-मुक्ता चैतन्य
भारतात कोरियन लाट आहे. गावखेड्यात के पॉपची गाणी प्रसिद्ध आहेत. बीटीएसची आर्मी आणि ब्लॅक पिंकचे ब्लिंक्स (आर्मी आणि ब्लिंक्स हे शब्द या के पॉप ग्रुप्सच्या फॅन्ससाठी वापरले जातात.) आता फक्त पुण्या मुंबईत नाहीत तर गावखेड्यातून दिसतात. कोरियन शिकवणारे क्लास ऑनलाईन आणि ऑफलाईन सुरु झाले आहेत. कपड्यांच्या फॅशन्समध्ये कोरियन फॅशनचा प्रचंड प्रभाव आहे. मुलामुलींना कोरियन सेलेब्रिटींसाठी कोरियन ग्लास स्किन हवी आहे. कोरियन ब्युटी प्रोडक्टस मोठ्या प्रमाणावर भारतात विकले जाऊ लागले आहेत. हा सगळा बदल गेल्या दहा वर्षातला आहे.
……………………………
गेल्या काही वर्षात तीन K नी आपल्या आयुष्यात दणक्यात प्रवेश केलेला आहे. पहिला K आहे केपॉप. जिथून या सगळ्याची सुरवात झाली. पाठोपाठ आला केड्रामा आणि त्यानंतर या दोन्हीच्या प्रभावामुळे आलं कोरियन फूड. रामेनच्या पलीकडे विशेष कोरियन अन्न पदार्थांची माहिती नसलेल्या आपल्या समाजात अचानक किमची (म्हणजे कोरियन लोणचे) ने प्रवेश केला. ऑनलाईन स्टोअर्स मधून कोरियन इन्स्टंट न्यूडल्सचे पॅक मिळायला लागले. ईस्ट अशियन खाद्यपदार्थ विकणाऱ्या हॉटेल्समधून आजवर चायनीज पलीकडे थाई फारतर फार मिळत होते, (अपवाद वगळता) त्याची जागा आता अनेक नव्या कोरियन पदार्थांनी घेतली आहे. सुपरमार्केट्स मध्ये कोरियन सॉस सहज उपलब्ध होतात. इतकं कशाला OTT प्लॅटफॉर्म्सवर दिसणाऱ्या कोरियन सीरिअल्स म्हणजे के ड्रामा आणि कोरियन सीरिअल्स आता फक्त हिंदी नाही तर मराठी, तेलगू, तामिळ या भाषांमध्येही उपलब्ध झाले आहेत. हा बदल होतोय कारण भारतात कोरियन लाट आहे, मार्केटची मागणी आहे. बोटांचे बदाम आता फक्त कोरियन सेलिब्रिटी करत नाहीत तर बॉलिवूडमधले प्रसिद्ध चेहरेही करताना दिसतात. गावखेड्यात के पॉपची गाणी प्रसिद्ध आहेत. बीटीएसची आर्मी आणि ब्लॅक पिंकचे ब्लिंक्स (आर्मी आणि ब्लिंक्स हे शब्द या के पॉप ग्रुप्सच्या फॅन्ससाठी वापरले जातात.) आता फक्त पुण्या मुंबईत नाहीत तर गावखेड्यातून दिसतात. कोरियन शिकवणारे क्लास ऑनलाईन आणि ऑफलाईन सुरु झाले आहेत. कपड्यांच्या फॅशन्समध्ये कोरियन फॅशनचा प्रचंड प्रभाव आहे. मुलामुलींना कोरियन सेलेब्रिटींसाठी कोरियन ग्लास स्किन हवी आहे. कोरियन ब्युटी प्रोडक्टस मोठ्या प्रमाणावर भारतात विकले जाऊ लागले आहेत. हा सगळा बदल गेल्या दहा वर्षातला आहे. त्यातही गेल्या पाचसात वर्षात हे वारं अधिक तेजीत वाहायला लागलं. कोरियाने त्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत हे खरंच पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने ते त्यांची गाणी, ग्रुप्स, सीरिअल्स, सिनेमे प्रमोट करतात त्यातही अतिशय वेगळेपणा आहे जो पाश्चत्य मनोरंजनाच्या क्षेत्रावर पोसलेल्या लोकांसाठी नवा आणि ताजा आहे.
