‘नूर’ – ए – रणथंबोर

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२४)

-प्र.सु.हिरुरकर

काही वेळातच वाघीण पाण्यातून उठली. नाल्याच्या काठाकाठाने आमचे कडे येऊ लागली. एवढ्यात ती पुढ्यातील पाणवठ्यात मागे मागे सरकून बसली. तेथून ती इतरत्र लक्ष देत होती. परत काही वेळातच ती ओल्या अंगाने नदीच्या पाणवठ्यातून वर आली यावेळी तिने आमचेकडे मान वाकवून पाहिले. आल्या दिशेने परत जाऊन ‘नूर’ वाघीण नाल्यातून वर आली आणि आम्ही ज्या रानवाटेवर होतो ती ओलांडून डावीकडच्या वनात पसार झाली. काल पाहिलेल्या नुरी वाघीणीची ही आई असल्याचे समजले. रणथंबोरमध्ये येणा-या पर्यटकांची ही अत्यंत आवडती वाघीण आहे. सध्या नूर वाघीणीला रणथंबोरची राणी संबोधल्या जाते. होय ‘नूर-ए- रणथंबोर’.
…………………………………………………………………………….
रखरखत्या वैशाखाच्या मध्यात २४ तासाच्या रेल्वे प्रवासानंतर राजस्थानच्या सवाई माधवपूर रेल्वे स्थानकावर पावलं पडली. वाळवंटीय प्रदेश म्हणून राजस्थानची जुनी ओळख. सकाळचे ११ वाजले होते. उन्ह तळपायला लागले होते. मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो. दुपारची सफारी असल्याने आवश्यक ते सर्व दैनंदिन सोपस्कार आटोपून रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या भ्रमणासाठी जिप्सीत बसून निघालो.

४३ डिग्री सेल्सीएसच्या उन्हामुळे चेह-याला आवश्यक तेथे कपड्याने झाकून प्रवेशव्दारातून आत प्रवेशलो. दूरवर तांबडी-पिवळी,दगड-धोंड्याची अस्पष्ट पर्वतराजी आणि काही ठिकाणी रणथंबोर किल्ल्याची ढासळलेली तटबंदी दिसत होती. तसा हा खडकाळ पट्ट्यांचा प्रदेश. गेरव्या रंगाच्या दगड-धोंड्याच्या खडतर रानवाटेवरुन जातांना लहान मोठे आडवे तिडवे झटके बसत असल्याने जवळचा कॅमेरा सांभाळत कसरत करावी लागत होती. रानवाटेच्या दुतर्फा दूर दूर पर्यंत पसरलेली बाभुळी सारखी बारीक पानांच्या ढोक वृक्षांची घनगर्द पसरलेली वृक्षराजी. त्यातून प्रवास करतांना वेगळीच अनुभूती मिळत होती. ही झाडे फक्त वाळवंटीय प्रदेशात दिसून येतात. पावसाची हलकासी एक सर जरी येवून गेली की, लगेच ही झाडं हिरवीगार होवून जातात. जणू काही वीस-तीस फुट उंचीची ही झाडं हिरव्या छत्र्यांसारखी वाटत होती.

