पवारसाहेब तुम्ही असे का वागता?

प्रिय श्री. शरद पवार साहेब

सप्रेम नमस्कार,

आज हे खुले पत्र आपणाला लिहीत आहे. अगोदर मनात असा विचार आला होता की, आपल्या घरच्या पत्त्यावर एक खासगी पत्र पाठवावे आणि माझ्या मनातल्या भावना व्यक्त कराव्यात. तुमच्याकडून त्याचे उत्तर नक्कीच आले असते. कारण तुम्हाला पत्र पाठवले की त्याचे उत्तर आले नाही, असे कधीच घडले नाही. हे तुम्हाला कसे काय जमते? सकाळी ८.३० वाजता तुम्ही लोकांना भेटायला सुरुवात करता. त्या अगोदर दोन तास तुमची अनेक कामे झालेली असतात. हा तुमचा कामाचा धडाका गेली अनेक वर्षे मी पाहतो आहे. राजकीय नेते जेव्हा उठतात तेव्हा तुमचे

चार-पाच तासांचे काम झालेले असते. गेली पन्नास वर्षे तुम्ही याच वेगाने काम करता आहात. राजकारणातही तुम्हाला आता ५२-५५ वष्रे झाली. १९६२ साली तुम्ही काँग्रेसमध्ये आलात. युवक काँग्रेसचे अध्यक्ष झालात. यशवंतराव चव्हाण यांचे पितृप्रेम तुम्हाला मिळाले. यशवंतरावांचे तुम्ही आवडते होतात; पण महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या तरुणांनाही तुमचे कमालीचे आकर्षण होते. तुमचे वाचन, तुमचा मित्रसंपर्क, सर्व क्षेत्रांतले ज्ञान समजावून घेण्याची तुमची सहजवृत्ती, जो विषय ज्याचा आहे त्याच्याकडून तो समजून घेण्यात कमीपणा न मानणारा तुमचा स्वभाव, असे हे अनेक गुणविशेष तुमच्यात आहेत.

pawarवयाच्या २७ व्या वर्षी आमदार, ३२ व्या वर्षी राज्यमंत्री, ३४ व्या वर्षी मंत्री, ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री, ५१ व्या वर्षी केंद्रीय संरक्षणमंत्री.. अशी राजकारणातील सगळी सन्मानपदे तुम्ही मिळवलीत आणि प्रभावीपणे तुमचा ठसा त्यावर उमटवलात. हे करत असतानाच नाटय़ परिषद असो, नेहरू विज्ञान केंद्र असो वा मुंबई क्रिकेट असोसिएशन असो अशा अनेक संस्थांमध्ये तुम्ही सहजपणे वावरलात, सर्वोच्चपदी बसलात आणि काही नवे करून दाखवलेत. अतिशय विपन्नावस्थेत असलेल्या माजी क्रिकेटपटूंना तुमच्या निर्णयामुळेच आज महिन्याकाठी सन्माननीय मानधन दिले जात आहे. अशी कितीतरी कामे तुमच्या नावावर आहेत. मुख्यमंत्री म्हणून तुमची कारकीर्दही अशीच कायमची लक्षात राहणारी. मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ हे नामांतर तुमच्यामुळे झाले. त्याची फार मोठी किंमत तुम्ही मोजलीत. राजकारणात, समाजकारणात, प्रशासनात महिलांच्या सहभागाबद्दलचा तुमचा आग्रह, महिला आयोगाची तुम्ही केलेली स्थापना आणि पोलीस दलात आज भरती झालेल्या मुली हे सगळे तुमचे निर्णय आहेत. शेतीमधले तुमचे निर्णय तर तुमच्या आवडत्या खात्याचेच आहेत. मला आजही आठवते आहे, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर (फेब्रुवारी १९७५) तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून शेती खाते मुद्दाम मागून घेतलेत. असे अनेक विषय तुमच्याभोवती फिरतात.

वेगळा पक्ष काढून तुम्ही काँग्रेसशी फारकत घेतलीत. त्यात काँग्रेसचे नुकसान झाले, पण तुमच्या ताकदीवर तुम्ही चाळीस-पन्नास आमदार निवडून आणता आहात, हेही अमान्य करता येत नाही. अशा या सगळ्या आगळ्यावेगळ्या नेतृत्वाचे, गेली पन्नास वर्षे महाराष्ट्राला आकर्षण वाटत राहिले आहे. हे खुल्या मनाने मान्य केले पाहिजे..