दक्षिण कोरियाचा सांस्कृतिक प्रभाव, सॉफ्ट पॉवर वापरण्याच्या त्यांच्या पद्धतींची मुळे त्याच्या इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. हा इतिहास त्याचा जपानपासून स्वातंत्र्याचा संघर्ष आहे आणि त्यानंतरच्या अमेरिकन प्रभावाचा आहे. १९१० ते १९४५ पर्यंत, कोरिया जपानी राजवटीत होता, हा काळ तीव्र सांस्कृतिक दडपशाही आणि आर्थिक शोषणाचा होता. जपानी अधिकाऱ्यांनी कोरियन भाषेवर बंदी घातली होती. कोरियन लोकांना जपानी नावे घेण्यास भाग पाडले गेले होते. त्याकाळात जपानने कोरियाची सांस्कृती दडपून, त्यांची कोरियन म्हणून जी काही ओळख होती ती पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता. कोरियन लोकांनी अर्थातच या प्रयत्नांचा विरोध केला होता. त्यांची भाषा आणि संस्कृती त्यांनी त्याकाळी गुप्तपणे जतन केली होती. जपानी राजवटीचा निषेध करण्यासाठी सुरु झालेली १ मार्च १९१९ ची चळवळ ही कोरियाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. ही चळवळ क्रूरपणे दडपली गेली असली तरी, सार्वभौमत्व परत मिळवण्याच्या भविष्यातील प्रयत्नांची पायाभरणी त्यादिवशी आणि त्या चळवळीने केली होती. या चळवळीमुळे स्वातंत्र्याचा संघर्ष, राष्ट्रीय ओळख तयार करण्याची तीव्र इच्छाशक्ती या सामाजिक भावनांना मोठ्याप्रमाणावर खतपाणी मिळाले. १९४५ मध्ये जपानी राजवटीतून कोरियाची मुक्तता झाली. देशाची विभागणी उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये झाली आणि दक्षिण कोरिया अमेरिकेच्या प्रभावाखाली आला. अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या राजकीय आणि आर्थिक प्रणालींना आकार देण्यात, लोकशाही सरकार आणि बाजार-आधारित अर्थव्यवस्था स्थापन करण्यात मदत केली. दक्षिण कोरियाच्या सांस्कृतिक विकासावर अमेरिकेचाही लक्षणीय परिणाम दिसून येतो. अर्थात दक्षिण कोरियाने घाऊक प्रमाणात अमेरिकन संस्कृती फॉलो केली नाही. उलट त्यांच्या आवश्यकतेनुसार ज्या गरजेच्या गोष्टी आहेत तेवढ्याच उचलल्या हे आज मागे वळून बघितल्यावर लक्षात येतं.
१९९० च्या दशकांत झाली सुरुवात!