रानवाटेच्या दोन्ही कडेने पसरलेल्या या हिरव्यागर्द वनराजीत पांढ-या शुभ्र लांब हातभर शेपटीचे स्वर्गीय नर्तक पक्षी ढोक वृक्षांच्या हिरवाईत विशेष लक्ष वेधून घेत होते. सोनपिवळ्या रंगाचे हळद्या पक्ष्यांची मंजूळ लांबसुरी शीळ पी-लो-लो आणि राखोडी-तांबड्या रंगाचे, लांब शेपटीचे टकाचोर पक्ष्यांचे थवे रणथंबोरला विशेष सौंदर्य देत होते. जंगलाला जीवंतपणा आणत होते. नानाविध पक्ष्यांच्या मांदियाळीत दूरवरुन नवरंग पक्ष्यांचा व्हीट–टयू,व्हीट-टयू आवाज अख्या रानावर पसरत होता. एका ठिकाणी शुष्क पठारावर तांबूस-राखोडी रंगाचे, डोक्यावर मध्यभागी कपाळावर दोन पिळदार हितभर शिंगाचे चिंकारा हरिण एकटेच अन्न ग्रहण करण्यात मग्न होते. आमच्या उपस्थितीची हलकीसी चाहूल त्याला लागली आणि ते सावध झाले. कान मागे-पुढे करत नजरेने आमचेकडे बघत ते सुरक्षेचा अंदाज घेत होते. याचा लहानसा आकार आणि त्याच्या रंग रुपामुळे ते अतिशय गोंडस वाटत होते. लवकरच ते आमच्यापासून अंतर वाढवत पलीकडे पसार झाले. पुढे रानवाटेने कोरड्या नाल्यात एका अर्जून वृक्षाच्या छायेत बुंध्याजवळ दगड-धोंड्यात एक मोर दगडांवर पोट ठेवून बसला होता. रखरखत्या उन्हामुळे दाह कमी करण्यासाठी नाल्यात ओलसर ठिकाणी तो बसला असावा. नाल्याच्या अलीकडच्या काठावर एक घोरपड आपल्या पंजाच्या मोठमोठ्या नखांनी लहान-मोठे दगडधोंडे बाजूला सरकवून त्याखालील खेकडे, किडे कीटकं खात होती.

दुपारच्या जंगल भ्रमणात शेवटच्या चरणात पर्वतराजी आणि वृक्षराजीच्या सांजसावल्या हळूवारपणे पसरु लागल्या होत्या. दूरवर एका ठिकाणी वाहनांची गर्दी आणि पर्यटकांच्या हालचाली दिसल्याने चालकाने गाडी वेगाने नेऊन नाल्याच्या काठावर थांबवली. पुढ्यात गाड्यांच्या गर्दीमुळे आम्ही सर्वात मागे असल्याने ब-याच शारीरिक कसरती करुनही काहीच दिसत नव्हते. पुढ्यातील पर्यटक मात्र उजवीकडे टक लावून पाहात होते. गाईडने दुस-या गाडीच्या गाईडला विचारले आणि तो म्हणाला-‘ नुरी वाघीण आराम कर रही है’ एवढ्यात समोरचा पर्यटकांचा कँटर पुढे सरकला आणि आमची गाडीही पुढे सरकली. पाच वर्षाची नूरी वाघीण अर्जून वृक्षाच्या सावलीत दोन पाय पुढ्यात घेवून, जीभ बाहेर काढत श्वास घेत आरामात बसली होती. आमचे पासून अंतर असावे जवळपास पाचशे फुटाचे. नूरीच्या मागे अंदाजे शंभर फुटावर एक मोर अन्न मिळवण्यात मग्न होता. मात्र कधीकधी तो वाघीणीच्या हालचालीकडेही लक्ष देत होता. बहुधा वाघीणीचे पोट भरले असल्याने ती आराम करत असावी. नुरीला कॅमेरात टिपण्यासाठी बराच आटापिटा करावा लागत होता. त्यात काही पर्यटकांच्या हालचाली वाघीणीच्या आरामात अडचण निर्माण करत होते. नुरी वाघीणीला बघण्यात बराच वेळ निघून गेल्याने सफारीचा वेळही आटोपत आला होता. गाईडने सूचना केली आणि मुख्य प्रवेशव्दाराकडे आम्ही निघालो.

