गांधी-150=गांधी कथा
साभार – विजय तांबे
जीवनशैली
गांधीजी जिथे जात तिथे पत्रकार पोचत असत. नोआखालीच्या प्रवासात एका पत्रकाराने त्यांना विचारले ‘ गांधीजी आपण १९२५ मध्ये म्हणाला होतात की देशाच्या घटनेत मी हे कलम घालेन की जो शाररीक परिश्रम करून देशाची काही ना काही सेवा करेल त्यालाच मतदानाचा अधिकार असेल. आज सुद्धा आपण यावर ठाम आहात का? ‘
गांधीजीनी उत्तर दिलं ‘ यावर मी मरेपर्यंत ठाम राहीन. ईश्वराने माणसाला बनविलं आहे. म्हणून प्रत्येक माणसाचा हा धर्म आहे की त्याने बिनकामाचे खाउ नये. ज्याच्याकडे पैसे असतील त्याने ते देउन टाकावेत आणि सर्वांसोबत हातापायाचा वापर करून खावं. बुद्धीने रुपये वाढवून भोगाविलासाची साधने निर्माण करून ऐशोआरामात जगणे पाप आहे.’
—————————————————————————————————————-
हरिजन सेवा
यात्रेमध्ये गांधीजी मांगरोलला पोचले. रात्री सार्वजनिक सभा झाली. दूरवर काही अस्पृश्य मुली बसल्या होत्या. त्यांना बघून गांधीजी म्हणाले ‘ माणसाच्या सहनशक्तीलाही अंत आहे.जर या अस्पृश्य मुलींना तिथूनच बोलावे लागणार असेल तर कॉंग्रेस कमिटीने हे दिलेले मानपत्र खोटे ठरेल. मी आधीच सांगितलं आहे. मी अंत्यज आहे. भंगी आहे. ज्यांना मी आपले मानतो, त्यांना तुम्ही दूर ठेवणार आणि मला जवळ करणार , असं कसं होईल? तुमच्या स्वागत कमानीवर अस्पृश्यता निवारणाची सूत्रं पाहिली आहेत. आपला खोटेपणा आपली असमर्थता व्यक्त करतो. मला दिलेलं मानपत्र एकतर तुम्ही परत घ्या किंवा मला अस्पृश्यांच्यात जाउन बसू द्या. माझा धर्म अहिंसा आहे. मी आपल्याला त्रास देउ इच्छित नाही. माझ्यामुळे तुम्ही अस्पृश्यांना येउन दिलंत तर माझी अहिंसा लोप पावेल. मी धर्मरक्षणाचं जे बोललोय ते आपल्याला पटत असेल तर अस्पृश्यांना येथे येउन बसू द्यावे. त्यांना येउन देण्याविरूद्ध तुमचे मत असेल त्र तसं मोकळेपणाने सांगा.”
हात वरती झाले. त्यांना बोलवावे या मताचे हजार होते. बोलावू नये या मताचे पंचवीस तीसजण होते. गांधीजी म्हणाले ‘ अस्पृश्यता पाळावी सांगणारा गट छोटासा आहे. मी नम्रतापूर्वक सांगतोय की बाजूला बसावं. जर त्यांना माझं म्हणणं पटत नसेल तर ठीक आहे, मीच अस्पृश्यांच्यात जाउन बसतो.’
एक ब्राम्हण उठला. सुरवातीला गांधीजींची स्तुती करत म्हणाला ‘ मी ब्राम्हण आहे. या अशा गोष्टीने आम्हाला त्रास होतो. म्हणून तुम्हीच अस्पृश्यांच्यात जाउन बसा.’ मात्र सभेने अस्पृश्यांना सभेत बोलावण्याच्या बाजूने मत दिले होते. गांधीजीनी सभेला प्रार्थना केली ‘ आता आपल्या मतानुसार नाही करता येणार. मी त्यांच्यात जाउन बसलो तर चांगले होईल.’ असं सांगून गांधीजी अस्पृश्यांच्या दिशेने चालू लागले. त्यांच्यासोबत इतर दोनतीन जण उठले. एकाने विरोधी ब्राम्हणास सांगितले ‘ हे बघ. गांधीजी गेले तर आम्हीपण त्यांच्या मागे जाऊ. तुम्ही वेगळेच राहणार. मग आपण गेलात तर त्यात वाईट काय ?’