कोरियन मनोरंजन जगाची लाट पहिल्यांदा आपल्याकडे येऊन आदळली ती ९०च्या दशकात. कोरियन ‘देमार’ सिनेमे त्याकाळी प्रचंड हिट होते. पण २००० नंतर खऱ्या अर्थाने या लाटेने वेग पकडला. आणि २०१० नंतर मात्र केपॉप आणि पाठोपाठ के ड्रामा ने जेन झी पिढीच्या मनात मेंदूत कायमची जागा मिळवली. बीटीएस, ब्लॅकपिंक आणि एक्सओ या तीन केपॉप ग्रुप्सनी जगभर स्वतःची एक वेगळी जागा तयार केली आणि कोरियन म्युझिक जगताची ओळख घराघराला झाली. मुलांना अचानक कोरियन भाषेत गायली जाणारी गाणी आवडू लागली. त्यांचे अर्थ गुगलवर शोधले गेले. गाणी तोंडपाठ झाली. केपॉपने संगीताला भाषेचे कुंपण मान्य नसतं हा मुद्दा पुन्हा एकदा ठळक केला. हे सगळं अचानक घडलेलं नाही. साऊथ कोरियन सरकार आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांचा हा एकत्रित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेला प्रयत्न आहे. जगावर छाप पाडण्याचे, जगभर बाजारपेठा विकसित करण्याचे वेगवेगळे मार्ग असतात, साऊथ कोरियाने सांस्कृतिक देवाणीचा मार्ग निवडला. यालाच राजकारणाच्या भाषेत ‘सॉफ्ट पॉवर’ म्हटलं जातं. ही कल्चरल डिप्लोमसी म्हणजेच सांस्कृतिक मुस्सदेगिरी करणारा आधुनिक काळातला साऊथ कोरिया हा पहिलाच देश असावा. जगभर प्रभाव टाकायला युद्ध, शस्त्र, तंत्रज्ञान याचा वापर अनेक देशांनी आजवर केलेला आहे. पण सांस्कृतिक मुस्सदेगिरी करुन जगाला दखल घ्यायला भाग पाडणारा साऊथ कोरिया हा पहिलाच देश आहे.
जगभर उसळलेल्या या लाटेचा प्रभाव भारतातही आहेच. सुरुवातीला युट्युब आणि इतर म्युझिक अँप्सवर केपॉपची गाणी ऐकली जात होती आता, केपॉप मधले छोटे मोठे ग्रुप्स भारतात ‘कॉन्सर्ट’ करु लागले आहेत. मोठ्या ग्रुप्सच्या लाईव्ह कॉन्सर्ट्सचं स्ट्रीमिंग करण्यासाठी आणि ते एकत्र बघण्यासाठी भारतातले फॅन्स थिएटर्स बुक करु लागले आहेत. कधी एकदा बीटीएस, ब्लॅकपिंक, एक्सओ आणि आताचे केपॉपचे फोर्थ जनरेशन ग्रुप्स भारतात येतात याकडे इथल्या फॅन्सच्या नजरा लागलेल्या आहेत. इतका प्रचंड चाहत्यांचा समुदाय भारतात असूनही मोठे ग्रुप्स भारतात येत नाहीत, किंवा त्यांच्या कुठल्याही ऑडिशन्स भारतात होत नाही (हा लेख लिहिते आहे तोवरचे हे वास्तव आहे.) हेही गणित समजून घेण्यासारखं आहे. केपॉप इंडस्ट्री फक्त गाणी ऐकणे आणि बघणे एवढ्यावरच चालत नाही. ज्या केपॉप आयडल्सना तरुणाई फॉलो करते त्यांचे अल्बम्स विकले जाणं, त्यांच्या कंपन्यांनी जे मर्चंटाईज बनवलेले असते ज्यात कपडे, वस्तू आणि अजूनही अनेक गोष्टी असतात त्या विकल्या जाणं, कॉन्सर्ट्सची महागडी तिकिटं विकली जाऊन हाऊसफुल होणं या गोष्टींचाही समावेश होतो. फुकट ते पौष्टिक समजणाऱ्या समाजात के पॉप चे फॅन्स मोठ्या संख्येने असले तरी या सगळ्यासाठी ते पैसे खर्च करण्याची क्षमता बाळगून असतीलच असं नाही. ज्या पटीने गुंतवणूक करावी लागेल कंपन्यांना त्या गणितात नफा करुन देण्यासाठी अजूनही भारतीय ग्राहक तयार नाहीये. तसा आणि तितका पैसा सामान्य नागरिकांच्या कुटुंबातून नाही. मुलांच्या केपॉप वेडा साठी खर्च करायला अधिकचे पैसे मध्यमवर्यीग आणि उच्च मध्यमवर्गीयांकडे नाहीत हेही वास्तव नाकारुन चालणारच नाही. शिवाय बॉलिवूड चे वेड आपल्याकडे कितीही असले तरी फॅडम इंडस्ट्री ज्या पद्धतीने साऊथ कोरियाने विकसित केलेली आहे तशी आपल्याकडे नाही. त्यामुळे आपल्याकडच्या लोकांना पोस्टर्स खरेदी पलीकडे आपल्या लाडक्या सिलिब्रिटींसाठी खर्च करणे माहित नाही. हे एक कारण असू शकतं प्रचंड फॅन फॉलोईंग असून, ग्राहकांची बाजारपेठ असूनही इथे कॉन्सर्ट्स होत नाहीत आणि ऑडिशन्स पण होत नाहीत.
