राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा !

-ॲड. किशोर देशपांडे

महाराजांचा एकेरी उल्लेख झालेला पाहून तळपायाची आग मस्तकात गेलेले महायुतीचे मा. आमदार साहेब यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन करून ज्या तेजस्वी, राकट व कणखर भाषेत समज दिली ती ऐकून आपण खरोखर धुरंधरांच्या राज्यात आहोत याची प्रचिती आली. कवीने उगीचच महाराष्ट्राला राकट, कणखर आणि दगडांचा देश म्हटलेले नाही, याचा पुनःप्रत्यय आला. सन्माननीय आमदार साहेबांना मा. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ महाराष्ट्राचे सांस्कृतिक व भाषा विकसन मंत्रीपदी नेमावे आणि त्यांच्या मार्गदर्शनात खालील शासन निर्णय निर्गमित करावे :-

१. कोणत्याही रेल्वे प्रवाश्याने अथवा नागरिकाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चा उल्लेख सीएसटी असा केल्यास त्याची जीभ छाटण्यात येईल.

२. कोणीही कोणाला हात जोडून राम राम म्हणू नये. प्रत्येकाने हात उंचावून व मुठ वळून जय श्री राम म्हणावे. भगवान श्रीरामांचा अथवा अन्य कोणत्याही हिंदू दैवताचा एकेरी उल्लेख कोणी केल्यास त्याचीही जीभ छाटण्यात येईल. विठू माऊली, ज्ञानोबा माऊली असे मवाळ बायकी शब्द कोणत्याही भक्ताने उच्चारू नयेत.

३. ऊर्दू भाषेवर बंदी घालावी. कारण त्या भाषेने आमच्या मराठी माणसांना राकटपणापासून व दगडी असण्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच लव्ह जिहाद सारखे भयंकर संकट महाराष्ट्रावर कोसळत आहे.

४. सन्माननीय आमदार साहेबांनी संबंधित वितरकाशी फोन वर केलेले संभाषण प्रत्येक प्राथमिक शाळेत पाठ्यपुस्तकातील धडा म्हणून समाविष्ट करावे. जेणेकरून अगदी बालपणापासून आपल्या मातृभाषेची खरी ओळख विद्यार्थ्यांना होत राहील.
सन्माननीय मुख्यमंत्री देखील भाषेच्या बाबतीत जरा मवाळच दिसतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अधिक राकट, तेजस्वी व कणखर भाषा या नवीन सांस्कृतिक मंत्र्यांनी शिकविली पाहिजे. युती धर्म पाळायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी नुसते गप्प राहू नये तर वर सुचविलेले उपाय प्रत्यक्ष अमलात देखील आणावे. दिल्लीश्वरांच्या चरणी निष्ठा अर्पण केल्यामुळे मा. मुख्यमंत्री या सहप्रवाश्यांना सांभाळून घेत आहेतच. कदाचित त्यांना दररोज गीतेचा (चुकलो, श्रीमद् भगवद्गीतेचा) दुसरा अध्याय गेली काही वर्षे वाचावा लागत असेल. त्यामुळे एकप्रकारची स्थितप्रज्ञ वृत्ती त्यांच्यात आलेली आहेच. मात्र हिंदुत्वाला जर अधिकाधिक तेजस्वी, धुरंधर व दगडासारखे कणखर आणि राकट व्हायचे असेल तर मा. आमदार साहेबांसारख्या मित्रपक्षातील निवडक आमदारांना महत्वाची जबाबदारी देणे भाग आहे.महाराष्ट्रात असेच हिंदू शेर आणि शेरनी वाढत राहिले तरच राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा हे आपले वर्णन सार्थक ठरेल.

(लेखक नामवंत विधिज्ञ आहेत)

9881574954

 

Previous articleक्वांटम लिव्हिंग: शक्यतांच्या पलीकडचे वास्तव
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here