गांधी कथा -३
असहयोग आंदोलनाच्या सुरवातीच्या दिवसात अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेजचे शिक्षण सोडून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. नागपूरचे असे विद्यार्थी गांधीजींना भेटायला आले. त्यांच्यातल्या एकाने विचारले ” आपण आम्हाला विद्यापीठाचे शिक्षण घ्यायला प्रतिबंध केलात. मात्र अधिक ज्ञान मिळविण्याची आमची इच्छा अपुरी राहिली आहे. त्यासाठी आपण कोणती योजना बनविली आहे का?”
गांधीजी म्हणाले ” आपण जे बोलत आहात ते योग्य नाही. आपले शिक्षण बंद व्हावे अशी माझी कधीच इच्छा नाही. मी आपल्याला विद्यापीठातून काढलेले नाही उलट खऱ्या विद्यापीठात दाखल केले आहे. हे विश्वच एका विश्वविद्यालय आहे. राष्ट्रासाठी कार्य करत असताना जर शिक्षण बंद झालं अशी भीती वाटत असेल तर ते राष्ट्रीय कार्य नव्हे. राष्ट्रीय कार्य हेच शिक्षण आहे. संकुचित, चार भिंतीत कोंडलेल्या शिक्षणाला मी व्यापक शिक्षणाकडे नेतोय.धन,ऐश्वर्य,सुख किंवा बुद्धीमत्तेपेक्षा आत्म्याला महत्व मिळायला हवं याची दक्षता घ्यायला हवी. शिक्षणाच्या संबंधात माझी ही कल्पना आहे की आपण ‘ महान ‘ पेक्षा ‘ चांगले’ बनावे. जीवन हे सेवेसाठी आहे हा मूलमंत्र आपण मनात पक्का कोरून ठेवा. कारण शिक्षणाचा मूळ उद्देश तोच असतो. ”
हे सर्व ऐकल्यावर प्रश्न विचारण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हढ्यात एका छोट्या मुलाने विचारले ” कोणत्या वेळी काय करावे असा प्रश्न निर्माण झाल्यावर कसा व्यवहार करावा हे मला सुचत नाही. कृपा करून आपण सांगाल का?”
गांधीजी म्हणाले ” अरे, यात काय कठीण आहे. जेंव्हा असा प्रश्न उभा राहील त्यावेळी सर्वाधिक त्यागाचा मार्ग अवलंबायचा. तो सर्वात सुरक्षित मार्ग असतो.”
सौजन्य – विजय तांबे