पण पवारसाहेब, हे सगळे मान्य केल्यानंतरही एक प्रश्न मनात सारखा टोचत आहे, ‘तुम्ही कधी कधी असे का वागता?’ तुमच्याबद्दलचे समज-गैरसमज तुमच्या अशा निर्णयातून महाराष्ट्राच्या समाजमनावर असे काही खोलवर रुतून बसले आहेत, की त्यामुळे तुमच्याबद्दलचे निर्माण झालेले समज कायमचे ‘गैरसमजा’त रूपांतरित झाले आणि तुमच्याबद्दलचे एक अविश्वसनीय वातावरण कायमचेच तुमच्या पक्षासकट सगळ्या पक्षांत जाणवते आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि त्यामध्ये पुरुषाच्या उत्तम गुणांसाठी २४ गुणांची महती गायली. त्या २४ गुणांत पहिला गुण ‘निर्भयता’ सांगितला आणि शेवटचा गुण ‘विश्वसनीयता’ सांगितला.

तुमच्यामध्ये २४ गुणांतले २३ गुण ठसाठस भरलेले आहेत, पण शेवटच्या गुणाने काही वेळा असे काही वळण घेतले की, ज्यामुळे तुमच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीत एक प्रश्नचिन्ह कायमचे निर्माण होत राहिले. ज्यामुळे तुमच्या प्रतिमेवर निश्चितपणे काही डाग पडले. जेव्हा आयुष्यात तुम्ही निवांत असाल, तेव्हा कदाचित अशा विषयांचे चिंतनही करत असाल. तुम्हाला खासगीदृष्टय़ा वेळ फारसा मिळत नाही. तरी चिंतनाची तुमची पद्धती माहिती आहे. पण अशा वेळी तुमच्या आयुष्यातले काही निर्णय चुकले आहेत किंवा चुकत आहेत, असे तुम्हाला कुठे तरी जाणवत असेल ते एकदा तुम्ही मोकळेपणाने बोला. तुमची घुसमट होतच असेल; पण महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांची घुसमट होते आणि त्यांना असे वाटते, ‘पवारसाहेब असे का वागतात?’

राग मानू नका; पण याची सुरुवात वसंतदादांचे सरकार पाडण्यापासूनच झाली. तो दिवसही मला आठवतो आहे. जेव्हा मुख्यमंत्री असलेल्या दादांच्या विधानमंडळातील चेंबरमध्ये तुम्ही आला होतात. दादा तुम्हाला विचारत होते, ‘शरदराव, हे सरकार तुम्हाला पाडायचे असेल, तर मला तरी ते कुठे चालवायचे आहे? आपण सगळेच मिळून पाडू..’

तुम्हाला जसा उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे यांचा जाच सहन होत नव्हता, तसा दादांनाही सहन होत नव्हता. पण तुम्ही घाई केलीत. आमदार डॉ. मंडलीक यांच्या गिरगाव येथील घरून त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांना एस. एम. जोशींनी फोन लावला. मग इंदिरा काँग्रेस आणि काँग्रेस एसचे सरकार पाडायचे ठरले. तुम्ही पुढाकार घेतलात. चाळीस आमदार फुटायची वेळ आली. मोरारजींनी अट घातली. ‘सरकार पाडा, पण शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मला शंकरराव चव्हाण आणि राजारामबापू पाटील हे दोन मंत्री असलेच पाहिजेत आणि शंकरराव अर्थमंत्री असले पाहिजेत.’ तुम्ही ती अट मान्य केलीत. शंकरराव अर्थमंत्री झाले.

खरे तर तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात १९७५ ते १९७७ साली होतात. तुमच्या मंत्रिमंडळात शंकररावांनी यायला नको होते; पण त्यांचाही धीर सुटला. राजारामबापू कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. म्हणून मंत्रिपदी त्यांचे नाव जाहीर होऊनही त्यांचा शपथविधी होऊ शकला नाही. मुंबई महानगरपालिकेतून बापूंना विधान परिषदेत निवडून आणल्यावर मग बापूंना तुम्ही मंत्री केलेत. पण शंकरराव असतील, बापू असतील, हे काँग्रेस संस्कृतीचेच होते. तुमच्या या मंत्रिमंडळात सगळ्यात मोठी चूक तुम्ही जी केलीत, ती उत्तमराव पाटील यांना महसूल मंत्री आणि हशू अडवाणी यांना नगरविकास मंत्री अशा दोन महत्त्वाच्या पदावर भाजपाच्या नेत्यांना बसवून. त्यांचा मंत्री अभिषेक तुमच्यामुळे झाला आणि भाजपाचा महाराष्ट्रातला सत्तेतला पहिला प्रवेश तुम्ही करून दिला, ही तुमची राजकीय भूमिका अनेकांना खटकली होती. आजही खटकते आहे. कारण राजकारणात मतभेद झाले तरी राजकारण एका ठाम भूमिकेवर करावे. सत्तेसाठी ते निसरडे असू नये. या भूमिका तुम्ही जपल्या नाहीत. दादांचे सरकार पाडले गेले. त्यावेळी तुमच्याबद्दल जे गैरसमज निर्माण झाले, ते अजूनही दूर झालेले नाहीत. हे सरकार पाडण्यामागचा आणखी आतला सगळा संदर्भ मला पूर्ण माहिती आहे. यशवंतराव चव्हाणांचा रामटेक बंगल्यावर आलेला फोन मला माहिती आहे. तो फोन तुम्ही न घेता किसनवीर आबांनी घेतला.