दुस-या दिवशी भल्या पहाटे रणथंबोरच्या वेगळ्या वनक्षेत्राकडे निघालो. हलकेसे ढगाळ वातावरण असल्याने थोडा फार गारवा जाणवत होता. मातीच्या रानवाटेवर गाड्यांचा धुराळा उडत होता. रानवाटेच्या डावीकडून नाला वाहत होता. त्याच्या काठावर अर्जून, वड, पिंपळ, जांभूळ इ. हिरवेगार मोठमोठे वृक्ष वाढलेले होते. धनेश पक्ष्यांचे आवाज आणि हालचाली दिसून येत होत्या.
एक पर्वत ओलांडून गाडी खाली उतरली. पायथ्याजवळून भर उन्हाळृयात एका वाहत्या नाल्याजवळून हिरव्या वनराजीतून आणि हिरव्यागार तृणमेळ्यातून पुढे जात होतो. या परिसरात आमची गाडी एकटीच होती. नाल्याच्या काठावरील हिरव्या गवतातील हालचाल गाडी चालकाच्या लक्षात आली. गाडी हळूवार पुढे घेवून थांबवली आणि काय आश्चर्य! एक प्रचंड देहयष्टीचा वाघ वृक्षछायेतील गवतात आराम करत बसला होता. किड्या कीटकांच्या त्रासामुळे तो कधी शेपटी हालवत होता तर कधी मान वर करुन पाहात होता. एक नजर त्याने आमचेवरही टाकली. त्याचा भर भक्कम करारी चेहरा दृष्टीस पडला. तसेच त्याला कॅमेरात टिपले. शरीराने अतीशय पोक्त आणि भेदक नजरेचा हा वाघ होता टी- 86 नावाचा. वयाने तो दहा वर्षाचा असून त्याचा या भागात प्रचंड दरारा असल्याचे गाईडने सांगितले. आमची गाडी एकटीच असल्याने शांतपणे त्याच्या हालचालीवर नजर ठेवून होतो. काही वेळातच तो गवतातून उठला आणि रानवाटेवर येऊ लागला. एव्हाना चालकाने गाडी पुढे घेतली होतीच. एका झाडाला वळसा घेवून नाकाने वास घेत तो रानवाटेवर आला. एक फर्लांगभर गाडी पुढे व तो मागे. सुरक्षित अंतर ठेवून त्याचे निरीक्षण करणे चालू होते. एवढा मोठा वाघ परंतु चालतांना तो थोडा लंगडत चालत होता. पुढच्या उजव्या पायाला काही तरी जखम असावी. शिकार करतांना किंवा दुस-या वाघासोबतच्या लढाईत तो जखमी झाला असावा. काही अंतर चालल्यावर त्याने रानवाटेवरुन काढता पाय घेतला आणि पलीकडच्या वनराजीत गेला. टी-86 नावाच्या वाघाच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो.

जंगल भटकंतीत एका ठिकाणी लहान मातीच्या तलावाजवळ आम्ही थांबलो. पाण्यावर हळद्या, टकाचोर, थीकनी, पांढ-या पोटाचा कोतवाल, तित्तर,मोर-लांडोर,क्रीस्टेड बंटींग, स्वर्गीय नर्तक इ. पक्ष्यांची मांदियाळी केवळ आपली तहान भागविण्यास गर्दी करत होते. त्याचे सोबतीला ससा, हरिण, मुंगूस इ. च्या गर्दीमुळे या तलावाला जीवंतपणा आला होता. काठावरच्या पाण्यात दिसणारे वन्यजीवांचे रंगीबेरंगी प्रतीबिंब नजरेला भुरळ पाडत होते. हळद्या पक्ष्यांचे सोनपिवळे प्रतिबिंब पाण्याला सोनेरी रंग देत होते. पुढे काही अंतर गेल्यावर एका ढोक वृक्षाच्या छायेत दोन सांभर आरामशीर बसले होते. त्यांच्या डोक्यावर दोन टकाचोर पक्षी त्यांच्या कानातील, अंगाखांद्यावरील कीडे-किटकं खावून साफसफाई करत होते. वन्यजीव आणि पक्ष्यांमध्ये करोडो वर्षापासून सामाजिक बांधीलकी जोपासली जात आहे. सांबरा प्रमाणेच हत्ती, रानगवे, निलगाय, पाणगेंडा. मगर इ. प्राण्यांची अशीच साफसफाई वेगवेगळे पक्षी करतात. जणू काही निसर्गानं प्रत्येकाला कामाची वाटणी चोखपणे वाटून दिली आहे. या साफसफाईमुळे वन्यजीवांची साफसफाई होवून रोगराई इतरत्र पसरत नाही आणि पक्ष्यांचे पोटही भरले जाते.

