ऐसा’ बी . टी . देशमुख होणे नाही …

-प्रवीण बर्दापूरकर

सकाळी उठल्याबरोबर पहिली बातमी वाचायला मिळाली ती बी . टी . देशमुख यांच्या निधनाची ; अतिशय क्लेश झाले . बी . टी . देशमुख  ओळखले जात ते ‘बीटी’ अशा सुटसुटीत नावानं . त्या संबोधनात जिव्हाळा आणि आदरही होता . बीटी यांच्या निधनाने एका सालस आणि सच्छील लोकप्रतिनिधीचं पर्व संपलं असं म्हणावं लागेल .

बीटी देशमुख कोण होते ? एक तळमळीचे  शिक्षक होते , वाचक होते ,आमदार होते , वक्ते होते , विदर्भाच्या विकासाची तळमळ असणारे नेते होते आणि विदर्भाच्या विकासाचा विकासाचा अनुशेष दूर व्हावा म्हणून संसदीय आणि न्यायालयीन लढाई लढणारे योद्धे  होते पण , हे सगळं जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते , बीटी देशमुख हे व्यक्तिमत्व अतिशय सालस आणि सरळ होतं . बीटी देशमुख यांच्या या सच्छीलपणाचा प्रभाव  किती मोठा होता याचा एक प्रसंग सांगतो .

बी . टी . देशमुख प्रदीर्घकाळ अमरावती पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून येत . या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात एका निवडणुकीत त्यांचा अनपेक्षित पराभव झाला . तो उमेदवार धनवान होता आणि केवळ धनवानच होता,  हीच त्याची बी . टी . देशमुख यांच्या विरोधात निवडून येण्याची पात्रता होती . निवडणुकीचा निकाल लागल्यावर ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक कुमार केतकर यांना मी फोन केला ( तेव्हा ‘लोकसत्ता’च्या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या विदर्भ आवृत्तीचा मी संपादक होतो . ) आणि बीटी देशमुख हरले ही बातमी दिली . बीटी देशमुख निवडणुकीत पराभूत होऊ शकतात हीच मोठी बातमी होती  .

केतकर म्हणाले ‘तू आता बीटी यांच्यावरच व्यक्तिवेध लिही . कारण हा पराभव बी टी देशमुखांचं शिक्षण आणि समाजकारणातलं महत्त्व कमी करु शकत नाही . त्यांच्या व्यक्तिमत्त्वा भोवती असणारी साधेपणाची झळाळी कमी करु शकत नाही ‘.

बीटी देशमुख यांचं मोठेपण यातच आहे की निवडणूक हरल्यावरही  त्यांच्यावर लोकसत्तामध्ये गुणगौरव पर मजकूर आला .

बी . टी . देशमुख एका शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले . नंतर शिक्षक झाले आणि जनतेचे प्रश्न सुटावेत या ओढीनं पुढे संसदीय राजकारणात आले . आयुष्यभर ते कुठल्याच पक्षाशी थेट संबंधित नव्हते पण , सर्वच पक्षात त्यांच्याविषयी मोठा सहज आदरभाव होता  . त्यांची नाळ मानवी संवेदनांशी घट्ट जुळलेली होती . अमरावती शहराच्या सामाजिक प्रश्नांच्या भोवती त्यांचा जीव घुटमळत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासाच्या बाबतीत विदर्भ जो मागे पडला त्याबद्दल त्यांच्या मनात अत्यंतिक सल होती . पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न बी. टी . देशमुख यांनी विधान परिषदेत ज्या हिरीरीने मांडले  तितक्याच आक्रमकपणे त्यांनी विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाचा लढा लढला . बी . टी. देशमुख आणि नितीन गडकरी या जोडीने त्यासाठी विधिमंडळ आणि न्यायालय अशा दोन्ही पातळ्यांवर अतिशय अभ्यासूपणे आवाज उठवला . अखेर या प्रश्नावर राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागला आणि विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाच्या प्रश्नात लक्ष घालावं लागलं . बीटी देशमुख आणि नितीन गडकरी यांचा हा लढा विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाच्या लढाईत सुवर्ण अक्षरानं नोंदवावा लागेल . महत्त्वाचं म्हणजे या लढ्याला यश आल्यानंतर श्रेयापासून दूर राहण्याची जी वृत्ती या दोघांनीही  दाखवली , त्याचीही विद्यमान राजकारणी आणि पत्रकारांनी न विसरता नोंद घ्यायलाच हवी .