के पॉप – के ड्रामा का आवडतात?
अनेकांना विशेषतः पालक-शिक्षकांना हा प्रश्न पडलेला आहे की जी भाषा समजत नाही त्यातली गाणी, सीरिअल्स, सिनेमे इतके का आवडतात. याला काही महत्वाची कारणं आहेत ती समजून घेऊया. केपॉप मधल्या अनेक ग्रुप्सची गाणी अतिशय ‘कॅची’ आहेत. पॉप म्युझिक असल्याने अर्थातच त्यात बिट्स ना विशेष महत्व आहे आणि तरुण वयात छान ठेका असलेली गाणी आवडतातच. बहुतेक गाण्यांचे व्हिडीओ अतिशय देखणे बनवलेले असतात. प्रोडक्शन खर्चिक आणि युनिक असते. अतिशय कलरफुल असते. आयडल्सच्या फॅशन्स, मेकअप स्टाईल्स युनिक असतात त्यामुळे आकर्षक वाटतात. सेलिब्रिटी स्त्री पुरुष एका विशिष्ट पद्धतीने दिसले पाहिजेत या टिपिकल चौकटी साऊथ कोरियन फॅशनने ओलांडल्या आहेत. मनोरंजनाचे क्षेत्र ज्या पद्धतीने जगाला दाखवले जाते तेच मुळात वेगळे आहे त्यामुळे त्याविषयी कुतूहल, आकर्षण निर्मांण होतेच. वायजी एंटरटेनमेंट, जेवायपी आणि एसेम या तीन केपॉप मधल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत आणि सगळे मोठे ग्रुप्स या कंपन्यांचे आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने ही इंडस्ट्री तयार करत नेली आहे ते फार रंजक आहे. या तिन्ही कंपन्यांचे मालक स्वतः आयडल्स होते. म्हणजे ते स्वतः रॅपिंग करणारे आणि ग्रुप्समधून पॉप म्युझिक सादर करणारे होते. आता चाळिशीला आलेल्या या कंपन्यांच्या प्रमुखांनी हळूहळू ही इंडस्ट्री उभी करत नेली आहे. नव्वदच्या दशकात (१९९२) seo taiji अँड बॉईज नावाने ग्रुप होता. soo -man lee या व्यावसायिकाने पहिल्यांदा एसेम एंटरटेनमेंटच्या माध्यमातून केपॉप ग्रुप्सची कल्पना मांडली आणि त्यासाठी प्रयत्न सुरु केले. मुला /मुलींना ट्रेनी म्हणून निवडून त्यांना प्रशिक्षण देऊन डेब्यू करत एक ग्रुप तयार करायचा ज्यांच्या कॉन्सर्ट्स होतील, विविध प्लॅटफॉर्म्सवर त्यांची गाणी वाजवली जातील हा बिझिनेस प्लॅन घेऊन सुरुवात झालेल्या केपॉपला आज एका मोठ्या इंडस्ट्रीचे रूप आलेले आहे. अनेक लहान मोठ्या कंपन्या त्यात आज काम करतात.
