मध्येच कधीतरी तिचा गडहिंग्लजला कार्यक्रम होता तेव्हा आमची भेट झाली. तिनं संयोजकांना सुचवलं होतं की भाषणापेक्षा तिची मुलाखत घ्यावी नि मुलाखत माझी मैत्रीण सोनाली घेईल. मला भयंकर टेन्शन आलेलं. मी उदयकाकांच्या मदतीनं सिन्सिअरली तिचं तोवरचं जे मिळालं ते सगळं वाचून मुलाखतीचे मोठाले प्रश्न लिहून काढले. तिनं सांगितलेलं की काही टेन्शन घेऊ नको, पण मला जाम धडधडत होतं. ती घरी आली. मी तिच्याकडं प्रश्नांची प्रिंट आऊट दिली. माझ्याकडं न बघताच म्हणाली, झालं आता. हे इथंच ठेवायचं. तुला माझं लेखन ठाऊक आहे, मी ही बर्यापैकी ठाऊक आहे. तर तुला आवडलेल्या एखाद्या लेखापासून, कादंबरीपासून किंवा कवितेपासून सुरूवात करू नि शेवट तू म्हणतेस तसं मी एक-दोन कविता वाचेन. बाकी मधल्या वेळेत मस्त गप्पा मारू. गोष्टीतून गोष्ट सुचत जाते. बिनधास्त राहायचं. माझं धाबं दणाणलं होतं, पण तिच्यावर विलक्षण श्रद्धा, त्यामुळं नंतर तिनं ड्रेस कुठला घालणारेस? हा नको, तो घाल वगैरे सूचना देत मला हलकं केलं. मुलाखत रंगली, माझा आत्मविश्वास उजळला आणि महत्त्वाचं म्हणजे, ‘चांगली घेतलीस की मुलाखत!’ असं कविताताई लग्गेच म्हणाली. माझं घोडं गंगेत न्हालं.