यशवंतरावांना काय सांगितले हेही माहिती आहे. (साहेब, तुमचे ऐकणार नाहीत. दादांचं सरकार पाडण्याचा आमचा निर्णय झालेला आहे.) हे सगळे किसनवीर बोलले; पण ते तुमच्या खात्यात पडलं आणि दादांचे सरकार तुम्हीच पुढाकार घेऊन पाडलेत, हा महाराष्ट्रात जो समज निर्माण झाला, तो दूर होणे अवघड झालं. स्वातंत्र्य चळवळीतले यशवंतराव आणि वसंतदादा या दोघांचे राजकीय भांडण त्यामुळे झाले. १९८०च्या लोकसभा निवडणुकीत यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध शालिनीताई पाटील बंडखोर उमदेवार म्हणून उभ्या राहिल्या. त्याला कारण, ते सरकार पाडणे हेच होते. पुढे यशवंतराव आणि दादांचे भांडण मिटले. सांगलीच्या सभेत दादा म्हणाले की, ‘साहेबांशी भांडण झाल्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले.’ त्यावर यशवंतरावांनी उत्तर दिले, ‘महाराष्ट्राचे नुकसान झाले की नाही माहीत नाही; पण माझे आणि दादांचे मात्र नुकसान झाले.’ या दोन मोठय़ा नेत्यांमध्ये भांडण होण्यास तुम्ही दादांचे सरकार पाडणे हे कारण होते आणि सरकार पाडायला यशवंतरावांचा आशीर्वाद होता, असा दादांचा पक्का समज होता.

१९८६ साली तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये आलात. औरंगाबादलाच तुमचा काँग्रेस प्रवेश झाला. राजीव गांधी स्वत: आले होते. ते पंतप्रधान होते. फारुख अब्दुल्ला होते आणि त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. त्यानंतर चव्हाणसाहेबांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्याची मोहीम सुरू झाली. त्या मोहिमेत आपण होतातच. वसंतदादांच्या बी-४ या बंगल्यात राजकीय मंत्रणा होत होत्या. तिथे मी नेहमी असायचो. ज्या दादांचे सरकार पाडण्यात तुमचा पुढाकार होता, तेच दादा हे त्यावेळी स्पष्ट सांगत होते की, ‘शरदला मुख्यमंत्री करायला हायकमांड तयार असेल, तर शंकररावला विरोध करू..’ मदन बाफना आजही याचे साक्षीदार आहेत. ज्या दादांना तुम्ही विरोध केला होता, त्याच दादांनी ‘तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री बनावे’ याला पाठिंबा दिला.

तुम्ही १९९९ साली काँग्रेस सोडलीत. वेगळा पक्ष स्थापन केलात. तो इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे; परंतु तुमच्या वेळोवेळी बदलत चाललेल्या भूमिकांमुळे राजकारणात संभ्रमाचे आणि संशयाचे धुके किती दाट पसरते याचा अनुभव आपण सगळे करत आहोत. म्हणूनच सामान्य कार्यकर्त्यांच्याही मनात प्रश्न येतो की, ‘पवारसाहेब असे का वागतात?’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सगळेच राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करीत असतात. पण ज्या नरेंद्र मोदी यांनी तुमच्या बारामतीमध्ये येऊन तुमच्या राष्ट्रवादीला – ‘एन. सी. पी. म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी’ म्हटले. ज्यांनी ‘काका-पुतण्याची बारामतीमधली जहागिरी संपवून टाका’ म्हटले, त्यांना तुम्ही बारामतीत का आणले? त्यांचा सत्कार का केलात? पवारसाहेब अगदी स्पष्टपणे सांगतो, पंतप्रधानपदाचे अप्रूप तुम्हाला वाटावे, असे मोठेपण त्या पदाला आता नाही. यशवंतराव किंवा तुम्ही पंतप्रधान होऊ शकला नसला तरी गेल्या दहा-वीस वर्षात इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर असे पंतप्रधान झाले आणि आताचे मोदी. या सगळ्यांपेक्षा तुमची राजकीय योग्यता कितीतरी मोठी आहे. असे असताना केवळ पंतप्रधानाला आणून तुम्ही त्यांचा सत्कार करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना त्यामुळेच असे वाटते की, पवारसाहेब असे का वागतात? तुम्हाला आता कोणताही राजकीय लोभ नाही. भाजपाचे सरकार आणि मोदी जाती-धर्माच्या नावावर हे राज्य करीत आहेत.