के पॉप इतकी के ड्रामाला भारतात प्रचंड फॅन्स आहेत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे १९९०-२००० हा काळ हॉलीवूडने रॉमकॉन सिनेमाने गाजवला. भारतातही या फिलगुड सिनेमांना मोठा चाहता वर्ग होता. त्यानंतर देमार म्हणजे ऍक्शन सिनेमाची मोठी लाट आली आणि रॉमकॉम कडे सगळ्यांचंच दुर्लक्ष झालं. खरंतर रॉमकॉम हा प्रेक्षकांचा कायमच आवडणारा प्रकार आहे. पण देमार सिनेमांच्या आणि सास बहू सीरिअल्सच्या लाटेत रॉमकॉम मागे पडले, काळाआड गेले. एखाद दुसरा सिनेमा सोडला तर भारतात तर रॉमकॉम प्रकार मागेच पडला. एखादा ‘रंगीला’ येतो, गाजतो आणि जातो. पण रॉमकॉमची स्वतंत्र इंडस्ट्री उभी राहू शकते हा विचारच मागे पडला. (अर्थातच काही अपवाद वगळता) भारतातले मनोरंजन जग ‘सास-बहु’ छाप कन्टेन्ट मध्ये पूर्ण बुडाले होते. पण ज्या प्रकाराकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झालेलं होतं तोच मनोरंजनाचा एव्हरग्रीन प्रकार साऊथ कोरियाने उचलला आणि त्याला स्वतःचा खास तडका देऊन नव्याने प्रेक्षकांच्या समोर आणलं. के ड्रामा सर्व प्रकारच्या सीरिअल्स बनतात, पण रॉमकॉम प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध असतात कारण ते अतिशय ताजेतवाने, देखणे, फील गुड असतात. भारतात त्याला मोठा ग्राहक तयार होण्याचं हेच कारण आहे. नाविन्यपूर्ण कथा, देखणे चेहरे आणि १० ते १६ एपिसोडमध्ये संपणाऱ्या सीरिअल्स हा सास बहू सीरिअल्सचे हजारो एपिसोड बघून थकलेल्या प्रेक्षकांसाठी थंड हवेची झुळूक आहे. शिवाय के ड्रामा मधले अक्टर्स देखणे, वेल मेंटेन आणि फॅशन्स काळानुसार..हे सगळंच भारतीयच नाही तर मराठी प्रेक्षकांसाठी नवं आणि आकर्षक होतं. आहे. म्हणूनच के ड्रामा मराठीत डब केले जातायेत, सबटायटल्स मराठीत येऊ लागल्या आहेत. के ड्रामा ची खरी ख्यासियत त्यांची कथानक आहेत. त्यात आजचे विषय आहेत, भावना आहेत, बघण्याचे वेगळे दृष्टिकोन आहेत. कथेला, संवादाला इतर कशा इतकेच महत्व देण्याची पद्धत आहे, आणि ते त्यांच्या सीरिअल्समधून दिसतं. प्रॉडक्शन उत्तम दर्जाचे असते. प्रेम, मैत्री, कौटुंबिक आणि वैयक्तिक वाढ यांसारख्या थीम कुठल्याही प्रेक्षकाला जवळच्या वाटणाऱ्या असतात.
के-पॉप आणि के ड्रामाच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे कोरियन भाषेतही रस वाढला आहे, अनेक भारतीय चाहत्यांनी कोरियन भाषेच्या वर्गात प्रवेश घेतला आहे किंवा कोरियन भाषा शिकण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरत आहेत. खरंतर हीच भाषिक देवाणघेवाण सखोल सांस्कृतिक प्रभावाचा पुरावा आहे.
