला आहे. विचार बेपत्ता झाला आणि त्याला मानणारी माणसे दिसेनाशी होत गेली, तरी त्याचे जनमानसातील आकर्षण अजून तसेच राहिले आहे. फार पूर्वी समाजवादाचा साधा उच्चारही क्रांतीच्या जयजयकारासारखा वाटे. तसे आज राहिले नाही. मात्र, हा आपल्या कल्याणाचा आणि सुरक्षेचा विचार आहे, ही भावना तो विचार समजूनही न घेतलेल्या अनेकांच्या, विशेषतः कनिष्ठ मध्यम व गरीब वर्गाच्या मनात आहे. लोकशाहीत निवडणुका आल्या की, सारेच पक्ष त्याची किंवा त्याच्याजवळ जाणारी भाषा बोलतात. तिला फारसा अर्थ नसला, तरी लोकांना ती आवडते.

            मुळात समाजवादाचा विचार समाजाच्या व्यापक पाठिंब्यावर उभा होईल, अशीच त्याच्या तत्त्वचिंतकांची धारणा होती. यात धनवंतांचा विचार नाही, पुरोहितांचा नाही, पैशाचा नाही. असलाच तर तो गरिबांचा व त्यांची गरिबी घालविणारा हा विचार आहे, अशीच भावना त्याने समाजात जागविली होती. त्यामुळे ती भाषा बोलणारे नेते गरिबांचे कैवारी आणि पक्ष गरिबांचे पाठीराखे म्हणून आपोआप ओळखले गेले. पण, ती भाषा बोलणारे नेते एक गोष्ट मुळातूनच जाणून होते. ती ही की, ही गरीब म्हणविणारी माणसे गरिबी घालविण्याच्या प्रश्‍नावर कधी संघटित होत नाहीत. त्यासाठी त्यांना आकर्षित करणारे विषय वेगळेच आहेत. त्यात धर्म आहे, जात आहे, पंथ आणि परंपरा आहे. इतिहासाने दिलेले खोटे अभिमान आहेत. हे अभिमान व तशा अहंता जागविणार्‍या यंत्रणा समाजात आहेत. दरिद्री प्रजाजन संस्थानिकांच्या मागे, गरीब कामगार मालकांच्या प्रतिनिधींच्या मागे आणि लुबाडले जाणारे दरिद्री त्यांची लुबाडणूक करणार्‍यांच्याच मागे कसे लागतात, याची जाण त्यांना होती. यात समाजाचे अडाणीपण असले, तरी हे अडाणीपण हाच त्याचा समज आहे आणि समज हा विचारांहून नेहमी भारी असतो, हे जाणकारांना कळत होते.

(सुरेश द्वादशीवार हे नामवंत लेखक व विचारवंत आहेत)

9922928221

………………..

हे पुस्तक Amazon.inBookganga.com वर उपलब्ध आहे. Online घरपोच बोलविण्यासाठी https://amzn.to/3iuMNy7 किंवा https://bit.ly/300AZNW या लिंकवर क्लिक करा

मीडिया वॉच पब्लिकेशनचे नवीन पुस्तक ‘समाजवाद: आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’ हे पुस्तक पुण्यात खालील ठिकाणी उपलब्ध

१. साधना प्रकाशन, ४३१, शनिवार पेठ

२. अक्षरधारा बुक गॅलरी, बाजीराव रोड, अत्रे सभागृहाच्या बाजूला

३. बुक गंगा, डेक्कन, शिवाजी नगर

४. रसिक साहित्य, बुधवारपेठ

५. मॅजेस्टिक बुक गॅलरी, नारायण पेठ

६.पुस्तकपेठ, आयडियल कॉलनी, कोथरूड

७. मनोविकास प्रकाशन, अप्पा बळवंत चौक

…………………………………………………………

सुरेश द्वादशीवार यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –सुरेश द्वादशीवा– type करा आणि Search वर क्लिक करा.

 

Previous articleज्याचा त्याचा गांधी !
Next articleपूर्वजांचे ‘पेहोवा’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.