महात्मा गांधींना भजने आवडत ती त्यातल्या शब्दांच्या अर्थाबरोबर त्यातल्या संगीतासाठीही आवडत.
१९४६ तामिळनाडूमध्ये मद्रास येथे हिंदी प्रचार सभेच्या एका कार्यक्रमाला महात्माजी गेले तेव्हा दीक्षितार कीर्ती यांनी एक तामिळ भजन म्हटलं ते महात्मा गांधींना इतकं आवडलं की त्यांनी ते पुन्हा एकदा म्हणायला लावलं.
१९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही महिन्यातच एम एस सुब्बलक्ष्मी यांना महात्मा गांधींचा एक निरोप मिळाला. त्यात लिहिलं होतं की त्यांनी *’हरी तुम हरो’ हे भजन म्हणून त्याच रेकॉर्डिंग दिल्लीला पाठवावे.*
सदाशिवम यांचं म्हणणं होतं की – आम्हाला भजनाबद्दल काही फारसं कळत नाही त्यामुळे आम्ही या भजनाला न्याय देऊ शकणार नाही किंवा दुसऱ्यांकडून म्हणवून घेतो आणि तुम्हाला पाठवतो.
त्यांचं पत्र मिळाल्यावर लगेच त्यांना महात्मा गांधींचा फोन आला. गांधी फोनवर म्हणाले की, *”सुब्बलक्ष्मी यांनी ते भजन गद्यात म्हटलं तरी चालेल.”* त्यावर सुब्बलक्ष्मी यांनी ठरवले की नाही आपण हे भजन म्हणूच आणि त्याचं रेकॉर्डिंग महात्मा गांधींना पाठवू आणि अक्षरशः एका दिवसात त्यांनी ते भजन रेकॉर्ड करून महात्मा गांधींना दिल्लीला पाठवले.
सुब्बलक्ष्मी रोज आकाशवाणीवर बातम्या ऐकत असत. १९४८ नवे वर्ष सुरू झाल्याच्या महिन्यात एक दिवस त्या बातम्या ऐकत असतांना त्यांना महात्मा *गांधींची हत्या झाल्याची बातमी ऐकायला मिळाली. त्यानंतर लगेचच ‘हरी तुम हरो’ हे सुब्बलक्ष्मींनी गायलेले भजन आकाशवाणीवर लागले*. सुब्बलक्ष्मींना भरून आलं. त्यांचं भान हरपलं. गांधीनी आपल्याला सांगितलेलं काम आपण केलं नसतं तर?
महात्मा गांधींना एकदा एकाने विचारलं होतं की तुमच्या एवढ्या कामांमध्ये तुम्हाला कधी संगीत ऐकायला सवड मिळते की नाही?
गांधी उत्तरादाखल म्हणाले की, *”जर माझ्या आयुष्यात संगीत नसतं आणि हास्य नसतं तर मी या सगळ्या कामाच्या ओझ्याखाली चिरडून मरून गेलो असतो.”*
रवींद्रनाथ टागोरांना पाठवलेल्या एका पत्रामध्ये महात्मा गांधींनी विनंती केली आहे की – शांतिनिकेतनमध्ये बंगाली संगीताच्या बरोबर *हिंदुस्तानी आणि पाश्चिमात्य संगीतही शिकवावे. यावरून संगीताबद्दलची महात्मा गांधी यांची आवड आपल्याला लक्षात येते*.
२० ऑक्टोबर १९१७ गुजरात मध्ये भडोच येथे दुसरे गुजरात शैक्षणिक संमेलन झाले होते. त्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले की,”अनेकदा खूप लोकांच्या समूहात आपल्याला एकएकटं असल्यासारखं वाटतं एक अस्वस्थपणा येतो. अशा वेळी शांत होण्यासाठी सर्वांनी मिळून एका सुरात एक गीत गायले पाहिजे. आपल्याला एक सूर – एक गीत – या शक्तीचा प्रत्यय अनेक उदाहरणांमधून येतो. होड्या चालवणारे नावाडी एका सुरात एका लयीत काही ना काही म्हणत असतात. हरारा – हरारा किंवा अल्लबेल – अल्लबेल, त्या आवाजाने त्यांना काम करायला स्फुरण येतं. लोकांना जागे करण्याच्या कामी संगीताचा उपयोग केला गेला पाहिजे.”