कोरियन फूडचे आकर्षणचे प्रचंड आकर्षण
कोरियन पाककृती, त्याच्या ठळक फ्लेवर्स आणि निराळ्या घटकांमुळे, भारतातही कोरियन खाद्य पदार्थांच्या चाहत्यांची वाढती संख्या आहे. किमची, रामियोन, बिबिंबप आणि ट्टेओकबोकी यांसारखे पदार्थ अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. मोठ्या शहरांमध्ये कोरियन रेस्टॉरंट्सची वाढ आणि सुपरमार्केटमध्ये कोरियन पदार्थांची उपलब्धता हे या वाढत्या ट्रेंडचे स्पष्ट संकेत आहेत.
भारतीय तरुणांवर कोरियन खाद्यपदार्थाचा प्रभाव फक्त चवीपलीकडे आहे. हे कोरियन संस्कृतीबद्दल व्यापक कुतूहल आणि प्रशंसा यातून येतं हे समजून घेतलं पाहिजे. खाद्य, संस्कृतीचा एक मूलभूत पैलू असतो. जेव्हा एखादा समाज भाषा, अन्न, परंपरा आणि सामाजिक नियमांमधून दुसऱ्या संस्कृतीचा वेध घेऊ लागतात तेव्हा प्रभाव लाटेपलीकडे आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यातून कोरियन खाद्य संस्कृती आणि भारतीय खाद्य परंपरा यात सामान धागे अनेक आहेत, चवींमध्ये साम्य शोधता येईल अशा अनेक जागा आहेत. त्यामुळेही कोरियन खाद्य पदार्थ भारतीय जिभेला भुरळ घालता आहेत.
दक्षिण कोरियाने आपली संस्कृती निर्यात करण्यात यश मिळवले आहे, याचे श्रेय त्याच्या नियोजनबद्ध सांस्कृतिक बुद्धिमत्तेला दिले पाहिजे. दक्षिण कोरियाच्या सरकारने सांस्कृतिक निर्यातीची ही क्षमता ओळखून, जागतिक स्तरावर मनोरंजन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ही एक रणनीती आहे, ज्याला बऱ्याचदा ‘हॅलियु डिप्लोमसी’ म्हटले जाते. संस्कृतीला चालना देण्याबरोबरच, दक्षिण कोरियाने आपल्या सांस्कृतिक बुद्धिमत्तेचा उपयोग व्यवसायाला चालना देण्यासाठी देखील केला आहे. के-पॉप, के-ड्रामा आणि कोरियन खाद्यपदार्थांच्या लोकप्रियतेमुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि सौंदर्यप्रसाधनांपासून फॅशन आणि खाद्यपदार्थांपर्यंत कोरियन उत्पादनांच्या मागणीत भारतात वाढ झाली. यामुळे भारतातील कोरियन कंपन्यांसाठी नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या असून, दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेच्या एकूण वाढीस हातभार लागला आहे.
कोरियन लाटेचा भारतावर होणारा प्रभाव केवळ सांस्कृतिक नाही तर आर्थिकही आहे. कोरियन संस्कृतीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कॉस्मेटिक्स आणि स्किनकेअरपासून इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशनपर्यंत कोरियन उत्पादनांची मागणी वाढली आहे. यामुळे भारतातील कोरियन कंपन्यांसाठी नवीन बाजारपेठ खुली झाली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराच्या वाढीस हातभार लागला आहे.भारत कायमच जगासाठी बाजारपेठ राहिलेला आहे. जगभरातल्या लाटा आपल्याकडे येऊन आदळतात आणि ग्राहक म्हणून आपण अनेक गोष्टी स्वीकारतो. कोरियन लाट जशी आली तशी ती कमीही होईल कदाचित. तोवर पुढची लाट येईपर्यंत वाट बघायची…
‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२४
(लेखिका सोशल मीडियाच्या अभ्यासक असून ‘सायबर मैत्र’ च्या संस्थापक आहेत.)
9307474960