ब्राम्हण समजले. त्यांच्यातले दोन तीनजणच फक्त परतायला उठले. बाकीचे विरोध करणारे म्हणाले ‘ घरी जाउन अंघोळ करू.’ आणि तिथंच बसून राह्यले.
——————————————————————————————————-
जीवनशैली
एक दिवस गांधीजींकडे एक शेठजी आले. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर तक्रारीच्या सुरात म्हणाले ‘ बापू बघाना जगात केवढी बेईमानी आहे. मी पन्नास हजार रुपये खर्चून धर्मशाळा बनविली. आता बनल्यावर तिच्या कामितीतून मला बाजूला केलं. जेंव्हा बनली नव्हती तेव्हा कोणी नव्हतं. बनल्यावर अधिकार गाजवायला पन्नास जण आले.’
गांधीजी काही वेळानं शेठजींना म्हणाले ‘ तुम्हाला दानाचा अर्थ नीट कळत नाहीएय म्हणून ही निराशा आलीय. काहीतरी देउन त्याच्या बदल्यात काहीतरी मिळवायचं हे दान नव्हे. हा व्यापार आहे. आता तुम्ही व्यापार केलाच आहे तर मग लाभ आणि हानी दोन्हीसाठी तयार रहायला हवं. लाभही होउ शकतो. हानी सुद्धा होईल. ‘
शेठजी निरुत्तर झाले.
————————————————————————————————————–
जीवनशैली
महात्मा गांधी आणि गुरुदेव टागोर दिल्लीत होते. गांधीजी हरिजन निवासमध्ये रहात होते. तर गुरुदेव लाला रघुवीरसिंह यांच्या घरी होते.
गुरुदेव शांतीनिकेतन साठी देणग्या गोळा करायला आले होते. त्यांनी आपल्या सोबत नाटकाचा ग्रुप आणला होता. त्यांनी दिल्लीत त्यांचे सुप्रसिद्ध नाटक ‘ चित्रांगदा ‘ सादर केले. गुरुदेव अतिशय वृद्ध झाले होते तरीही त्या अवस्थेत ते मंचावर येत.
गांधीजीना हे आवडलं नाही. गुरुदेवांना शांतीनिकेतन सारखी संस्था चालवायला पैसे गोळा करण्यासाठी या वयात स्टेजवर यावे लागणे त्यांना लज्जास्पद वाटत होते. त्यानी महादेव भाईना आपल्या मनातली खळबळ व्यक्त केली. महादेव भाई म्हणाले ‘ बापू तुम्हाला आठवतं का? दक्षिण आफ्रिकेतून येउन तुम्ही गुजराथमध्ये आश्रम स्थापन करायचे ठरविलेत. तेंव्हा पुण्याच्या गोखलेंनी आपल्या सहाय्यकाला बोलावून सांगितले होते की तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढे देत चला. तो देत गेलं. केवढे उदार होते गोखले !’
गांधीजी म्हणाले ‘ बरं झालं. चांगली आठवण केलीस. तू एका काम कर . गुरुदेवांकडे जाउन त्यांना किती रुपयांची गरज आहे ते विचार. त्यानंतर तू यांच्याकडे जा. मी तुला पत्र देतो. ते गुरुदेवांना तेवढे रुपये गुप्तदानाच्या रोपात देतील. ‘
गुरुदेवांना हवे होते तेवढे पैसे मिळाले. उरलेले कार्यक्रम रद्द करून ते शांतीनिकेतनला पोचले.
——————————————————————————————————————————–
जीवनशैली
आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत असताना २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबांचे निधन झाले. अंत्यसंस्कार सार्वजनिक ठिकाणी करायला सरकारने परवानगी नाकारली. निवडक निकातावार्तीयांना हजर राहण्यास परवानगी दिली. गांधीजीनी महादेवभाईच्या समाधी शेजारीच बांची दहनक्रिया करायचे ठरविले. जेलर कटेली यांनी बांच्यासाठी शुद्ध खादी मागविली. गांधीजी म्हणाले ‘ मी उगाचच खादी जाळू इच्छित नाही. ती गरीबांना कामाला येईल.’
श्रीमती ठाकरसी यांनी चंदनाची लाकडे आणायची का असं विचारल्यावर गांधीजी म्हणाले ‘ जर मी गरीबाला चंदनाच्या लाकडावर अग्नी देउ शकत नाही तर बा ला कसं देणार ? ती ज्याची पत्नी आहे तो स्वत:ला गरीबातील गरीब मानतो. कसं जाळू चंदनाच्या लाकडावर ?’