पुढे उजवीकडे रणथंबोर किल्ल्याची उजवीकडील ढासळलेली तटबंदी आणि खाली उतरत्या भिंतीच्या भागातून खाली ब-याच ठिकाणी पाणी असलेला नाला वाहात होता. भर दुपारी वैशाखी उन्हाचा तडाखा होताच. या नाल्यातील एका पाणवठ्यात एक वाघीण पाण्यात बसून शरीराची उष्णता कमी करत होती. जिप्सी पासून अंतर असावे जवळपास एक हजार फुटाचे. वाघ हा उष्ण रक्ताचा प्राणी असल्याने त्याला जास्त ऊन सहन होत नाही. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी त्यांना हा प्रकार उन्हाळ्यात वारंवार करावा लागतो. ही ‘नूर’ नावाची प्रसिध्द वाघीण असल्याचे गाईडने सांगितले. हिलाच T – 39 या नंबराने ओळखल्या जाते. शरीराने अतिशय पोक्त असून ती अंदाजे नऊ-दहा वर्षाची असावी, असे समजले. नूर वाघीणीच्या मागील डाव्या पायाच्या मांडीजवळ काळ्या पट्ट्यांचा इंग्रजी Y असा आकार आहे. ती शांत वाघीण असून डोळ्यांभोवती पांढरा पट्टा आहे. यावरुन ती ओळखली जाते. काही वेळातच ती पाण्यातून उठली. नाल्या नाल्याने आमचे कडे येऊ लागली. एवढ्यात परत ती पुढ्यातील पाणवठ्यात मागे मागे सरकून बसली. तेथून ती इतरत्र लक्ष देत होती. एवढा मोठा जंगलाचा राजा वाघ परंतु त्यालाची क्षणोक्षणी सुरक्षेच्या कारणास्तव सतर्क राहावे लागते. परत काही वेळातच ती ओल्या अंगाने पाणवठ्यातून वर आली यावेळी तिने आमचेकडे मान वाकवून पाहिले. आल्या दिशेने परत जावून नूर नाल्यातून वर आली. आणि आम्ही ज्या रानवाटेवर होतो ती ओलांडून डावीकडच्या वनात पसार झाली. काल पाहिलेल्या नुरी वाघीणीची ही आई असल्याचे समजले. तीने आता पर्यंत तीन वेळा पिल्लांना जन्म दिल्याचेही गाईडने सांगितले. सध्या नूर वाघीणीला रणथंबोरची राणी संबोधल्या जाते. होय हीच नूर-ए- रणथंबोर. तिची सुंदरता, तिचा आकार,रंग रुप आणि नजर आणि पिल्लांचे योग्य संगोपन करण्यात तरबेज असल्याचे कळते. असंख्य पर्यटकांची ती आवडती वाघीण आहे.

आमच्या दौ-याच्या शेवटच्या दिवशी पाखर पहाटे अरण्य भ्रमणास निघालो. अनेक ठिकाणी मोराचे पूर्ण पिसारा फुलवून नृत्य सुरु होते. त्याच्या पुढ्यात लांडोरीही होत्या. दूरवर राखोडी पर्वतराजी आणि खाली एक जलाशय पूर्ण पाण्याने भरले होते. गवती तृणमेळ्यात निलगाय आणि चितळाचे संपूर्ण कुटुंब अन्न शोध कार्यक्रमात गुंग झाले होते. तेथून पुढे जातांना एका ठिकाणी एक अस्वल वाळवीच्या वारुळाजवळ थांबली. मान खाली करुन आपल्या मोठमोठ्या नखांच्या पंजाने वारुळ उखरत होती. हातभर तोंड खुपसून तोंडाने फर्ररकन हवा आत ओढून वाळवी फस्त करत होती. बराच वेळ तिचा प्रयत्न सुरु होता. अखेर ते सोडून ती पलीकडे निघाली. पलीकडे दुसरी अस्वलही होती. त्या दोघीही सोबत सोबत चालत पलीकडच्या वनात पसार झाल्या.

