-अविनाश दुधे
इंदूरमध्ये आतापर्यंत पाच-सहा वेळा येऊन गेलो. महात्मा गांधी रोडवरील राजवाडा अनेकदा पाहिला; पण काय कोण जाणे, लालबाग पॅलेस पाहणे मात्र राहूनच गेले होते. आज तो पाहिला आणि होळकरांचे हे वैभव पाहून अक्षरशः थक्क झालो! विस्मयचकित झालो.
१८८६ मध्ये सुरू झालेला हा राजेशाही प्रवास तुकोजीराव होळकर द्वितीय, शिवाजीराव होळकर आणि तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या काळात आकाराला आला. तब्बल तीन टप्प्यांत उभा राहिलेला हा पॅलेस सुमारे 28 एकरांच्या परिसरात विस्तारलेला आहे.
इटालियन रेनेसाँ, पॅलेडियन आणि बारोक वास्तुशैलींचा अद्भुत मिलाफ; व्हर्सायच्या राजवाड्याची झलक देणारे अंतर्भाग; इटालियन संगमरवरी स्तंभ, बेल्जियन काचेच्या खिडक्या, पर्शियन गालिचे आणि भव्य झुंबर—प्रत्येक कक्ष म्हणजे कलासंपन्नतेचा स्वतंत्र अध्याय!
छताकडे पाहिले की ग्रीक देव-देवतांची चित्रे, भित्तींवर कलाकुसर; ‘T’ आकारातील राजेशाही डायनिंग हॉल, स्प्रिंगवर बसवलेला नृत्यगृहाचा लाकडी मजला आणि अगदी स्वयंपाकघरापासून अन्न वर नेण्यासाठीची यंत्रणाही!
आणि प्रवेशद्वार? लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसच्या दरवाजांची प्रतिकृती—पण आकाराने जवळजवळ दुप्पट! इंग्लंडहून आणलेले हे लोखंडी दरवाजे पाहताक्षणीच त्या काळच्या होळकरांच्या अभिरुचीची कल्पना येते.
कधीकाळी बांधकामावर सुमारे 36 लाख रुपये खर्च झाले होते—त्या काळातली ही रक्कम किती प्रचंड असेल, याची कल्पना आजच्या काळात करणेही अवघड!
बाहेरून पाहताना एक राजवाडा दिसतो; पण आत पाऊल टाकल्यावर एक काळ, एक संस्कृती आणि होळकरांच्या कलाप्रेमाची संपूर्ण दुनिया उघडते.
आज लालबाग पॅलेस पाहिला… आणि मनात एकच विचार आला—राजेशाही संपली, पण तिचे सौंदर्य अजूनही इथे तितक्याच दिमाखात जिवंत आहे!
(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )
8888744796
………………………………………….
अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.