बीटी वृत्तीने अतिशय साधे होते जवळजवळ सहा फुटाची उंची , शिडशिडीत बांधा , रापलेला वर्ण , पायजमा व कुर्ता किंवा सदरा आणि पायात चपला असा एकूण बीटी यांचा अवतार होता . अभ्यासू वृत्ती आणि अन्यायाविरुद्ध कणखरपणे आवाज उठवण्याची त्यांची वृत्ती होती . ते मुंबई किंवा नागपूरला कामासाठी म्हणा की विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी , रेल्वे किंवा बसनं प्रवास करत . नागपूरला आमदार निवासात राहणारे आणि एस. टी. बसनं प्रवास करणारे गणपतराव देशमुख यांच्यासारखे जे काही मोजके दोन-चार विधिमंडळ सदस्य होते त्यात बी . टी.  देशमुख यांचा अग्रक्रमानं समावेश करावा लागेल . आमदार निवास ते विधिमंडळ हा नागपुरातला प्रवास ते एसटीच्या बसनं किंवा चक्क पायी करत असत . मुंबईतही आमदार निवासातून विधिमंडळात जाताना पाऊस असो की ऊन्हं ,  बी . टी . देशमुख यांनी कधी टॅक्सी केली आहे , असं दिसलं नाही . ताडताड पावलं टाकत बीटी विधिमंडळाकडे जात , सभागृहात प्रवेश करत आणि कामकाजात मोठ्या तडफेनं  भाग घेत .

रेल्वे स्टेशनवर किंवा बसस्थानकावर वाहनाची प्रतीक्षा करताना ते बाकावर वाचत बसलेले अनेकदा दिसत . आपण आमदार आहोत म्हणजे कोणी विशेष आहोत असा कोणताही डामडौल त्यांच्या वागण्यात कधीच दिसला नाही . त्यांच्या पोतडीत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही जनजीवनातील असंख्य हकीकती आणि आठवणी होत्या . त्या आठवणी कुणा धनवान कुटुंबाशी निगडित असलेल्या कधीच नव्हत्या तर शेतीत राबणाऱ्या बळीराजाच्या आणि सामान्य माणसाच्या होत्या . हा बळीराजा आणि हा सामान्य माणूस हाच बी . टी .देशमुख यांच्या आस्थेचा आणि कामाचाही कायम केंद्रबिंदू राहिला . त्यामुळे बीटी यांना भेटलं की हिरव्यागार सावलीत वसलेलं एखादं गाव भेटल्यासारखं वाटायचं आणि त्या गावचेच एक रहिवासी बी . टी . देशमुख आहेत , असं जाणवायचं .

बी . टी . देशमुख तब्बल अडीच दशक विधिमंडळाच्या राजकारणात होते पण , पक्षीय राजकारणाचा शिंतोडा त्यांनी त्यांच्या अंगावर चुकूनही उडू दिला दिला नाही आणि कुणाही भ्रष्ट मंत्री नेत्याशी त्यांची कधी जवळीक घडली नाही .साधारण २००० आधीच्या राजकारणात जाणकार , समंजस अभ्यासू आणि पाय जमिनीवर घट्ट रोवलेल्या लोकप्रतिनिधींचं बहुमत होतं . त्यांची संख्या नंतर हळूहळू कमी होत गेली . विधिमंडळ आणि संसदीय राजकारणात धनवानांची चलती सुरु झाली आणि बी . टी . देशमुख यांच्यासारखे सच्छील राजकारणी मागे पडले . निवडणुकीच्या राजकारणात जनतेशी असणाऱ्या बांधिलकीपेक्षा पैसा महत्त्वाचा झाला . कम व्हॉट मे , कोणत्याही  प्रकारे निवडणूक जिंकलीच पाहिजे , ही इर्षा निर्माण झाली आणि बी . टी . देशमुख यांच्यासारखे राजकारणी अपवाद म्हणून उरले . म्हणूनच बी. टी . देशमुख यांचा पराभव झाला तरी माध्यमात ते गौरवपर लेखाचे मानकरी ठरले , हेच त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे . असे लोकप्रतिनिधी आता केवळ आठवणींच्या प्रदेशातच उरलेले आहे . धनाच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या विद्यमान राजकारणात बीटी देशमुख यांच्यासारख्या राजकारण्यांना मुळीच आता स्थान उरलेलं नाही . देशमुख यांची जागा विदर्भातला अन्य कोणताही नेता आता कोणत्याही प्रकारे घेऊ शकणार नाही हे निश्चित .

(लेखक-ज्येष्ठ संपादक , राजकीय विश्लेषक , ब्लॉगर , साहित्यिक आहेत .)

+919822055799

Previous article‘इंडिया’आघाडीचे नुसतेच हाकारे!
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here