ख़ुद को कभी मैं पा न सका… जाने कितना गहरा हूँ…

सफल प्रेमाच्या असफल गोष्टी

-सानिया भालेराव

गुलाबी रंग म्हटलं की तिला काही आठवत असेल तर त्याचे अत्यंत रेखीव गुलाबीसर ओठ. त्याचं भारदस्त कपाळ, कुरळे केस आणि मनाचा ठाव घेणारे डोळे. त्याला नुसतं पाहिलं की तिला विरघळून जायला व्हायचं. त्याचं देखणं रूप ती डोळ्यात साठवू पाहायची. तिला कित्येकदा वाटायचं त्याच्या गुलाबी ओठांचा करकचून चावा घ्यावा आणि मग या विचाराने ती खुद्कन हसायची. ती अशी हसली की तो डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्याकडे एक जालीम कटाक्ष टाकायचा आणि मंद हसायचा. तिला क्षणभर वाटायचं की याला आपल्या मनातलं कळलं की काय? पण मग ती छे छे असं म्हणून सोडून द्यायची. पण खरी गोष्ट ही की त्याला तिच्या मनातलं सगळं सगळं कळायचं. तिच्या टपोऱ्या काळ्याशार डोळ्यांमध्ये दाटून आलेलं प्रेम त्याला जसंच्या तसं दिसायचं. तिच्या जीवाची घालमेल सुद्धा त्याला समजायची पण आपल्याला काहीही कळलं नाहीये, हे दाखवण्यात तो तरबेज होता. त्याचं तिच्यावर इतकं गडद प्रेम होतं की त्याला स्वतःचीच भीती वाटायची. स्वतःबद्दल त्याला खात्रीच नव्हती. हसनैन आक़िब यांचा एक शेर आहे, तो त्याच्यावर अगदी लागू होता..

ख़ुद को कभी मैं पा न सका

जाने कितना गहरा हूँ…

आणि म्हणून तो कायम एक अंतर ठेवून तिच्याशी वागायचा. तिला त्याच्या आत होणारी उलथापालथ माहितीच नव्हती. तीला फक्त त्याच्यावर जीवापाड प्रेम करणं इतकंच ठाऊक होतं.. त्याच्या एका वाढदिवसाला तिने एक शर्ट घेऊन द्यायचं ठरवलं. ती गेली दुकानात आणि ढिगाने शर्ट पाहिले पण तिला एक सुद्धा रंग पसंत पडेना. सरतेशेवटी तिची नजर एका शर्टवर गेली. अगदी सुंदर फिकट गुलाबी रंगाचा तो शर्ट. त्याच्या ओठांसारखाच.. तिने चटकन तो शर्ट घेतला, डोळे बंद केले आणि हा शर्ट घातलेलं त्याचं रुपडं तिच्या डोळ्यासमोर आलं. तिला खुद्कन हसू आलं. दुकानदार मात्र तिला वेड्यागत बघत होता.. पण तिच्या गावीसुद्धा नव्हतं ते.. तिने तो शर्ट घेतला आणि घरी आली.

त्याच्या वाढदिवसाला तिने तो शर्ट त्याला दिला आणि म्हणाली “उद्या आठवणीने घालून ये बरं.” मग धीर एकटवून म्हणाली, “तुला काहीतरी सांगायचं आहे मला”. तो काही म्हणणार इतक्यात धूम ठोकून पळून गेली. काही केल्या तिला झोप येईना. आपण जेव्हा उद्या सांगू त्याला की, किती वेड्यासारखं प्रेम करतो त्याचावर.. तर काय म्हणेल तो? कसा दिसेल त्या गुलाबी रंगाच्या शर्टमध्ये.. या विचाराने तिचे गाल सुद्धा गडद गुलाबी होऊन गेले.. बशर नवाज यांची गजल लावली तिने..