सकाळचा वेळ असल्याने कोवळी उन्हे रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात पसरु लागली होती. नाल्याच्या काठाकाठावरुन रानवाटेने आमची भटकंती सुरु होती. एवढ्यात एका परतणाऱ्या जिप्सी चालकाने सुलताना वाघीण आराम करत असल्याचे सांगितले. आम्हीही लगेच तेथे पोहोचलो. रानवाटेच्या उजवीकडे नाला आणि नाल्याच्या पलीकडच्या बाजूने नाल्याजवळून अंदाजे पाचशे फुटावर एका गवताच्या झुडूपाआड ती आराम करत होती. कधी कधी चारही पाय वर आणि पाठ जमिनीला टेकवून ती लोळत होती. सुलतानाची शरीरयष्टी मजबूत असल्याचे जाणवत होते. तिचे पाहिजे तसे छायाचित्र काही मिळत नव्हते. अंतरही भरपूर होते. अखेर काही वेळातच तीचा आराम झाला असावा. ती उठून बसली. एक जांभई दिली. उठून उभी राहीली.आता ती पलीकडे वरच्या तटबंदीकडे चढू लागली.तिथे चढताच ती सरळ तटबंदीच्या भिंतीवरुन चालत होती. चालतांना एका ठिकाणी ती गवती हराळी देखील खातांना दिसली. वाघ गवत खातो हे आजपर्यंत केवळ ऐकले होते. पण पाहिले नव्हते. आज प्रत्यक्षात सुलताना वाघीण चक्क गवत खातांना पाहून तिचे व्हिडिओ देखील मी घेतले. पोटाचे विकार असल्यास कुत्रा, मांजर यापूर्वी गवत खातांना मी पाहिले होते. परंतु आज स्वत:चे डोळ्याने हे दृश्य भरभरुन पाहायला मिळाल्याने मी धन्य झालो.

सुलताना ही पहिल्या दिवशीच्या सफारीत पाहायला मिळालेल्या नुरी वाघीणीची बहीण असल्याचे कळले. ‘नूर’ वाघीण ही नुरी व सुलताना या वाघीणीची आई असून यांचा पिता औरंगजेब नावाचा वाघ असल्याचेही गाईडने माहिती दिली. परंतु सुलताना ही रागीट आणि मुडी असून तिने एकदा पर्यटकांच्या जिप्सीचा एक किलोमीटर पर्यंत पाठलाग केल्याचे समजते. सफारीतून परततांना बांधवगडची राणी नूर एका रानवाटेवर आडवी पडून मस्तपणे आराम करत बसली होती. या अवस्थेतही तिची सुंदरता लक्ष वेधून घेत होती. क्षणभर खाली उतरुन तिच्या अंगावरुन हळूवारपणे हात फिरवावा असे वाटत होते. पण ते शक्य नव्हते. पलीकडे पर्यटकांची जिप्सी तर अलीकडे आमची जिप्सी… मध्ये नूर आराम करत बसलेली होती. नूरने रानवाटच अडवून ठेवली होती. बराच वेळ वाट पाहिली वेळ होत असल्याने चालकाने गाडी फर्लांगभर मागे मागे घेत दुस-या रानवाटेवर नेऊन मुख्य प्रवेशव्दाराकडे घेतली.

