पाऊस कोसळत होता… कुकरू धुक्यात हरवत होतं!

-अविनाश दुधे
बैतूल–कुकरू–घटांग प्रवास म्हणजे पावसात भिजवणारा आणि धुक्यात हरवून टाकणारा एक अविस्मरणीय अनुभव होता.
मध्यप्रदेशातलं, पण महाराष्ट्राला अगदी खेटून असलेलं कुकरू! सतपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सुमारे १,१३७ मीटर उंचीवर वसलेलं हे छोटंसं गाव. निसर्गसौंदर्याबरोबरच कॉफीच्या बागांसाठीही कुकरूची ओळख आहे. ब्रिटिशांनाही या डोंगरमाथ्याचं हवामान आणि निसर्ग भुरळ घालत होता. त्यामुळेच इथे ब्रिटिशकालीन विश्रामगृह उभारण्यात आलं.
आज मात्र कुकरूने आपला सगळा निसर्ग धुक्याच्या पडद्याआड लपवून ठेवला होता.
मुसळधार पाऊस कोसळत होता. खोल दरीच्या काठावरचं ते जुनं विश्रामगृह पावसाच्या सरी अंगावर घेत शांतपणे उभं होतं. आणि दरीच्या तळातून धुक्याचे लोट वर येत होते.
हळूहळू दरी नाहीशी झाली.
समोरचा डोंगर नाहीसा झाला.
रस्ताही धुक्यात विरघळला.
दहा फुटांवरचंही दिसत नव्हतं!
क्षणभर वाटलं, आपण डोंगरावर उभे नाहीच… आपण थेट ढगांच्या आत शिरलो आहोत.
पाऊस, धुकं, डोंगर आणि खोल दरी—या चौघांनी मिळून कुकरूला आज एखाद्या गूढ चित्रपटाचा सेटच बनवलं होतं.
पण या सगळ्या धुक्याच्या जादूमध्ये आणखी एक सुंदर दृश्य भेटलं.
परिसरातील गवळी लाकडी भट्टीवर मोठ्या पातेल्यात दूध सावकाश घोटत होते. बाहेर पाऊस धोधो कोसळत होता आणि आत लाकडाची भट्टी धगधगत होती. धुराचा वास, उकळत्या दुधाची वाफ आणि भट्टीची ऊब… वातावरणात एक वेगळीच गोडी उतरली होती.
याच दुधापासून खवा आणि रबडी तयार केली जात होती.
बाहेर अंगावर काटा आणणारी थंडी…
आणि आत लाकडी भट्टीची ऊब!
आज त्या भट्टीसमोर बसून शरीर शेकत गरमागरम गोड दूध पिण्याचा आनंद घेतला.
त्या एका कपात केवळ दूध नव्हतं…
त्यात पावसाची थंडी होती,
भट्टीची ऊब होती,
डोंगराची माती होती,
गवळ्यांच्या हाताची चव होती
आणि धुक्यात हरवून जाण्याचा एक विलक्षण आनंद होता.
(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )

8888744796

………………………………………….

अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleपाच बोगदे, धुक्यातले डोंगर आणि हरवून टाकणारं धाराखोह
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here