वडिलांच्या शिस्तीमुळे मी रोजचे हिशेब ६२ सालापासून नियमित लिहीत असे. त्याचबरोबर कोण आले, कोण गेले, आमचे सोशल कॅलेंडर, आणि काही खास नोंदी, म्हणजे… आज पुलाव बिघडला, इथपासून ज्यादा खर्च , पाहुण्याच्या बरोबर घालवलेला वेळ, पाहिलेली सिनेमा, नाटके, महाराष्ट्र मंडळाच्या चहाच्या कपातली वादळे,.. पाने चाळताना मला खूप गंमत वाटली . एक जुलैचे पान आले त्यात ,
सावकार पेठेतल्या चिंचोळ्या रस्त्यामधून मदुरै मला घेऊन जायचा. रस्त्याच्या कडेला टोपल्या घेऊन बसलेले फळवाले, भाजीवाले, हातरिक्षा आणि सायकली यांचा सुळसुळाट होता. त्यातूनच त्या जुन्या पेठेत अनेक घरात गाय किंवा म्हैस त्या काळात होती. .त्या गोमाता दुपारच्या उन्हात पाय मोकळे करायला रस्त्यावर येऊन चक्कर मारून जायच्या. ‘गाय, म्हैस, समोरून आली तर गाडी थांबवायची .त्यांच्या पाठीमागून आपण जायचे, समोर जायचे नाही,’ ही मदुरै यांनी दिलेली शिकवण. ‘ हातगाडीवाले किंवा बैलगाडीवाले, यांना ओव्हरटेक करायच्या भानगडीत पडू नये. त्यांच्या गाडीला ब्रेक नसतो , आपल्या गाडीला असतो; तसेच ट्रक, बस, यांना पुढे जाऊ द्यावे.त्यांना घाई असते, आपल्याकडे भरपूर वेळ आहे .’ इत्यादी इत्यादी, आपुलकीचे काळजीयुक्त धडे.