ब-हर-उनवाँ मोहब्बत को बहार-ए-ज़िंदगी कहिए

क़रीन-ए-मस्लहत है उस के हर ग़म को ख़ुशी कहिए

जहाँ-साज़ों को फ़रज़ाना हम अहल-ए-दिल को दीवाना

ज़माना तो बहुत कहता रहा अब आप भी कहिए

मैं अक्सर सोचता हूँ तेरी बे-पायाँ नवाज़िश को

अदा-ए-ख़ास कहिए कोई या बस सादगी कहिए

भरी महफ़िल से भी तिश्ना ही लौट आई नज़र अपनी

ख़ुद-आगाही समझ लीजे इसे या ख़ुद-सरी कहिए ….

आणि कधी डोळा लागला कळलंच नाही तिला ..सकाळी ठरलेल्या वेळेला धडधडत्या हृदयाने ती पोहचली.. वाट बघत बसली पण तो आलाच नाही. त्यावेळी मोबाईल वगैरे प्रकार नव्हते. दुपार होत आली. रडून रडून डोळे सुजले होते. उन्हाने गाल लाल झाले होते. तो मात्र आलाच नाही. मग एकदम काय झालं कोणास ठाऊक ती उठली आणि चालायला लागली.. त्या दिवसापासून गुलाबी रंग तिच्या आयुष्यातून तिने बाद करून टाकला तो कायमचा. त्याचा विचार हजार वेळा तिला कित्येक वर्ष येत राहिला पण तिने निकराने गुलाबी रंगाचा द्वेष करण्याचे निष्फळ प्रयत्न चालूच ठेवले..

“बाबा, तूझ्याकडे गुलाबी रंगाचे शर्ट किती जास्तं आहेत रे? किती हँडसम दिसतोस तू गुलाबी रंगामध्ये.. तुला तर आजच्या दिवशी शर्ट निवडतांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही.. नवरात्रीचा आजचा दिवस म्हणजे तुझाच जणू..” मानसी त्याला म्हणाली.. तो एकदम चमकला.. मग गोड हसून तिला म्हणाला ‘फार जुनं नातं आहे माझं या रंगाशी’.. आणि त्याला ती आठवली.. तिचंच नाव त्याने मानसीला दिलं होतं.. त्या दिवशी तिने दिलेला शर्ट घालून तो बाहेर पडला खरा पण मुंबईहून येताना त्याच्या मोठ्या भावाचा एक्सीडेंट झाला असं त्याला कळलं. भाऊ – वहिनी त्याच्या पदरी सहा महिन्यांची पोर सोडून गेले होते. आता त्याच्याकडे काही पर्याय नव्हताच. त्या तान्ह्या जीवाला घेऊन त्याने मुबंई गाठली आणि सगळं पाठीमागे सोडलं.. फक्त तो गुलाबी शर्ट मात्र सोबतीला घेऊन गेला आणि गुलाबी रंग आणि त्याची मानसी हेच त्याचं आयुष्य झालं..

एव्हाना मानसी तयार झाली होती.. त्याने शर्ट चढवला आणि तो बाहेर आला.. “अरे इतका जुना कोणता हा शर्ट घातलास बाबा ?” मानसीने त्याला विचारलं.. “गुलाबी रंग किती फिकट झाला आहे याचा” ती म्हणाली.. तो फक्त हसला.. तिच्या डोक्यावर त्याने हात ठेवला आणि अचानक पायातला जोर कमी पडतो आहे असं त्याला जाणवलं.. मानसीने लागलीच त्याचा हात पकडला.. त्याला भरून आलं होतं.. त्याच्या मानसीच्या काळ्याशार डोळ्यांना आठवत तो चालायला लागला..

(लेखिका संशोधिका असून त्यांची ‘इकोसोल’ नावाची पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणारी कंपनी आहे.)

[email protected]

Previous articleअजित पवारांवरील छापे आणि इन्कमटॅक्सची राजकीय हुशारी
Next articleगुलाबी दूध
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here