प्रत्येक सफारीच्या मध्यंतरात एके ठिकाणी जंगलाच्या मध्यभागात थोडावेळ पर्यटकांना नाश्ता-चहा इ. करिता थांबविण्यात येते. रणथंबोरमध्ये आमची जिप्सीही अशा ठिकाणी पोहचली. तेथे पाहातो ते तेथे आधीच सहा जिप्सी उभ्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येक गाडीवर टकाचोर पक्ष्यांचे थवेच्या थवे गर्दी करत होते. जिप्सीतील पर्यटक या टकाचोर पक्ष्यांना बिस्कीट, चॉकलेट, ब्रेड खाउ घालतांना दिसले. मला या बाबीचा अत्यंत राग आला. ही बाब अत्यंत चुकीची आहे. गाईडला विचारले तर तो म्हणाला- सफारी करनेवाले पर्यटक इनको खाने को देते है, उनको आदत पड गयी है. विशेषत: गाडीमध्ये सुशिक्षित पर्यटक असूनही तेही या टकाचोरांना खावू घालत होते.. वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा १९७२ नुसार वन्यजीवांना माणसाचे अन्न खाऊ घालण्याचे प्रलोभन दाखविणे हा गुन्हा आहे. कुठल्याही पक्ष्यांना त्यांचे नैसर्गिक खाद्यच खाऊ दिले पाहिजे.
भारत सरकारतर्फे १९५४ मध्ये रणथंबोरला सवाई माधोपूर गेम सेंच्यूरी मान्यता मिळाली. त्यानंतर १९९३ साली प्रोजेक्ट टायगर रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यात आले. १९८० मध्ये ३९२ चौ.कि.मी.च्या रणथंबोरच्या जंगलाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.

हे दोन्हीही प्रकल्प सवाई माधोपूर जिल्हयात येतात. हे शुष्क पर्नगळीचे वन असून यामधून बनास आणि चंबल या दोन नद्या येथील जैवविविधतेला समृध्द करतात. पडाम, राजवाडा, मालीक हे तीन तलाव बाराही महिने येथील वन्यजीवांची तहान भूक भागवतात. येथे वाघ, बिबट, अस्वल, तडस, कोल्हे, जंगली मांजर, मगर, चितळ, निलगाय, चिंकारा इ. वन्यजीव असून जवळपास ३२५ प्रकारचे पक्षी आहेत. रणथंबोर किल्ल्याच्या वर जोगी महाल असून त्याच्या पुढ्यातील तलावात दिवस-रात्र वन्यजीवांच्या हालचाली सुरु असतात. लाल-खरपी दगडांमध्ये या किल्ल्याचे बांधकाम असून किल्ल्याची तटबंदी, भिंती आणि जुन्या वास्तु ढासळत चालल्या आहेत. किल्ल्यावर जोगी महालच्या परिसरात रणथंबोरला जागतिक प्रसिध्दी मिळवून देणारी मछली वाघीण होती. वयाच्या १९ व्या वर्षी २०१६ मध्ये ती मरण पावली.

पर्वताच्या डोक्यावर रणथंबोर राष्ट्रीय उद्यान असून रणथंबोर किल्ला इ.स. ९४४ मध्ये बांधला गेला आहे. नौलखा गेट, हाथी पॉल, दरवेषचा दर्गा, बदल महल, हामीर महल, राणी महल, गणेश मंदीर, जैन मंदिर, दिल्ली गेट, रघुनाथ मंदिर, सुपारी महल, राज मंदिर, सतपोल दरवाजा, शिवछत्री, शिव मंदिर, लक्ष्मी नारायण मंदीर हे येथील मुख्य ठिकाण आहेत. माझ्या मनात राजस्थान म्हणजे रखरखता वाळवंटीय प्रदेश असा समज होता. परंतु चार दिवस येथील मनसोक्त जंगल भटकंती केली त्यानंतर हा गैरसमज पूर्णपणे दूर झाला. राजस्थान आता पूर्वीचा राहिला नसून वाळवंटातील या हिरवळीत नूर-ए-रणथंबोरला पाहायला हजारो पर्यटक गर्दी करत असतात. मीही हा स्वर्गीय अनुभव घेवून परतीवर फिरलो ते परत येथे येण्यासाठीच.

{ सर्व छायाचित्रे प्र.सु.हिरुरकर}

लेखक वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार आहेत.
9822639798

Previous articleनितांतसुंदर कारगिल!
Next articleपोर्तुगीज स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना – कारंजाचा काण्णव बंगला
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here