पुढे गांधी म्हणतात,”संगीत म्हणजे लय. संगीत म्हणजे रचना. संगीताचा परिणाम झपाट्याने पण थंडावा निर्माण करणारा होतो. मला वाटतं स्काऊट आणि सेवा समिती या संघटनांनी योग्य असे संगीताचे प्रशिक्षण देऊन आपल्या स्वयंसेवकांकडून देशप्रेमाची गाणी म्हणवून घेतली पाहिजेत.
दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींनी आपल्या आश्रमात संध्याकाळच्या प्रार्थना सुरू केल्या. त्यावेळेला म्हटलेल्या भजनांचे एक संकलन – ‘नीतिवं काव्यं’ या नावाने प्रकाशित झाले आहे.
गांधींची संगीताची कल्पना ही आत्म्याला जोडूनसुद्धा होती. महात्मा गांधींनी पंडित नारायण मोरेश्वर खरे यांना ७ ऑक्टोबर १९२४ ला एक पत्र लिहिले. पंडित खरे हे साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमात संगीत शिक्षक होते. त्यांना लिहिलेल्या पत्रात गांधी म्हणतात –
“मी संगीताकडे आत्मिक विकासाचे साधन म्हणून पाहतो*. आपणा सर्व आश्रमवासींनी आपली भजने त्यातले सार समजून घेऊन म्हणावी यासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती आहे. संगीत ऐकताना मला अवर्णनीय आनंद मिळतो. संगीत ही एक अशी रचनात्मक कृती आहे की ज्यामुळे आपल्या आत्मा उन्नत होतो.”
१५ एप्रिल १९२६ च्या अहमदाबादहून प्रकाशित झालेल्या ‘यंग इंडिया’ मध्ये महात्मा गांधी लिहितात –
“आपण संगीताकडे एक विस्तृत पटातून पाहिले तर त्यात आपल्याला एकोपा, सलोखा आणि परस्पर सहकार्य या गुणांचे दर्शन होईल. मला असे वाटते की अधिकाधिक लोकांनी आपल्या मुलाबाळांना संगीत शिकण्यासाठी संगीत वर्गांना घातले तर ते देशाची उन्नती करण्यासाठी काम करत आहेत असेही म्हणता येईल.”
संगीतामध्ये विषमता आणि द्वेषाला जागा नाही. भारतीय संगीत हे राष्ट्रीय एकात्मतेचे एक उदाहरण आहे. हिंदू आणि मुस्लिम संगीतकारांना एकत्र आणून संगीत सभा होतात आणि सर्वांना आनंद देतात.
गांधी म्हणतात की, “संगीत केवळ गायन किंवा वादन एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. त्याच्या कक्षा खूप दूरवर रुंदावलेल्या आहेत. जेव्हा जीवनाची संगत एका सूरात एका ठेक्यात एकाच वेळेला होते तेव्हाच खरे संगीत निर्माण होते.
हृदयाच्या तारा छेडणारे संगीत हे परस्परांच्या हृदयालाही जोडून ठेवू शकते.”
गांधींच्या मते सूतकताई करताना फिरणाऱ्या चरख्यात किंवा टकळीत आणि विणल्या जाणाऱ्या कापडातही संगीत भरलेले आहे.
मूळ लेखन – व्ही आर देविका,
दी हिंदू, ५/१०/२०१८- साभार
हे सुद्धा वाचा- Mahatma Gandhi – A unique musician- https://www.mkgandhi.org/articles/mahatma-gandhi-unique-musician.html