घरवापसीचा कार्यक्रम करून एक धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत आहे, अशी सगळी नेमकी आणि वास्तव टीका तुम्ही वेळोवेळी करता आहात. परवा बालेवाडीलाही तुमच्या पक्षाच्या अधिवेशनात तुम्ही नेमकी हीच टीका केलीत, ती अगदी योग्य आहे. पण, तुमचा पक्ष या भाजपा सरकारविरुद्ध आणि त्यांच्या धर्मवादी धोरणाविरुद्ध रस्त्यावर उतरायला का तयार नाही? का तुमचा एकही मोर्चा नाही? सत्कार कशाला केला? सत्कार व्यक्तीचा होत असेल, पंतप्रधानांचाही होत असेल, पण त्या व्यक्तीमागे आणि त्या पंतप्रधानामागे या देशाला घातक ठरणारा एक विचार दडलेला आहे. पंतप्रधानांमध्ये एक हुकूमशहा दडलेला आहे. हे खरे तर तुम्ही आम्हाला सांगायला हवे आणि या लढाईचे नेतृत्व तुम्ही करायला हवे. असे असताना १४ फेब्रुवारीला-अगदी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी तुमचे हे मित्रप्रेम ऊतू गेले, याची गरज होती का? राजकारणात व्यक्तिगत शत्रुत्व करू नये, असे यशवंतरावांनी आपल्या सर्वाना शिकवले. पण यशवंतराव हेही सांगत होते, की राजकीय भूमिकेत विरोध असेल तर तो विरोध प्रखरपणे व्यक्त करा. शरदराव राग मानू नका, पण तुमच्या भूमिका निसरडय़ा आहेत. महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारला बहुमत मिळाले नाही, त्याच दिवशी संध्याकाळी त्या सरकारला पाठिंबा देण्याची सगळ्यात घाई तुम्हाला झाली. त्यावेळीही अशीच चर्चा होती की, पवारसाहेब असे का वागत आहेत? महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्यासाठी हे मी करत आहे, असे तुम्हीच सांगितलेले कारण वसंतदादांचे सरकार पाडतानाही लागू होते. त्यामुळे तुम्ही जी गणिते मांडून राजकारण करता आहात, त्यात सोय आणि गैरसोय या दोन्हींचा विचार आहे.

राजकारण हा साधूचा मठ नाही हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु समविचारी डाव्या पक्षांबरोबर समझोता करणे आवश्यक असताना तुमच्या सगळ्या बोलण्या-वागण्यात काँग्रेसबद्दलचा राग दिसतो आहे. ज्या पक्षाने तुम्हाला मोठे केले, ज्या पक्षाने तुमची राजकीय भूमिका घडवली, त्या पक्षाशी तुमचा मतभेद झाला तरी तुम्ही राजकीयदृष्टय़ा वेगळे होताना, तुमच्या पक्षाच्या नावात ‘काँग्रेस’ या शब्दाला टाळू शकला नाहीत. ही काँग्रेस आणि तो सर्वधर्म-समभावाचा विचार हेच देशाचे शक्तिस्थान व्हायला हवे आणि त्यासाठीच भाजपाला विरोध व्हायला हवा. असे असताना तुम्ही भाजपा आणि मोदींच्या विरोधात प्रखर भूमिका घेऊन रस्त्यावर न उतरता बारामतीत मोदींना बोलवून त्यांचा सत्कार करता आहात आणि दुसरीकडे बालेवाडीत त्यांच्यावर टीका करता आहात, या तुमच्या दोन भूमिका समांतर वाटत नाहीत. एकमेकांना छेद देणा-या वाटतात आणि म्हणून असे वाटत राहते की पवारसाहेब असे का वागतात?

चुकलं माकलं असेल तर क्षमा करावी. जे वाटलं ते स्पष्टपणे लिहिलं. राग नसावा.

आपला

मधुकर भावे

Previous articleएक मंत्रमुग्ध सत्यशोधन!
Next articleवर्तमानपत्राचे काम नेमके काय असते?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here