-मिथिला सुभाष
महाभारतातल्या ययातीची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच. त्याने एक दिवस आरशात पाहिले, त्याला एक चंदेरी केस दिसला. ययाती बेचैन झाला. “माझा जो पुत्र माझं म्हातारपण घेईल त्याला मी माझा वारसदार बनवेन,” असे त्याने जाहीर केले आणि त्याच्या ‘पुरू’ नावाच्या मुलाने त्याचे ते म्हातारपण घेतले. ययाती पुन्हा एकदा आयुष्याचा उपभोग घ्यायला तयार झाला…!
हल्ली म्हातारपण नकोसे झालेले असे ययाती आणि ‘ययात्या’ पदोपदी भेटतात.
माणसाने कितीही ‘नको’ म्हंटले तरी म्हातारपण येतेच. मग सुरु होतो त्याला नाकारण्याचा सिलसिला, निकराचे प्रयत्न! वजन कमी करणे, चरबी (शरीरावरची) वितळवणे, केसांना रंग देणे, वगैरे, वगैरे…! खरं तर म्हातारपण ग्रेसफुली एक्सेप्ट केलं तर ते अत्यंत देखणं, ऋजू आणि व्यक्तिमत्वाला संपूर्णत्व देणारं असतं.
मी स्वत: मध्यमवर्गातली आणि माझे वाचकही खात्रीने मध्यमवर्गातले असल्यामुळे म्हातारपणाशी लढण्याचे पंचतारांकित उपाय इथे देत नाही. कारण ती माहिती देणे हा या लेखाचा विषय नसून वृद्धत्व नाकारण्याची जी एक शहरी लाट हल्ली आलेली आहे, तिचा मागोवा घेणं हा हेतू आहे.
सगळ्यांना तरुण रहायचंय, तरुण दिसायचंय…त्यासाठी लोक, विशेषत: माझ्या वयाच्या बायका (मी ६०+ आहे) स्वत:ची अक्षरश: शोभा करून घेत असतात…अर्थात ती त्यांनी आजपासून १०-१२ वर्षापूर्वीच सुरु केलेली असते. पुढे काहीही लिहिण्याआधी एक गोष्ट आग्रहाने नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे, माणसाने आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यायलाच हवी. त्यासाठी व्यायाम, आहार-नियोजन असायलाच हवे. पण त्याचा हेतू तरुण दिसणे हा नसावा, स्वस्थ असणे हा असावा. कारण, आपण मनात कितीही तरुण दिसण्याची इच्छा बाळगली तरी म्हातारपण हे नैसर्गिक आहे, ते येणारच. स्वत:वरच्या प्रेमामुळे आपल्याला ते आरशात दिसत नसले तरी इतरांना दिसते. चाळीशीच्या पुढच्या, प्रयत्नपूर्वक गालाचे खप्पड आणि देहाचे चिपाड करून घेतलेल्या बायका पाहिल्या की मला त्या चेटकिणीसारख्या दिसतात. ‘हॅन्सल अँड ग्रेटल’च्या गोष्टीतल्या चेटकिणीसारख्या. अथक प्रयत्न करून त्यांनी वजन आटोक्यात आणलेले असते, ‘वजन उतरले की तुम्ही तरुण दिसणार,’ हे त्यांच्या डाएटीशियन आणि जिमवाल्यांनी त्यांच्या मनात बिम्बवलेले असते. त्यामुळे या बायका हुरळून जाऊन जी फॅशन करतात तीही २० ते २५ या वयोगटातल्या मुलींची. बिच्चारी एवढे कष्ट करतेय, कशाला तिचं मन मोडा, म्हणून जवळची माणसं काही बोलत नाहीत. ‘मरू दे ना, आंब्याच्या चोखलेल्या बाठीसारखी झाली तरी आपलं काय बिघडतंय,’ असं म्हणून दूरची माणसं बोलत नाहीत. आणि ही बाई स्वत:चं हसं करून घेत राहते…
पुरुषांच्यात हे फॅड अजून फारसे पसरलेले नाही. त्यांना अनादी काळापासून एकच इच्छा असते, मरेपर्यंत बाईचा, आणि त्यातही तरुण बाईचा उपभोग घेता यावा आणि तिनं त्यादरम्यान इतकं दमून जावं की आपण माणूस नसून घोडा आहोत असं तिला वाटावं! याबद्दल नंतर कधीतरी लिहिणार आहेच. हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
.हे असं का झालं? याला उत्तर एकच. काळ बदलला! पूर्वी एका कंपनीत अनेक वर्ष काम करणाऱ्या माणसाचा आदर केला जायचा, हल्ली, ‘यांना दुसरीकडे काळे कुत्रे विचारत नाही, म्हणून इथे पडलेत लाथा खात,’ असे मानले जाते. त्यामुळे सारख्या नोकऱ्या बदलाव्या लागतात. कार्यानुभावाला पूर्वी असलेली किंमत आज कमी झालीये, नवीन रक्ताला वाव देणे सगळ्यांच्या सोयीचे झाले आहे. व्यवस्थापनाला सतत तरुण माणसे हवी असतात. त्यामुळे तरुण राहण्याला पर्याय नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. माणूस काम कसे करतो हे पाहत असतानाच तो प्रेजेंटेबल आहे की नाही हेही पाहिले जाते. उलट एखादी प्रेजेंटेबल व्यक्ती कामात थोडी डावी असली तरी चालवून घेण्याची वृत्ती वाढलेली आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्टमधल्या ‘फिटेस्ट’चे निकष बदलले आहेत.
हे सारे बरे की वाईट यात मला पडायचे नाही. पण अनुभवी माणूस, त्याचे अनुभव, त्याला त्यामुळे आलेले शहाणपण या सगळ्याला हल्ली ‘डावी घातलीये’ ते पाहून मला अचंबा वाटतो. आणि यामुळेच तरुण राहण्याचे खूळ इतके वाढले आहे की शहरी माणसाने त्यापाई आपली सारासार विवेकबुद्धी गहाण टाकली आहे.
पाश्चिमात्यांची नक्कल, आपल्या संस्कृतीत वयोवृद्धांना दिला जाणारा मान वगैरे कशाकशात मला जायचे नाही, कारण त्यात काही अर्थ नाहीये. फक्त शिंगे मोडून वासरात शिरताना आपली शोभा तर होत नाहीये ना, याचे भान वयस्कर मित्र-मैत्रिणींनी ठेवावे असे मात्र वाटते. नाहीतर मी वापरलेला ‘ययाती कॉम्प्लेक्स’ हा शब्द एखाद्या ‘बुलेमिया’ टाईप आजारासाठी सर्रास वापरला जाऊ लागेल, तसे होऊ नये!
(लेखिका गृहिणी आहेत)
CHAN LEKH AGDI ASECH AHE SATYA WASTUSTHITI