
-संपत मोरे
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार रंगराव नामदेव पाटील हे आमदारकीच्या काळात तालुक्याचा बैलगाडीतून दौरा करीत. दौर्यादरम्यान ते आपल्यासोबत तांदूळ आणि स्वयंपाकाच्या वस्तू जवळ ठेवत. ज्या गावात ते जात त्या गावातील चावडी अथवा धर्मशाळेत राहत. तिथे जेवण बनवत आणि गावकर्यांना सोबत घेऊन जेवण करत गावातील लोकांशी संवाद करीत. गावातील लोकांना आपल्या खाण्याजेवण्याची झळ लागू नये, त्यांना आपला त्रास होऊ नये, ही भूमिका त्यांची असायची.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हा आडवळणी मतदारसंघ. या मतदारसंघात १९५२ साली वडगाव या गावचे रंगराव पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी केली. त्यात त्यांचा विजय झाला. आमदार असताना त्यांनी जो साधेपणा दाखवला. त्यावेळी असलेल्या प्राप्त आणि प्रतिकूल परिस्थितीत तालुक्यातील जनतेची जी सेवा केली, त्याची आठवण तालुक्यातील तिसर्या चौथ्या पिढीचे लोक काढतात. माजी आमदार पाटील यांच्याबाबत लिखित स्वरूपात काहीही साहित्य आढळत नाही; मात्र मौखिक माध्यमातून हा माणूस, त्यांचे कार्य, त्यांच्या कामाचे वेगळेपण लोकांनी जपले आहे. हा माणूस आता लोकांच्या स्मरणनोंदीत जिवंत आहे. जुन्या लोकांनी त्यांच्याबाबत जे सांगितले आहे, तेच नवी पिढी सांगते.
शाहूवाडी हा तालुका सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या शेजारील तालुका. आम्ही आज याच शाहूवाडीला निघालो होतो. आमच्या वाटेला अनेक गावं आली. या गावांची वैशिष्ट्य सुद्धा वेगवेगळी. प्रत्येक गावाने आपली नवी ओळख जपलेली. त्या त्या गावातून जाताना या गोष्टी आठवत होत्या. देशात ब्रिटिशांची सत्ता असताना ही सत्ता उथलवून लावण्यासाठी ज्या गावांनी पुढाकार घेतला, सातारा जिल्ह्यात स्थापन झालेल्या पत्रीसरकार चळवळीला बळ दिलं तो हा परिसर. कुंडल आणि वाळव्याचा हा परिसर. या दोन गावात तसं अंतर, पण हे अंतर पार झालं राष्ट्रीय विचारांनी. इंग्रजी सत्ता घालवून इथं स्वराज्य आणायचं, हा विचार गावागावात गेला. गावच्या गाव पेटून उठली. गावगाडा लढण्याच्या तयारीत असायचा. त्यावेळच्या दिवसाचं वर्णन या लढ्यातल्या शूरवीरांनी आपापल्या परीने केले आहे. काहींनी लिहिलं आहे, तर काहींच्या सोबत मीही संवाद केला आहे. त्यातील अनेक क्रांतिकारक आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आज त्यांच्या मुलुखात असल्यावर त्यांची आठवण होणार नाही, असं थोडंच आहे? त्यांच्या आठवणी आणि ब्रिटिश सत्तेसोबतच्या त्यांच्याकडून ऐकलेल्या लढती मला आठवत होत्या. आज माझ्यासोबत जो सहकारी आहे, त्याचं नाव चंद्रकांत यादव. अठरा वर्षाचा तरुण. आयटीआय शिकणारा. माझा मामेभाऊ. त्याला मी हा सगळा परिसर सांगतोय. मला जेवढा समजला, तेवढा इतिहास त्याला ऐकवतोय. त्यालाही ते ऐकण्याची गोडी लागली आहे. यातील बरंच त्यानं ऐकले आहे; याला कारण म्हणजे या भागातील लोकांच्यात असलेलं इतिहासाचं वेड. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्रीसरकारच्या लढाईत ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांच्यावर या परिसरातल्या लोकांनी अफाट प्रेम केलं. त्यांच्या आठवणी सतत जागत्या ठेवल्या. या तरुण मुलाच्या कानावरून यापैकी इतिहासाची काही पान गेलेली. आजही तो एकाग्रतेने ऐकत होता.
